Showing posts sorted by relevance for query भूतान. Sort by date Show all posts
Showing posts sorted by relevance for query भूतान. Sort by date Show all posts

04 August, 2012

जाता बुद्धाच्या देशा –भूतान भाग : 2


भारत-भूतान प्रवेशद्वार

सकाळचे सात वाजले तरी अजून चहा मिळाला नाही म्हणून मंडळींची चुळबूळ सुरू होती. भूतान मधील फुन्तशोलींग मधल्या हॉटेल मध्ये आम्ही होतो तरीपण भारतातल्या जयगावमधलेच कामगार तिथल्या हॉटेलमध्ये कामाला होते आणि साडेसात वाजल्याशिवाय त्यांना भूतान मध्ये प्रवेश मिळणार नव्हता. ते कामगार आल्यावरच चहा बनणार होता. आपल्याला कितीही घाई असली तरी त्या त्या ठिकाणचे व्यवहार तिथल्या पद्धती प्रमाणेच चालतात. चिंता मत करो साबजी, सब हो जायेगा अशी आश्वासनं गंभिरपणे घ्यायची नसतात. एरवी अंथरूणात लोळतपडणारे आपण अशा ठिकाणी गेलो की, विशेषत: हिमालयात गेल्यावर लवकर उठतो, तिथल्या हवामानामुळेच आपल्याला ताजतवानं वाटून लवकर जाग येते. थंड हवामान आणि उठल्या उठल्या लागणारा चहा या सवयीमुळे चहाला लागणारा उशीर नकोसा होतो.

स्वच्छ, सुंदर  भूतान
चहा मिळाला, नाश्ता तयार होईपर्यंत बाहेर फेरफटका मारून यावं म्हणून हॉटेलच्या बाहेर आलो. काल काळोखात निट न पाहिलेला भूतान-भारत सिमेवरचा भाग बघावा म्हणून तिकडे वळलो. भूतान मधले रस्ते झाडून स्वच्छ केल्यासारखे होते तर पलिकडचे जयगावचे रस्ते कचर्‍याने भरून गेले होते. काही पावलांच्या अंतरात हा जमीनास्मानाचा फरक होता. हा वृत्तीतला आणि वागणूकीतला फरक आहे. भूतान मधले लोक आपला परीसर स्वच्छ ठेवू शकतात तर आपण भारतिय का नाही? आपण भारतातले आहोत आणि घाण करणारे हेच ते लोक अशा नजरेने आपल्याकडे सगळे भुतानी पहात आहेत असा माला भास होवू लागला. सार्वजनिक स्वच्छतेबद्दल भूतानची जनता जागरूक आहेच.

फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य
नाश्ता आटोपून निघण्याच्या तयारीने बाहेर पडलो. आज आमची गाडी सलीम चालवत होता. हा सलीम म्हणजे माहितीचा खजिनाच होता. (सलिम बद्दल वेगळं पोस्ट लिहायचा माझा विचार आहे.) शंभर सव्वाशे मिटर अंतर गेल्यावर फुन्तशोलींग शहर संपले आणि चढाव सुरू झाला. गाडी एक डोंगर चढत होती, असे सात डोंगर पार करून आम्ही १८० कि.मी. वरच्या थिंपू या भूतानच्या राजधानीच्या शहरात पोहोचणार होतो. उंचावरून फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य दिसत होतं. एका वळणावर इंजिनीअरींग कॉलेज दिसलं, हे भूतान मधलं एकमेव इअंजिनीअरींग  कॉलेज, सलीमने माहिती पुरवली. संपूर्ण भूतान हिमालयात वसलेलं असूनही इथले रस्ते दृष्ट लागावेत एवढे उत्तम आहेत. हे भूतानचे रस्ते आपल्या लष्कराच्याच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या Dantak  या कंपनीने बनवलेले आहेत. भूतान मध्ये १९६० पर्यंत मोटरवाहतूकीचे रस्तेच नव्हते. त्यानंतर भारताशी झालेल्या करारानुसार तिथे रस्ते बांधले गेले. भूतानची संरक्षण व्यवस्थाही भारतच पाहतो. त्यामुळे तिथे आपलं भारतिय सैन्य खडा पाहा देत होतं.  

शिस्तबद्ध वाहतूक
वाटेत भारतिय लष्कराच्याच एका कॅंटीनमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. पुणे सातार्‍यकडचे काही सैनिक आम्हाला तिथे भेटले, पण मालवणी बोलणारा कणकवली जवळचा एक सैनिक भेटला तेव्हा तर आम्हाला खुप आनंद झाला. प्रसन्न करणारा गारवा आणि सृष्टी सौदर्याची मजा घेत आमचा प्रवास सुरू होता. वाटेत कुठेतरी रस्त्याचं काम सुरू होतं म्हणून गाड्या थांबल्या. पाय मोकळे करायला आम्ही गाडी बाहेर पडलो. थोड्याच वेळात वाहनांची रांग लागली. रस्त्यात एका मागोमाग एक थोडं अंतर ठेवून थांबलेल्या गाड्या पाहून त्यांच्या शिस्तीचं कौतूक वाटलं. पुढे जायची गडबड नाही की कर्कश हॉर्न वाजवणं नाही. साधारण तासाभराने वाहतूक पुन्हा सुरू झाली. दिवस मावळतीला चालला असतानाच आम्ही थिंपू शहरात प्रवेश करते झालो. ताबा इथे असलेलं वागचुक रिसॉर्ट येईपर्यंत दिवस काळोखात बुडाला. शहरापासून दूर टेकडीवर असलेल्या रिसॉर्टमध्ये पोहोचलो तेव्हा कडाक्याच्या थंडीने गारठायला होत होतं.

वांगचूक रिसॉर्ट
वांगचूक रिसॉर्ट हे थिंपू मधलं फोर स्टार हॉटेल आहे. गेल्या गेल्या गरमागरम चहाने आमचं स्वागत झालं. हॉटेलच्या मुलींनी आमच्या सामानाचा ताबा घेतला. मॅनेजरपासून कुकपर्यंत सगळ्या मुलीच कामं करताना दिसत होत्या. अप्रतिम रुम्स आणि आतलं वातावरण पाहून प्रवासाचा शिण कुठल्याकुठे निघून गेला. गरम पाण्याने आंघोळी झाल्यावर प्रशस्थ अशा डायनींग हॉलमध्ये मंडळी जमली पण बुखार्‍याजवळ गर्दी करून उभं राहण्यातच जास्त मजा येत होती. थंडीचा कडाका अजूनच वाढला होता.  

   

02 August, 2012

जाता बुद्धाच्या देशा – भूतान भाग : १



बागडोगरा विमातळ

पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक जीएनएच’ (Gross National Happiness) किती आहे हे पाहिलं जातं तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान. थिंपू या देशाच्या राजधानीच्या शहरातही सिग्नल यंत्रणा नसलेला पण वाहतूकीचे नियम अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश म्हणजे भूतान. इतर सारं जग उत्पन्न कसं वाढेल याच्या चिंतेत असताना पर्यटकांची गर्दी नाकारणार्‍या पर्यायाने पर्यटन उद्योगामुळे मिळणार्‍या मिळकतीवर पाणी सोडणारा देश म्हणजे भूतान. सगळा देशच जागतीक वारसा आहे असं मानून मनापासून तसं वागणार्‍यांचा देश म्हणजे भूतान. अखिल जगतात लोकशाहीचे वारे वाहात असताना राजेशाही पाहिजे म्हणून निदर्शन करणार्‍या मणसांचा देश म्हणजे भूतान. सार्वजनिक ठिकाणीही कमालिची  स्वच्छता असलेला आरोग्यदायी देश म्हणजे भूतान. टपरी किंवा झोपडपट्टी शोधूनही सापडणार नाही असा देश म्हणजे भूतान. हॉटेल पासून दुकानापर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान. हिमालयात वसलेला आपला सुंदर शेजारी देश म्हणजे भूतान. भूतान विषयी आजपर्यंत माहित असलेल्या ही वैशीष्ट्ये आता पडताळून पहायची होती. भूतानला जायच्या आधीच मन तिथे वास्तव्याला गेलं होतं. विमानाने जायचं असलं तरी तिथे थेट अवतिर्ण होता आलं असतं तर किती बरं झालं असतं!


बागडोगरा विमातळावर विमान उतरत होतं, खाली हिरवागार प्रदेश दृष्टीस पडत होता. चहाच्या बागा असाव्यात,पण तो गर्द हिरवेपणा पाहाता पाहाता विमानाने धावपट्टीवर हलकेच चाकं टेकवली. वर जाताना आकाशात भरारी घेण वैगेरे आपण म्हणतो पण जमिनीला पाय लागणं किंवा पाय जमिनीवर असणं किती महत्वाचं असतं ते आकाशात उंच गेल्याशिवाय कळत नाही. बागडोगरा हे नाव आपण सहसा ऎकलेलं नसतं. प. बंगाल राज्यातल्या दार्जिलिंग जिल्ह्यातला हा विमान तळ लष्कराचा असला तरी नागरी विमान तिथे उतरू दिली जातात. पुढे हे विमान असम राज्यात गोहाटीला जायचं होतं. मागे गोहाटीला जाताना आम्हाला प्रथम गोहाटीला उतरवून त्यावेळचं विमान नंतर बागडोगराला गेलं होतं. एवढ्या दूरवर येवूनही विमान आणखी पुढे जाणार आणि पुन्हा ते उतरणार ते आपल्याच देशात असा विचार मनात आला आणि आपला भारत देश खरच खंडप्राय असल्याचा अभिमान वाटायला लागला.

आपल्या देशातील महानगरं सोडली तर इरत ठिकाणची विमानतळं गजबजलेली नसतात. आलेल्या विमानातून उतरलेले प्रवासी तेवढेच बाहेर विखूरले जातात आणि पुन्हा सगळा परिसर सामसूम होवून जातो. आम्ही ताजे तवाने होईपर्यंत सहप्रवासी निघून गेले होते. आमची वाट पाहत असलेल्या बाहेरच्या वाहनात बसून आम्हीही निघालो आणि थोड्याच वेळात  शहरातली वाट संपवून मोकळ्या प्रदेशात आलो. सभोवताली चहाच्या बागा, मार्च महिना असल्याने प्रसन्न करणारी हवा आणि हसरे सोबती यामुळे प्रवास मजेत चालला होता.  वाटेत एक नक्षलबारीला जाणारी बस दिसली. म्हणजे नक्षलवादी चळवळीचं मुळ असलेला प्रदेश जवळच होता तर. नक्षलवाद, त्या वरचे उपाय, आदिवासी त्यांचे प्रश्न, तळागाळातल्या लोकांना न जुमानणारी आपल्या देशातली शासन यंत्रणा, झोटींगशाहीचं प्रतीक बनलेली प. बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बद्दल अनेक विचार मनात येत गेले. अशावेळी आपण नजरेने एक बघत असतो आणि मन भलतीकडेच भटकत राहातं, तसच काहीसं होत होतं. प्रवासात हे एक बरं असतं. दुसरं काहीच करत नसलो तरी आपण स्थळकाळाचं बंधन नसलेले विचार करू शकतो. एकाच दिशेने अखंड प्रवास सुरू असला की मग ती  विचारांची साखळीही लांब लांब होत जाते. तीन साडेतीन तासांचा प्रवास असल्याने ती प्रक्रिया चालूच राहिली. जलपायगुडीचा मैलाचा दगड दिसला. रल्वेने आलो असतो तर इथपर्यंत आलो असतो. रस्त्याला समांतर असे रल्वेचे रुळ दिसायला लागले. तिस्ता नदीवरचा पूल लागला. मग जंगल सुरू झालं. वाटेत एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो, मोठा कप भरून चहा मिळाला पण चव यथातथाच होती. तिथलो लोक पचकवणी पण भरपूर चहा पिणारे आहेत.

सकाळपासून हजारो कि.मी. प्रवासहोवूनही तो अजून संपला नव्हता. गाडी बाहेरचं दृष थकवा दूर करत होतं. आता अंधारून यायला लागलं. उत्तर-पुर्वेकडचा हा भाग असल्याने तिथे लवकर काळोख होतो. तशातच खड्डे असलेला अत्यंत खडबडीत असा रस्ता लागला. पुढचे दहा किलोमिटर हा असाच रस्ता आहे ड्रायव्हर विनोदने पुस्ती जोडली. चला तेवढाच पाळण्यात बसल्याचा आनंद. प्रवासात हा असा ऍटीट्युड ठेवावाच लागतो. नाहीतर तो प्रवास आणखी कंटाळवाणा होतो. काही लोक तर या आधीचे कष्टप्रद झालेले प्रवास पुन्हा पुन्हा आठवून दु:खात भर घालून घेतात.

कितपर्यंत पोहोचलात? ड्रायव्हरला पुन्हा पुन्हा फोन येत होता. आत्मा आणि आणखी काही मंडळी भूतानच्या प्रवेशद्वारवरच्या फुन्तशोलींग या गावात आधीच पोहोचली होती. थोड्याच वेळात आम्हीही पोहोचलो. प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून नामग्ये या हॉटेल मध्ये पोहोचलो. आपल्यापेक्षा त्यांची घड्याळं अर्धा तास पुढे होती.  तेवढा एक फरक सोडला तर अजून आपला देश सोडल्याची जाणीव होत नव्हती. नामग्ये हॉटेल मधली ती संध्याकाळ मात्र उत्साहवर्धक होती. माझा मित्र आत्मा सलीम या आमच्या तिथल्या व्यवस्थापकाबरोबर मराठीत बोलत होता ते ऎकून मी चक्रावलो होतो. या माणसाकडे अशी माणसं कशीबुवा आकर्शीत होतात?  सहलीला  अशा गोड धक्क्याने सुरूवात झाली होती.




03 January, 2010

'भ्रमंती हिमालयाची’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन


वॉन्डररर्सया हौशी छायाचित्रकारांच्या भ्रमंती हिमालयाचीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन सूप्रसिध्द छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते नुकतेच पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे झाले. हौशी छायाचित्रकारांनी छायाचित्रकारांनी मांडलेले हे प्रदर्शन उत्कृष्ट असुन हा उत्साह असाच कायम ठेवावा. कॅमेर्‍या पेक्षा कॅमेर्‍या मागची नजर महत्वाची आहे. तसच पुढच्यावर्षीही मला अशा प्रदर्शनाला यायला आवडेल असं ते पुढे म्हणाले.

लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड तसेच अन्य ठिकाणांची चित्तवेधक छायाचित्र या ठिक़ाणी मांडण्यात आली असून सदर प्रदर्शन दिनांक 3 जानेवारी ते 10 जानेवारी, 2010, सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील.

02 January, 2010

'भ्रमंती हिमालयाची’ छायाचित्र प्रदर्शन




जगभरातील पर्यटकांना हिमालयाची बर्फाच्छदित शिखरे नेहमीच साद घालत असतात. अर्घ्याहुन अधिक हिमालय तर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. वॉन्डररर्सचे हौशी छायाचित्रकार गेली कित्येक वर्ष हिमालयात भ्रमंती करत आहेत. जम्मु - काश्मीर मधले लडाख, हिमाचल प्रदेश, मधील स्पिती व्हॅली, सिक्कीम. असाम, अरूणाचल प्रदेश मधले तवांग, मघालय, नागालॅन्ड आणि शेजारचा देश भुतान इत्यादी ठिकाणी गेल्या वर्षभरात फिरून काढल्ेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे.

हिमाच्छदित शिखरे, गोठलेले तलाव, खळाळत्या नद्या, चोहिकडे, रंगाची रांगोळी असलेला लडाखचा आगळावेगळा प्रांत, हिरवागार अरूणाचल, तळयांच तवांग, अदिम जनजातींचं मेघालय. आणि नागालॅन्ड शांत धिरगंभीर उत्तर सिक्किम, आणि नेत्रसूखद हिरवाई, चिड आणि पाईनचे भले थोरले वृक्ष व त्यातून बागडणाऱ्या नद्या, बौध गुंफा यांचे साम्राज्य असलेले भुतान अशा अनेक ठिकाणची मनोवेधक छायाचित्र या प्रदर्शनात पाहता येतील. या प्रदर्शनामध्ये हिमालयातील निसर्गरम्य स्थळांबरोबरच, तिथली संस्कृती, सण लोकजीवन, या सर्व गोष्टी जनसामान्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न छायाचित्रकानांनी केलेला आहे.

वॉन्डररर्स या हौशी छायाचित्रकारांच्या गटाची स्थापना श्री. आत्माराम परब यानी हौशी छायाचित्रकरांना हक्कांच व्यासपीठ मिळवून देणे आणि दुर्लक्षित पर्यटन स्थळांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचवणे या हेतुने 9 वर्षापूर्वी केली असून आतापर्यंत अनेक छायाचित्रकाराच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी आत्माराम परब, तुषार निदांबुर, नरेंद्र प्रभु, विश्वेश नाईक, सुधीर धर्माधिकारी, सुरेंद्र तांबे, मेघन पाटणकर. रेखा भिवंडिकर, गिरीष गाडे. सागर कर्णिक, सुहासीनी मुतालिक आणि स्मिता रेगे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक 3 जानेवारी ते 10 जानेवारी, 2010, सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे.

या प्र्रदशनादरम्यान हिमालयातील, भ्रमंती, लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड तसेच अन्य ठिकाणांची महिती, स्लाईड शो चित्रफित आणि मार्गदर्शन विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. संपर्क : 9892182655, 9320031910.

या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन दिनांक 2 जानेचारी 2010 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे.


04 February, 2010

हिमालयाची फोटोरूपी भ्रमंती!

प्रदर्शन कुठे : ठाणे आर्ट गॅलरी, बिग बाजारजवळ, बाळकूम रोड, माजीवडे, ठाणे

केव्हा : ५ ते ७ फेब्रुवारी, सकाळी ११ ते सायंकाळी ८

हिमालयातली उत्तुंग शिखरे... गोठलेले तलाव... खळाळत्या नद्या... डोंगरांची रांगोळी... रंगांची उधळण असलेला लडाख... हिरवागार अरुणाचल... तळ्यांचे तवांग... आदिम संस्कृतीचे मेघालय... धीरगंभीर उत्तर सिक्किम... पाईनच्या मोठमोठे वृक्ष... हिमालयाच्या लांबच लांब पसरलेल्या रांगांमध्ये दिसणाऱ्या या अद्भूत गोष्टींनी वेड नाही लावले तरच नवल!

काश्मीरमधले लडाख, हिमाचल प्रदेशातील स्पितीव्हॅली, सिक्किम, आसाम, अरुणाचलमधील तवांग, मेघालय, नागालँड आणि शेजारचा भूतान... हिमालयाच्या कुशीत असलेल्या विविध परिसरांचे फोटोरूपी दर्शन या प्रदर्शनातून होणार आहे!

अधिक माहितीसाठी वाचा :

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5529279.cms


14 February, 2019

भारत सरकारने चीनला ठणकावले






दबावास भीक न घालता मोदी यांनी अरुणाचलास भेट दिली आणि नंतर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा आक्षेप धुडकावून लावला, हे योग्यच झाले. – लोकसत्ता

भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यास आक्षेप घेणाऱ्या चीनला ठणकावले ते उत्तम झाले. चीनची विधिनिषेधशून्य हुकूमशाही ही भारतासाठी कशी अणि किती मोठी डोकेदुखी ठरणार आहे, याची चुणूक गेली काही वर्षे मिळत आहेच. आपला हा शेजारी देश कोणतेही नीतिनियम पाळत नाही. प्रचंड, कल्पनाही करता येणार नाही इतकी कमावलेली आर्थिक ताकद आणि त्या जोडीस सुप्त साम्राज्यवादी मनीषा यामुळे चीन हा सर्वच जगासमोरचे मोठे आव्हान आहे. मग तो दक्षिण चीन समुद्रातील कृत्रिम बेटनिर्मितीचा उद्योग असो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारात एकतर्फी केला जाणारा चलन दर बदल असो. चीन हा देश स्वार्थ वगळता कोणतेही मूल्य पाळत नाही. माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच या वृत्तीचे निर्लज्ज उदाहरण आधुनिक जगात चीनइतके अन्य कोणते नसावे. रशियाचे व्लादिमीर पुतिन हे निरंकुश सत्तेत चीनच्या क्षी जिनपिंग यांच्याशी स्पर्धा करू शकतात. पण त्यातही चीनच्याच यशाची खात्री असेल. इतका चीन हा बेमुर्वतखोर आणि आत्मकेंद्री आहे. तैवान, ताईपेई, हाँगकाँग वा तिबेट या मुद्दय़ांवरून तो किती निर्घृण होऊ शकतो, हेदेखील अनेकदा दिसून आले आहे. भारतीय पंतप्रधानाने अरुणाचल प्रदेशास भेट दिली म्हणून आक्षेप घेणे हे चीनच्या याच व्यापक निर्घृणतेचे पुढील पाऊल. ते सातत्याने पुढेच टाकले जात आहे, ही बाब लक्षात घ्यावी अशी. अशा वेळी त्या देशाच्या दबावास भीक न घालता मोदी यांनी अरुणाचलास भेट दिली आणि नंतर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या आक्षेपास धुडकावून लावले हे स्वागतार्ह ठरते.

दोनच वर्षांपूर्वी भारत, चीन आणि भूतान यांच्यातील आंतरराष्ट्रीय तिठय़ावर चीनने डोकलाम प्रकरण घडवून आणले. या डोकलाम परिसरात चीनने शब्दश: घुसखोरी केली. त्या प्रकारासही मोदी सरकारने दिलेला प्रतिसाद रास्त तसेच शहाणपणाचा होता. डोकलाम येथे चिनी सैनिकांच्या डोळ्यास डोळा भिडवून भारतीय सैन्य खडे केले गेले आणि काही काळाने चीनने माघार घेतली. ती पहिली चुणूक होती. कोणालाही न कळता शांतपणे शेजारी देशात हातपाय पसरायचे आणि फारसा विरोध झाला नाही तर आपले बस्तानच बसवायचे, ही चीनची विस्तारवादी रीत स्वातंत्र्यापासून आपण पाहत आलो आहोत. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरू यांच्या हिंदी चिनी भाई भाईच्या स्वप्नाळू अवस्थेमुळे आपल्यावर काय आफत ओढवली याचादेखील आपण अनुभव घेतलेला आहे. त्यानंतर चीनशी आपले गोठलेले संबंध सुधारू लागले ते पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे परराष्ट्रमंत्री म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी त्या देशास भेट दिल्यानंतर. त्या वेळी चीनकडून नागा, मिझो बंडखोर, पाकिस्तान आदींना दिल्या जाणाऱ्या मदतीचा मुद्दा वाजपेयी यांनी थेट चिनी नेतृत्वासमोर उपस्थित केला होता. चीनचा निगरगट्टपणा असा की वाजपेयी त्या देशात असतानाच व्हिएतनामवर चीनने हल्ला केला. त्या वेळी सर्व राजनैतिक संकेत झुगारून वाजपेयी यांनी दौरा अर्धवट सोडला आणि ते मायदेशी परतले. परंतु हा इतिहास न घोळवत बसता पुढे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा चीनशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. २००३ साली त्यांनी चीनला दिलेली भेट या मुद्दय़ावर ऐतिहासिक मानली जाते. त्या वेळी उभय देशांत झालेले विविध करार हे या दोन देशांतील संबंधांचे संदर्भबिंदू ठरले. बंदुकीच्या नळीतच सर्व सामर्थ्यांचा उगम असतो,’ अशा अर्थाचे माओ झेडाँग यांचे वचन हे चीनच्या धोरणाचे खरे सूत्र आहे. वाजपेयी यांनी ते कधीही डोळ्याआड केले नाही आणि तरीही सामरिक वास्तव आणि राजनैतिक मुत्सद्देगिरी यांच्या आधारे त्यांनी या देशास हाताळले.

नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान मोदी यांचे चीनविषयक धोरण वाजपेयी यांनी घालून दिलेल्या मार्गानेच पुढे जात राहिले. मोदी यांची ताजी अरुणाचल भेट ही त्याचीच निदर्शक. चीनचा या प्रदेशावर दावा आहे. तो देश अरुणाचलास दक्षिण तिबेट मानतो आणि तो आपल्याच देशाचा भाग आहे, असे त्याचे म्हणणे आहे. ते आपण सातत्याने अव्हेरत आलो आहोत. त्या देशाशी असलेली आपली सुमारे साडेतीन हजार किलोमीटर लांबीची सीमा ही सतत खदखदत असते आणि त्यास प्रामुख्याने चीनच जबाबदार असतो. आजतागायत आपण चीनशी या सीमेसंदर्भात किमान २१ वेळा चर्चा केली आहे. पण चीन अरुणाचलचा हेका सोडावयास तयार नाही. त्या देशाची भूक हा यातील महत्त्वाचा मुद्दा. तो अरुणाचलपुरता मर्यादित नाही. ६२ च्या युद्धात चिनी सेना आसामातील रांगिया शहरापर्यंत आल्या होत्या. एक बोट दिले तर चीन हातच गिळंकृत करणार. तेव्हा कोणतीही लष्करी कागाळी न करता चीनच्या या विस्तारवादास ठामपणे विरोध करत राहणे हाच एक मार्ग आहे.

मोदी सरकारने अजूनपर्यंत तरी तो सोडलेला नाही. याबाबत आपले धोरणसातत्य निश्चितच कौतुकास्पद ठरते. आपल्या लष्करी सामर्थ्यांच्या मर्यादा लक्षात घेता ते योग्यदेखील आहे. कारण या मुद्दय़ावर चीनशी आपण कोणत्याही अंगाने बरोबरी करू शकत नाही. दोनच दिवसांपूर्वी वॉल स्ट्रीट जर्नल या दैनिकातील एका लेखाने भारत आणि चीन यांच्या लष्करी सामर्थ्यांतील प्रचंड दरी दाखवून दिली. ताज्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने संरक्षणासाठी जवळपास ४.३२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली खरी. पण आठ टक्के इतकी वाढ करूनही अर्थसंकल्पाचा मोठा वाटा १४ लाख सैनिकांच्या वेतन-भत्त्यावरच खर्च करावा लागणार आहे. त्याच वेळी चीनचा संरक्षण अर्थसंकल्प भारतापेक्षा ४०० टक्क्यांनी अधिक आहे, या एकाच मुद्दय़ाने उभय देशांतील तफावतीचा अंदाज यावा. आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५ टक्के आपण संरक्षणावर खर्च करतो तर चीन त्याच्या महाप्रचंड अर्थसंकल्पाच्या साडेतीन ते चार टक्के. त्या देशाची मजल स्वतंत्र विमाने तयार करण्यापर्यंत गेली आहे. अशा वेळी आहे त्या परिस्थितीत चीनच्या मुद्दय़ावर आपणास वेगळे काही करण्यास वाव नाही.

साभार – लोकसत्ता

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजेअसं कायाचं हे ही एक कारण आहे.


17 January, 2011

शेडस् ऑफ लडाख



सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. अधिक शिरोडकर प्रदर्शनाचं उद्घाटन करताना  
शेडस् ऑफ लडाख हे छायाचित्रांचं प्रदर्शन रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, येथे भरलं आहे. लडाख हे असं ठिकाण आहे जे आपल्याच पृथ्वी तलावरचं असूनही तिथे गेल्यावर वेगळ्या ग्रहावर आल्याचा भास होतो. बहुतांशी भाग वनस्पती विरहीत असूनही हा प्रदेश सौंदर्यात तसूभरही कमी नाही. निसर्गाच्या रंगांची अदाकारी आणि त्याच बरोबर अध्यात्माची शिखरं असलेल्या तिथल्या बौद्ध गुंफा, या सगळ्या वातावरणाशी तादात्म्य पावलेले तिथले लोक, अतिशय विषम असं हवामान, बर्फाच्छादीत पर्वत रांगा, निळं-निळं पाणी आणि निळाई ल्यालेलं आकाश, सप्तसिंधू मधली सिंधू नदी आणि तिच्या हातात हात घालून निघालेली झंस्कार नदी, अभावानेच आढळंणारं पण वैशिष्ट्यपुर्ण असं वन्यजीवन, तिथले सण, महोत्सव हे सगळच जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षणाच केंद्र. आपले भारतातील चोखंदळ पर्यटकही आता लडाखकडे वळत आहेत.

वॉन्डररर्स या हौशी छायाचित्रकारांपैकी काही जण श्री. आत्माराम परब यांच्या नतृत्वाखाली याच ठिकाणी जाऊन आले. गेल्या वर्षभरात यांनी काढलेल्या चायाचित्रांचं  प्रदर्शन येथे मांडण्यात आलं आहे. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी मानव दवे, नरेंद्र प्रभु, गिरीश गाडे, विराज नाईक, वसूधा माधवन, गिरीश केतकर, सतिश जोशी, आणि आत्माराम परब यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक १६ जानेवारी ते २३ जानेवारी, २०११, सकाळी ११ ते सायंकाळी  वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे.

फ़ू-बाई-फू फेम अंशूमन विचारे सोबत आत्माराम परब
या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन दिनांक १५ जानेचारी २०११ रोजी सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. अधिक शिरोडकर  यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यानी सर्वच छायाचित्रकारांच्या कलेचं कौतूक केलं आणि लडाखला या वयातही जावसं  वाटतं असं मनोगत प्रकट केलं. या प्रदर्शनाला रसिक पर्यटन प्रेमीं बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरानी आत्तापर्यंत भेट दिली आहे आपणही या संधीचा लाभ उठवावा.    

सदर प्रदर्शन 'इशा टुर्स्' ने प्रायोजित केलं असून इशा टुर्स् तर्फे   या प्रदर्शनादरम्यान हिमालयातील, भ्रमंती, लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड, विदेशातील केनीया, दुबई  तसेच अन्य ठिकाणांची महिती, स्लाईड शो चित्रफित आणि मार्गदर्शन विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. संपर्क : 9892182655, 9320031910.


मा. अधिकजी आणि सहभागी छायाचित्रकार 


कौतूकाचे बोल 

27 April, 2016

ई-भटक्यांच्या जगात



आज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे.     

प्रवासवर्णनाच्या पुस्तकांची मराठीत खूप मोठी परंपरा आहे. पण आठ-दहा वर्षांत ब्लॉगच्या माध्यमातून अनेकविध प्रवासवर्णनं इंटरनेटवर, तीदेखील मराठीतून उपलब्ध झाली आहेत. या ई-भटकंतीचा हा थोडक्यात धांडोळा..



साचलेपणा घालवण्यासाठी फिरणं जरुरीचं आहेच, पण पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी मात्र त्या आठवणींची साठवण करणंही क्रमप्राप्त आहे. सफरीवर जाऊन आल्यानंतर पूर्वी त्या सहलीच्या फोटोंचे अल्बम बनवले जात असत. हे अल्बममधले फोटो मग आठवणींना उजाळा देत राहण्याचं काम करतात. क्वचितप्रसंगी त्या प्रसंगाची नोंद डायरीमध्ये व्हायची. कधी कधी त्याला पुस्तकाचं रूप मिळत असे. मात्र हा सगळा ठेवा हातासरशी असणं खूप महत्त्वाचं असतं. इंटरनेटमुळे मात्र ते एकदमच सोयीचं झालंय असं म्हणावं लागेल. युनिकोडच्या सुविधेमुळे हे सारं मराठीतून मिळायला लागून आठ नऊ र्वष होऊनही गेली.

माहितीचं महाजाल याही बाबतीत आपली मदत करायला हजर झालं. गुगलड्राइव्हवर आता आपल्याला हवी ती माहिती साठवून ठेवता येते. त्यामध्ये फोटो, फाइल्स, गाणी असे अनेक प्रकार अगदी सहजच साठवता येतात. पण ही माहिती फक्त आपणास किंवा आपण ज्यांना अधिकृत केलं आहे अशांनाच वापरता येते. आपण काढलेले फोटो किंवा लिहिलेला मजकूर इतर कुणालाही वाचण्या, ऐकण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा तर त्याकरिता महाजालावर ब्लॉगची सोय उपलब्ध आहेच. गुगल किंवा याहूने ब्लॉगस्पॉट किंवा वर्डप्रेसच्या माध्यमामधून अगदी फुकट म्हणावी, अशी ही सोय उपलब्ध करून दिली आणि जगातल्या सर्व भाषांमधले नेटिझन्स या माध्यमाचा वापर करू लागले. आपली मराठीही त्या बाबतीत पुढे आहेच. अनेक विषयांबरोबरच पर्यटन किंवा प्रवास वर्णन या सदराखाली लेख आणि छायाचित्रांची नोंद माहितीच्या महाजालात होऊ लागली आणि संपूर्ण जगातले मराठी बांधव त्याचा घरबसल्या आस्वाद घेऊ लागले. अनेक प्रवासवेडय़ा भटक्यांची सफरीची दैनंदिनी छायाचित्रांसहित वाचल्यावर अनेकांना सफरीवर जाण्याचे वेध लागू लागले. अनेक साहसी सफरींचा लेखाजोखा मग नेमाने येऊ लागला आणि तत्परतेने त्याचं स्वागतही होऊ लागलं. एखाद्या ठिकाणी कसं जावं, कधी जावं, काय काय अडचणी येऊ शकतात, जाण्यायेण्याचा मार्ग याचं छायाचित्रांसहित वर्णन ब्लॉगवर उपलब्ध झालं आणि ब्लॉगर आणि पर्यटक यांच्यामध्ये एक सेतू बांधला गेला.

रोहन चौधरी हा असाच एक भटक्या. त्याच्या ब्लॉगवर त्यानेच म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या देशाच्या इतिहासाप्रमाणे त्याच्या भूगोलावरही उदंड प्रेम करणाऱ्या एका सामान्य भटक्याची भ्रमणगाथात्याने सादर केली आहे. सिक्कीम या देशाच्या ईशान्येकडील राज्यात भटकंतीला जायच्या तयारीपासून ती सफर पूर्ण होईपर्यंतचा सगळा वृतांत या ब्लॉगवर मिळतो. रोहनने ब्लॉगवर लिहिलेला लडाखचा सफरनामाही वाचनीय आहे आणि त्या संपूर्ण सफरीचा व्हिडीओ वृत्तांतही त्याने यूटय़ुबवर ठेवला आहे. रोहनच्याच माझी सह्य़भ्रमंतीया ब्लॉगवर सह्य़ाद्रीत काय करावं लागतं तरहे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा महाबळेश्वर नव्हे. नुसतं डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण-पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडावं लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणारं ऊन. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरुषार्थाला..!’’ गोनिदांच्या शब्दातला हा थरार ज्या वेडय़ांनी अनुभवलाय त्यांचंच हे स्वानुभव कथन आहे.

