03 May, 2020

कुत्रे बिस्कीट



कुत्रे बिस्कीट... खुप दिवसांनी आठवली ही बिस्कीटं. तळ कोकणात त्या काळी (आता खरं तर त्याला कोणे एके काळी असंच म्हटलं पाहिजे) पाववाला सकाळीच शहरवजा गावामधून पाव, बिस्कीटं विकण्यासाठी सायकलने फेरी मारायचा. त्याच्या सायकलला घंटी ऐवजी ट्रकला असायचा तसा हॉर्न असायचा. तो पॉsss पॉsss करीत गावभर फिरायचा. पाववाल्याजवळ गिर्‍हाईक यायच्या अगोदर गावातले तमाम कुत्रे जमा व्हायचे. सायकलपासून थोडं  अंतर ठेवून मागून धावत रहायचे. बेकरीतल्या ताज्या पाव-बिस्कीटांचा दरवळ कुत्र्यांना मॉर्निग वॉक करायला भाग पाडायचा. पाववाला पाव-बिस्कीटं विकायला थांबायचा, मध्येच कधीतरी कुत्र्यांच्या दिशेने काही बिस्किटं फेकायचा. पुन्हा सायकलचा पॅडल मारून पॉsss पॉsss करीत रस्त्याला लागायचा.

आता यात कुत्रे बिस्कीटांची महती अशी की ती माणसाला आणि कुत्र्यांना दोघांनाही आवडायची. कुत्र्याला पावही आवडत असणार पण त्याला तो कोण देणार? रुपयाच्या नाण्याएवढीच असलेली ही बिस्कीटं मात्र कुत्र्यांना पाववाल्याकडून किंवा गाववाल्यांकडून मिळायची.

काल ही गोष्ट घरात सांगितली तेव्हा माझी मुलगी विचारायला लागली कुत्र्यांसाठी होती म्हणून त्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटं म्हणायचे का? म्हटलं नाही, तेव्हाचे कुत्रे एवढे माजलेले नव्हते आणि गाववाले श्रीमंत नव्हते. कुत्र्यांना द्यायला ती इवलीशी बिस्कीटंच परवडायची, पाववाल्यामागे बिस्कीटांच्या वासामुळे कुत्रे फिरत रहायचे त्यामुळे असेल किंवा त्याच्याकडून त्यांना ती बिस्कीटंच मिळायची म्हणून असेल त्या छोट्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटंअसं नाव पडलं.

आताचे कुत्रे माणसांनी खायच्या बिस्कीटांना हुंगून बघतात आणि तुम्हालाच लखलाभ होवो अशी चर्या करून निघून जातात. वक्त वक्त की बात है, काळाचा महिमा अघाद आहे. कुत्रंपण खात नाही ते माणूस खातो.                

02 May, 2020

स्वप्नांचा प्रवास






वाटा असती कधी न सोप्या
अवचित कधी ती वाट अडे
कडेकपारी सह्याद्रीच्या
घालून देती हेच धडे

पायवाटा माझ्या झाल्या म्हणत त्या वाटांचंच हमरस्त्यात रुपांतर करीत नसते अवघड काही रे म्हणणार्‍याचीही आज वाटांवरती काटे रे अशी अवस्था झाली आणि न सुटणारं हे कोडं कसं सोडवायचं अशी स्थिती आहे.

खरंच आज वाटा अडल्या आहेत आणि सगळं जगच बंदीवान झालं आहे. पायाला चाकं असलेल्याची तर पार कुचंबणा झाली आहे. पण हेही दिवस जातील आणि पुन्हा एकदा आपण सगळे नव्याने बाहेर पडूच....! आज ही खात्री वाटण्याचं कारण ठरला प्रिय मित्र आत्माराम परब. फेसबुक वॉच पार्टीवर चांगला पाऊण तास या पठ्ठ्याने गप्पांची मैफिल रंगवली. मी पुढे जाणारच या दुर्मम्य इच्छाशक्ती पुढे कोरोना हरेलच पण पुन्हा नव्याने जगभराची भ्रमंती सुरू होईल.  आत्मा बोलत असताना गेला दिड महिना दाटून आलेलं मळभ कुठल्याकुठे नाहीसं झालं आणि नव्या वाटा पुन्हा साद घालू लागल्या. त्याचं बोलणं सुरू असताना येणार्‍या  प्रश्नांवरून हे लक्षात येत होतं. मित्रहो मन प्रसन्न करणारे खुप छान क्षण होते ते. आपणही याचा आनंद या लिंकवर जाऊन लुटाच:



              

26 April, 2020

कृतज्ञता




मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारणअसं आपल्या तुकाराम महाराजानी सांगून ठेवलं आहे. हे प्रसन्न मन हे सिद्धीचं साधनही होवू शकतं.

