14 March, 2010

गर्दीतले देवदूत


रोज मरे त्याला कोण रडे अशी म्हण आहे. खरं तर ती रोज रडगाणं गाणार्‍याकडे कुणी लक्ष देत नाही अशाअर्थी आहे. पण आपल्या मुंबईत लोकलखाली रोजच कुणी ना क़ुणी येत असतं आणि वर्दीतल्या माणसांच्या बेफिकीरीमुळे त्यातल्या बहुतेकजणांचे प्राण जातात. नुकताच असाच एक तरूण छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अपघातग्रस्त स्थितीत पडून होता. आजूबाजूची गर्दी त्याला पाहून हळहळत होती पण त्याच्या मदतीला नेहमीप्रमाणे कुणीच येत नव्हतं. वर्दीवाले आले नाहीत पण त्या गर्दीत असलेल्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्या तरूणाचे वडील येईपर्यंत थांबून त्या जखमी तरूणाला धीर तर दिलाच पण आपल्या मुलाला पाहून मूर्च्छित पडलेल्या वडीलांना आधाराचा हात दिला.

काळाचौकी तेथे रहाणारा अनिकेष कदम हा तरूण त्या दिवशी धावत्या लोकलमधून धक्कालागून पडला होता आणि त्याला तत्काळ मदत करणारे युवक होते जे.जे. कला महाविद्यालयात शिकणारे सुशांत वायदांडे, कुणाल पाटील, चेतन नेहते, मयूर गुलदगड आणि धवल मंगरूळकर. या सर्व युवकांचं अभिनंदन आणि त्यांच्या संवेदनशीलतेला सलाम ! तसच अशी सकारात्मक बातमी देणार्‍या लोकसत्ताच्या कैलास कोरडे यांना धन्यवाद.       

09 March, 2010

स्त्री शक्ती




अतीशय कठीण परिस्थीतीतून चातुर्याने मार्ग काढून कुटुंबाचं पर्यायाने समाजाचं जगणं सुकर करणार्‍या स्त्रीया आपण रोजच पहातो. नैसर्गिक मर्यादांमुळे अबला म्हणून गणला गेलेला स्त्री वर्ग आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर गगनाला गवसणी घालताना दिसतो. कालच मुंबई ते न्युयॉर्क या एअर इंडीयाच्या विमान प्रवासात पायलट पासून सर्व विमान कर्मचारी आणि प्रवाशी फक्त महिला होत्या, हा विक्रमही महिलांनी करून दाखवला. एव्हरेस्ट सर करणारी कृष्णा पाटिल असूदे नाहीतर अंटार्टिकावर १५ महिने राहून आलेल्या डॉ. देवयानी बोरोले असूदे स्त्री शक्तीचा हा वावर आता आपल्याला सर्वच क्षेत्रात दिसतो आहे. आज पर्यंत पडद्याआड असलेली किंवा जाणीवपुर्वक ठेवलेली ही शक्ती आता खर्‍या अर्थाने कामी येते आहे.

या पार्श्वभुमीवर गेली १४ वर्षं संसदेत अडकलेलं महिला आरक्षण विधेयक काल पास होईल असं वाटत असतानाच बैल बाजाराला लाजवेल एवढ्या उन्मत्तपणे त्याला विरोध करण्यात आला. लालू , मुलायम, शरद या यादवांनी आणि त्यांच्या बगलबच्चांनी दांडगाई करून महिला आरक्षण विधेयक रोखलं. याच लालूने राबडीदेवीच्या खुर्चीआड राहून राज्य केलं तेव्हा त्याला लाज वाटली नव्हती हे विशेष. आज सदर विधेयक पास होईल अशी आशा करूया नव्हे तसे झाले पाहिजे.              

05 March, 2010

थिंक महाराष्ट्र


Logoआज थिंक महाराष्ट्र (thinkmaharashtra.com) हे संकेतस्थळ इंटरनेटवर अधिकृतपणे अवतीर्ण होत आहे. जेष्ठ पत्रकार आणि गंथालीचे श्री. दिनकर गांगल यांच्या नेतृत्वाखाली  हे संकेतस्थळ तयार झाले आहे. महाराष्टीय समाजातील चांगुलपणा आणि गुणवत्ता यांचे नेटवर्कींग करावे आणि त्याद्वारे समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे यासाठी गेले काही महिने काही तरूण व अनुभवी ज्येष्ठ मंडळी एकत्र येवून विचारविनिमय करत होती त्यातून थिंक महाराष्ट्र डॉट ऑर्ग या प्रकल्पाचा जन्म झालेला आहे.

आज शुक्रवार ५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबई येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात थिंक महाराष्ट्र डॉट ऑर्ग इंटरनेटवर अवतरणार आहे. याच कार्यक्रमात ब्लॉग, वेब माध्यम आणि मराठी या विषयावर एक परिसंवाद होणार असून त्यात संजीव लाटकर, अतुल तुळशीबागवाले, माधव शिरवळकर, रामदास बिवलकर आणि तात्या अभ्यंकर सहभागी होणार आहेत.   

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates