Showing posts sorted by relevance for query आत्मा. Sort by date Show all posts
Showing posts sorted by relevance for query आत्मा. Sort by date Show all posts

20 July, 2021

‘आत्मा’ रंगी रंगलो


 

पहिल्या लडाख सफरीत लडाखला पोचल्यावर दुसर्‍याच दिवशी आत्माराम परब हे वेगळंच रसायन आहे हे आम्हा मित्रांच्या लक्षात आलं. बरोबर आलेल्या प्रत्येकाला सहलीचा पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. सहलीत कबूल केलेली ठिकाणं सोडून कितीतरी जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून आम्ही चकीत झालो होतो. बोलता बोलता आम्ही सांगून टाकलं की “आम्ही दिलेले पैसे फिटले, आता आमच्याकडून तुम्ही हवं ते काम करून घ्या.” मग शेवटच्या दिवसापर्यंत ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असंच सगळं चालू होतं. श्रीनगरला शेवटच्या दिवशी आता ही सफर संपणार आणि आपले पाय पुन्हा जमिनीवर येणार म्हणून मन खट्टू झालं. पण माझ्या बाबतीत असं व्हायचं नव्हतं, त्या सहलीच्या शेवटालाच माझी एक अनोखी सफर सुरू व्हायची होती.

लडाखहून परत आलो आणि चार-दोन दिवसातच आत्माराम परबांचा फोन आला. काहीतरी कारण काढून त्यानी भेटूया म्हणून सांगितलं, भेटलो. जबरदस्त इच्छाशक्ती आणि अपार उत्साह असलेला हा माणूस अगदी प्रत्येक भेटीत मनाला भिडत गेला. कुठलीही गोष्ट ‘केली’ न म्हणता ‘झाली’ म्हणणारा, मैत्रीला जागणारा, नफा-नुकसानाचा विचार न करता झोकून देणारा, कुणालाही अगदी कुणालाही; बिनधास्त भेटणारा असा हा ‘आत्मा’ आत्तापर्यंत माझ्यासाठी आत्मारम परब होता. पण एका दिवशी बोलता बोलता त्याने “मला माझे सगळे मित्र ‘आत्मा’म्हणून हाक मारतात, तेव्हा तुम्हीही आत्माच म्हणा” असं म्हणाला. मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं पण त्याने हट्ट सोडला नाही आणि मग तो माझ्यासाठीही ‘आत्मा’ झाला. अशी माणसं नशीबात असावी लागतात. आत्माशी मैत्रं जुळलं आणि जीवनातल्या एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली. त्याच्या पोतडीतून कधी काय बाहेर येईल याचा नेम नाही. कोरोना काळातही लडाख, अजंठा-वेरूळ-औरंगाबाद, बारा मोटेची विहिर, दोनदा कोकण या ठिकाणी त्याने उचलून नेलंच. पण त्याधी अनेक सहलींवर अनेकदा नेलं. घासून घासून टूर लिडर बनवलं. गेल्या पंधरा वर्षात माझ्या परिघाच्याबाहेर नेवून त्या बाहेरची दुनिया दाखवली. 

या आधीच्या पोस्टमध्ये त्याचा आत्माराम परब असा उल्लेख केला त्याकर फेसबूक वर त्याने अभिप्राय दिला तो असा: 

Atmaram Parab

प्रत्येक क्षण डोळ्यासमोरुन जात आहे. किती तरी वेगळी आव्हान होती त्यावेळी पण खूप मजा यायची. कारण सोबतचे पर्यटक सुद्धा त्या आव्हानं कडे एक अनुभव म्हणूनच बघत होते त्यामुळे सर्वच काही सोपं वाटायचं. 2003 मध्ये इशा टुर्स केल्यापासून साधारण 2009 पर्यंत इशा टुर्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची थेट संपर्क होता. आणि तोपर्यंत सहलीला येणारी मंडळी मला "आत्मा" या नावाने हाक देत होती. पुढे त्याचं आत्माजी, आत्मारामजी, सर अशी बरीच विशेषण लागली जी मला आवडत नाहीत.

Narendra Prabhu च्या या लिखाणामुळे ते पुन्हा अनुभवण्याचा आनंद घेतो आहे

त्याच्या बरोबरच्या कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिल्याच सफरीत लेहहून कारगीलला जाताना कडा कोसळल्याने वाट अडली होती, दुपारची वेळ, सगळेच सकाळपासूनच्या प्रवासाने दमले होते. गाड्या थांबल्या, याने नेहमीप्रमाणे जाऊन पाहिलं तर काही दगड धोंडे बाजूला केले तर आमच्या गाड्या निघतील एवढी वाट तयार होवू शकेल असं वाटलं. मग काय आत्माने दगड बाजूला करायला सुरूवात केली, तो करतोय ते हे पाहून ड्रायव्हर पुढे झाले आणि दगड बाजूला करू लागले, मग आम्हीही उरतलो, दहा मिनीटात वाट मोकळी झाली आणि गाड्या पुन्हा मार्गस्थ झाल्या. नेतृत्वाचे गुण त्याच्या अंगी भरले आहेत. मी कसं करू? असा प्रश्न त्याला पडत नाही.            

आणखी एक प्रसंग: एकदा असेच आम्ही लडाखची दमछाक करणारी टूर संपवून मुंबईत परतलो. मी घरी आलो आंघोळ केली आणि मोबाईल पहातो तर हा घरी न जाता विमानतळावरून थेट मित्रांना भेटायला गेला होता, निमित्त होतं ‘मैत्री’ दिवसाचं. कसं जमतं हे याला. त्याचे ते फोटो पाहून मी चक्रावून गेलो. मनाला काही भिडलं, भावलं की कविता सुचते तशी ती तेव्हाही सुचली: 

जीवन सुंदर बनवायला तुझ्यासारखा एकच मित्र पुरे
आयुष्यातले थोडेच क्षण तुझ्यासोबत जगलो खरे
त्या क्षणांचा सोबती मित्रा तुच होतास
थोडा कमी किंवा थोडा जास्तही नव्हतास

जगता जगता एक दिवस तू मला भेटलास
कसा कोणजाणे पण माझ्या हृदयात बसलास
आता हळूहळू कळतय तू म्हणजे नक्की काय आहेस
कधी भाबडा तर कधी नुसता यार आहेस

मतलबी मिठ्यांची दोस्ती मला कधी जमली नाही रे
पण तू समोर आल्यावर आवेगही आवरता आला नाही रे
म्हणूनच म्हणतो, जीवन सुंदर बनवायला फक्त तुच पुरे
शंभर दोस्तांच्या गरड्यापेक्षा तुझा एकच हात दे रे
नरेंद्र प्रभू
०२/०८/२०१५


कदा असेच आम्ही पुण्याला जायला निघालो, वाटेत मला पिकअप करून गाडी सुरू करताना आत्मा काही तरी शोधायला लागला. फोन करून एक रिंग दिली आणि चला... म्हणून गाडी सुरू केली. मग मी विचारलं काय झालं? तर म्हणाला मोबाईला हरवला बहुतेक. लोणावळ्याला फुड मॉलवर मी म्हटलं, अरे मोबाईल हरवला आणि तू एवढा शांत कसा? तर म्हणाला वैतागून तो कसा मिळणार? मिळायचा असेल तर मिळेलही. 


मित्रांना भेटायचं तर काळवेळ ना पहाता भेटायचंच हा याचा बाणा असतो. अतूल चुंबळे यांना ते अमेरीकेला जायला दुसर्‍या दिवशी निघणार होते तेव्हा रात्री साडेबाराला आम्ही त्याना भेटायला पुण्याला पोचलो होतो. पावसात मुंबईहून निघून गावी पोचताना वाट वाकडी करून वैभवाडीजवळच्या रानातल्या आडगावात, जोरदार पाऊस व रात्रीच्या काळोखात जावून त्या मित्राचं घर शोधून काढलं आणि ‘गावी आलो की येतो’ हे शब्द खरे केले होते. बेभान पावसात देवबागला जावून संजय मोंडकरला भेटणे हे मी विसरू शकत नाही, तसंच त्याचं राज्यपालाना भेटणं, दलाई लामांची भेट या गोष्टीही वेड लावणार्‍याच. जे आत्माला भेटलेत त्यांचेही असेच अनुभव असतील आणि जे अजून भेटलेले नाहीत त्यांनी एकदा भेटून बघाच, या माणसात (आत्म्यात) आपण हरवून जाल हे नक्की. गेली चौदा वर्षं मी त्याचा अनुभव घेतोय. सहली, प्रदर्शन, मेळावे, फोटोग्राफी, ट्रेकिंगपासून गावी एकत्र जाणं, अनेक उपक्रम राबवणं यात आत्माचा सतत सहवास लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे.

अनेक अतर्क्य, अशक्य वाटणार्‍या कितीतरी गोष्टी या माणसाने लिलया केल्या आहेत, त्यातल्या अनेक ‘लडाख प्रवास  अजून सुरू आहे...’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे‘ या दोन पुस्तकात लिहिल्या आहेत, ती पुस्तकं जरूर वाचावीत अशी विनंती आहे. 

भाग १: मुक्काम तर येणारच

भाग २: क्यामेरा क्या तेरा

भाग ३: जागेपणीचं स्वप्न

भाग ४: स्वर्गारोहण

भाग ५: पचेल तेच खावं

भाग ६: ब्रो

भाग ७: सीमा रक्षक

भाग ८: युटी (Union Territory) अच्छा है?

भाग ९: आत्मा रंगी रंगलो

'लडाख प्रवास  अजून सुरू आहे...' या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन (ऑस्ट्रेलिया)

लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्यासोबत टीम ईशा 









19 November, 2017

एक जिप्सी आणि ऋण मानणारा सच्चा कार्यकर्ता


  
आज दि. १९ नोहेंबर २०१७ रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या  साहित्यरंग महोत्सव  २०१७ - "प्रवासवर्णन आणि पर्यटन विकास" या ४ दिवसीयकार्यक्रमाअंतर्गत  चाकोरी बाहेरील पर्यटन या विषयावर  ईशा टूर्सचे  संचालक आत्माराम परब  याची प्रकट  मुलाखत होणार आहे.

स्थळ: दादर  माटुंगा  सांस्कृतिक  केंद्र
११२ , .के.सावंत मार्ग, (यशवंत  नाट्यगृहाशेजारी)  माहिम  मुंबई  ४०००१६  

या निमित्ताने अधिक माहितीसाठी मासिक ईशान्य वार्ताच्या  दिवाळी विशेषांकात प्रसिध्द  झालेला ईशा टूर्सचे  संचालक आत्माराम परब यांच्या वरचा माझा लेख.

माझी ती पहिलीच लेह-लडाखची सफर होती. चंदीगड-मनाली-लेह करून आम्ही कारगील आणि पुढे श्रीनगरला जाण्यासाठी लेहहून निघालो होतो. गेल्या नऊ-दहा दिवसांची भटकंती स्वप्नवत वाटत होती. लडाखचा देखणा प्रदेश अजून संपला नव्हता. पण आताचा आमचा प्रवास म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री कारगीलला पोहोचणे एवढ्याचसाठी होता. असं असलं तरी चकीत होणं आणि फोटो काढणं चालूच होतं. सकाळी लेहचा निरोप घेऊन साडेचार-पाच तास होत आले होते. सगळं शरीर संथावलेलं होतं. जेवणासाठी धाब्यावर थांबण्याची वाट सगळेच पहात होते. आम्ही थकलो होतो. बाहेर भाजून काढणारं उन, आणि चालत्या जिपमध्ये मध्येच जाणवणार्‍या झळा तर उंचावर गेल्यावर पुन्हा थंडी असा हवेचा खेळ चालू होता. सृष्टीचा अनोखा नजारा मात्र पुन्हा पुन्हा कॅमेर्‍याला अव्हान देत होता.

‘ईशा टुर्स’चे पर्यटक घेऊन चाललेल्या आमच्या गाड्या अचानक थांबल्या, त्या रस्त्याच्या कडेला एका मागोमाग एक पार्क केल्यावर त्यांची इंजिनं बंद झाली. पुढे मैलभरावर धुळीचा लोट उठला आणि मागोमाग मोठ्ठा स्पोटाचा आवाज झाला. समोरच्या पर्वताला आपटून त्याचा प्रतिध्वनी आल्यावर पुन्हा सन्नाटा पसरला.
अब क्या हुवा?
या आमच्या त्रासिक प्रश्नाला
ब्रो वालोंका काम चालू है।
असं निर्विकार उत्तर ड्रायव्हरकडून मिळालं. त्यांच्यासाठी ते नेहमीचं होतं. कमालीचा पेशन्स असलेल्या त्या ड्रायव्हर्सना आम्ही ‘बुद्धम शरणम....’ म्हणून आधीच शरण गेलो होतो. चला आता तासाभराला राखण लागली. अंग आंबून आलं होतं. बाहेर तापलेल्या उन्हात उतरण्यापेक्षा आहे ते बरं म्हणून बसून राहिलो. रस्त्यावर दगड मातीचा ढिगारा पडला होता. आता ब्रोची (Border Road Organization) माणसं येतील, मग रस्ता साफ होईल आणि मगच आम्ही मार्गस्थ होऊ याची कल्पना आली. एवढ्यात आत्माराम परब (संचालक ईशा टुर्स) स्वत: खाली उतरून त्या ढिगार्‍याच्या दिशेने गेले. पहाणी केली. आपल्या गाड्या जाण्यासाठी काय करता येईल याचा अंदाज घेऊन बहुदा त्यानी खाली वाकून समोर रस्यावर पडलेले दगड दरीत उचलून टाकायला सुरूवात केली.
“अरे हा माणूस स्वत:च कामाला लागला ! “
”.......”
हळूहळू एक-एक ड्रायव्हर, मग आम्ही असे पन्नास-साठ हात कामाला लागले. आमच्या गाड्या जाण्यापुरता रस्ता मोकळा झाला. गाड्या मार्गस्थ झाल्या. मगाशी आलेली मरगळ कुठल्याकुठे पळून गेली. लडाख बरोबरच आत्माराम परबानी मनात घर केलं ते कायमचं.

लडाखच्या पहिल्या सफरीत ‘आत्माराम परब’ हे अजब रसायन अनुभवलं. आत्माराम परब वरून ‘आत्मा’ असा प्रवास झाला. आणि मग प्रत्येक वर्षी लडाखवारी व्हायला लागली. लडाखची वाट खडतर आहे, अनेकदा ती अडते पण आत्मा असला की अडथळे दूर होतात (केले जातात), सगळ सुगम होऊन जातं. पण एकदा मात्र त्याला अपवाद झाला. लडाखला ढगफुटी झाली आणि अख्खं खोरं आणि तिथले आधीच कठिण असलेले रस्ते उध्वस्त झाले. आत्मा केनियाच्या टूरवर होता. तिथून मुंबईला येऊन थेट विमानतळावरून तो लेहला निघाला. ‘ईशा टुर्स’च्या पर्यटकांनी अल्पावधीत जमवलेली पुंजी घेऊन आत्मा ढगफुटीनंतरच्या तिसर्‍या  दिवशी लेहला जावून पोहोचला. तिथले ओळखीचे ड्रायव्हर, सखे-सोबती, मित्र यांच्या घरी जाऊन मदतीचा हात पुढे केला. अशा अवस्थेत माणसाला मदत आणि पाठीवर धीराचा हात या दोहोंची गरज असते. आत्माने ती मदत केली. लडाखशी असलेलं बंधुत्वाचं नातं आणखी दृढ झालं.

आता लडाखला ‘ईशा टुर्स’च्या दिड-दोनशे पर्यटकांच्या सहली हे नेहमीचंच झालं आहे. एवढ्या मोठ्या गोतावळ्यात आत्माचा मदत करण्याचा मुळ स्वभाव मात्र कायम आहे. आता ‘लडाख बुद्धीस्ट असोशिएशन’ तर्फे चालवल्या जाणार्‍या शाळेतील ३५ वंचीत मुलांचं पालकत्व ‘ईशा टुर्स’ने घेतलं आहे.

जेव्हा जशी ताकद होती तशी त्या माध्यमातून तन-मन-धन या तिन्हींचा वापर करून आत्माचा लडाखचा प्रवास सुरूच आहे. जग पादाक्रांत करीत असताना त्याचं लक्ष लडाखवर असतंच असतं. तिथे गेल्यावर मात्र लडाखचा आसमंत कसाही असला तरी याच्या प्रतिभेचं इंद्रधनू सप्तरंगांची उधळण करीत असतं. जगण्यातला आनंद शतगुणीत करीत रहातं.


नरेंद्र प्रभू



27 January, 2010

आत्मा



हा माझा जवळचा मित्र. याच्या बाबतीत रोज काहीतरी घडत असतं. कधी लडाखला गेलाय तर कधी भुतानला. नुकताच श्रीलंकेला जाऊन आला. ओळखीतलं कुणीही भेटलं तरी विचारणा होते आत्मा काय करतोय? आता काय म्हणून सांगायचं? हा माणूस एका मागोमाग एक काहीतरी करतच असतो. आपल्याला माहिती असलेलं सगळं सांगायचं असं ठरवलं तरी अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात. यावर उपाय म्हणून म्हटलं फेस बुकवर एक ग्रुप तयार करावा. तसा केलाय Atmaram Parab Fan Club या नावाने. बघा...वाचा.. जॉईन व्हा.

आत्मा... ज्याच्याशी माणसं मनाने जोडली जातात. जो सह्य आणि असह्य मित्रांनाही हसत मुखाने सामोरा जातो. क्रिकेट, कस्टमस्, फोटोग्राफी, इंटेरिअर डेकोरेशन अशी मुशाफिरी करत जो आता लोकांना भटकवण्यात दंग आहे. आत्ता तरी तेच करतोय, पुढे काय करणार इश्वर जाणे. एकूण काय, देवाक काळजी...!

लडाख, हिमाचल प्रदेश, स्पिती-व्हॅली, सिक्कीम, भुतान, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, मणिपूर सगळ्या हिमालयात भ्रमंती. हिमालय हा त्याचा ध्यास असं असलं तरी तिकडे असताना सह्याद्रीच्या भेटीचीच मनात आस. म्हणून दशसहस्त्र फुटांवरून जो येतो तो समुद्र सपाटीला पार कोकणात तिकडे सिंधुदूर्गात जाऊन थडकतो. प्रत्येकवेळी नवे सखे-सोबती यांची भर पडलेली असते किंबहूना तीच मिळकत असते. असा हा आत्मा. मी त्याचा फॅन..... आपण...?


23 February, 2012

केल्याने देशाटन


बरेच दिवस एकाच परिघात फिरत राहिलं तर जीवन निरस होत जातं. पण भ्रमंतीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर, किंबहूना पडतानाच हुरूप येतो. फिरण्यासाठी आपण कुठे जातो या पेक्षा जातो की नाही याला खुप महत्व आहे. पण समजा खंडप्राय अशा आपल्या भारत देशात जर आपण एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे प्रयाण करणार असू आणि काही तासातच दूरवर पोहोचणार असू तर काय बहार येईल महाराजा ! पण हे मी का सांगतोय..... कारण...... आज मी मुंबईहून पुर्वांवांचलाच्या सफरीवर निघालोय.  पुर्वांचल म्हणजे असा प्रश्न पडला का? अहो, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपूरा, नागालॅंड, मणिपूर आणि मिझोराम या भारताच्या पुर्वेकडच्या सात राज्यांना पुर्वांचल म्हणतात. 

तर आज आत्ता आमचं विमान मुंबईहून निघून दिल्लीत काही वेळासाठी थांबलं आहे. थोड्या वेळाने ते गुवाहाटीसाठी रवाना होईल, घाई नाही पण मला शक्य तेवढ्या लवकर तिकडे गुवाहाटीला पोहोचायचं आहे. गडबड, गोंधळ या पासून दूर एक अनोखा प्रदेश माझी वाट पाहात आहे. मुख्य म्हणजे माझा प्रिय मित्र आत्मा (मित्र हो,..., हे महा भारी प्रकरण आहे.) मला भेटणार आहे. पण हे गुपीत मी माझ्या मनातच ठेवलय, बरोबरच्या मंडळींना त्याचा अजून थांगपत्ता नाही. असो त्याला अचानक पाहिल्यावर काय होतं बघूया.

आला..... आत्माचाच फोन आला......   .... .... ......

चला, हा कोलकात्याच्या विमानतळावर पोहोचतोय, आमचं विमान उडण्याची तयारी झालीय, आता लॅपटॉप बंद करावा लागणार तेव्हा पुढचा वृतांत नंतर देईनच. तुर्त थांबावं लागतय.

आपलाच रोजचा मित्र, पण तो वेगळ्या प्रदेशात भेटणार, यातही एक वेगळी मजा असते. तिथे गेल्यावर एका छप्पराखालची माणसं एकाच घरातील होवून जातात. बघूया काय होतं ते, आत्मा सोडून बाकी सार्‍यांची अजून तशी सारखी ओळख व्हायची आहे. हो.. दांडेकर साहेब आधीपासून परिचयाचे  आहेत. असो.  

इलेक्ट्रॉनीक उपकरणं बंद करा अशी सुचना झाली तेव्हा हे आता बंद करतो. पण आता मला तिकडे गुवाहाटीला आत्मा भेटणार की काझीरंगाला ?


25 August, 2013

आत्माची शंभरावी लडाख सफर


मित्र हो...!  आज माझा प्रिय मित्र आत्मा आपल्या शंभराव्या लडाखवारीवर चाललाय. एका लडाख बाहेरच्या माणसाने लडाखला शंभरवेळा जाणं हा एक विक्रम असावा. पर्यटकांना घेवून लडाखला जायचं असा ध्यास घेतल्यापासून त्याच्या स्वत:च्या शंभर वार्‍या झाल्या आहेत, असा योग फार क्वचीतच येतो, या भटक्याच्या आयुष्यात तो आलाय. आज हजारो पर्यटक लडाखला ईशा टुर्स बरोबर जावून आलेत, काही आता चाललेत तर काही जायची तयारी करताहेत. पण आत्मासाठी ती आता मळलेली वाट झाली आहे. पण ही वाट त्याची त्याने घडवली. अनेक बिकट प्रसंगांना तोंड देत प्रवास चालू ठेवला. आणि तो प्रवास पर्यटकांसाठी सोपा केला. आज त्याच्या पाठीवर कौतूकाची जी थाप पडते त्यासाठी त्याने आधी खस्ता खाल्ल्यात हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.
तो लडाखला असा काही भिडला की लडाखने आणि लडाखींनींही त्याला आपलसं केलं. आपल्या स्वत:च्या गावात जेवढा त्याला आपलेपणा वाटतो तेवढाच लडाखलाही वाटतो. लडाखवर जेव्हा ढगफुटीने प्रहार केला तेव्हा तमाम पर्यटक आणि जनता लडाख सोडून जाण्यासाठी विमानतळावर गर्दीकरून होती तेव्हा तो मात्र परदेशातून आल्या आल्या लडाखला दाखल झाला होता. त्याच्या आश्वासक कृतीने तिथल्या अनेक लडाखी मित्रांना नक्कीच आधार मिळाला.

लडाख हिल कौसील, जम्मू काश्मिर सरकारचा पर्यटन विभाग यानी आत्माचं वेळोवेळी कौतूक केलं आहे, ते मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक लडाखला आणल्याबद्दल पण उन्हाळी पर्यटनाबरोबरच लडाखच्या हिवाळी सहली सुरू करून त्याने इथल्या पर्यटनाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. पर्यटनाचे चार महिने संपल्यावर मरमॅट सारखी गुडूप होणारी इथली हॅटेल्स आता हिवाळ्यातही उघडी राहू लागली आहेत. नुकतच आमचं लडाख प्रवास अजून सुरू आहे हे पुस्तक प्रकाशीत झालं तेव्हा बोलताना आत्मा म्हणाला होता की आता मी जो काही आहे ती लडाखचीच देन आहे. एवढा तो लडाखशी एकरुप झाला आहे.

त्याच्या पहिल्यावहील्या लदाख सफरीचा थरार लडाख प्रवास अजून सुरू आहे या  पुस्तकात आपल्याला वाचायला मिळाला आहेच पण त्या घटनेनंतर तब्बल शंभरवेळा लडाखला येणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यासाठी लागतं ते अफाट धैर्य, अविरत ध्यास, सर्वस्व झोकून द्यायची वृत्ती आणि फायद्या तोट्याचा विचार न करता व्रतस्थतेने पर्यटकांची सेवा करण्याची तळमळ हे सगळ त्याच्या ठायी आहेच. नुकताच कैलासची परिक्रमा करून मी परत आलोय त्या वेळी कैलासपतीला जे साकडं घातलं ते एवढंच होतं की अशीच ताकद, धैर्य आणि आरोग्य त्याला लाभावं. आपल्या सारख्या जीवाभावाच्या पर्यटकांकडेही आज मागत आहे ते आत्मा आणि ईशा टुर्ससाठी असेच अनंत आशिर्वाद.          

          





                            

27 October, 2013

दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने


लडाख....
....... प्रवास अजून सुरू आहे. 

या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्यावेळी मी केलेल्या भाषणाचा गोषवारा. 

मित्रहो, आपल्या मध्ये मी आज बोलायला उभा आहे तो या सन्माननीय व्यक्तींमध्ये माझा मित्र आत्माराम परब असल्यामुळेच. मित्रहो, ह्या मिलींदजींनी माझा उल्लेख काका म्हणून केला पण या माणसाच्या सहवासात आल्यापासून मी रोजच्या रोज तरूण होत आहे. या माणसात उत्साह, उर्जा एवढी आहे की एखाद्या लहान मुलासारख्या याला नेहमी नवनवीन कल्पना सुचत असतात आणि आम्हा मित्रांना पालवी फुटल्या सारखं होत राहतं. मला याने मुल तर केलच पण लेखकही केलं. या माणसाने पर्यटनाच्या क्षेत्रात जी काय वेगळी आणि साहसी वाट शोधून काढली आणि आज तीला मळलेली वाट केली त्या त्याच्या अनोख्या प्रवासामुळे मी आज आपल्यामध्ये उभा आहे. आत्माच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटारसायकल प्रवासाची खिळवून ठेवणारी कथा, त्या घटनांचा थरार म्हणजे हे पुस्तक आहे. आज पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशीत होताना माझ्या मनात संमिश्र भावना उचंबळून येत आहेत कारण या पुस्तकाचं आणि पुण्याचं हे पुस्तक जन्माला येताना पासूनचं नातं आहे. या पुस्तकाच्या काही प्रकरणांचं वाचन या पुण्यातच झालं. तेही रेणू दिदिंच्या घरात. मी पुस्तक वाचत होतो आणि दीदी मात्र मनाने त्या मोटारसायकलवर स्वार झाल्या होत्या. त्याच वेळी माझ्या लिखाणाने टॉप गेअर मघे जावून वेग घेतला होता. या पुस्तकाची जी मर्यादीत आवृत्ती लेह मध्ये जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशीत झाली त्या पहिल्या प्रिंटचे पहिले वाचक लेप्टनन जनरल रवी दास्ताने हे ही पुण्याचेच. हे पुस्तक आणि पुणं यांचं आणखीही एक नातं म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना श्रेष्ट सामाजसेविका, लेखिका आणि ज्या एकलव्य न्यासाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या न्यासाच्या अध्यक्ष रेणूदिदि गावस्कर यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. असं हे पुस्तक आधीच पुण्याशी घट्ट बांधलं गेलं आहे.
    
हे पुस्तक लिखाणाचा जो प्रवास झाला तो प्रवासही फारच रोमांचकारी होता ते माला इथे सांगावसं वाटतं.  सोपानदेव आणि बहिणाबाई चौधरींमध्ये घडलेला एक किस्सा आहे. सोपानदेव एकदा विवेकानंदावर काही वाचत बसले होते. बहिणाबाईंनी विचारलं तू हे काय आणि कुणाबद्दल वाचतोस, तर सोपानदेव म्हणाले आई तो थोर माणूस होता तुला तो कसा कळणार? बहिणाबाई मात्र तो काय वाचतोय ते ऎकत राहिल्या. दुसर्‍या दिवशी पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओवी म्हणू लागल्या तेव्हा सोपानदेव चमकले आणि ते विचारू लागले ही स्वामी विवेकानंदावरची ओवी आहे तुला गं कशी माहित? बहिणाबाई म्हणाल्या काल तू हेच तर वाचत होतास.    

एका रात्री तीन साडेतीन तास या पुस्तकाला घटनाक्रम माझ्या या मित्राने मला सांगितला आणि सकाळी उठल्या उठल्या लाडाख प्रवास अजून सुरू आहेहे नाव आणि एकूण एकवीस प्रकरणांची नावं एका कागदावर लिहिली आणि आत्माला वाचून दाखवली. या माणसाला आम्ही जवळची मित्रमंडळी आत्मा म्हणतो आणि हे पुस्तक मी लिहिलं असलं तरी या पुस्तकाचा खरा आत्मा हाच माणूस आहे. एकदा एका दिव्यातून सुखरूप बाहेर आल्यावर पुन्हा त्या वाटेला सहसा कुणी जात नाही पण याने तर कस्टमची नोकरी सोडून हा मार्ग स्विकारला, त्या त्याच्या जीवन प्रवासाची सुद्धा ही कथा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात असा एक हिरो असतो, आपल्याला त्या मनातल्या हिरो सारखं वागता आलं पाहिजे असं आतून कुठं तरी वाटत असतं, पण जोखीम पत्करायची आपली तयारी नसते. आत्मारामने ती जोखीम पत्करली आणि हिमालयातल्या अनेक वाटा प्रशस्त केल्या. नुसतीच जोखीम नव्हे तर कल्पकता, जिद्द, चिकाटी, माणसं जमवणं आणि ती राखणं, झोकून देणं असा अनेक गुणांनी युक्त असा हा माणूस एकदा का आपला मित्र झाला की मग तो सतत आपल्या संपर्कात येत राहातो. या पुस्तकात जो थरार मांडलाय त्या प्रत्येक घटनेत याचे हे गुण आपल्याला दिसून येतील. पुस्तक लिहून झाल्यापासून ते वाचकांना वाचायला मिळावं असं मला सारखं वाटत होतं. लिहून झाल्यानंतर तीन वर्षांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि आता सहा महिन्यात हे दूसरी आवृत्ती निघत आहे.

आज पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक वाचकांचे फोन आले आणि त्यानी पुस्तकाचं कौतूक तर केलंच पण लडाखला जायची इच्छाही प्रगट केली. या पुस्तकाचे प्रिंटर माधव पोंक्षेसाहेब यानी हे पुस्तक छपाईला जायच्या आधी वाचून काढलं आणि आता लडाखला जायचंही नक्की केलय. लडखच्या पर्यटनाला चालना देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं म्हणूनही मला आनंद वाटत आहे. पुस्तक प्रकाशीत झालं आणि लगेचच वाचकांचे अभिप्राय यायला लागले. त्यातले बहूतेक वाचक एका दिवसात पुस्तक वाचून संपवलं म्हणणारे होते. काही निवडक अभिप्राय या आवृत्तीत छापले आहेत पण काही मनात घर करून राहिले त्यातला आत्माच्या आईचा अभिप्राय प्रातिनिधिक म्हणायला हवा. पुस्तकातला घटनाक्रम तिला चांगलाच माहित होता पण शेवटच्या दोन प्रकरणातलं लडाखचं वर्णन वाचून तीने आत्माला विचारलं लडाखाक जावक किती पैसे लागतत रे...., यंदा माका जावचा आसा. मला वाटतं याच्या एवढा उत्तम अभिप्राय असू शकत नाही. दिवसागणीक वेडी स्वप्न घेवून घराबाहेर पडणारा हा मुलगा आणि कायम कापरं काळीज घेवून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ही माय. तीला एक फोन करण्यासाठी ऎशी-पंच्याऎशी किलोमिटर पायपीट करत, नद्या-नाले, डोंगर तुडवत गेलेला हा तीचा शिवबा त्या खडतर वाटेवरून परत आला त्या हृदयस्पर्षी नात्याचीही ही गोष्ट आहे. नुकतीच आपण उत्तरांचलची ढगपुटी टिव्हीवर पाहिली असेल तशाच प्रकारच्या ढगफुटीने हिमाचलप्रदेश मध्ये 1995 साली हाहाकार माजवला होता आणि नेमक्या त्याच जीवघेण्या आपत्तीत आत्माराम आणि त्याचे मित्र सापडले होते त्याची थरारक कथा म्हणजे हे पुस्तक आहे.     

एखादी संस्था माणूस म्हणून जन्माला येते हे मी याच्याबाबतीत अनुभवलय त्यामुळेच मला वाटतं हा एक संस्था म्हणून जन्माला आलाय. अनेक व्यवधानं सांभाळत त्याचा हा प्रवास अव्याहत सुरू आहे. मला दिदिंनी सांगितलेली एक चीनी गोष्ट सांगावीशी वाटते. एक शेतमजूर दमून भागून घरी आल्यावर एक मेणबत्ती लावायचा, झोपी गेल्यावर त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं. त्या मेणबत्तीच्या ज्योतीमधून त्या स्वप्नाला सुरूवात व्हायची. तिथला राजा त्याच्या जवळ येवून आपल्या मुलीचं लग्न कसं होणार म्हणून चिंतामग्न स्थितीत बसायचा. याला वाटायचं मी यात काय करणार? मग एकदा सेवकाने शेतमजूराला सांगितलं, अरे तो राजा तूलाच गळ घालतोय, तू त्या सुंदर राजकुमारीशी लग्न कर. मग तो राजी होतो आणि त्यांचं लग्न होतं. तो शेतमजूर रोज एक मोणबत्ती पेटवाचा आणि त्याच्या स्वप्नाला त्या ज्योतीमधून सुरूवात व्हायची. आत्मा असंच रोज आम्हाला ज्योतीमधलं स्वप्न देतो आणि ती स्वप्न अशी सत्यात उतरतात. मग त्या स्वप्नांच्या अशा आवृत्या निघतात. या प्रसंगी मला वाटतं आमच्या नव्या पुस्तकाची इथे पुण्यात घोषणा करावी. मित्रहो, ईशा टूर्स आणि आत्माराम परब यांच्या जीवन प्रवासावर प्रभाव टाकणारी माणसं, प्रसंग आणि किस्से यावरचं पुस्तक लिहावं असं नक्की झालं आहे त्या आमच्या नव्या पुस्तकाचंही असंच स्वागत होईल याची मला खात्री आहे. 


नुकतीच आत्माची लडाखची शंभरावी सफर झाली आणि लगेचच एकशे एकावी पण झाली. शंभराव्या सफरीत ईशा टुर्सचे जे दिडेशे पर्यटक त्याच्या सोबत लेह लडाखला होते त्यांच्या बरोबर मी सुद्धा होतो. तिथे त्याचं जे भव्य स्वागत आणि सन्मान झाला तो पाहून मला आनंद तर झालाच पण एक मर्‍हाठी माणूस म्हणून खुप अभिमानही वाटला. मला वाटतं हे पुस्तक वाचताना आपल्याही मनात तशीच भावना उत्पन्न होईल. लडाखला गेला नसाल तर जावंसं वाटेल. गेला असाल तर पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल. या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी मी हे नक्की म्हणू शकतो कारण तशा प्रकारचे अभिप्राय महाराष्ट्रभरातून आम्हाला प्राप्त झाले आहेत. पुस्तक कसं आहे ते आपण वाचून ठरवालच पण हे पुस्तक वाचल्याने लडाखप्रांत मात्र आपल्या मनात घर करून राहील अशी मला खात्री आहे. धन्यवाद.  जय हिंद, जय माहाराष्ट्र.                  

नरेंद्र प्रभू 

02 August, 2012

जाता बुद्धाच्या देशा – भूतान भाग : १



बागडोगरा विमातळ

पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक जीएनएच’ (Gross National Happiness) किती आहे हे पाहिलं जातं तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान. थिंपू या देशाच्या राजधानीच्या शहरातही सिग्नल यंत्रणा नसलेला पण वाहतूकीचे नियम अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश म्हणजे भूतान. इतर सारं जग उत्पन्न कसं वाढेल याच्या चिंतेत असताना पर्यटकांची गर्दी नाकारणार्‍या पर्यायाने पर्यटन उद्योगामुळे मिळणार्‍या मिळकतीवर पाणी सोडणारा देश म्हणजे भूतान. सगळा देशच जागतीक वारसा आहे असं मानून मनापासून तसं वागणार्‍यांचा देश म्हणजे भूतान. अखिल जगतात लोकशाहीचे वारे वाहात असताना राजेशाही पाहिजे म्हणून निदर्शन करणार्‍या मणसांचा देश म्हणजे भूतान. सार्वजनिक ठिकाणीही कमालिची  स्वच्छता असलेला आरोग्यदायी देश म्हणजे भूतान. टपरी किंवा झोपडपट्टी शोधूनही सापडणार नाही असा देश म्हणजे भूतान. हॉटेल पासून दुकानापर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान. हिमालयात वसलेला आपला सुंदर शेजारी देश म्हणजे भूतान. भूतान विषयी आजपर्यंत माहित असलेल्या ही वैशीष्ट्ये आता पडताळून पहायची होती. भूतानला जायच्या आधीच मन तिथे वास्तव्याला गेलं होतं. विमानाने जायचं असलं तरी तिथे थेट अवतिर्ण होता आलं असतं तर किती बरं झालं असतं!


बागडोगरा विमातळावर विमान उतरत होतं, खाली हिरवागार प्रदेश दृष्टीस पडत होता. चहाच्या बागा असाव्यात,पण तो गर्द हिरवेपणा पाहाता पाहाता विमानाने धावपट्टीवर हलकेच चाकं टेकवली. वर जाताना आकाशात भरारी घेण वैगेरे आपण म्हणतो पण जमिनीला पाय लागणं किंवा पाय जमिनीवर असणं किती महत्वाचं असतं ते आकाशात उंच गेल्याशिवाय कळत नाही. बागडोगरा हे नाव आपण सहसा ऎकलेलं नसतं. प. बंगाल राज्यातल्या दार्जिलिंग जिल्ह्यातला हा विमान तळ लष्कराचा असला तरी नागरी विमान तिथे उतरू दिली जातात. पुढे हे विमान असम राज्यात गोहाटीला जायचं होतं. मागे गोहाटीला जाताना आम्हाला प्रथम गोहाटीला उतरवून त्यावेळचं विमान नंतर बागडोगराला गेलं होतं. एवढ्या दूरवर येवूनही विमान आणखी पुढे जाणार आणि पुन्हा ते उतरणार ते आपल्याच देशात असा विचार मनात आला आणि आपला भारत देश खरच खंडप्राय असल्याचा अभिमान वाटायला लागला.

आपल्या देशातील महानगरं सोडली तर इरत ठिकाणची विमानतळं गजबजलेली नसतात. आलेल्या विमानातून उतरलेले प्रवासी तेवढेच बाहेर विखूरले जातात आणि पुन्हा सगळा परिसर सामसूम होवून जातो. आम्ही ताजे तवाने होईपर्यंत सहप्रवासी निघून गेले होते. आमची वाट पाहत असलेल्या बाहेरच्या वाहनात बसून आम्हीही निघालो आणि थोड्याच वेळात  शहरातली वाट संपवून मोकळ्या प्रदेशात आलो. सभोवताली चहाच्या बागा, मार्च महिना असल्याने प्रसन्न करणारी हवा आणि हसरे सोबती यामुळे प्रवास मजेत चालला होता.  वाटेत एक नक्षलबारीला जाणारी बस दिसली. म्हणजे नक्षलवादी चळवळीचं मुळ असलेला प्रदेश जवळच होता तर. नक्षलवाद, त्या वरचे उपाय, आदिवासी त्यांचे प्रश्न, तळागाळातल्या लोकांना न जुमानणारी आपल्या देशातली शासन यंत्रणा, झोटींगशाहीचं प्रतीक बनलेली प. बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बद्दल अनेक विचार मनात येत गेले. अशावेळी आपण नजरेने एक बघत असतो आणि मन भलतीकडेच भटकत राहातं, तसच काहीसं होत होतं. प्रवासात हे एक बरं असतं. दुसरं काहीच करत नसलो तरी आपण स्थळकाळाचं बंधन नसलेले विचार करू शकतो. एकाच दिशेने अखंड प्रवास सुरू असला की मग ती  विचारांची साखळीही लांब लांब होत जाते. तीन साडेतीन तासांचा प्रवास असल्याने ती प्रक्रिया चालूच राहिली. जलपायगुडीचा मैलाचा दगड दिसला. रल्वेने आलो असतो तर इथपर्यंत आलो असतो. रस्त्याला समांतर असे रल्वेचे रुळ दिसायला लागले. तिस्ता नदीवरचा पूल लागला. मग जंगल सुरू झालं. वाटेत एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो, मोठा कप भरून चहा मिळाला पण चव यथातथाच होती. तिथलो लोक पचकवणी पण भरपूर चहा पिणारे आहेत.

सकाळपासून हजारो कि.मी. प्रवासहोवूनही तो अजून संपला नव्हता. गाडी बाहेरचं दृष थकवा दूर करत होतं. आता अंधारून यायला लागलं. उत्तर-पुर्वेकडचा हा भाग असल्याने तिथे लवकर काळोख होतो. तशातच खड्डे असलेला अत्यंत खडबडीत असा रस्ता लागला. पुढचे दहा किलोमिटर हा असाच रस्ता आहे ड्रायव्हर विनोदने पुस्ती जोडली. चला तेवढाच पाळण्यात बसल्याचा आनंद. प्रवासात हा असा ऍटीट्युड ठेवावाच लागतो. नाहीतर तो प्रवास आणखी कंटाळवाणा होतो. काही लोक तर या आधीचे कष्टप्रद झालेले प्रवास पुन्हा पुन्हा आठवून दु:खात भर घालून घेतात.

कितपर्यंत पोहोचलात? ड्रायव्हरला पुन्हा पुन्हा फोन येत होता. आत्मा आणि आणखी काही मंडळी भूतानच्या प्रवेशद्वारवरच्या फुन्तशोलींग या गावात आधीच पोहोचली होती. थोड्याच वेळात आम्हीही पोहोचलो. प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून नामग्ये या हॉटेल मध्ये पोहोचलो. आपल्यापेक्षा त्यांची घड्याळं अर्धा तास पुढे होती.  तेवढा एक फरक सोडला तर अजून आपला देश सोडल्याची जाणीव होत नव्हती. नामग्ये हॉटेल मधली ती संध्याकाळ मात्र उत्साहवर्धक होती. माझा मित्र आत्मा सलीम या आमच्या तिथल्या व्यवस्थापकाबरोबर मराठीत बोलत होता ते ऎकून मी चक्रावलो होतो. या माणसाकडे अशी माणसं कशीबुवा आकर्शीत होतात?  सहलीला  अशा गोड धक्क्याने सुरूवात झाली होती.




03 March, 2012

गुवाहाटी ते काझीरंगा



गो एअरचं विमान ठरल्या वेळेपेक्षा तीस मिनिटं उशीराच गुवाहाटी च्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तेव्हा मला आगमन कक्षामधून लवकरात लवकर बाहेर पडायची घाई झाली होती, कारण आमच्या आधीच गुवाहाटीला पोहोचलेले अनिल, अदिती आणि कृपा साळवी, तसच आदित्य माझी वाट पाहात ताटकळत होते. आम्ही एकूण वीसजण आत्ता उतरत होतो. मी सामान घेवून बाहेर पडलो तरी इतर मंडळी बाहेर येईनात. सर्वांनी सामान तर घेतलं होतं. आता काय झालं म्हणून बघायला गेलो तर काहींच्या ब्यागा तुटल्या होत्या. हे विमान कंपनीवाले सामान काळजीपुर्वक हाताळत नाहीत आणि मग प्रवासाच्या सुरवातीलाच लोकांना त्रास सहन करावा लागतो. मंडळी सामानासहीत बाहेर आली तेव्हा तिकडे राम, क्रिष्णा, अमुल्यनाथ वैगेरे आमची वाट पाहत गाड्या घेवून सज्य होते. मंडळी गाडीत बसत असतानाच तिकडे आत्माचं विमान गुवाहाटीला उतरलं होतं. चला हा आला तर. तो आणि इरत सात मंडळी बाहेर यायच्या आत आमची वाहानं काझीरंगाच्या दिशेने निघाली होती.

गुवाहाटी काझीरंगा प्रवास सुरू झाला, हा प्रवास मी या आधी सुद्धा केला आहे. पण त्या वेळी जवळ जवळ काळोखातच सगळा रस्ता पार करावा लागला होता. आता दुपारच्या दोन सव्वादोन च्या सुमारास प्रवास सुरू झाल्याने किमान तीन तास तरी बाहेरचा देखावा दिसणार होता. आम्ही निघालो असा आत्माचा फोन आला......., व्वा...! म्हणजे आता आमच्या मध्ये फक्त पंधरा मिनिटांचंच अंतर होतं तर!  

वाटेतल्या तंदूरबार रेस्टॉरंट मध्ये चहासाठी थांबलो. आमच्या चहा होई पर्यंत आत्मा आणि मंडळी पोहोचतील असा कयास होता, पण पंधरा मिनिटात मंडळी पोहोचली तरी चहा तयार झाला नव्हता. बरं चहा आणायला हा असमला (आसाम नव्हे हा...!) गेला का? असा प्रश्न विचारायची सोय नव्हती कारण आम्ही खुद्द असम मध्येच होतो. आत्माला अचानक समोर पाहून मंडळी चकीत झाली. मी सोडून बाकीच्याना अत्मा इथे भेटेल असं वाटलं नव्हतं. सहलीवरचा पहिला चहा यायच्या आतच दुधात साखर पडली होती. पण तिथलं चहा पुराण संपेपर्यंत चक्क पंचेचाळीस मिनिटं गेली आणि अपेक्षेपेक्षा जास्त पैसेही.

आता संध्याकाळ दाटून यायला लागली. मात्र घड्याळात पाचच वाजले होते. आपल्या भारत देशाच्या अतीपुर्वेकडच्या भागातून आमचा प्रवास सुरू होता. जागो जागी खणलेले अरुंद रस्ते, धुळ यांचा सामना करत मजल दर मजल करणं सुरू होतं. आपल्याकडे रस्ते रुंदीकरणाचं काम चालतं, तसं इकडे रस्ते उंचीकरणाचं काम चालू होतं. पावसाळ्यात ब्रम्हपुत्रेला येणार्‍या महापुरात हे रस्ते पाण्याखाली जातात आणि संम्पर्क तुटतो म्हणून ही उंची करणाची मोहीम. आता पुर्ण काळोख झाला होता. पहाटे पाच पासून सुरू झालेल्या प्रवासामुळे अंग आंबून गेलं होतं. डोळे पेंगुळायला लागले होते. तेवढ्यात सगळ्या गाड्या थांबल्या. खुद्द आत्मा बरोबर असल्याने मी गाडी बाहेर पडलो नाही. पण मग सगळेच बाहेर पडलेले पाहून मी बाहेर आलो तर सगळे जण शहाळी खात होते. (असमीत शहाळ्याला डाब म्हणतात.) चला आणखी अर्धा तास जाणार तर. मंडळी गाडीत बसली, डोळ्यावरची झापडही दूर झाली, आता पुन्हा रिसॉर्ट कधी एकदाचं येतय म्हणून वाट पाहाणं सुरू झालं. ठिकठिकाणी हत्ती, वाघ, हरण रस्ता क्रॉस करत असेल तेव्हा गाडी जपून चालवा, त्यांना इजा पोहचवू नका असे बोर्ड लावलेले दिसत होते. उद्या सकाळची पहिली सफारी डोळ्यासमोर दिसू लागली. मन:पटलावर गेल्या वेळचं काझीरंगा सरकत असतानाच लॅंडमार्क वूड रिसॉर्टचा बोर्ड दिसला, गाडी मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्याला लागली, हे रिसॉर्ट कसं असेल? अशी उत्सुकता वाटत असतानाच कंदीलाची रोषणाई केलेला रिसॉर्टचा रस्ता लागला,  प्रशस्थ अशा त्या रिसॉर्ट समोर गाडी उभी राहिली. मंडळी खुशीत आली,  चला सुरूवात तर उत्तम झाली. उद्या पहाटे पाच वाजताच्या पहिल्या सफारीला जायला सर्वच उत्सूक होते. खरं म्हणजे उद्या सहलीला खरी सुरूवात होणार होती.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates