छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करताना अधिक शिरोडकर साहेब |
तसे शिरोडकर साहेब नेहमीच भेटत असतात. कधी वर्तमान पत्रातून, कधी दूरदर्शन वाहिन्यांवर, कधी त्यांच्या छायाचित्रांतून, तर कधी एखाद्या कार्यक्रमात. काल भेटले ते मात्र माझा मित्र आत्माराम परब याच्या ‘गोठलेलं लडाख’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात. एक साधा नगरसेवक (माफ करा चुकून म्हटलं साधा, नगरसेवक म्हटला की तो ‘दादा’च जास्त असतो.) किती छाती फुगवून चाललेला असतो. पण खासदार राहिलेले अधिकजी कसलाच बडेजाव राखून नव्हते. वॉंन्डरर्सच्या मागच्या एका प्रदर्शनात झालेली ओळख त्यांनी लक्षात ठेवली होती आणि काल समोर गेल्या गेल्या हात हातात दिला. गप्पांच्या ओघात अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या पण कुठेच ‘मी’ पणा नव्हता. जीवनाकडे बघायचा दृष्टीकोनही अगदी सरळ साधा पण मुद्द्यांवर बोट ठेवणारा.
मागच्या प्रदर्शनाला ते आले तेव्हा काही वेळ स्वतःमध्ये हरवलेले वाटले. थोड्या वेळाने फोटो पहाण्यात रमून गेले. मग बोलता बोलता म्हणाले मला पुन्हा नवी उभारी आली. तीन दिवसांपुर्वीच त्यांची लाडकी मुलगी देवाला प्यारी झाली होती. त्या दुःखातून उठून दुसरासा आला नसता पण अधिकजी आले. आमच्यात रममाण झाले. काल सुद्धा म्हणालेच गेल्या चार वर्षात पायाची दोन ऑपरेशनस् झाली, बायको गेली, मुलगी गेली हे व्हायचच, पण अशा ठिकाणी आल्यावर बरं वाटतं. आता वय झालं तरी अजून मला फिरावसं वाटतं. देवाच्या मनात असेल तर मी पुन्हा नक्की लडाखला जाणार. वय झालं तरी उत्साहं कायम आहे आणि त्यांच्या चेहर्यावर बालकाचं हास्य मी सतत पहात होतो.
छायाचित्रण हा तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. नुकतच जहांगिर आर्ट गॅलरीत त्यांचं वन्य जीवनावरचं छायाचित्र प्रदर्शन झालं. हे त्यांच आठवं छायाचित्र प्रदर्शन. परंपरागत फोटोग्राफित पारंगत असलेले अधिकजी सध्याच्या डिजिटल फोटोग्राफितही तेवढेच वाकबगार आहेत. ऎशी वय झालं तरी त्यांनी मानसिक वय वाढू दिलेलं नाही. नवं तंत्रज्ञानही तेवढ्याच आवडीने अवगत केलं. देशातले आघाडीचे कायदेतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे छायाचित्रकार म्हणून त्यानी त्यामुळेच नाव कमावलं.
जंगलात जाऊन केवळ फोटोग्राफी केली म्हणजे झालं असं न मानता त्यानी जंगलाच्या संवर्धनासाठीही कार्य केलं. संसदेच्या पर्यावरण विषयक समितीवर असताना आणि आता पायउतार झाल्यावरही त्यांचं जंगलाविषयीचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. भरतपूरवर तर त्यांचं विशेष प्रेम. बंदी असलेल्या भागात गाडी घेऊन आलेल्या मंत्र्याला त्यांनी परत पाठवलं त्याचा किस्सा काल ऎकताना पर्यावरणावरचं त्यांचं प्रेम हे बेगडी नसल्याचं जाणवत होतं.
खर्या कार्यकर्त्याचा उत्साहं वाढवण्याचं कसब तर काल थोडक्या वेळातही दिसून आलं. गंगाजलचे श्री. विजय मुडशिंगीकर, नेत्रहिनांचा नेत्र असलेले श्रीपाद आगाशे यांना त्यानी दिलेलं उत्तेजन विचार करायला लावणारं होतं. आत्माच्या ‘गोठलेलं लडाख’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यानी आत्माचं मुक्तकंठाने कौतूक केलं. लोक निसर्गाला विसरत चालले असताना आत्मारामने लोकाना पुन्हा निर्सगाकडे नेण्याचं काम केलं आहे. लडाखसारख्या ठिकाणी पर्यटकाना नेणं ही साधी गोष्ट नाही. आणि तिथला निसर्ग छयाचित्रातून मांडणं ही त्याहून कठिण बाब असल्याचं अधिकजींनी नमूद केलं. स्वतः श्रेष्ठ छयाचित्रकार असूनही तेवढ्याच चांगल्या छयाचित्रकाराला दाद देणं मी मी म्हणणार्यांना जमेलच असं सांगता येत नाही. अधिकजींना दिर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो आणि लडाखला जायची त्यांची इच्छा आत्मारामच पुरी करो हिच सदिच्छा.
No comments:
Post a Comment