मन गुरु आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।

असं मन प्रसन्न करण्याचं एक कारण काल घडलं.  प्रिय मित्र आत्माराम परब यांनी वेबीनारची लिंक पाठवली आणि पावणे दोन तासांची एक मैफिल जमून गेली. श्री. विभास जोशी (https://pragatileadership.com/team/vibhas-joshi) यांनी या वेबीनारची आखणी आणि सुत्र संचालन केलं होतं. अनेकदा ऐकलेले मुद्दे पण या नेमक्या वेळी खुप छान आणि सुत्रबद्धरितीने त्यानी मांडले आणि मनातली जळमटं दूर करून टाकली. त्यांचा  कृतज्ञता (Gratitude) व्यक्त करणे हा मुद्दा खरच खूप भावला. महिन्याभराच्या बंदमधून पुढल्या किती ते माहित नसलेल्या बंदकडे वाटचाल होत असताना स्थिरचित्त कसं रहावं आणि का रहावं हे ते जाता जाता सांगून गेले. म्हणाले कितीतरी कारणं असतील ज्यासाठी आपण आभार मानले पाहिजेत, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आत्माने अशा अनेक गोष्टीत मला सहभागी करून घेतलं आहे खरंच मी त्याच्या प्रती कृतज्ञ आहे.      

कशाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे याची यादीच करायाला घेतली तर.... असा विचार केला आणि कितीतरी गोष्टी नजरेसमोर येवू लागल्या. जिवाभावाची माणसं बरोबर आहेत, रहायला घर आहे, जेवण मिळतय, वेगवेगळे पदार्थ करून बघता येत आहेत, विशेष म्हणजे प्रकृती उत्तम आहे, चावलेलं गिळता येतं, खाल्लेलं पचतय, पाय घरात असलेतरी ते चालताहेत, या लॉकडाऊनमधून बाहेर पडून पुन्हा नक्की भभारी घेऊ अशी खात्री आहे, आपण एकमेकांना मोबाईलवर पाहू शकतो; बोलू शकतो, राहून गेलेलं वाचन पुर्ण करू शकतो, शोशलमिडीयाचा वापर करू शकतो, छंद जोपासता येताहेत, याही परिस्थितीत हसू फुलवणारे मित्र आहेत, पक्षी आकाशात उडताहेत, जग थांबलेलं नाही, आपल्या जिवावर उदार होवून डॉक्टर; परिचारीक, पोलिस, सफाई कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीवाले, दुधवाले, औषध दुकानदार इ. सगळे आपल्याला सेवा पुरवत आहेत, लहान मुलं निरागसपणे हसताहेत, मुख्य म्हणजे आशा आणि जिद्द कायम आहे, देव पळालेले नसून कुणीतरी काळजी घेतय, मन मोकळं करायला मित्र नातेवाईक आहेत, गाणी-गोष्टी ऐकू शकतो, व्यायाम- योगासनं करयला भरपूर वेळ आहे,  ध्यान लावू शकतो, कुटुंबाला वेळच वेळ देवू शकतो ही यादी आणखी वाढवू शकतो या सगळ्या गोष्टींबद्दल  मी आज  कृतज्ञ आहे. घरात बंद झालो असलो तरी आनंदी आहे. कोरोनावर उपाय सापडेलच पण त्याला मनावर स्वार व्हायला द्यायचं नाही हे आपल्या हाती आहे.    

राजास जी महालीही संत तुकडोजी महाराजांची कविता लहानपणी शिकलो होतो त्या कवितेचा अर्थ आत्ताकुठे समजू लागलाय. त्यातली पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे ही ओळ मनाला भावली.            

नरेंद्र प्रभू 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates