काल आरोंदा इथल्या लोटस
बॅकवॉटर रिसॉर्ट मध्ये आलो तेव्हाच विठ्ठल कामतांचं कौतूक वाटलं होतं. किरणपाणी
गावात, तिराकोल नदी किनारी, रम्य वातावरणात हे सुंदर रिसॉर्ट बांधलं आहे. इथे
आम्हाला गावचं हरवत चाललेलं गावपण अनुभवायला मिळालं. कालची संध्याकाळ वेळवे गावात
पाहुणचार घेण्यात गेली. नदी किनारी, माडाच्या बनात हापूस आंब्याचा आस्वाद घेतानाची
मजा काही औरच असते महाराजा. परम मित्र स्मिताच्या आग्रहाखातर तिच्या अनुपस्थितीत
वेळव्यात आमचं उत्तम स्वागत झालं. मजा आली.
आज सकाळी गावात फेरफटका
मारून मी आणि हर्षदा रिसॉर्टला परतत असताना गेटवरच कामत साहेब भेटले, मुख्य म्हणजे
स्वत:हून बोलले. इथे रहायला आवडलं का? कसं वाटलं? शांतता अनुभवायची असेल तर अशा
ठिकाणी राहीलं पाहिजे म्हणाले. गडबड, गोंधळ, ढॅनच्याक-ढॅनच्याक या पासून दूर त्या
शांततेचा आवाज ऎकण्यासाठी आमच्यासारखे ते सुद्धा आरोंदयाला आले होते. बरोबर एक
डॉक्टर होते. गोव्यात घर असूनही आम्ही इथे शांततेच्या शोधात आलेले ऎकून त्याना खुप
बरं वाटलं. फोटो काढले आणि निरोप घेतला. विठ्ठल कामत, एवढ्या मोठ्या साम्राज्याचा
अधिपती, पण कसला डामडौल नव्हता. छोट्याशाच भेटीत मोठ्ठा आनंद मिळाला.
खरचं पक्षंच्या किलबिलाटाशिवाय
तिथे कसलाच आवाज नव्हता. नदिचा शांत प्रवाह, तेवढाच शांत स्थितप्रज्ञ वाटणारा
समोरचा डोंगर, मासेमारी करण्यासाठी निघालेली एखादीच होडी आणि तेवढ्याच शांतपणे
वाहणारी वार्याची झुळूक आणि सकाळच्या कामात व्यग्र असलेले गावकरी. पुढच्या दोन
दिवसांसाठी राहायचा उत्साहं शतगुणीत झाला.
No comments:
Post a Comment