रुपेरी वाळूत, माडांच्या बनात
मेंदीच्या रंगात, साथ ही निवांत
निळाई पाण्यात आणि आकाशात
गोडशा स्वप्नात, हाती तुझा हात
लाली आभाळात, जशी गुलाबात
लाली या गालात, सल्लजभावात
लाडीक चाळ्यात, हळव्या स्पर्शात
चालले हातात गुंफूनिया हात
स्वप्नांच्या स्वप्नात, सागराची
साथ लाटांच्या भरात, चिंब चिंब न्हात
अथांग प्रीतीत, ओली चिंब होत
हिरव्या चुडय़ात, तुझीया मिठीत
नवविवाहितांना आपल्या विविध आकर्षणांनी लुभावणारा अंदमानचा
प्रदेश म्हणजे खरं तर स्वप्नांचंच गाव आहे. स्वच्छ मोकळी हवा, निळेशार आरसपानी समुद्रकिनारे, माडांची बनं, हिरवाईने वेढलेली अनेक बेटं, पक्ष्यांचा स्वैर विहार, घनदाट जंगलं, सेल्युलर कारागृहासारखं
ऐतिहासिक ठिकाण, विपुल सागरी संपत्तीने भरलेली विक्री केंद्रं, स्नॉर्केिलग, स्कुबाडायिव्हगसारखे
पाण्यातले खेळ या सर्वाची मजा या एकाच सहलीत घेता येते.
मुंबईहून चेन्नई माग्रे विमानाने किंवा बोटीने पोर्ट ब्लेअर
या अंदमानच्या राजधानीत पोहोचता येतं. पोर्ट ब्लेअरला पोहोचत असतानाच या
आगळ्यावेगळ्या प्रदेशाचं सौंदर्य आपल्याला भुरळ पाडतं, त्याचं निराळेपण लक्षात येतं. ‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचं सांगितलं जातं. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान). भल्या पहाटे चन्नईहून विमानाने निघाल्यावर पोर्ट ब्लेअरला
जरी सकाळी पोहोचलं तरी उन्हाचा कडाका जाणवतो, पण तिथल्या
नारळपाण्याने मात्र जीव सुखावून जातो.
बंगालच्या उपसागरात थेट विषुववृत्ताजवळ असलेला देशाच्या
पूर्व विभागात मोडणारा हा केंद्रशासित प्रदेश तसा इंडोनेशियाच्या जवळ आहे. अंदमान
भारताचा अविभाज्य भाग असला तरी तो मुख्यभूमीपासून १२०० किलोमीटर दूर आहे. या
भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात गेल्यावर एका वेगळ्या भूभागात आल्याचा भास होतो.
अंदमान हे मुख्य बेट आणि जवळपास असलेली अनेक लहान लहान बेटं
यांनी हा प्रदेश नटलेला आहे. पोर्ट ब्लेअरच्या जवळच नजरेच्या टप्प्यात दिसणारं रॉस
आयलंड हे बेट हे पूर्वीचं राजधानीचं ठिकाण होतं. आता तिथे वसती नसली तरी आजही तिथे
ब्रिटिशकालीन इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. पोर्ट ब्लेअरच्या धक्क्यावरून बोट पकडून
दहा-पंधरा मिनिटांत रॉस आयलंडला पोहोचता येतं. तिथल्या धक्क्यावरून थोडं आत गेल्या
गेल्या तिथे बागडत असलेल्या हरणांचं दर्शन होतं. बाजूलाच माडांच्या बनात मोर विहरत
असतात. एखादा ससा इकडून तिकडे पळत जातो. एकूण काय समुद्रावरून येणारा वारा आणि
निर्मळ निसर्गाचा सहवास याने मन खरंच उल्हसित होतं. या छोटय़ाशा बेटावरून दिसणाऱ्या
दीपगृहाचा देखावा आपल्याला ओळखीचा वाटतो, कारण वीस रुपयांच्या
नोटेवर तो छापलेला आहे. एवढं करून हाती उरलेला वेळ नॉर्थ बे या रमणीय किनाऱ्यावर
गेल्यास ती संध्याकाळ नक्कीच सार्थकी लागते. दाट जंगल आणि त्याला लागून असलेला हा
सागरकिनारा फक्त आपलीच वाट पाहात होता की काय असं वाटतं. निरव शांतता आणि
समुद्राचा वारा सायंकाळ साजरी करतो.
शिवरायांच्या महाराष्ट्राचं अंदमानशी देशप्रेमाचा धागा
जोडणारं नातं आहे. स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकरांनी देशासाठी
ज्या हालअपेष्टा सोसल्या, त्याला जगाच्या इतिहासात तोड
नाही. संध्याकाळी सेल्युलर जेलमधील ध्वनिप्रकाशाचा नेत्रदीपक कार्यक्रम पाहिल्यावर
स्वातंत्र्यसेनानींचं देशाप्रती असलेलं योगदान लक्षात येतं. सेल्युलर जेलवरून
जवळचा परिसर आणि अथांग सागर यांचं विहंगम दर्शन घडतं.
पोर्ट ब्लेअरमध्येच मत्स्यजीवन आणि मूळ रहिवासी यांच्या
उत्क्रांतीविषयक संग्रहालय तसेच नौसेना अशा विविध संग्रहालयांना भेट देऊन तिथल्या
प्रदेशाची माहिती आणि धावता आढावा घेता येतो आणि तिथल्या विक्री केंद्रांमधून
आवडलेल्या वस्तू विकत घेता येतात. जवळच असलेल्या आशियातील सर्वात मोठय़ा चाथम सॉ
मिलला भेट दिली तर अवाढव्य लाकडाचे ओंडके आणि ते कापणारी तेवढीच मोठी लोखंडी पाती
पाहता येतात.
पोर्ट ब्लेअर बेटापासून दोन तासांच्या अंतरावर बरातांग
बेटावर आदिम संस्कृती असलेल्या जारवा आदिवासींची वसती आहे. शिवाय तेथील ‘मड व्होलकॅनो’ जगप्रसिद्ध आहेत. याच भागात
चुनखडीच्या गुहा (लाइमस्टोन केव्ह) पाहण्यासारख्या आहेत. अंदमानच्या या रमणीय
परिसराची सफर हॅवलॉक बेट आणि राधानगर हा जगातील सात नंबरचा सुंदर समुद्रकिनारा
यांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हॅवलॉक बेटावर जाण्याकरिता जलदगतीने
जाणाऱ्या बोटींची व्यवस्था आहे. पोर्ट ब्लेअरहून दोन ते अडीच तासांत या बोटीने
हॅवलॉक बेटावर पोहोचता येतं. समुद्राचा तळ दाखवणारं स्वच्छ निळंशार पाणी, सोसाटय़ाचा वारा आणि घनदाट जंगलानी वेढलेली छोटी छोटी बेटं यांचं दर्शन घेत हा
वेळ कधी निघून गेला ते समजतही नाही. बोट धक्क्याला लागते आणि निवासाच्या ठिकाणी
जाण्यासाठी आपण जेव्हा गाडीपाशी येतो तेव्हा तो फेब्रुवारी महिन्यात गेल्यास तिथे
पिकलेले आंबे मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.
सकाळच्या वेळी एलिफंटा समुद्रकिनारी स्नॉर्केलिंग, पोहणे, स्कुबाडायिव्हग, काचेचा तळ असलेल्या
बोटीमधून समुद्र सफर आदी जलक्रीडांचा आनंद लुटता येतो. सागराच्या पोटात लपलेली
रंगीत दुनिया याचि देही याची डोळा पाहण्याची गंमत काही औरच असते. रंगीत मासे, शेवाळ, शंख-िशपले आणि पाण्याखालची सागरी संपत्ती
न्याहाळण्याची दुर्मिळ संधी इथे साधता येते.
हॅवलॉक बेट म्हणजे या सहलीतला परमोच्च बिंदू असतो. विरळ
वसती असलेलं शांत सुंदर गाव, सभोवार पसरलेला अथांग दर्या, घनदाट अरण्य आणि रात्रीला चांदण्यांनी भरलेलं आकाश. जीवनातली सुखस्वप्न
रंगवायला यासारखी दुसरी जागा शोधून सापडणार नाही. रात्रीच्या वेळी, समुद्रकिनारी वाळूत पाय सोडून बसल्यावर सागराचं संगीत ऐकावं आणि त्या शांततेत
हरवून जावं.. याच बेटावर एका बाजूला राधानगर सर्वाग सुंदर समुद्रकिनारा आहे.
रुपेरी वाळूत फेरफटका मारून थकल्यावर जोजवणाऱ्या समुद्राच्या लाटांमध्ये स्नानाचा
आनंद घेता येतो. अस्ताला जाणारं मोठ्ठं सूर्यिबब मन:पटलावर आठवणींना कोरत असताना
कधी काळोख पडला समजतच नाही.
अंदमानच्या या सफरीत अनेकदा समुद्राची सर वेगवेगळ्या नौका, पडाव, बोटींमधून करता येते. एका अविस्मरणीय सफरीची सांगता
झाली तरी पुढील आयुष्यात सतत आनंद देणाऱ्या आठवणी बरोबर घेऊनच आपण अंदमानचा निरोप
घेतो. आशाच स्वप्निल वातावरणात भावबंध घट्ट होतात, माणसं आणखी जवळ
येतात. इथे दिवस साजरे होतात, करावे लागत नाहीत.
No comments:
Post a Comment