30 April, 2022

हा असाच असतो बाप


परममित्र विजय मुडशिंगीकर यांनी FBवरच्या एका दर्जेदार पोस्टवर एक प्रतिक्रीया दिली आणि ती पोस्ट वाचून ही कविता सुचली.   


हा असाच असतो बाप सोसतो ताप लेकरासाठी

वणवणतो उघड्यापायी अन् फिरतो जोतापाठी  

 

उचलून घेतसे कवळ्या त्या कलिकेला

अन् योजत जातो तिच्याच आयुष्याला

मोजतो नगद अन् जमतो घाम कपाळी

सावरतो उठतो निघतो रोज सकाळी  

 

शाळेच्या खेळामध्ये नसते त्याला गम्य

परी झटतो करतो तीच्याचसाठी रम्य

कधी पुस्तक-पाटी घेऊनी म्हणतो आलो

वाण्याच्या वहीत आजच दाखल झालो

 

हरखुन ऐकतो पहिला नंबर आला

पोशाख तीचा तो किती जुना बघ झाला

मागतो मोडतो गळ्यामधली वाटी  

जी एकच होती कशी मागावी प्रिती?

 

अन् आता होईल कन्या ती अधिकारी  

घेऊन चालला तीजसाठी ही शिदोरी

पण... भाकर-चटणी त्याच्यासाठी गोड 

लागली सुकी जरी प्रेमाला नाही तोड


हा असाच असतो बाप सोसतो ताप लेकरासाठी

वणवणतो उघड्यापायी अन् फिरतो जोतापाठी  

 

नरेंद्र प्रभू

३०/०४/२०२२ 

01 March, 2022

ती आई होती म्हणूनी...

 

चित्र: सौ. रेखा भिवंडीकर 


काल memoir हे चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर मन अजूनही तिथेच रेंगाळत राहिलंय. त्या चित्रांनी असा फेर धरलाय की दुसरं काही सुचत नव्हत. ही कविता स्फुरली आणि मगच बरं वाटलं.      


ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मी ही झालो

किती वेळ आतल्या आत दुलाईला कवळून बसलो

 

तो स्पर्श मुलायम होता; जरी हात राबले होते

कष्टाने ओढीत होती ते शुभ्र पिठाचे जाते

 

बागेला फुलण्याचेही ती स्वप्न दाखवीत होती

फुलताना मजलाही 'ती' 'ही' फुले देऊनी गेली

 

किती काळ लोटला आहे ती पुन्हा समोरी आली

मायेच्या ओलाव्याने मज चिंब भिजवूनी गेली

 

ती आई होती म्हणूनी...

 

नरेंद्र प्रभू


27 February, 2022

Memoir

 


फुल फुलल्यानंतर त्याचा सुगंध सर्वदूर पसरतो पण ते उमलताना पहीलं म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे काय त्याची प्रचिती येते. कला विकसीत होताना पहायला मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. सौ. रेखाताई भिवंडीकर या त्यापैकी एक आहेत. त्याच्या कलेची परीपक्वता न्याहाळायची असेल तर अशी संधी आपणाला उद्याच चालून येणार आहे. 


सुप्रसिद्ध चित्रकर्त्या सौ. रेखाताई भिवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या 

चित्रांचं
मेमोयरहे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी जहांगीर कलादान,१६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात येणार आहे.  सदर प्रदर्शन दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.


सौ. रेखाताई भिवंडीकर या उत्तम छायाचित्रकार आहेत. उत्तम निसर्ग छायाचित्रं टिपणं हा त्यांचा छंद आहे. पण कुंचल्यातून चित्र साकार करताना कॅनव्हासवर जे उमटतं त्यांची रचना त्यांच्या स्मृतीपटलावर कितीरती आधीच झालेली दिसते. त्यांच्या संस्मरणातून साकार झालेली चित्रं पहाताना आपण आपल्याच बालपणातील जगात कधी पोचतो हे समजत देखील नाही. विविध माध्यमातील आणि शैलीमधील चित्रं साकारताना त्याना नकळत त्यांची स्वता:ची अशी एक शैली सापडली आणि मग रंग-कुंचल्याचा जो अविष्कार कॅनव्हासवर झाला त्यातून ही चित्रमालीका कला रसिकांच्या भेटीला येत आहे.   

आई आणि मुलीचं साधेपणात व्यतीत झालेलं जीवन, त्यालील बारकावे, प्रेम, जिव्हाळा, निखळ मैत्री, ममता अशी सौदर्य स्थळं,आणि उमदेपणा, भावूकपणा  यथार्थवादी शैलीमध्ये रेखातांईंच्या चित्रांमधून प्रतिबिंबित झाला आहे. मानवी जीवनाची ही लड त्यानी किती हळूवारपणे कॅनव्हासवर उतरवली आहे ते अनुभवण्याची सुवर्णसंधी मुंबईकर कला रसिकांनी मिळणार आहे याचा जरूर लाभ घ्यावा.

नरेंद्र प्रभू

       


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates