अच्युत पालव ऊर्फ कॅलिग़्राफी म्हणण्या एवढं पालवांच नाव या कलेशी जोडलं गेलं आहे. शब्दाना अर्थगर्भ व्यक्तिमत्व प्रदान करताना नित्यनवे अविष्कार सादर करणे हि तर त्यांची हातोटी. रोजची वर्तमानपत्र, मासिकांमधून त्यांच्या कलेचा आस्वाद वाचकाना घेता येतोच आणि त्या माध्यमांमधून ते सतत घरा-घरांत संचार करत असतात. पण जगभरात कलेच्या माध्यमातून त्यांनी जी रांगोळी घातली त्याला तोड नाही. पालव यांच्या अक्षरचित्रांनी रशियातील म्युझियममध्ये कायमस्वरूपी विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. 'युरोपियन कंटेम्पररी म्युझियम'मध्ये निवड झालेले पालव पहिले भारतीय आहेत.

जगभरातील लोकांचा कॅलिग़्राफीतला उत्साह, काम आणि जाणिव बघुन आपल्या भारतातील विद्यार्थी मागे आहेत हे जाणून संपुर्ण देश पादाक्रांत करत अनेक कलामहाविद्यालयात स्वतः जाऊन जागृती करण्याचं काम अच्युत पालवानी केलं आहे. ही सामाजिक जाणिव आणि समाजऋणातून उतराई होण्यासाठी कलाकार खरतर कला सादर करण्यात मग्न असतो पण पालव या अवस्थेतून जागृत होऊन समाजसेवकाच्या चालीने ही भ्रमंती करतात ते पाहून त्याना सलाम करावासा वाटतो
कलाकाराच्या कलेला वेदनेनेही अंकुर फुटतात, असं असलं तरी या जातीवंत कलाकाराने भगिनी निधनाच दुःख पोटात घेऊन आपल्या महोत्सवाला हसत मुखाने सामोर जाणं हा नियतीचा खेळ म्हटलं तरी ते सोप नक्कीच नाही.
जे. जे. कलामहाविद्यालयात २१ डिसेंबर पर्यंत १० ते ७ या वेळात अच्युत पालवांच्या पुढाकाराने 'कॅलिफेस्ट ' हे प्रदर्शन भरलय त्याला आपण एकदा जरुर भेट द्याच.
ले. नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment