24 May, 2012

तवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक




से ला पास


तेजपूरच्या चित्रलेखा बागेच्या प्रसन्न वातावरणातून पाय काढवत नव्हता, पण एखादं ठिकाण कितीही आवडलं तरी आपणाला केव्हाना केव्हा पुढे जावंच लागतं. काळ थांबत नाही तसे आपणही नकळत पुढे होत असतो. आता तर आम्हाला तवांगच्या दिशेने जायचं होतं. माझ्या स्मृतीत तर तवांगने पक्क घर केलं होतच. मी गेल्या वेळच्या खुणा शोधत असतानाच आमची गाडी भालुकपॉंगच्या दिशेने पळायला लागली, मात्र थोड्याच वेळात ड्रायव्हरला वेग आवरता घ्यावा लागला. तेजपूर शहराच्या बाहेर पडताच भालुकपॉंगच्या दिशेने रस्ता असा नव्हताच. धुळीचे लोट उठवत गाड्या पुढे जात होत्या. असम मधलं रस्ते उंचीकरणाचं काम राज्यव्यापी होतं तर. संथ गतीने मार्गक्रमण करीत आम्ही भालुकपॉंगला पोहोचलो पण वाटेत लागणार्‍या नामेरी नॉशनल पार्कचा आनंद म्हणावा तसा लूटता आला नाही. आसम अरुणाचल प्रदेश सिमेवर प्रवेश प्रक्रिया पुर्णकरून भालुकपॉंगला पोहोचलो तेव्हा रस्त्यातली धुळ जरा कमी झाली तरी पुढे रस्ते कमी अधिक प्रमाणात खराबच होते. एकूण ३१५ कि.मी. अंरत दोन दिवसात पार करायचं होतं.

पहिल्या टप्प्यातला धुळीचा पडदा दूर झाला, पुढे टिपीचं ऑर्केडीयम आलं. फेब्रूवारी महिना हा काही ऑर्किडचा फुलायचा काळ नव्हता. पाच-दहा मिनीटातच काढतापाय घेतला. तीन साडेतीन वाजताच ढगांचं साम्राज्य पसरल्याने सुर्य दर्शन होत नव्हतं. गर्द वनराईने नटलेले पर्वत धुक्याची शाल पाघरून असतानाच प्रकाश अंधूक होत गेला. बोमडीलाला हॉटेलवर पोहोचता पोहोचता पुर्ण काळोख झाला होता.
बोमडीला....., ही चीन-भारत युद्धाची रणभुमी. त्या दुखर्‍या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या कारण आम्ही त्या युद्धभुमी वरून प्रवास करत होतो. (जिज्ञासूंनी ब्रिगेडियर जॉन दळवी यांचं हिमालयन ब्लंडरहे पुस्तक वाचावं किंवा जयंत कुलकर्णी यांनी केलेलं भाषांतर तरी वाचावं.) संरक्षण सिद्धता या बाबतीत आपण आनादी काळापासून लंगडे आहोत. चाणाक्याच्या काळापासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक विरांनी आक्रमणं रोखून धरली पण पुन्हा पुन्हा आपण त्याच त्याच चुका करत आलोय. आता सुद्धा सरकार आणि सेना प्रमुखामध्येच जुंपलीय, असो.

नुकमॉडॉंग (Nyukmadong) येथील युद्ध स्मारक
काल सुर्य लवकर बुडाला तरी आज त्याने अपेक्षेपेक्षा आधीच दर्शन दिलं. अरुणाचल प्रदेश मधल्या पच्शिम केमांग जिल्ह्याचं बोमडीला हे मुख्यालय. हॉटेलच्या खिडकीतूनच बाहेरचा नजारा दिसत होता. हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं ते सुंदर गाव आणि दुरवर दिसणार्‍या बर्फाच्छादीत पर्वत रांगा. या पर्वत रांगा पार करूनच आम्हाला तवांगला जायचं होतं. वाटेत लागणार्‍या बोमडीला मॉनेस्ट्री पासून पुन्हा प्रवासाला सुरुवत झाली. मॉनेस्ट्रीमध्ये चार दिवस चालणारा उत्सव चालू होता. एरवी शांत असणार्‍या मॉनेस्ट्रीत मंत्रोच्चार ऎकायला मिळाले. दिरांगला गरम पाण्याची कुंड पाहायच्या निमीत्ताने जरा पाय मोकळे केले. आजूबाजूचा निसर्ग मन मोहवत होता.   

नुकमॉडॉंग (Nyukmadong) येथील युद्ध स्मारकाची भेट मन हेलावणारी होती. बासष्ठ सालच्या युद्धात शौर्य गाजवणार्‍या योध्यांची नाव असलेले फलक वाचत असतानाच सौ. दांडेकरनी देशभक्तीपर गीत म्हणण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्वांनीच  त्यांच्या सुरात सुर मिसळले. हिमालयाच्या पार्श्वभुमीवर तिरंगा डौंलाने फडकत होता.

१३,७०० फुटांवर असलेला से ला पास जवळ येत होता, हवेतला गारवा कमालीचा वाढला होता, बाहेर बर्फवृष्टी होत होती. या सहलीतली ती पहिलीच बर्फ़वृष्टी होती. चला हे  पण अनुभवायला मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुचीपर्णी वृक्षांवर बर्फ जमा झालं होतं. सेला पासला गाड्या थांबल्या. पासच्या कमानीचे फोटो घेण्यात काहीजण दंग होते तर काहींनी चहा आणि शेकोटीचा आधार घेतला होता. गरम गरम चहा पोटात गेल्यावर जरा हायसं वाटलं. पुन्हा तवांगच्या देशेने वाटचाल सुरू झाली. घड्याळात पाच वाजायला अजून थोडा अवकाश होता पण बाहेर काळोख दाटून आला होता........
 
            

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates