खरं तर मुंबई ते
गोवा हा वर्ष सहा महिन्यातून घडणारा नेहमीचाच प्रवास, एक तर तो कोकण रेल्वेने
होणारा आणि म्हणूनच सुखकारक. पण या वेळी तसा तो करायचा नव्हता. आधीपासून ठरवल्या
प्रमाणे मला गाडी घेवून निघायचं होत, चांगला रस्ता म्हणून हा प्रवास
पुणे-कोल्हापूर मार्गे करायचं ठरवलं. पहिल्यांदा एक मित्र सोबत येणार होता आणि
त्याचं येणं रद्द झाल्यावर भाऊ यायचं नक्की झालं. पण शेवटी त्याचीही काही अडचण
निघाली आणि मी एकटाच निघालो. कुठचीही
गोष्ट एकट्याने करणं म्हणजे ते एक काम होवून जातं. पण ठरवलं म्हणजे ठरवलं. मला
निघायचंच होतं. निघालो..........!
मुंबई-पुणे
एक्सप्रेस वे आणि पुढे पुणे-बॅगलोर (आता बंगळूरू बरं का. नाहितर तेवढ्यावरून एखादा
कानडी खवळायचा.) हायवे. प्रवास सुरू झाला.
‘मनाचा ब्रेक
उत्तम ब्रेक’
‘दुर्घटना से देर भली’
‘वळणा वळणाचा रस्ता
वाहने सावकाश हाका’
'नजर हटी दुर्र्घटना
घटी'
'अपघात प्रवण क्षेत्र'
आणि वाहन किती वेगात चालवावं याची सुचना देणारे फलक अशा सर्वाचं वाचन करीत आणि मुख्य म्हणजे त्याचं पालन करीत मी कार चालवत होतो. सुप्रभाती निघूनही थोड्याच वेळात उन्हे तापू लागली. एअर कंडीशनचा सहारा घेतला. प्रवास तसा सुखाचा चालला होता. दर दोन तासांनंतर थांबण्याचा आणखी एक नियम मी पाळायचं ठरवलं होतं. तसा थांबत होतो. मागच्याच पंधरवड्यात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर किती वेग असावा याची खमंग चर्चा वर्तमान पत्रातून झाली होती ती आठवत सावकाश जाणं चालू होतं. मागून भन्नाट वेगाने येणार्य़ा वाह्नांना पहले आप म्हणून वाट करून देत होतो. प्रत्येक मोठ्या गाडीला छोट्या गाडीच्या पुढेच जायचं होतं. जड वाहने डाव्या बाजूने चालवावीत हा नियम सर्रास डावलला जात होता. टोल नाक्यावरही मागून हॉर्न वाजवणारे महाभाग होतेच. काही जण व्हिडिओ गेम प्रमाणे रिमोट आपल्याच हातात असल्याच्या माजात चालले होते. या सर्वांचा जाच सहन करत, मनावर ताबा ठेवत गाडी चालवणं सुरू होतं.
सातारा अजून मागे पडायचं होतं, सुर्य आग ओकत होता. एवढ्यातच एअर कंडिशनने राम
म्हटलं. आता गर्मीची गुर्मी सहन करत प्रवास करावा लागणार होता. मनाने त्याचीही
तयारी केली. खुपच गरम होत होतं. अरे हा तर घाटावरचा भाग, इथे एवढं गरम व्हायला नको
होतं. हल्ली सगळंच बदलत चाललंय. माणरसां बरोबर निसर्गही बदलत चाललाय. ठिक आहे
आलीया भोगासी.......
थोड पाणी प्यावं, चहा घ्यावा म्हणून एका टोल नाक्यानंतर थांबलो. उकाडा असह्य
झाला होता. वर आकाशात ढग जमा होत होते. उन सावलीचा खेळ सुरू झाला होता. चहा पिऊन
निघालो. थोड्याच वेळात काचेवर पाण्याचे थेंब दिसू लागले. पाऊस आला वाटतं....... हो
पाऊसच! मघापासून मध्ये मध्ये लुडबुड
करणारे मोटरसायकलवाले रस्त्याच्या कडेला आडोशाला उभे राहिलेले दिसले. चला बरं झालं,
कटकट गेली. आता हे तरी या बाजूने त्या बाजूने वळवळणार नाहीत. पावसाचा जोर वाढत गेला तशी गाड्यांची संख्या कमी
झाली. एवढ्यात मांड नदी वरचा पूल लागला, हाच तो दुष्काळग्रस्त मांड तालूका, दुष्काळ
पडणार नाही तर काय होणार? दोन्ही बाजूला उसाचे मळेच्या मळे दिसत होते. नगदी
पिकासाठी मुबलक पाणी आणि तालूका मात्र दुष्काळग्रस्त. तर याच ठिकाणी हा अवकाळी
पाऊस चालू झाला होता. आता पावसाने रौद्र रुप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा,
विजांचा लखलखाट आणि तुफानी पाऊस. दोन
फुटांवरचंही दिसेना. पार्किंग सिग्नल चालू केले आणि रस्त्याच्या कडेला गाडी उभी
केली. पुढे मागे गाड्यांची रांग लागली. मघाशी सुपात असलेले आम्ही ‘कारवाले’ आता
जात्यात होतो. रस्त्यात एखादच वाहन चालत होतं. दुपारच्या वेळेलाच काळोख दाटून आला
होता. असाच तास सव्वा तास गेला....... पाऊस
थोडा कमी झाला. एक एक करून वाहनं मार्गी लागली, मीही निघालो. पुढे हायवे सोडून
कोल्हापूर शहराकडे मोर्चा वळवला. इकडे मघाच च्या पावसाचा मागमुस नव्हता. शहरातल्या गर्दीतून वाट काढत रंकाळा तलाव गाठला.
संध्याकाळचे साडेपाच वाजत होते. इथून पुढे गगनबावडयाकडे जाणारा रस्ता होता.
मघापासून एकेरी मार्गावरून चालणारी गाडी आता दुहेरी मार्गावरून जात होती. रस्ताही
अरुंद होता. साहजिकच वेगावर मर्यादा आली. त्यात गाव, शाळा म्हणून गतीरोधक असल्याने
हळू हळू जावं लागत होतं. हे गतीरोधकही लावण्याचा काही नियम आहे असं वाटत नाही.
किंवा तो असला तरी पाळला जातो का अशी शंका यावी असे ते रस्त्यात होते. उंची, रुंदी
याचा काही ताळ मेळ नव्हता. पण या सावकाश जाण्यातही एक प्रकारची मजा होती.
रस्त्याच्या दुतर्फा बहरलेले गुलमोहर, रंगी बेरंगी फुलं, विविधरंगी बोगन वेली आणि हिरवीगार
शेतं. या सर्वातून सुर्याची तिरपी झालेली, मावळतीकडे चाललेली उन्हं, आकाशात
उधळलेले रंग, मजा येत होती, आता प्रवास सुखाचा वाटत होता. मुख्य म्हणजे मी बर्यापैकी
प्रवास पुर्ण केला होता.
गगनबावड्याला जिव्हाळा रिसॉर्ट मध्ये मुक्काम केला आणि सकाळी अप्रतिम अशा करूळ
घाटाचं सौंदर्य न्याहाळत तळ कोकणात उतरलो. पुढे कणकवली-कुडाळ-सावंतवाडी करत गोवा गाठलं.
दुसरा चालवत असलेल्या गाडीत बसून प्रवास करणं वेगळं आणि स्वत: चालवत जाणं
वेगळं. रस्ता, आजूबाजूची माणसं, ह्वामान, पाणी, माती सगळच बदलत जातं. प्रत्येकाचा स्वभाव
वेगळा अगदी रस्त्यांचाही त्या बद्दल पुन्हा कधीतरी.
No comments:
Post a Comment