नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा परखड सवाल.
(ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख : )
‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं? देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे’ असं परखड
मत नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी नुकतंच मुंबई येथे
मांडलं. जुहू, मुंबई येथे इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर ने बांधलेल्या राणी मॉं
गायडिन्ल्यु भवनाचं उद्घाटन करताना त्यानी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणाचा गोषवारा आणि समारंभाचा वृतांत.
गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ इशान्येकडच्या राज्यात
कार्यरत असलेल्या आणि आता नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त
झालेल्या पद्मनाभ आचार्य यांनी जुहू, मुंबई येथे इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर ने
बांधलेल्या राणी मॉं गायडिन्ल्यु भवनाचं उद्घाटन नुकतंच केलं. पुर्वांचलातील
जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम या भवनातून होईल.
|
ईशान्य वार्ताचे संपादक श्री. पुरूषोत्तम रानडे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. |
सनदी लेखापाल असलेले श्री. दिलिप परांजपे यांनी उपस्थिताना
राज्यपालांच्या कार्याची ओळख करून दिली.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेच्या
माध्यमातून पुर्वांचलात पद्मनाभ आचार्ययांच्या
बरोबरीने काम करीत असताना आलेल्या अनुभवांचा
आलेखच त्यानी यावेळी मांडला. जनरल करीअप्पांना भेटण्यासाठी ओव्हल मैदानात व्यतीत
केलेली रात्र, टाटा, गोदरेज, गोविंदभाई श्रॉफ अशा दिग्गज उद्योजकांच्या त्या काळात
घेतलेल्या भेटी यांचे किस्से ऎकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. या नंतर
सुमारे चाळीस मिनिटं केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी
कार्यकर्ता कसा असावा, राष्ट्रपेम म्हणजे काय याचा पटच उभा केला. या प्रसंगी
बोलताना राज्यपाल महोदय म्हणाले:
|
मा. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पुस्तक भेट देताना प्रस्तूत लेखक आणि श्री. आत्माराम परब.
|
इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरच्या माध्यमातून पुर्वांचलासाठी
मुंबईमध्ये राहून आपण काय करू शकतो या विचारच खुप मोठा आहे. पुर्वांचलामधल्या
लोकांना मुंबईत राणी मॉं गायडिन्ल्यु यांच्या नावाने एक भवन उभं राहिलय हे ऎकूनच
किती बरं वाटलं आहे. आपल्यात राष्ट्रीय भावनेची कमतरता का आहे? याचा विचार आपण
केला पाहिजे, तो काही मंडळींनी केला आणि या भवनाची उभारणी झाली. आपण भारतमाता की
जय असं म्हणतो. ही भारतमाता कोण आहे? हिच्या कुठल्याही अंगाला काही दुखापत झाली तर
आपली प्रतिक्रिया काय असते? काय असली पाहिजे? १९६२ साली चीनचं आक्रमण झालं,
तेव्हाची गोष्ट, तेव्हा आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करीत होतो. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचं काम करीत होतो. पंतप्रधान नेहरूंना प्रचंड धक्का बसला होता.
वर्तमान पत्र, रेडीओ वरून या आक्रमणाची वार्तापत्र कानी येत होती. आम्ही शिकलेले
होतो, रोज वर्तमानपत्र वाचत होतो, एवढं असूनही NEFA म्हणजे काय याची कल्पना
आम्हाला नव्हती. मात्र लहानपणापासून संघाचे संस्कार आमच्यावर झाले होते. आपल्या
देशावर आक्रमण झालं आहे, आपण या मध्ये काहीतरी केलं पाहिजे या भवनेने आम्ही
पुर्वांचलात जावून पोहोचलो. अप्रतिम निसर्ग सौदर्याने भरून राहिलेली हा प्रदेश
पाहिला आणि आम्ही अचंबीत झालो. आमची पाटी कोरी होती. मोकळ्या मनाने आम्ही तिथल्या
लोकांना भेटलो. तेव्हा लक्षात आलं मिझोराम, नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, नेफा आसाम
या भागातल्या कितीतरी लोकांनी भारत स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले होते,
बलिदान दिलं होतं. त्या ठिकाणी कसलाच विकास झाला नव्हता. सोयी-सुविधा नव्हत्या असं
असूनही नागालॅन्ड मधल्या राणी मॉं गायडिन्ल्यु, मेघालयातचे तिरोत सिंह, अरुणाचल प्रदेश मधील अबोर
लिरेंग अशा अनोक महारथींनी देशासाठी खस्ता खाल्ल्या. सर्व सुविधा असताना काम करणं
निराळं आणि पुर्वांचलासारख्या दुर्गम भागात काम करणं निराळं. आजही तो भाग तसाच
आहे, संकटात आहे. मुळातच या प्रदेशाचा ९८% भाग हा आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेला
आहे, फक्त दोन टक्के भूभाग भारताशी जोडलेला असल्याने या राज्यांचे प्रशन हे वेगळे
आहेत. एका बाजूला आक्रमक चीन दुसर्या बाजूला घुसखोर बांगलादेश, तिकडे म्यानमार
अशा देशांच्या सीमांनी व्याप्त असलेली ही राज्यं आपल्याच भारत मातेची अंग आहेत. अरुणाचल
प्रदेश सारखं अख्खं राज्य आपलंच आहे असं चीन म्हणतो, कोणतंही सार्वभौम राष्ट्र हे
स्विकारू शकत नाही. हा बाह्य धोका तर दिडशेहून जास्त फुटीर गट आपणाला स्वतंत्र
व्हायचंय म्हणून सशस्त्र क्रांती किंवा आंदोलन करीत आहेत, असा आंतर्गत धोका. लाखो घुसखोर बांगलादेश मधून आले आहेत.
म्यानमारच्या सीमेवर अतिरेकी प्रशिक्षण केंद्र आहेत. चीन मधून प्रशिक्षीत आतंकवादी
या भागात येत असतात. इथली जनाता या लोकांच्या भुलथापांना का बळी पडते आहे? नक्षलवादी
का तयार होतात? याचा विचार केला तर असं लक्षात येतं की गेली साठ वर्ष सातत्याने हा
भाग दुर्लक्षीततच राहिला आहे. आसाममध्ये कमीतकमी तीस विधानसभा क्षेत्रं अशी आहेत
की ज्यात आपण प्रवेशही करू शकत नाही एवढे बांगलादेशी तिथे भरलेले आहेत. ऑल आसाम
स्टुडंट युनियनने फार मोठं आदोलन या विरोधात उभारलं तरीही स्थिती बदललेली नाही.
तिथली जनाता डोंगर दर्यांमध्ये वास्तव्य करते. त्या काळी अगोदरच्या
नेफा मध्ये आम्हाला जायचं होतं. मी आणि दिलीप परांजपे तिथे जायला निघालो. जे.बी.
पटनाईकांनी तिथे मिठाचा पुरवठा करण्यासाठी कलिंग एअरलाईंस ची स्थापना केली होती.
विमानातून मिठाच्या बोर्या ठिकठिकाणे टाकल्या जात. त्या विमानातून आमच्या
वजनाच्या गोण्या खाली काढून आम्हाला बसवलं गेलं आणि आम्ही पासी घाट इथं पोहोचलो.
आमच्याबरोबर एक पोलिटीकल ऑफिसर होते. वेगवेगळ्या जन-जातीच्या लोकांनी नृत्य करून
आमचं स्वागत केलं. सुंदर दृष्य होतं ते. हे सर्व पहात असताना लक्षात येते गेलं की
हे लोक भारतीयच आहेत. यांनाही आपल्यासरखाच मतदानाचा हक्क आहे. यांच्या सारखं एकच
मत आपल्याला देता येतं, लोकशाही प्रक्रियेत सगळे समान असताना या लोकाशी एवढे दिवस
जो भेदभाव केला गेला त्याला आपणच कारण आहोत. यांच्यावर जो अन्याय झाला किंवा होत
आहे त्याला आपणच जबाबदार आहोत आणि याना काही मदत करायची झाली तर ती
प्रायश्चित्ताच्या भावनेने केली पाहिजे, उपकाराच्या भावनेतून नाही. या समाजाचं आपण
काही देणं लागतो.
आपल्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलाची आवश्यकता आहे.
व्यक्ती केंद्रीत शिक्षण, जे ब्रिटीशांनी केवळ कारकूनांची फौज निर्माण करण्याकरीता
राबवलं तीच पद्धती आजही राबवली जात असल्याने देशप्रेम आपल्याला शिकवावं लागतं. चाळीस
वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, त्या वेळी आम्ही विद्यार्थीपरिषदेचं काम करीत असताना एक
जपानी विद्यार्थी मुंबईत माटुंग्याच्या कार्यालयात आला होता. आठ दिवस तो आमचं काम
पहात होता, मुलाखती घेत होता. त्याला ते समजत नव्हतं, अखेर त्याने विचारलं की
तुमचं मुख्य उद्देश काय आहेत? आम्ही म्हटलं ‘राष्ट्रप्रेम’, तो अचंबीत झाला
म्हणाला “काय ‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?
ते निसर्गत:च असलं पाहिजे. देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे. तुम्ही जर
एवढी मोठी संस्था या कामासाठी उभारली असेल तर तुमच्या जीवनपद्धतीतच काहीतरी दोष
आहे.” त्याच्या या प्रतिक्रियेनंतर आमच्याही लक्षात आलं की आपण भारतासाठी, आपल्या
मातृभूमी काही केलं पाहीजे याचं बाळकडूच आम्हाला शिक्षणातून मिळालं नसल्यानेच आपल्याला
या विपनावस्थेतून जावं लागत आहे. काम करीत असताना आम्ही नागालॅन्ड मधल्या मोंड या
ठिकाणी गेलो. तिथल्या जनजातीच्या राजाने आमचं मिठीमारून स्वागत केलं, आसनावर बसवलं
आणि त्याच्याजवळ असलेलं सर्वात उत्तम रत्न आम्हाला देवू केलं. हा बंधूभाव, ‘अथिती
देवो भव’ हा भाव त्यांच्या जवळ आहे तर आपण नागरी वस्तीत वाढलेले, उत्तम शिक्षण
घेतलेले असताना आपण ते संस्कार का हरवून बसलो आहोत.
तिथे केरळचे मिशनरी आधीपासूनच काम करीत होते. मग आम्ही
पोहोचलो. आज दुरदर्शनवर तिथली जनता शहरातील लोक किती मजेत आहेत ते पहातात, काय
खातात ते पहातात आणि तिथले लोक किडे खातात. एवढं अंतर का? याचा विचार केला पाहिजे.
‘भारत मेरा देश है’ म्हणत असताना ही दरी कशी कमी होईल हे पाहिलं पाहिजे. आसाम
मधल्या तेलाच्या विहिरी, पुर्वांचलात सर्वत्र आढळून येणर्या कोळशाच्या खाणी,
विपूल वन संपदा, जल संपदा एवढं सगळं असतानाही तिथे अभ्यास करण्यासाठी लागणारी वीज
नाही, तो भाग मागास का राहिला याचा विचार झाला पाहीजे. स्वातंत्र्याची फळं
सर्वानाच मिळाली पाहिजेत. काही ठरावीक लोकांच्या हातातच संपत्ती एकवटली आहे ते
चित्र बदललं गेलं पाहिजे. आपण सर्वांनी त्यात आपला वाटा उचलला पाहिजे. इथे बसून
आता मी हा ‘ईशान्य वार्ता’चा अंक पहात होतो. हा ज्यानी कोणी काढला आहे त्यानी
केवढं मोठं काम केलं आहे.
मिशनरी लोक छोटीशी वस्ती असली तरी शाळा सुरू करतात. माझ्या
उडुपी या गावात केवळ तीनशे ख्रिश्चन असताना त्यांनी शाळा, त्याच्या बाजुला
हॉस्पिटल, अनाथालय सुरू केलं. आपण देवळं बांधतो, देवाला सोन्याने मढवतो, जेवणावळी
उठवतो. पण समाजाला काय देतो. दरिद्री नारायणाची सेवा आपण कधी करणार? १९८२ साली एक
माणूस आणि एक टेबलवर इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरचं काम सुरू झालं तेव्हा ते काम
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विचार केला नव्हता.
आज देशात एक चेतनामय वातवरण आहे. पंतप्रधानांनी जन-धन योजना
सुरू केली आहे. मी नागालॅन्ड राज भवनात माळीकाम करणार्या कामगारांना भोजनाचं
आमंत्रण देवून त्याची विचारपूस केली आणि नागालॅन्ड राजभवनातून राज्यपाल या
नात्याने मी त्या योजनेला चालना देण्याचं काम केलं आहे. मोठमोठ्या उद्येगपतींना
तीन टक्क्याने कर्ज देण्यासाठी बॅका त्यांच्या घरी जातात पण बारा टक्के व्याज
देवूकरणार्या स्वयंरोजगार कर्त्याला त्रास दिला जातो. जन-धन योजनेत हे चित्र
बदललं जाईल. पहिल्याच दिवसात संपुर्ण देशातून दोन करोडच्या वर लोकांनी बचत खाती
उघडली. हे काम आपण सर्वांनी पुढे नेलं पाहिजे.
आपल्या देशात 720 भाषा, बोलीभाषा बोलल्या जातात. पुर्वांचलात
हे प्रमाण जास्त आहे. मुबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ अनेक विदेशी भाषा
शिकवतात. या विद्यापीठानी जर या पुर्वांचलातील भाषा शिकवण्याचा सहा महिन्यांचा
प्रमाणपत्र अभ्याक्रम सुरू केला तर पुर्वांचलातील मुंबईत काम करणारे लोक त्या भाषा
शिकवायला तयार आहेत. पुर्वांचलातील माणसं या मुळे आपल्याशी जोडली जातील. मुंबईत
आपली भाषा शिकवली जाते हे ऎकूनच त्यांना आनंद होईल. देश जोडण्याच्या असे अनेक
पर्याय आहेत. इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरमध्ये हे काम जोमाने केलं जाईल.
नागालॅन्डमध्ये आम्ही हे काम सुरू केलं आहे. नागालॅन्डच्या राज्यपालाची पत्नी
तिथल्या सर्वजनिक शाळेत जाऊन शिकवायला लागली आहे. शिकलेल्या, पदवीधर महिलांनी;
ज्या घरीच असतात त्यांनी शांळांमध्ये जावून विद्यादान करायला सुरूवात केली तर
तिथली उपस्थिती वाढेल आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्वल बनेल.
नागालॅन्ड मध्ये राज्यपाल म्हणून मी गेलो आहे, स्वेच्छेने
गेलो आहे. तिथला राज्यपाल ही शिक्षा कशी असू शकते. पुर्वांचलात आपण गेलं पाहिजे.
तुमचं सर्वांचं तिथे स्वागत आहे. ‘ईशान्य वार्ता’ने हे काम सुरू केलं आहे. इंडियन
नॅशनल फेलोशिप सेंटर हे काम करीत आहे.
पुर्वांचलात आपण या. आपलं सर्वांचं तिथे स्वागत आहे.
महामहीम राज्यपालांच्या या भाषणानंतर सर्व सभागृह अंतरमुख
झालं होतं. त्याच भारलेल्या वातावरणात ईशान्य वार्ताचे संपादक श्री. पुरूषोत्तम
रानडे यांचा आणि अन्य मान्यवरांचा राज्यपालानी नगालॅन्डच्या भेटवस्तू देवून सत्कार
केला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात साजर्या होणार्या नागालॅन्डच्या हॉर्नबिल फोस्टीव्हलसाठी
सर्वांना आमंत्रित करून या कार्यक्रमाची सांगता झाली.
|
मा. राज्यपालांशी नागालॅन्डच्या पर्यटनासंबंधी चर्चा करताना आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू. |