25 May, 2012

तवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग दोन




चोहीकडे बर्फ, अंधूक होत चाललेला प्रकाश आणि वाढत चाललेली थंडी अशा वातावरणात प्रवास चालूच होता. दिवसभरच्या प्रवासामुळे आलेला शिण आणि बाहेर काही दिसत नसल्याने प्रवास लाबतचालला आहे असं वाटत होतं. सेला पास मागे टाकून वळणावळणाच्या रस्त्याने गाडी खाली उतरत होती. बाहेर मिट्ट काळोख, क्रिष्णाच्या( आमचा ड्रायव्हर) भरोशावर सगळं चाललं होतं. रस्ते खराब असल्याने मध्येच धुळीचे लोळ उसळत होते. आता हॉटेलवर पोहोचायची वाट पहाणं एवढच काम उरलं होतं. क्रिष्णाला रस्ता माहित होता बाकी आमचा प्रवास अज्ञाताकडे होतो तसा चालला होता. दूर उंचावर दिवे दिसायला लागले, ते तवांग होतं. पुन्हा गाड्या चढाला लागल्या, सात सव्वासातच्या दरम्यान हॉटेलवर पोहोचलो. गरम गरम चहा कॉफीने स्वागत झालं. हॉटेलच्या उबदार वातावरणात पुन्हा उत्साह संचारला.

पहाटे लवकर जाग आली. कडाक्याची बोचरी थंडी असल्याने अंथरूण सोडवत नव्हतं. हळूहळू आकाश मोकळं व्हायला लागलं तशी तवांग फिरायचा उत्साह दुणावत होता. मुख्य म्हणजे तवांगची एकशे आठ तळी मला एकसारखी खुणावत होती. त्या सर्व तळ्यांचा मुकुटमणी संगेत्सर लेक बघायला मिळणार की नाही अशी शंका वाटत होती. करण हॉटेल मधल्याच एकाबाजूच्या खोल्यांमध्ये नळाचं पाणी येत नव्हतं. म्हणजे बाहेर सगळी कडे बर्फाचं साम्राज्य असणार आणि तवांग पासून आणखी वर १४,५०० फुटांवर असलेली ही तळी तर पुर्ण गोठलेलीच असणार आणि पुढे संगेत्सर लेक जवळ जाणारा रस्ता मोकळा नसणार असा अंदाज होता. बघू काय होतं ते.

आठच्या सुमारास तळ्यांच्या दिशेने गाड्या पळू लागल्या. संपुर्ण तवांग शहराचं दर्शन वरून होत होतं. एका खडकावर श्री. छत्रपती शिवाजी मार्ग असं कोरलेलं होतं. मराठा रेजीमेंट च्या जवानांनी महाराजांचं नाव कोरलेलं असावं. मागच्या वेळी मला मराठी जवान भेटले होते. या वेळी भेटतील का? संध्याकाळी युद्ध स्मारकाला भेट द्यायची होती तेव्हा कदाचीत भेट घडेल. जस जसे वर जात होतो तसतशी हवा मोकळी होत गेली, सकाळपासून दाटून आलेल्या कुंद वातावरणात फरक पडला आणि सुर्याची किरण आमच्या पर्यंत पोहोचली. एवढया रम्य प्रदेशात आल्यावर जर स्वच्छ सुर्यप्रकाश नसला तर मनासारखे फोटो घेता येत नाहीत. सुर्य किरणांबरोबरच कॅमेर्‍यांनी केस बाहेर डोकी काढली. दुरदर्शनेचे कसलेले फोटोग्राफर अनिल साळवी मनोमन सुखावले असणार, त्यांनी चालत्या गाडीमधून फोटो घ्यायला सुरूवात केली. बाहेरचा नजारा नेत्रसुख म्हणजे काय असतं त्याचा प्रत्यय देत होता.

एका गोठलेल्या तळ्याजवळ गाड्या थांबल्या आणि प्रत्येक मोठं माणूसही मुल होवून गेलं. सगळे बफ्रावर झरझर चालत गेले, घसरगुंडीचा खेळ सूरू झाला. शुभ्र ताज्या बर्फात कुणी लोळण घेत होतं, बर्फाचे चेंडू उडवले जात होते, फेकले जात होते, फेकून मारले जात होते. बर्फाचीच उधळण चालू होती. कुणीही थांबायला तयार नव्हतं. मज्जा…………..च मज्जा काही काळ तरी आम्ही स्वर्गात होतो. खेळ इथले संपत नव्हते.                     

संगेत्सर लेकच्या दिशेने निघालो, TCP Y JUNCTION असा बोर्ड लागला,  इथे गाड्या चालवाव्या लागतात. पुढे जायचं असेल तर इथे लष्कराची परवानगी घ्यावी लागते. संगेत्सर लेक जवळ जाणारा रस्ता धोकादायक असल्याने परवानगी मिळाली नाही. पण त्याच कुणाला काही वाटलं नाही. कारण अलिकडच्याच तळ्यावर मनोसोक्त खेळून झालं होतं. जवानांची भेट, फोटो काढणं झालं. चहू बाजूला  पसरलेला शुभ्र बर्फ न्याहाळण्यात मंडळी रंगून गेली होती. ले कॅम्प, गोरडोंग, वांगडुंग अशी चीन मधली आणि लुनग्रोला, केरेटेंग, संगेत्सर लेक अशा भारतातील ठिकाणांच्या अंतरांचा बोर्ड दिसला. चीन पासून अवघ्या तीस किमी अंतरावर आम्ही होतो. हाच तो सगळा अरुणाचलचा प्रदेश ज्या साठी चीन ने भारतावर युद्ध लादलं आणि अजून चीन या प्रदेशावर दावा करतं.

File:Sakyamuni Buddha.jpg
शाक्यमुनी बुद्ध
शाक्यमुनी बुद्धाची मुर्ती असलेल्या तवांग मॉनेस्ट्रीला भेट देण्याचा पुढचा कार्यकम होता. तिबेट मधल्या ल्हासा येथील मॉनेस्ट्री नंतरची ही सर्वात जगातली सर्वात मोठी मॉनेस्ट्री. लडाखच्या मॉनेस्ट्रीज पेक्षा थोडा वेगळेपणा जाणवला या ठिकाणी. मुख्य म्हणजे या ठिकाणी गेट पर्यंत गाडीने जाता येतं.   

चीन-भारत युद्ध स्मारक
जसवंत सिंहांचा पुतळा
चीन-भारत युद्ध स्मारकाची भेट ही आमच्यासाठी महत्वाची गोष्ट होती. माजोरडया  राजकारण्यांमुळे प्राणाला मुकलेले जवान प्राण पणाला लावून आपल्या सिमांचं रक्षण करतात. कारगील युद्धात शत्रूला धुळ चारण्यात आपले जवान यशश्वी झाले त्यामुळे द्रास वॉर मेमोरीयल आणि इथे तवांगला भेट देताना वेगवेगळ्या भावना मनात दाटून येतात. नेहरू. त्यावेळचे संरक्षणमंत्री श्री. कृष्णमेनन यांच्या आत्ममग्न आणि दुराभिमानी वागण्याच्या आठवणींनी मन विषण्ण झालं.
नुरानांग चा धबधबा 

तवांगचा निरोप घेताना थोडं जड वाटत होतं. त्या दिवशी येताना जे भाग काळोखात बुडाला होता तो आज पाहायला मिळणार होता. नुरानांग चा धबधबा हा त्या पैकी एक होता. उंचावरुन कोसळणारा प्रपात पाहून दिल खुश झालं. नागमोडी रस्ते पार करत आम्ही जसवंत गडच्या दिशेने जात होतो. जसवंत सिंह हा एक बहादर. चीन बरोबरच्या युद्धात ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला त्या विर जवानांत जसवंत सिंहांच नाव अग्रभागी आहे. जसवंत गढच्या जवानांच्या हातचा गरम गरम चहा खरंच अमृत तुल्य वाटला. अशा ठिकाणी गेल्या वर वाटत राहतं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत         

 जसवंत गड

24 May, 2012

तवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक




से ला पास


तेजपूरच्या चित्रलेखा बागेच्या प्रसन्न वातावरणातून पाय काढवत नव्हता, पण एखादं ठिकाण कितीही आवडलं तरी आपणाला केव्हाना केव्हा पुढे जावंच लागतं. काळ थांबत नाही तसे आपणही नकळत पुढे होत असतो. आता तर आम्हाला तवांगच्या दिशेने जायचं होतं. माझ्या स्मृतीत तर तवांगने पक्क घर केलं होतच. मी गेल्या वेळच्या खुणा शोधत असतानाच आमची गाडी भालुकपॉंगच्या दिशेने पळायला लागली, मात्र थोड्याच वेळात ड्रायव्हरला वेग आवरता घ्यावा लागला. तेजपूर शहराच्या बाहेर पडताच भालुकपॉंगच्या दिशेने रस्ता असा नव्हताच. धुळीचे लोट उठवत गाड्या पुढे जात होत्या. असम मधलं रस्ते उंचीकरणाचं काम राज्यव्यापी होतं तर. संथ गतीने मार्गक्रमण करीत आम्ही भालुकपॉंगला पोहोचलो पण वाटेत लागणार्‍या नामेरी नॉशनल पार्कचा आनंद म्हणावा तसा लूटता आला नाही. आसम अरुणाचल प्रदेश सिमेवर प्रवेश प्रक्रिया पुर्णकरून भालुकपॉंगला पोहोचलो तेव्हा रस्त्यातली धुळ जरा कमी झाली तरी पुढे रस्ते कमी अधिक प्रमाणात खराबच होते. एकूण ३१५ कि.मी. अंरत दोन दिवसात पार करायचं होतं.

पहिल्या टप्प्यातला धुळीचा पडदा दूर झाला, पुढे टिपीचं ऑर्केडीयम आलं. फेब्रूवारी महिना हा काही ऑर्किडचा फुलायचा काळ नव्हता. पाच-दहा मिनीटातच काढतापाय घेतला. तीन साडेतीन वाजताच ढगांचं साम्राज्य पसरल्याने सुर्य दर्शन होत नव्हतं. गर्द वनराईने नटलेले पर्वत धुक्याची शाल पाघरून असतानाच प्रकाश अंधूक होत गेला. बोमडीलाला हॉटेलवर पोहोचता पोहोचता पुर्ण काळोख झाला होता.
बोमडीला....., ही चीन-भारत युद्धाची रणभुमी. त्या दुखर्‍या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या कारण आम्ही त्या युद्धभुमी वरून प्रवास करत होतो. (जिज्ञासूंनी ब्रिगेडियर जॉन दळवी यांचं हिमालयन ब्लंडरहे पुस्तक वाचावं किंवा जयंत कुलकर्णी यांनी केलेलं भाषांतर तरी वाचावं.) संरक्षण सिद्धता या बाबतीत आपण आनादी काळापासून लंगडे आहोत. चाणाक्याच्या काळापासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक विरांनी आक्रमणं रोखून धरली पण पुन्हा पुन्हा आपण त्याच त्याच चुका करत आलोय. आता सुद्धा सरकार आणि सेना प्रमुखामध्येच जुंपलीय, असो.

नुकमॉडॉंग (Nyukmadong) येथील युद्ध स्मारक
काल सुर्य लवकर बुडाला तरी आज त्याने अपेक्षेपेक्षा आधीच दर्शन दिलं. अरुणाचल प्रदेश मधल्या पच्शिम केमांग जिल्ह्याचं बोमडीला हे मुख्यालय. हॉटेलच्या खिडकीतूनच बाहेरचा नजारा दिसत होता. हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं ते सुंदर गाव आणि दुरवर दिसणार्‍या बर्फाच्छादीत पर्वत रांगा. या पर्वत रांगा पार करूनच आम्हाला तवांगला जायचं होतं. वाटेत लागणार्‍या बोमडीला मॉनेस्ट्री पासून पुन्हा प्रवासाला सुरुवत झाली. मॉनेस्ट्रीमध्ये चार दिवस चालणारा उत्सव चालू होता. एरवी शांत असणार्‍या मॉनेस्ट्रीत मंत्रोच्चार ऎकायला मिळाले. दिरांगला गरम पाण्याची कुंड पाहायच्या निमीत्ताने जरा पाय मोकळे केले. आजूबाजूचा निसर्ग मन मोहवत होता.   

नुकमॉडॉंग (Nyukmadong) येथील युद्ध स्मारकाची भेट मन हेलावणारी होती. बासष्ठ सालच्या युद्धात शौर्य गाजवणार्‍या योध्यांची नाव असलेले फलक वाचत असतानाच सौ. दांडेकरनी देशभक्तीपर गीत म्हणण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्वांनीच  त्यांच्या सुरात सुर मिसळले. हिमालयाच्या पार्श्वभुमीवर तिरंगा डौंलाने फडकत होता.

१३,७०० फुटांवर असलेला से ला पास जवळ येत होता, हवेतला गारवा कमालीचा वाढला होता, बाहेर बर्फवृष्टी होत होती. या सहलीतली ती पहिलीच बर्फ़वृष्टी होती. चला हे  पण अनुभवायला मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुचीपर्णी वृक्षांवर बर्फ जमा झालं होतं. सेला पासला गाड्या थांबल्या. पासच्या कमानीचे फोटो घेण्यात काहीजण दंग होते तर काहींनी चहा आणि शेकोटीचा आधार घेतला होता. गरम गरम चहा पोटात गेल्यावर जरा हायसं वाटलं. पुन्हा तवांगच्या देशेने वाटचाल सुरू झाली. घड्याळात पाच वाजायला अजून थोडा अवकाश होता पण बाहेर काळोख दाटून आला होता........
 
            

20 May, 2012

मुंबई ते गोवा व्हाया कोल्हापूर



खरं तर मुंबई ते गोवा हा वर्ष सहा महिन्यातून घडणारा नेहमीचाच प्रवास, एक तर तो कोकण रेल्वेने होणारा आणि म्हणूनच सुखकारक. पण या वेळी तसा तो करायचा नव्हता. आधीपासून ठरवल्या प्रमाणे मला गाडी घेवून निघायचं होत, चांगला रस्ता म्हणून हा प्रवास पुणे-कोल्हापूर मार्गे करायचं ठरवलं. पहिल्यांदा एक मित्र सोबत येणार होता आणि त्याचं येणं रद्द झाल्यावर भाऊ यायचं नक्की झालं. पण शेवटी त्याचीही काही अडचण निघाली आणि मी एकटाच निघालो.  कुठचीही गोष्ट एकट्याने करणं म्हणजे ते एक काम होवून जातं. पण ठरवलं म्हणजे ठरवलं. मला निघायचंच होतं. निघालो..........!

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि पुढे पुणे-बॅगलोर (आता बंगळूरू बरं का. नाहितर तेवढ्यावरून एखादा कानडी खवळायचा.) हायवे. प्रवास सुरू झाला.

‘मनाचा ब्रेक
उत्तम ब्रेक’

‘दुर्घटना से देर भली’

‘वळणा वळणाचा रस्ता
वाहने सावकाश हाका’

'नजर हटी दुर्र्घटना घटी'

 'अपघात प्रवण क्षेत्र'


आणि वाहन किती वेगात चालवावं याची सुचना देणारे फलक अशा सर्वाचं वाचन करीत आणि मुख्य म्हणजे त्याचं पालन करीत मी कार चालवत होतो. सुप्रभाती निघूनही थोड्याच वेळात उन्हे तापू लागली. एअर कंडीशनचा सहारा घेतला. प्रवास तसा सुखाचा चालला होता. दर दोन तासांनंतर थांबण्याचा आणखी एक नियम मी पाळायचं ठरवलं होतं. तसा थांबत होतो. मागच्याच पंधरवड्यात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर किती वेग असावा याची खमंग चर्चा वर्तमान पत्रातून झाली होती ती आठवत सावकाश जाणं चालू होतं. मागून भन्नाट वेगाने येणार्‍य़ा  वाह्नांना पहले आप म्हणून वाट करून देत होतो. प्रत्येक मोठ्या गाडीला छोट्या गाडीच्या पुढेच जायचं होतं. जड वाहने डाव्या बाजूने चालवावीत हा नियम सर्रास डावलला जात होता. टोल नाक्यावरही मागून हॉर्न वाजवणारे महाभाग होतेच. काही जण व्हिडिओ गेम प्रमाणे रिमोट आपल्याच हातात असल्याच्या माजात चालले होते. या सर्वांचा जाच सहन करत, मनावर ताबा ठेवत गाडी चालवणं सुरू होतं.

सातारा अजून मागे पडायचं होतं, सुर्य आग ओकत होता. एवढ्यातच एअर कंडिशनने राम म्हटलं. आता गर्मीची गुर्मी सहन करत प्रवास करावा लागणार होता. मनाने त्याचीही तयारी केली. खुपच गरम होत होतं. अरे हा तर घाटावरचा भाग, इथे एवढं गरम व्हायला नको होतं. हल्ली सगळंच बदलत चाललंय. माणरसां बरोबर निसर्गही बदलत चाललाय. ठिक आहे आलीया भोगासी.......

थोड पाणी प्यावं, चहा घ्यावा म्हणून एका टोल नाक्यानंतर थांबलो. उकाडा असह्य झाला होता. वर आकाशात ढग जमा होत होते. उन सावलीचा खेळ सुरू झाला होता. चहा पिऊन निघालो. थोड्याच वेळात काचेवर पाण्याचे थेंब दिसू लागले. पाऊस आला वाटतं....... हो पाऊसच!  मघापासून मध्ये मध्ये लुडबुड करणारे मोटरसायकलवाले रस्त्याच्या कडेला आडोशाला उभे राहिलेले दिसले. चला बरं झालं, कटकट गेली. आता हे तरी या बाजूने त्या बाजूने वळवळणार नाहीत.  पावसाचा जोर वाढत गेला तशी गाड्यांची संख्या कमी झाली. एवढ्यात मांड नदी वरचा पूल लागला, हाच तो दुष्काळग्रस्त मांड तालूका, दुष्काळ पडणार नाही तर काय होणार? दोन्ही बाजूला उसाचे मळेच्या मळे दिसत होते. नगदी पिकासाठी मुबलक पाणी आणि तालूका मात्र दुष्काळग्रस्त. तर याच ठिकाणी हा अवकाळी पाऊस चालू झाला होता. आता पावसाने रौद्र रुप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि तुफानी पाऊस.  दोन फुटांवरचंही दिसेना. पार्किंग सिग्नल चालू केले आणि रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. पुढे मागे गाड्यांची रांग लागली. मघाशी सुपात असलेले आम्ही ‘कारवाले’ आता जात्यात होतो. रस्त्यात एखादच वाहन चालत होतं. दुपारच्या वेळेलाच काळोख दाटून आला होता.  असाच तास सव्वा तास गेला....... पाऊस थोडा कमी झाला. एक एक करून वाहनं मार्गी लागली, मीही निघालो. पुढे हायवे सोडून कोल्हापूर शहराकडे मोर्चा वळवला. इकडे मघाच च्या पावसाचा मागमुस नव्हता.  शहरातल्या गर्दीतून वाट काढत रंकाळा तलाव गाठला. संध्याकाळचे साडेपाच वाजत होते. इथून पुढे गगनबावडयाकडे जाणारा रस्ता होता. मघापासून एकेरी मार्गावरून चालणारी गाडी आता दुहेरी मार्गावरून जात होती. रस्ताही अरुंद होता. साहजिकच वेगावर मर्यादा आली. त्यात गाव, शाळा म्हणून गतीरोधक असल्याने हळू हळू जावं लागत होतं. हे गतीरोधकही लावण्याचा काही नियम आहे असं वाटत नाही. किंवा तो असला तरी पाळला जातो का अशी शंका यावी असे ते रस्त्यात होते. उंची, रुंदी याचा काही ताळ मेळ नव्हता. पण या सावकाश जाण्यातही एक प्रकारची मजा होती. रस्त्याच्या दुतर्फा बहरलेले गुलमोहर, रंगी बेरंगी फुलं, विविधरंगी बोगन वेली आणि हिरवीगार शेतं. या सर्वातून सुर्याची तिरपी झालेली, मावळतीकडे चाललेली उन्हं, आकाशात उधळलेले रंग, मजा येत होती, आता प्रवास सुखाचा वाटत होता. मुख्य म्हणजे मी बर्‍यापैकी प्रवास पुर्ण केला होता.

गगनबावड्याला जिव्हाळा रिसॉर्ट मध्ये मुक्काम केला आणि सकाळी अप्रतिम अशा करूळ घाटाचं सौंदर्य न्याहाळत तळ कोकणात उतरलो. पुढे कणकवली-कुडाळ-सावंतवाडी करत गोवा गाठलं.

दुसरा चालवत असलेल्या गाडीत बसून प्रवास करणं वेगळं आणि स्वत: चालवत जाणं वेगळं. रस्ता, आजूबाजूची माणसं, ह्वामान, पाणी, माती सगळच बदलत जातं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा अगदी रस्त्यांचाही त्या बद्दल पुन्हा कधीतरी.      

18 May, 2012

विठ्ठल कामत – एक ग्रेट भेट



काल आरोंदा इथल्या लोटस बॅकवॉटर रिसॉर्ट मध्ये आलो तेव्हाच विठ्ठल कामतांचं कौतूक वाटलं होतं. किरणपाणी गावात, तिराकोल नदी किनारी, रम्य वातावरणात हे सुंदर रिसॉर्ट बांधलं आहे. इथे आम्हाला गावचं हरवत चाललेलं गावपण अनुभवायला मिळालं. कालची संध्याकाळ वेळवे गावात पाहुणचार घेण्यात गेली. नदी किनारी, माडाच्या बनात हापूस आंब्याचा आस्वाद घेतानाची मजा काही औरच असते महाराजा. परम मित्र स्मिताच्या आग्रहाखातर तिच्या अनुपस्थितीत वेळव्यात आमचं उत्तम स्वागत झालं. मजा आली.

आज सकाळी गावात फेरफटका मारून मी आणि हर्षदा रिसॉर्टला परतत असताना गेटवरच कामत साहेब भेटले, मुख्य म्हणजे स्वत:हून बोलले. इथे रहायला आवडलं का? कसं वाटलं? शांतता अनुभवायची असेल तर अशा ठिकाणी राहीलं पाहिजे म्हणाले. गडबड, गोंधळ, ढॅनच्याक-ढॅनच्याक या पासून दूर त्या शांततेचा आवाज ऎकण्यासाठी आमच्यासारखे ते सुद्धा आरोंदयाला आले होते. बरोबर एक डॉक्टर होते. गोव्यात घर असूनही आम्ही इथे शांततेच्या शोधात आलेले ऎकून त्याना खुप बरं वाटलं. फोटो काढले आणि निरोप घेतला. विठ्ठल कामत, एवढ्या मोठ्या साम्राज्याचा अधिपती, पण कसला डामडौल नव्हता. छोट्याशाच भेटीत मोठ्ठा आनंद मिळाला.        

खरचं पक्षंच्या किलबिलाटाशिवाय तिथे कसलाच आवाज नव्हता. नदिचा शांत प्रवाह, तेवढाच शांत स्थितप्रज्ञ वाटणारा समोरचा डोंगर, मासेमारी करण्यासाठी निघालेली एखादीच होडी आणि तेवढ्याच शांतपणे वाहणारी वार्‍याची झुळूक आणि सकाळच्या कामात व्यग्र असलेले गावकरी. पुढच्या दोन दिवसांसाठी राहायचा उत्साहं शतगुणीत झाला.             





03 May, 2012

‘मॅक्सेल’ पुरस्कार



२०१२ या पहिल्या वर्षांच्या मॅक्सेलपुरस्काराचा वितरण सोहळा येत्या रविवारी दि. ६ मे २०१२ रोजी होणार असून या वर्षी चे पुरस्कार विजेते असे आहेत: मॅक्सेल व्यावसायिक नेतृत्त्व प्रावीण्यवर्गवारीचा पुरस्कार गेल्या तीस वर्षांत देशापरदेशातील अनेक विख्यात संस्थांच्या अत्युच्च पदावर कार्य केलेले बोईंग इंडियाचे अध्यक्ष दिनेश केसकर यांना तसेच टाटा स्टील लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत नेरूरकर यांना प्रदान केला जाणार आहे. बँक अधिकाऱ्यांचे सर्वोत्तम संघटक ते बँक व्यवहाराचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे जनक आणि एक यशस्वी बँकर अशा भूमिका लीलया निभावून या क्षेत्रातील एक आदर्श ठरलेले सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांना पहिला मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
alt मॅक्सेल उद्योजकीय प्रावीण्यतेचा पुरस्कार म्हणून निर्लेप सूमहाचे संस्थापक-संचालक असलेल्या राम भोगले, मुकुंद भोगले आणि नित्यानंद भोगले अशा तिघांची निवड करण्यात आली आहे. याच वर्गवारीतील दुसरा पुरस्कार तब्बल ९० दशलक्ष अमेरिकी डॉलरची उलाढाल असलेल्या डीएलझेड कॉर्पोरेशन या अमेरिकेत स्थापित कंपनीचे अध्यक्ष विक्रम राजाध्यक्ष यांना दिला जाणार आहे. 
altमॅक्सेल नाविन्यता प्रावीण्यपुरस्कार क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि मुख्याधिकारी कैलास काटकर आणि संजय काटकर यांना प्रदान केला जाईल, तर मॅक्सेल उदयोन्मुख प्रावीण्यपुरस्काराच्या प्लाझ्मा इंडियाच्या कार्यकारी संचालिका अरुंधती जोशी या मानकरी ठरल्या आहेत. 

उध्योजकतेचं कौतून आणि मराठी माणसाचं तसं जवळचं नातं आहे असं म्हणता येणार नाही. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, कवी संमेलन असे अनेक उत्सव साजरे करणारे आपण उद्योजकते पासून थोडे दूरच उभे आहोत असं वाटत राहातं. मराठी समाजाच्या याच उणीवेवर नेमकं बोट ठेवून त्या साठी प्रत्यक्ष कृती करण्याचं ठरवल ते प्रगतीच्या एक्सप्रेस वे या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचे लेखक आणि कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी. मॅक्सेल (Maharashtra Corporate Excellence) फाउंडेशन या  संस्थेचे ते निमंत्रक आणि संस्थापक विश्वस्थ आहेत.

महाराष्ट्रातीच्या उद्योगजगतातील आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज्जांनी त्यांच्या उत्तुंग कर्तुत्वाने अनेक शिखरं गाठली, पण हे कर्तुत्व मराठी लोकांपर्यंत पोहोचलं नाही. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. हे जाणवल्याने नितीन पोतदारांनी हा वसा हाती घेतला आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, जेष्ठ संपादक कुमार केतकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देवस्थळी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, निवृत्त न्यायमूर्ती अरविंद सांवत, अमेरिकेतील उद्योगपती सुनिल देशमुख आदी मॅक्सेल फाऊंडेशनचे विश्वस्त आहेत.

मॅक्सेल फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा...!   


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates