03 February, 2012

लिटल ब्युटी


‘जीवनी संजिवनी तू बालकाचे हास्य का ?’ जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असणार्‍या भगवंताला कवीने विचारलेला हा प्रश्न. खरच देवाचं दर्शन याची देही याची डोळा घ्यायचं असेल तर फुलं आणि मुलं यांच्या शिवाय पर्याय नाही. रोज नवोन्मेषाने बागडणारी बालकं पाहिली की जीवन किती आनंदाने भरलेलं आहे याचा साक्षात्कार होतो. आजच्या धकाधकीच्या रहाटगाडग्यात या मुलांकडे पाहायला वेळ कुणाकडे आहे?
पण त्या सानुल्या बालकांचे अनेक भावविभ्रम केवळ एका पेंसिलच्या सहाय्याने साकार केले आहेत विनायक धारगळकर यांनी. चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरचे निरागस भाव तेवढ्याच तरलतेने कागदावर उतरवलेले पाहून आपण थक्क होवून जातो.  गोजीर्‍या बालकांचं हास्य, लटका भाव, खेळात रममाण होणं, आपल्याच नादात असणं, विस्फारीत नेत्रांनी जगाकडे पाहाणं, फुरंगटून बसणं अश्या अनेक भावमुद्रा त्यांनी तेवढ्याच हळूवारपणे सादर केल्या आहेत. एका स्केच मध्ये तर ती चिमुरडी आपणला पाठमोरी दिसते पण तिच्या चेहर्‍यावरचे कुतुहूल आपणाला तो चेहरा न पाहताही जाणवत राहतं हेच धारगळकारांच्या हातामधलं कसब आहे.

अशाच अनेक चित्रकृती ‘लिटल ब्युटी” या आपल्या प्रदर्शनातून विनायक धारगळकर यांनी मांडल्या आहेत. स्थळ आहे, ऎरावत आर्ट गॅलरी, 29 बाळक़ृष्ण निवास, एल. एन. रोड, वेलिंगकर मॅनेजमेंट इंस्टिट्यूट जवळ, माटुंगा (मध्य रेल्वे) मुंबई 400 019. दि. 2 ते 11 फेब्रुवारी 2012, सकाळी 11 ते  सायंकाळी 7 या वेळात सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे. अधिक माहितीसाठी 24135851 वर संम्पर्क साधावा.                 

30 January, 2012

वार्षीकोत्सव


असे उत्सव जे वर्षातून एकदा येतात. अनेकदा ते करायचे म्हणून केले जातात. मराठी माणूस तसा उत्सव प्रिय. सदा सर्वदा काहीना काही कारण काढून उत्सव साजरे करणं हा वसाच जणू यांनी उचललेला असतो. आमच्यासाठी मात्र इशा टुर्सचं प्रभादेवीला भरणारं प्रदर्शन म्हणजे वार्षीकोत्सव असतो. तशी यावर्षी डोंबिवली, पुण्याला दोन प्रदर्शनं झाली पण मुबईचं प्रदर्शन म्हणजे महोत्सव असतो. अनेक मित्र जे एरवी फोनवरच भेटतात ते या प्रदर्शना दरम्यान भेटतात. अनेक नव्या ओळखी होतात. तर्‍हेतर्‍हेची माणसे भेटतात. काही नमुने ही......असो.

कित्येक जण सहलींकडे आकृष्ट होतात. छायाचित्र पाहाण्यात रममाण होतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. वन्या सहलींचे बेत नक्की होतात. या वेळचं प्रदर्शन नेहमी प्रमाणे लडाखवर नाही तर केनियावर आहे. जशी केनियात पक्षी प्राण्यांची लयलूट आहे तशीच मनोहारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम तसा अनौपचारीक असतो.या वर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ छायाचित्रकार अधिक शिरोडकर आपली महत्वाची कामं थांबऊन आवर्जून आले होते. त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा ते आत्माला म्हणाले एक चांगलं प्रदर्शन रविंद्रला आहे तुम्ही पण या. क्षणभर कळेना हे कुठल्या प्रदर्शना विषयी बोलताहेत? पण आमच्याच प्रदर्शनाची बातमी हिंदुस्तान टाईम्स मध्ये वाचून ते फिरकी घेत होते. प्रत्यक्ष उद्घाटनाला आल्यावरही त्यांचं मिश्कील बोलणं आणि फोटो आणि प्राण्यांबद्दल अभ्यासपुर्ण बोलणं ऎकलं आणि प्रदर्शनाचा श्रीगणेशा तर उत्तम झाला असं मनोमन वाटून गेलं. येता आठवडाभर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. जरुर भेट द्या. आनंद घ्या.               

 


वैभव मांगले


26 January, 2012

आकार पॉट आर्ट

मातीला पाय जरी  लागला  तरी ई..ई...ई....! करत ओरडणारी शहरी मुलं मातीला हात लावायला उद्युक्त होतात, माती बरोबर खेळायला तयार होतात, मातीच्या प्रेमात पडतात. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण होतात, गृहिणींना काय विकत घेऊ आणि काय नको असं होतं. आकार पॉट आर्ट च्या दालनात प्रवेश केल्या केल्या हे असं घडतं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ ला लागून असलेल्या तलाशेट, इंदापूर इथे हे आकार पॉट आर्ट चं दालन आणि कार्यालय आहे.

‘फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार’ या गाण्याच्या ओळी सहज ओठावर येतात, पण इथला वेडा कुंभार मात्र परंपरागत कुभार नाही. राजेश कुलकर्णी यांना समोर पाहिल्यावर ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे व्हाइट कॉलर व्यक्ती वाटतात, पण एकदा का ते चाकावर अदाकारी करायला लागले की थक्क व्हायला होतं. बघता बघता  समोरची माती पणती, मडकी, चंबू, घडा, नरसाळे असे अनेक आकार घ्यायला लागते, एकीकडे हात चालत असतानाच या कले विषयी ते भरभरून मोकळे पणाने बोलत राहातात, माहिती देत राहातात. समोरच्या मातीच्या गोळ्याला त्यांच्या हाताचा स्पर्श होतो आणि वेगवेगळे आकार साकार होतात, ते पाहून आपण अचंबीत होतो पण ते तेवढ्यावरच थांबत नाहीत, अजून त्यांच्यातील कलाकार पुर्ण सादर झालेला नसतो. ते सर्व आकार एक एक करून हातात घेत त्यांना ते आणखी खुलवतात आणि एक पुर्ण कलाकृती रुप घेते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा गणनायक, तो गणपती त्या मधून प्रकट होतो. मन समाधी अवस्थेत जातं.

राजेश कुलकर्णी 
पेण, जवळचच माणगाव ही तर कलाकारंचीच भुमी. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेला इलाखा हळूहळू शहरीकरणाने व्यापून जात असतानाच आणि इथले मुळचे कुंभार आपला व्यवसाय सोडून ऊपजीविकेसाठी इतर व्यवसायात गुंतले असताना राजेश कुलकर्णीनी मातीत हात घातला आणि त्यातून सोनं निर्माण केलं. आपल्या सोबत गावातील दहा-बारा तरूणांना त्या कलेचं बाळकडू पाजून तयार केलं आणि गावातच स्थिरस्थावर केलं. गाव आणि गावच्या मातीमध्ये ते भक्कमपणे उभे आहेत.

इथे गेल्यावर खुप हलकं हलकं वाटलं. ट्रेस मॉनेजमेंट कुठलाही वर्गाला हजेरी न लावताही.        
       




LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates