अगदी दिड-दोन वर्षाचा असल्यापासून रेडिओवर लागलेली गाणी हार्मोनियमवर वाजवणार्या सत्यजितला वादनाची कला उपजतच आहे. कुणाकडेही वादनाच शिक्षण न घेताही सगळी वाद्य सत्यजितला वश होतात हे नंतरच्या काळात समजत गेलं. प्रथम हार्मोनियम आणि नंतर हाती येईल ते वाद्य जेव्हा सत्यजित वाजवत असे तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटे. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात गेल्यापासून प्रत्येक वर्षीच्या स्नेहसंमेलनात सत्यजितचं वादन हा अविभाज्य घटक बनलेला होता. जेमतेम चौदा वर्षाचा असतानाच सत्यजित अशोक हांडेंच्या संपर्कात आला आणि मग ‘मंगल गाणी- दंगल गाणी’ पासून ‘मराठी बाणा’पर्यंत आणि ‘आवज की दुनिया’ पासून ‘अमृत लता’ पर्यंत हजारो प्रयोगाना सत्यजित साथसंगत देताना, तसच इतर वादकांना सुरांचा फॉलोअप देताना दिसला. मुळ गाण्यात असलेली अनेक वाद्य प्रत्यक्षात स्टेजवर नसताना त्यांचा आवाज मात्र ऎकू यायचा तेव्हा अनेक जाणकार श्रोत्यांना ही गाणी रेकॉर्डवर वाजताहेत की काय असा प्रश्न पडायचा, पण ती सत्यजितच्या कि बोर्डची किमया आहे हे समजल्यावर प्रत्येकजण त्याचा चाहता व्हायचा. तो सिलसिला आजही तसाच सुरू आहे. झि मराठीच्या ‘सारेगमप’मध्ये तर अनेकदा ही जादू प्रेक्षकांना पहायला मिळते आणि मान्यवर परिक्षकही भारावून जातात. अशोक हांडे, विजय कदम, आप्पा वढावकर, अवधूत गुप्ते, अजय-अतूल, कौशल इनामदार, अजित परब, सलिल कुलकर्णी, श्रीनिवास खळेंपासून बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत विवीध क्षेत्रातले दिग्गज सत्यजितला हात उंचावून दाद देतात. पं. सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, अरूण दाते यांची साथसंगतीसाठी सत्यजितहाच 'पहिली पसंद' आहे.
किबोर्डवर मुळ वाद्याबर हुकूम टोनस् तयार करावे लागतात तेव्हाच ते वाजवता येतात आणि ऎकायला मिळतात. अनेक वाद्यांचे असे टोनस् सत्यजितने तयार केले आहेत. म्हणूनच ‘सारेगमप’च्या एका कार्यक्रमात एकामागोमाग एक असे स्वर ऎकून अवधूत गुप्तेंनी सत्यजितचं ‘प्रभू’ हे आडनाव बदलून ‘ब्रम्हदेव’ ठेवलं पाहिजे असे उद्-गार काढले होते. ‘द म्युझिशियन्स’ या वाद्यमेळ्याच्या कार्यक्रमात तर सत्यजित एक मॉजिशियन म्हणूनच वावरत असतो. त्या प्रयोगात सत्यजितचं अँकॉर्डीयन आणि पियानिका वाजवताना पाहाणं आणि ऎकणं हा एक देवदुर्लभ असा अनुभव असतो. दोन वेगळ्या प्रकारची वाद्य (किबोर्ड व पियानिका) एकाच वेळी एकाच कलाकाराने एकहाती वाजवणं हे सत्यजितच करू जाणे. त्याच्या या कौशल्याची पारख आप्पा वढावकरांसारख्या कलाकाराने सतरा-अठरा वर्षांपुर्वीच केली आणि स्वतःचं अँकॉर्डीयन सत्यजितच्या हवाली केलं. आप्पांना आता त्याचं चीज होताना पाहायला मिळालं असेल. टेलिव्हीजनच्या माध्यमातून हा कलाकार आता रसिकांच्या दिवाणखान्यात पोहोचला आहेच पण मला खात्री आहे त्याचं संगित त्यांच्या हृदयाला भिडेल. आता लवकरच सुरू होणार्या ‘लिट्टील चॅम्स् २’ मध्ये सत्यजितच्या बोटांची फुलपाखरं पुन्हा एकदा बागडताना दिसतील, त्याची वाट पाहूया.
No comments:
Post a Comment