30 April, 2022

हा असाच असतो बाप


परममित्र विजय मुडशिंगीकर यांनी FBवरच्या एका दर्जेदार पोस्टवर एक प्रतिक्रीया दिली आणि ती पोस्ट वाचून ही कविता सुचली.   


हा असाच असतो बाप सोसतो ताप लेकरासाठी

वणवणतो उघड्यापायी अन् फिरतो जोतापाठी  

 

उचलून घेतसे कवळ्या त्या कलिकेला

अन् योजत जातो तिच्याच आयुष्याला

मोजतो नगद अन् जमतो घाम कपाळी

सावरतो उठतो निघतो रोज सकाळी  

 

शाळेच्या खेळामध्ये नसते त्याला गम्य

परी झटतो करतो तीच्याचसाठी रम्य

कधी पुस्तक-पाटी घेऊनी म्हणतो आलो

वाण्याच्या वहीत आजच दाखल झालो

 

हरखुन ऐकतो पहिला नंबर आला

पोशाख तीचा तो किती जुना बघ झाला

मागतो मोडतो गळ्यामधली वाटी  

जी एकच होती कशी मागावी प्रिती?

 

अन् आता होईल कन्या ती अधिकारी  

घेऊन चालला तीजसाठी ही शिदोरी

पण... भाकर-चटणी त्याच्यासाठी गोड 

लागली सुकी जरी प्रेमाला नाही तोड


हा असाच असतो बाप सोसतो ताप लेकरासाठी

वणवणतो उघड्यापायी अन् फिरतो जोतापाठी  

 

नरेंद्र प्रभू

३०/०४/२०२२ 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates