‘अनंताश्रम’ नुसतं नाव घेतल्याबरोबर तीथे खाल्लेल्या मटनाचा सुवास अंतरंगात दरवळायला लागतो आणि त्या पाठोपाठ खडपे बंधूंची कोकणी मिश्रीत मालवणी ऎकायला येते. घरच्या जेवणाची याद येणार्याला किंवा कंटाळा येणार्याला अशा दोन्ही प्रकारच्या माणसांना हमखास लज्जतदार मासळी आणि मटणाचं जेवण खिलवणारी ‘अनंताश्रम’ ही गिरगावातली खानावळ होती. होती असं म्हणण्याचं कारण असं की ती खानावळ आता अर्धवट चालू आहे. कालच सहकुटुंब आडवा हात मारण्यासाठी म्हणून अनंताश्रमात गेलो तर खडपे भेटले आणि मिस्कीलपणे हसत म्हणाले “खानावळ बंद, जेवण नाय्” मी सर्दच झालो. चला हे कधीतरी ऎकायला मिळणारच होतं. तिथला एक बोर्ड वाचत विचारलं हे काय लिहीलय? तर म्हणाले बुधवार, शुक्रवार आणि शनिवार फक्त पार्सल देतो. मनात म्हटलं नशीब तेवढा तरी आधार आहे. (इथे उघड काही बोलण्याची सोय नाही महाराजा. अनुभवी गिर्हाईकाला त्याचा चांगलाच अनुभव आहे.) येत्या ३० एप्रिल पासून बहूदा तेही बंद, असं मालकच म्हणत होते.
गेली सत्त्याहत्तर वर्ष चव न बदलता दर्दी खवय्याला खिलवणार्या या खानावळीचा स्वतःचा असा एक वर्ग होता. मी स्वतः गेली पंचवीसेक वर्ष तिकडे जात होतो. महाराष्ट्र टाईम्स चे गोविंद तळवलकर, टाईम्स चे दिलीप पाडगावकर, अभिनेते दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, मोहन वाघ, शोभा डे अशी दिग्गज मंडळी मला त्या खानावळीत वेळोवेळी भेटली. खडपे बंधू सर्वाशी सारखच अंतर ठेवून वागत. आता तो एक इतिहास होणार आहे. ‘घाईला पण वेळा लागतो’ अशी पाटी आणि तत्सम अलिखित नियम याची मजाही आता घेता येणार नाही.
गोव्यात सध्या मांडवी कॉर्नर ला आणि पुढे पर्वरीला अनंताश्रामाची खानावळ सुरूकरण्याचा त्यांचा विचार आहे. असो आता या पृथ्वीतलावर असं लज्जतदार खाणं मिळणं कठीण आहे असं म्हणण्याची सोय नाही. पण ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर गोव्याला गेलं पाहीजे आणि अनंताश्रमाच्या वेळा पाळल्या पाहिजेत. “करू बाबा ता पण करू, पण पैसे घेवन इतक्या जेवण तरी वाढ ! ”