30 January, 2012

वार्षीकोत्सव


असे उत्सव जे वर्षातून एकदा येतात. अनेकदा ते करायचे म्हणून केले जातात. मराठी माणूस तसा उत्सव प्रिय. सदा सर्वदा काहीना काही कारण काढून उत्सव साजरे करणं हा वसाच जणू यांनी उचललेला असतो. आमच्यासाठी मात्र इशा टुर्सचं प्रभादेवीला भरणारं प्रदर्शन म्हणजे वार्षीकोत्सव असतो. तशी यावर्षी डोंबिवली, पुण्याला दोन प्रदर्शनं झाली पण मुबईचं प्रदर्शन म्हणजे महोत्सव असतो. अनेक मित्र जे एरवी फोनवरच भेटतात ते या प्रदर्शना दरम्यान भेटतात. अनेक नव्या ओळखी होतात. तर्‍हेतर्‍हेची माणसे भेटतात. काही नमुने ही......असो.

कित्येक जण सहलींकडे आकृष्ट होतात. छायाचित्र पाहाण्यात रममाण होतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. वन्या सहलींचे बेत नक्की होतात. या वेळचं प्रदर्शन नेहमी प्रमाणे लडाखवर नाही तर केनियावर आहे. जशी केनियात पक्षी प्राण्यांची लयलूट आहे तशीच मनोहारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम तसा अनौपचारीक असतो.या वर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ छायाचित्रकार अधिक शिरोडकर आपली महत्वाची कामं थांबऊन आवर्जून आले होते. त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा ते आत्माला म्हणाले एक चांगलं प्रदर्शन रविंद्रला आहे तुम्ही पण या. क्षणभर कळेना हे कुठल्या प्रदर्शना विषयी बोलताहेत? पण आमच्याच प्रदर्शनाची बातमी हिंदुस्तान टाईम्स मध्ये वाचून ते फिरकी घेत होते. प्रत्यक्ष उद्घाटनाला आल्यावरही त्यांचं मिश्कील बोलणं आणि फोटो आणि प्राण्यांबद्दल अभ्यासपुर्ण बोलणं ऎकलं आणि प्रदर्शनाचा श्रीगणेशा तर उत्तम झाला असं मनोमन वाटून गेलं. येता आठवडाभर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. जरुर भेट द्या. आनंद घ्या.               

 


वैभव मांगले


26 January, 2012

आकार पॉट आर्ट

मातीला पाय जरी  लागला  तरी ई..ई...ई....! करत ओरडणारी शहरी मुलं मातीला हात लावायला उद्युक्त होतात, माती बरोबर खेळायला तयार होतात, मातीच्या प्रेमात पडतात. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण होतात, गृहिणींना काय विकत घेऊ आणि काय नको असं होतं. आकार पॉट आर्ट च्या दालनात प्रवेश केल्या केल्या हे असं घडतं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ ला लागून असलेल्या तलाशेट, इंदापूर इथे हे आकार पॉट आर्ट चं दालन आणि कार्यालय आहे.

फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार या गाण्याच्या ओळी सहज ओठावर येतात, पण इथला वेडा कुंभार मात्र परंपरागत कुभार नाही. राजेश कुलकर्णी यांना समोर पाहिल्यावर ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे व्हाइट कॉलर व्यक्ती वाटतात, पण एकदा का ते चाकावर अदाकारी करायला लागले की थक्क व्हायला होतं. बघता बघता  समोरची माती पणती, मडकी, चंबू, घडा, नरसाळे असे अनेक आकार घ्यायला लागते, एकीकडे हात चालत असतानाच या कले विषयी ते भरभरून मोकळे पणाने बोलत राहातात, माहिती देत राहातात. समोरच्या मातीच्या गोळ्याला त्यांच्या हाताचा स्पर्श होतो आणि वेगवेगळे आकार साकार होतात, ते पाहून आपण अचंबीत होतो पण ते तेवढ्यावरच थांबत नाहीत, अजून त्यांच्यातील कलाकार पुर्ण सादर झालेला नसतो. ते सर्व आकार एक एक करून हातात घेत त्यांना ते आणखी खुलवतात आणि एक पुर्ण कलाकृती रुप घेते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा गणनायक, तो गणपती त्या मधून प्रकट होतो. मन समाधी अवस्थेत जातं.

राजेश कुलकर्णी 
पेण, जवळचच माणगाव ही तर कलाकारंचीच भुमी. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेला इलाखा हळूहळू शहरीकरणाने व्यापून जात असतानाच आणि इथले मुळचे कुंभार आपला व्यवसाय सोडून ऊपजीविकेसाठी इतर व्यवसायात गुंतले असताना राजेश कुलकर्णीनी मातीत हात घातला आणि त्यातून सोनं निर्माण केलं. आपल्या सोबत गावातील दहा-बारा तरूणांना त्या कलेचं बाळकडू पाजून तयार केलं आणि गावातच स्थिरस्थावर केलं. गाव आणि गावच्या मातीमध्ये ते भक्कमपणे उभे आहेत.

इथे गेल्यावर खुप हलकं हलकं वाटलं. ट्रेस मॉनेजमेंट कुठलाही वर्गाला हजेरी न लावताही.        
       
25 January, 2012

रेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास 8121281212 वर SMS करा
रेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास काय करावं? हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडला असेलच. सरकारी खात्यात अनेक खेटा मारल्या तरी कामं होत नाहीत हा नेहमीचा अनुभव असल्याने प्रावासात आपल्याला लगेच मदत मिळेल याची आपण कधीच आशा धरत नाही. कसा बसा प्रवास संपवण्यावरच आपला भर असतो, पण आता IRCTC आपल्या हकेला ओ देते असा चांगला अनुभव एका प्रवासी मित्राला आला आहे. त्याचं असं झालं हा प्रवासी हैद्राबाद अजमेर एक्सप्रेसने प्रावास करत असताना दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा जागा झाला तेव्हा टॉयलेट मध्ये पाणी नव्हतं. त्याची झोप उडाली. अजून अठरा तासांचा प्रवास बाकी होता. आता काय करावं? त्यानी रेल्वेत असलेल्या कर्मचार्‍याकडे तक्रार केलीच पण 8121281212 या नंबर ला "Traveling in the A1 compartment of Hyderabad Ajmeer express train No 12720. No water in the bathrooms . Pl arrange. Also replace leaking valves else problem repeats." असा SMS केला आणि आच्छर्य म्हणजे " Your reference id is 1110250019.For status visit www.scr.indianrailways.in. or SMS as STATUS TO 8121281212 . Thanks for registering complaint "  असं उत्तर आलं. पुढे वीस मिनीटात water will be filled at the nearest
Railway station having water filling facility.
 असा SMS आला. आणि खरोखरच इटारसी स्टेशनवर पाणी भरलं गेलं. नंतर आठवड्याभराने गळणारी वॉल्व दुरूस्त केले आहेत असा मेसेज आला. या बद्दल रल्वेचं खरच अभिनंदन केलं पाहीजे. आपण रेल्वे प्रवास करत असताना जर आपणाला जर काही असुविधा झाल्यास 8121281212 वर SMS कराच. मेरा भारत महान...!  
        

16 January, 2012

पैलतीरसांज सभोवती दाटून येता
हसून करिती अपूले स्वागत
पैलतीरावर दोघे क्षणभर
पैलतीरावर दोघांचे घर

घर दोघांचे होते सुंदर
नात्यांमध्ये पडले अंतर
ऎलतीरावर नाती सगळी
पैलतीरावर दोघांचे घर

नाती-गोती होती बोजड
आठवणींच्या हिंदोळ्यावर
लपल्या व्यथा लोचना आड
हसून करिती त्यांना ते दूर

मधून वाहे अथांग पाणी
ऎलतीराला जाणीव नाही
रुजून येती नवीन नाती
पैलतीरावर अशी कितीक ती

पळभर येती निघून जाती
असे सोबती अशीच नाती
घटकाभरची विश्रांती ती
आयुष्याचे संचित होती

नरेंद्र प्रभू

10 January, 2012

हर्णै बंदर
कुबेराची संपत्ती आणि समुद्रातील धन कधी संपायचं नाही. त्यातली कुबेराची संपत्ती अजून पाहायची आहे पण समुद्रातील धन पाहीलं ते हर्णै बंदरावर. चमचमत्या चांदीचा वर्ख ल्यालेली मासोळी पुरा बंदर किनारा व्यापून उरली होती. जिकडे बघावं तिकडे मासळीच मासळी. शेकडो होड्या बंदराला लागल्या होत्या आणि त्या मधून आणलेलं ते धन कोळी लोक बैल गाड्यांमधून किनार्‍यावर आणून आणून ओतत होते. किती ओतलं तरी ते संपत नव्हतं. निवती, मालवणच्या समुद्र किनार्‍यावर रापण ओढून आणलेले मासे बघितले होते पण हे त्या हून कित्येक पटीने अधिक होतं. किनार्‍यावर आणल्या आणल्या त्याचे लिलाव पुकारले जात होते. मासळी घाऊक दरात विकली जात होती. थोड्या अंतरावर किरकोळ विक्री करणार्‍या कोळणी जोरदार आवाजात गिर्‍हाईकाशी बोलत होत्या. लिलाव करणार्‍यांचा आवाज टिपेला पोहोचला होता. सुर्य बुडायच्या आत बाजार आवरता घ्यायचा होता आणि साडेपाचच्या सुमारासच किरणं तिरकी होवून लांब सावल्या पडल्या होत्या.

दिड-दोन हजार लोकवस्ती असलेलं हर्णै गाव अर्ध अधिक किनार्‍यावर लोटलं होतं. दिवसभरातील हे सर्वात घाई गडबडीचे क्षण होते. दिड-दोन तासात सारा व्यवहार आटपायचा होता. बंदरावर गेल्या गेल्या धावत जाणारं एक मुंगूस दिसलं, त्यालाही दुसर्‍या दिवशीची बेगमी करायची होती. एक गाय टोपलीतलं काहीतरी चोरून खाताना दिसली, बैल गाडीवाले जेवढ्या फेर्‍या होतील तेवढ्या मारायच्या प्रयत्नात होते. लिलावाच्या आरोळ्या उठत होत्या. भाव केले जात होते. कुणाला उसंत म्हणून नव्हती. एका बाजूला मात्र बर्फाचे गोळे विकणारी बाई, बाजूलाच भाजी विकणारे असे लोक जरा निवांतपणे गडबडीतले लोक मोकळे होण्याची वाट पाहात होते. त्याही पेक्षा निवांत असं ते हर्णै गाव बंदर किनार्‍या पासून दूर शांत शांत भासत होतं.         
   
आंजर्ल्यात पोहोचल्या पासून हर्णै बंदर पाहाण्यासाठी आम्ही आतूर झालो होतो. मासळी खाण्या बरोबरच ती पाहाण्यातही आनंद असू शकतो हे त्या दिवशी समजलं. वस्तीतूनच बंदराकडे जाणारी ती अरूंद वाट पार करत, ड्रायव्हींगचं कसब पणाला लावत महेशदानी गाडी किनार्‍यावर आणून लावली आणि मग आम्ही सगळे त्या गर्दीचाच भाग झालो. कुठलाच एक ठरावीक हेतू समोर नसतानाही मग पुढचा तास-दिड तास आम्ही त्या गर्दीत व्यग्र होवून गेलो. मोठमोठे मासे हातात घेऊन पाहिले, लिलावाचा पुकारा केला, खेकडे विकत घेतले. सुर्य मावळतीला जाईपर्यंत उत्सव साजरा केला.   

(फोटो: रेखा भिवंडीकर)08 January, 2012

फेटेवाला मुंज्या!


जालरंग प्रकाशनाच्या 'शब्दगारवा' या अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा. 


वार्षिक परीक्षा संपली होती. अजून रिझल्ट लागायला वेळ होता. शाळेत जा की नको जाऊ, कुणीच विचारत नव्हतं, ना रागावत होतं. अशा दिवसात मी जवळपासच्या डोंगरावर जास्त रमायचो. परीक्षेच्या दिवसात अभ्यासामुळे कित्येक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असत.  नारायण धारपबाबूराव अर्नाळकरांपासून बाबा कदमवि.स.खांडेकरांपर्यंत जे मिळेल ते वाचावं आणि काजूआंबेफणसकरवंदंजांभळं  खात डोंगररानात मनसोक्त भटकावंया दिनक्रमामुळे परीक्षा आटोपल्या तरी उसंत म्हणून नसायची. वेळेचं भान नसायचं की ऊन्हातानाची पर्वा नसायची. घराजवळच्या डोंगरात तर मी एकटाच जायचो. आमच्या काजूच्या झाडांच्या काजू वेचून आणायचो. तिथल्या झुडुपांना लागलेली तोरणं मला खूपच आवडायची. काटेरी झुडुपांना लागणारी ही पांढुरकी दोन-तीन गुंजाएवढी फळं गोड चवदार असतात.

असाच एका दुपारी मी डोंगरावर गेलो.  सगळं कसं शांतं शांतं. पक्षीप्राणी सुद्धा रानमेव्याचा आस्वाद घेऊन विसावले असावेत. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. एका झुडुपाजवळ मी तोरणं काढण्यात मग्न होतो. तिथून दुसर्‍या झाडाजवळ जाताना सहज वर नजर गेली तर कायएका उंच झाडावर डोक्याला पंचा गुंडाळून बसलेला माणूस माझ्याकडे एकटक पाहत होता. मी त्याच्याकडे लक्ष न देता तोरणं काढू लागलो. पण पुन्हा-पुन्हा नजर त्याच्याकडेच जात होती. हा मला निरखून का बघतोय......आता माझं तोरणं काढण्याकडे लक्ष लागेना. मी त्यांच्या हद्दीत आल्यामुळे तर हा मला बघत असेल काघरी वडिलांना येऊन सांगितलं तरपण तोरणं काय कुणीही कुठलीही काढतात. त्यासाठी कोण कशाला रागावणार? माझ्याजवळ काजूसुद्धा होत्या पण त्या आमच्या झाडाच्या. वेगळ्या आकाराच्या असल्याने मी तसं दाखवून देऊ शकतो असे विचार मनात येत होते. पण नको लोकांच्या जागेत. आपण आपलं घरी परतावं म्हणून मी काढता पाय घेतला. घरी आलो तरी तो माणूस काही डोक्यातून जाईना.

संध्याकाळ झालीमला परत डोंगरावर जावंसं वाटायला लागलं. बघूया तरी म्हणून पुन्हा त्या जागेवर गेलो. वर बघितलं तो दिसला नाही. आणखी पुढे गेलो आणि अचानक तो पुन्हा दिसलातसाच डोळे रोखून बघणारा. माझी भितीने गाळण उडाली. पुन्हा वर बघितलं, तो अजून माझ्याकडेच बघत होता. कोण रे...! मी जीवाच्या आकांताने ओरडलो. पण त्याचं रोखून बघणं सुरूचहाकेला,  आवाजाला मात्र कसलाच प्रतिसाद नव्हता. अंगावर नखशिखान्त काटा उभा राहिला. जवळपास कुणीच नव्हतं. मी आणि तो माझ्यावर डोळे वटारून बघणारा. मी तिथून धूम ठोकली. थेट घराच्या अंगणात पोहोचलो. अजून तिन्हीसांजा व्हायच्या होत्या. देवळाजवळ गेलोतिकडे मुलं खेळत होती. माझा मित्र शशी भेटला. त्याला ही हकिगत सांगितलीत्यावर तो म्हणाला तिकडे एकटा कशाला गेलासतिकडे भुतंमुंजे असतात. तो मुंज्या असणार. मला ते खरं वाटू लागलं. असेल, मुंज्या असेल. मी तर त्याला दोनदा प्रत्यक्ष डोळ्यांनी  पाहून आलोय. एप्रिल-मे मध्ये आम्ही अंगणात झोपत असू. त्या दिवशी मी घरातच झोपलो. रात्री धड झोप लागली नाही, सारखा तो डोळ्यासमोर येत राहिला.

दुसर्‍या दिवशी उठल्या उठल्या तोंड धुतल्याबरोबर पुन्हा त्या जागेवर जावंसं वाटू लागलं. एकीकडे वाटत होतं नको. तो आज खाली जमिनीवर आला तर?  पण स्वस्थ बसवेना. धीर करूनहातात काठी घेऊनतोंडाने जोरजोरात गाणं म्हणत गेलो. पुन्हा तेचतो बघतच होता. माझ्या हातात काठी होतीच. पुढे झालो, नजर त्याच्यावरचतो मलाच पाहत होता. आणखी पुढे गेलो. तरी तो बघतो आहेच. चार पावलं पुढे गेलो तर तो दिसेनासा झाला. आता काय करावं? शूरवीर मराठे तानाजीशिवाजीतेहतीस कोटी देवसगळ्यांचं स्मरण केलं. बळ एकवटलं आणि पुन्हा वर पाहिलंतो गायबच. पुन्हा चार पावलं मागेतो परत दिसला. मग झुडूप बाजूला करून सरळ झाडाखाली गेलो आणि सगळा उलगडा झाला. त्या झाडाची माणसाच्या डोक्या एवढी होईल अशी फांदी कुणीतरी अशी तोडली होती की लांबून ते डोकं वाटावं. नाकडोळेमुंडासं थेट माणसा सारखं. झाडाच्या चिकामुळे ते सगळं हुबेहूब दिसत होतं. खाली लाकडं पडलेली होती. मी पुन्हा मागे जाऊन पाहिलं तर तो तिथेचमला रोखून बघत होता. आता मात्र मजा वाटत होती. म्हणजे मुंज्या माझ्या मनात होता आणि वर झाडावर तोडलेली फांदी.

लेखक: नरेंद्र प्रभू


आशा आल्या प्रतिक्रीया:

ब्लॉगर विशाल नी म्हटले...

वाह काका !


२२ डिसेंबर २०११ ११-१० म.नं.ब्लॉगर SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर नी म्हटले...
मस्त किस्सा.


अशाच गैरसमजातून भुते वगैरे जन्माला येतात. आपण अंधश्रद्धांना खतपाणी न घालता परिस्थिती व्यवस्थित समजून घेतलीत याबद्दल धन्यवाद.
२५ डिसेंबर २०११ ६-०९ म.पू.


ब्लॉगर अमित दत्तात्रय गुहागरकर नी म्हटले...
मस्त किस्सा. बरेचदा असं होतं.


आमच्याही गावी स्मशानाजवळील झाडावरच्या एका फांदीवर कुणीतरी पांढर्‍या रंगाचा शर्ट टाकला होता. हवेने तो हलत होता. आम्ही एकदा रात्री त्या रस्त्याने येत असताना तो शर्ट पाहीला आणि आम्ही तिथून प्रकाशाच्यापण दुप्पट वेगात पळ काढला.
२८ डिसेंबर २०११ ८-३१ म.नं.

06 January, 2012

केतकी बीच रिसॉर्ट


मुंबई पासून २२५ कि.मी. अंतरावर असलेलं आंजर्ले हे दापोली जवळ असलेलं एक सुंदर गाव. कोकणातल्या उत्तम निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा गावात गेलं पाहिजे. डोंगरमाथा आणि तो उतरताच पायथ्याशी असणारा अथांग सागर किनारा हे कोकणातल्या बहुतेक समुद्र किनार्‍यांचं वैशिष्ठ्य, आजर्ल्याचा किनारा तसाच, मनाला भुरळ पाडणारा. शांत सुंदर गाव आणि तशीच त्या वातावरणाला शोभतील अशी माणसं. नागमोडी रस्ते, ठिक ठिकाणी असलेली मंदिरं, नारळी-पोफळीच्या बागा, जणू काही स्वप्नातलं गाव.          

केतकी बीच रिसॉर्ट हे त्या गावातलच समुद्र किनार्‍याला खेटून असलेलं रिसॉर्ट. या रिसॉर्ट मध्ये जाण्याचा नुकताच योग आला. रस्त्यालगतच्या पायवाटेने नारळीच्या बागेत प्रवेश केला. त्या बागेतच असलेल्या बारा-तेरा कॉटेज आणि नंतर थेट समुद्र किनाराच. अगदी प्रायव्हेट बीच म्हणाना. गेल्या गेल्या हा निसर्ग सोडला तर आमचं स्वागत करायला कुणी नव्हतं. थोड्या वेळाने मालक आले. कामात असावेत. त्रोटक बोलणं, हो नाही अशी उत्तरं. (दुसर्‍या दिवशी थर्टी फस्टसाठी येणार्‍या मोठ्या ग्रुपचं त्यांना टेंशन असावं) मनात म्हटलं कठीण आहे...... त्यांचा विचार बाजूला सारून आम्ही समुद्रावर फिरण्यात रममाण झालो. रात्रीचं जेवण मात्र छान होतं. कॉटेज आतून खुप छान अशा नाहीत, पण ठिक ठाक. (कोकणात जास्त अपेक्षा करू नयेत.) तिथे अनेक सुचना असलेला बोर्ड थोडा खटकतोच. अशा ठिकाणी येणार्‍या माणसांनीच त्याना शहाणं केलं असावं कदाचीत.

दुसर्‍या दिवशी मालक-मालकिण सकाळपासूनच कामाला लागले. तो ग्रुप आल्यावर उत्तम पोहे आणि चहा समोर आला. मंडळी खुश झाली. मालकाही आज हसतमुख होते. आग्रह करत होते. दुपारच जेवण, संध्याकाळचा चहा सगळं वेळेवर. ओळख झाल्यावर ते खुलेपणाने बोलू लागले. कोकणी माणूस असाच, त्याला म्हणूनच  फणसाची उपमा देतात. बाहेरून काटेरी वाटेल पण आतून गोड. हे तसेच निघाले. आता तीथे राहायला आपलेपणा वाटायला लागला.              

जवळच असलेलं हर्णै बंदर म्हणजे मासळी प्रेमींना पर्वणीच. मालकांनी तिकडूनच मासे आणले. सामीष पोटभर जेवणाचा आस्वाद घेत मंडळी खुश झाली. घरगुती जेवणाची चवही तशीच न्यारी होती. बागायतीत रहाणं. दोन माडांना बांधलेल्या झोपाळ्यावर झुलणं, समोर १८० अंशात पसरलेला समुद्र, तिथून येणारा गार वारा, आवाज काय तो त्या लाटांचाच. सुख म्हणजे नक्की हे च असावं. मला तरी तसं वाटलं. आपण जावून पहा. मुख्य म्हणजे या रिसॉर्ट ची वेब साईट आहे, बघा क्लिक करून.          

02 January, 2012

थर्टी फस्ट गोड झालाथर्टी फस्ट...! हल्ली हा उत्सव झालाय. डिसेंबर महिन्याची एकतीस तारीख म्हणजे इंग्रजी वर्षाचा अखेरचा दिवस. नववर्षाचं स्वागत करण्यासाठीची तयारी बर्‍याच आधी पासून सुरू होते. कुठे जायचं, कसं जायचं.... पासून कुणाबरोबर जायचं याची आखणी सुरू होते. खरं तर इतर दिवसा सारखा हा ही एक दिवस, पण दिवसा पेक्षा रात्रीला जास्त महत्व. नीशे सोबत नशेला ही जवळ करण्याची घाई. माहोल अगदी धुंद करणाराच हवा असा अट्टाहास.

शिशीरात काटा आणणारी थंडी तशी या वर्षी उशीरानेच अवतरली. दिवाळी पर्यंत लांबणार्‍या पावसामुळे थर्टी फस्ट पर्यंत थंडीची वाट पहावी लागली. गेल्या आठ दिवसात हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळाला आणि सहलीचा मुड तयार झाला. आंजर्ल्याच्या केतकी बीच रिसॉर्ट ला जाऊया असा आत्मारामचा फोन आला आणि विचार पक्का झाला. आत्माराम आणि सहल हे समिकरण आता मनात पक्कं झालं आहे. आकाशात भरारी घेणारा विहंग जसा मनसोक्त मजा करत फिरत असतो तसाच आत्माराम वाटेतल्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत मुशाफिरी करत असतो. त्यात कोकण हा त्याचा विक पॉईंट. दापोली जवळच्या आंजर्ल्याला जायचंय म्हटल्यावर तो जोशातच होता. कर्न्याळाला आमचे परममित्र महेश भिवंडीकर, रेखाताई येऊन या सहलीत सामिल झाले आले आणि उत्सव सुरू झाला. इंदापूरच्या आकार पॉट आर्ट या ठिकाणी पहिला हॉल्ट घेतला. कोकणच्या मातीत दडलेली कला आणि पुढे नदी, डोंगर यांच्या साथीने चाललेली निसर्गाची अदाकारी बघत असतानाच अचानक डाव्या बाजूला अथांग समुद्राचं दर्शन घडलं आणि आंजर्ला जवळ आल्याचा मैलाचा दगडही दिसला.

कोकणचं निसर्ग सौंदर्य आणि जुनी पण सुंदर घरं पहात असतानाच मुकामाचं ठिकाण आलं. रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला आणि प्रथम दर्शनीच त्या परिसराच्या प्रेमात पडलो. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, बागायतीतच रहायची सोय, सुखद गारवा आणि हवाहवासा वाटणारा मित्र परिवार.

इशा टुर्स ने आयोजित केलेली ही सह्यमित्र ची सहल होती. या पुर्वीही मी सह्यमित्र च्या ट्रेक ला गेलो होतो. व्यसनापासून दुर पण निसर्गाच्या, दर्या-खोर्यांच्या, कडे-कपार्यांच्या, गड-किल्ल्यांच्या सान्निध्यात ही मंडळी रमून गेलेली असतात. या वेळीही तसच घडलं. सागर सावंत या आमच्या मित्राने आल्या आल्या सुत्र हातात घेतली. सह्यमित्र गितांजली माने यांनी संयोजन केलं होतं. लहान थोर अशी पन्नास मंडळी होती पण कसलीही गडबड नव्हती की कोलाहल नव्हता. मुख्य म्हणजे ओरबाडून घेण्याची वृत्ती नव्हती. समुद्र स्नान करून मंडळी तृप्त होता होता गत वर्षीच्या शेवटच्या दिवसाचा सुर्य अस्ताला गेला. जवळच असलेल्या हर्णै बंदरावरून आणलेले मासे स्वयंपाक घरात सिद्ध होत असतानाच वेगवेगळे खेळ रंगात आले. जेवण्याचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा खेळांना रंगत आली. रात्रीचे बारा वाजले जल्लोशात नव वर्षाचं स्वागत झालं. उत्तर रात्री पर्यंत खेळ रंगला पण कसलाच उन्माद नव्हता. दारू, दारूकाम नव्हतं. विचारांचं आदान प्रदान, पुन्हा मिळण्याची इच्छा व्यक्त होत नव वर्षाला आरंभ झाला आणि खरच थर्टी फस्ट गोड झाला

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates