प्रिय मित्र आत्माराम परब यांनी हा सुंदर फोटो काढला आणि त्या चष्म्यामधून सुर्यच आपल्याकडे पहात आहे असं वाटलं, मग ही कविता सुचली. सूर्य म्हणतोय:
रोजचा दिस ढळत जाता सांज होई मी पहातो
तू तिथे काठावरी रे घुटमळोनी का परत जातो?
उतर या दर्यात आता तोडूनी ते पाश सारे
कवळूनी घे स्वप्ने तुझी ती, बघ आता येतील तारे
दे झुगारून बंधने ती, जी तुझी तू घातलेली
वेळ थोडा राहिला अन, ती निशा बघ थांबलेली
रे तुझ्या बाहूत आहे स्फुरण माझ्या लालिमेचे
कर आता साकार स्वप्ने आर्त जे आहे मनीचे
चांदण्याचे राज्य येईल, अन कळ्याही उमलतील
सज्य हे आकाश सारे, येत आहे तारकादल
कर जरा घाई जराशी पाहुदे रे पूर्णताही
जाऊदे रे दिनकराला या, या दिसाची आहुती ही
नरेंद्र प्रभू
२८ फेब्रुवारी २०२१