संकेत पाटेकर या सह्य़वेडय़ानेही त्याच्या ब्लॉगवर सह्य़ाद्रीच्या कडेकपारी धुंडाळताना त्यांचा घेतलेला आढावा स्तिमित करणारा आहे. सह्य़ाद्रीचा सचित्र असा आढवाच यातून हाती लागतो. तर सरदेसाईज या ब्लॉगवर पिर्ड रॉक्सची अप्रतिम छायाचित्रं पाहायला मिळतात. मॅकिनॉव आयलंड, सूलॉक्स, टकमिनॉव फॉल्स व पिर्ड रॉक्स या सफरीविषयीची माहिती आणि मुख्यत्वाने छायाचित्रं इथे पाहता येतात. सहजच या ब्लॉगवर खाडी देशातील भटकंती, तिथले लोक, इमारती याची महिती आणि छायाचित्रं पाहता येतात. भुंगा या ब्लॉगवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचा धांडोळा घेतलेला दिसते. धुवाधार पावसात झिम्माड होताना टिपलेली छायाचित्रं ही या ब्लॉगची आणखी एक जमेची बाजू आहे.

पंकज झरेकर या छायाचित्रकाराचा ब्लॉग म्हणजे छायाचित्रांची मेजवानी आहे. स्वर्गीय साल्हेर, मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, ताम्हणी घाट, रतन गड, धुक्यातले अप्रतिम फोटो हे या ब्लॉगचं खास वैशिष्टय़ आहे. त्याचजोडीला लडाखची रमणीय अशी भटकंती आपणास वाचायला मिळते. तर अमित कुलकर्णीच्या ब्लॉगवरदेखील अशीच छायाचित्रत्रिय भटकंती करता येते. मिसळपावच्या एका खास धागा भटकंतीला वाहिलेला आहे. नुकताच त्यांनी महिला दिन २०१६ निमित्त अनाहिता भटकंती विशेषांकही सादर केला आहे. या ब्लॉगवर लंडन, अमेरिका, जपान ते थेट रत्नागिरी अशा देश-विदेशातील अनेक पर्यटनस्थळांविषयी महत्त्वपूर्ण माहितीचा खजिना रिता केला आहे.

प्रभुनरेंद्र या ब्लॉगवर अंदमान, भूतान, लेह-लडाख, अरुणाचल आसाम, मेघालय, काल्पा, कैलास-मानसरोवर, गोवा, दादरा नगर-हवेली, नारकांडा, नुब्रा व्हॅली, सराहन, सांगला, नारकांडा, हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालॅण्ड अशा अनेक अनवटवाटांवरचे गेल्या सात-आठ वर्षांत लिहिलेले ११५ हून अधिक लेख आणि छायाचित्रं पाहता येतील.

भटकंती करतानाची खाद्ययात्रा हा आणखी एक आवडीचा विषय. काही भटके ठिकठिकाणची खाद्यपरंपरा नेमकी टिपतात. त्यापैकी एक म्हणजे महेंद्र कुलकर्णी यांचा काय वाट्टेल तेहा ब्लॉग. या ब्लॉगवर खाद्ययात्रा या गटात महाराष्ट्रातील काही शहरांतील खाद्ययात्रेचा अनुभव घेता येतो. भटकंती करताना हे असं निवडक काही खायचं असेल तर जरूर भेट द्यायला हवी. याच ब्लॉगवर प्रवासवर्णन या गटात महाराष्ट्र, गोवा, गुजरात भटकंतीची वर्णन तर आहेतच पण जोडीला प्रवासातील अडचणींवरील काही अनुभव मार्गदर्शक ठरणारे आहेत.

गेल्या काही वर्षांत मात्र या ब्लॉगर भटकंतीला काहीशी ओहोटी लागली असं म्हणावं लागले. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्वरित अपलोड केलेले फोटो आणि चार ओळींची माहिती असं स्वरूप याला येत गेलं आहे. फेसबुकवर पटापट मिळणारे लाइक्स जरी तुमचा उत्साह वाढवत असले तरी त्यातून दस्तावेजीकरण कमीच होतं असं म्हणावं लागेल. मुख्यत: गुगलच्या माध्यमातून तुम्ही जर एखाद्या ठिकाणाची माहिती शोधायचा प्रयत्न करत असाल तर तुलनेने फेसबुकवरील माहिती हाती लागणं जरा अवघडच असतं. पण ब्लॉगवर संबंधित लेखांना टॅगिंग केलेले असल्यामुळे ते सहज सापडतात. त्यामुळे किमान आपली फेसबुकवरची माहिती ब्लॉगवर टाकली तरी इतरांसाठी ती फायदेशीर ठरू शकते.


नरेंद्र प्रभू – enpee2004@gmail.com

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates