भय, दुःख, हताशा या सर्वावर काळ हेच एक उत्तर होऊ शकतं. नव्याने कामाला लागण्यासाठी जी ऊर्जा लागते ती आपणाला निसर्गाकडुन नक्कीच प्राप्त होईल या उद्देशाने पुन्हा एकदा निसर्गाकडे गेलो आणि त्याने मला निराश केलं नाही.
चार घटका विश्रांती घेऊन इगतपुरीहून भंडारद-याकडे निघालो. वाटेत शिर्डीकडे चालत जाणारे साईभक्त पाहून गंम्मत वाटली. हल्ली गावाकडच्या लोकानीही चालणं टाकलय. तासंतास वाहनांची वाट पाहणारे लोक आपल्याला दिसतात. पण हे मात्र चालताहेत दिवस, रात्र, पुन्हा दिवस, मैलोंनमैल, वारी एक वार दोन वार वारंवार. हि उर्जा कोणत्यातरी कामात लावली तर ? एक विचार मनात आला. पण मन प्रत्येकाचं वेगळ कसं जगावं, कश्यासाठी जगावं हल्ली वरच्यावर असे प्रश्न पडतात, प्रसंग येतात, त्यावर त्यानी शोधलेलं हे उत्तर असावं किंवा हे एखाद्यालाच सुचलं असावं आणि इतरांचा सहभाग असाच, मोठा विचार न करता.
भंडारद-याच्या आर्थर जलाशयाकडे पोहोचलो. संथ निळशार पाणी त्यात डुंबणारी चार दोन मुलं, पर्यटकांसह फिरणारी एखादी नाव बाकी सगळं कस शांत शांत. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी भंडारद-याला तब्बल १६ तासाहून जास्त वेळ महापुराने ओलीस ठेवलेले जलखात्याचे कर्मचारी आठवले. अतिरेक पावसाने केलेला, पाण्याने केलेला आठवला. आता त्याच नामोनिशाण नव्हतं, जणुकाही घडलच नव्हतं.
संध्याकाळच्या आकाशात रंग भरलेले होते. आज जशी रंगांची उधळण होती तशी उद्या नसणार, काल नव्हती नित्यनवे रंग देणारा निसर्ग मनाला उल्हसित करुन गेला. जळमटं केव्हाच दूर झाली होती.
ले. नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment