आज दसरा. विजया दशमी. आज शस्त्रांची पुजा करायची. शेतकरी
नांगराची, लोहार हातोड्याची किंवा भात्याची, सुतार रंध्याची आणि राजकारणी जिभेची
पुजा करीत असतील. पण खवय्ये करतात ती जिभेची पुजा वेगळी आणि राजकारणी करतात ती
वेगळी. खाणं खाणं आणि खाणार्यांचं खाणं किंवा पैसे खाणं यात अंतर आहे. गाडीवाले
जेव्हा त्या गाडीची पुजा करतात तेव्हा ती शस्त्राची पुजा आहे की काय असा प्रश्न
मला पडतो आणि आज त्या गाडीपासून आपल्याला जपून राहिलं पाहिजे असं मी मनोमन ठरवतो. कारण
त्या गाडीवानाने जर ते शस्त्र वापरण्याचं ठरवलं तर काही धडगत नाही.
खंडे नवमी किंवा दसर्याला जशी शस्त्रांची पुजा करतात तशी
दिवाळीत लक्ष्मी पुजनादिवशी हिशेबाच्या वहीची पुजा करतात. हिशेबाच्या चोपड्या
जावून संगणकाने जेव्हा त्याची जागा घेतली तेव्हा पुजार्याला मात्र आता काय करू
असा प्रशन पडला होता. शेवटी त्याने संगणकाच्या मॉनिटरवच शुभलाभ असं लिहून स्वस्तिक
काढलं आणि ते पाहून पुढचे कितीतरी दिवस मला त्याची खेटराने पुजाकरावी असं वाटत
होतं.
हे पुजा करणारे मात्र त्यांच्या पुजा करण्याच्या हट्टापायी
अनेकदा अनावस्ता प्रसंग ओढवून घेतात. असंच एकदा एका शंकर नामक पुजार्याने लक्ष्मी
पुजनाला नारळ फोडला आणि डोळ्याचं पात लवत न लवत तोच त्या नारळातलं पाणी ऑफिसमधल्या
लक्ष्मीला म्हणजे तिजोरीला वाहिलं आणि आतमधल्या सकल लक्ष्मीला आंघोळ घातली. नेमकं
त्या नारळातलं पाणी गोड गोड होतं, पुढचे दोन तीन दिवस रजेचे गेले आणि जेव्हा चौथ्या
दिवशी ती तिजोरी उघडली गेली तेव्हा तिजोरीत लक्ष्मी बरोबर मुंग्याही रहायला आल्या होत्या,
नोटा भिजल्या होत्या, काहींची लक्ष्मीशी झटापट झाली होती. आता उत्तरपुजा कशाने
करावी हे तिथल्या लक्ष्मीधरालाही समजेना.
एरवी कार्यालयात ज्याला कामात रस नसतो अशा बर्याच जणांना
हा असला दिवास मात्र आपलाच वाटत असतो. आजच्या दिवशी पुजा केली म्हणजे वर्षभर टंगळमंगळ
करून पगाराच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता येते हे त्याना पक्के ठावूक असते.
या अशा पाश्वभूमीवर संगणकाची (माझ्या शस्त्राची) पुजा कशी
करावी असा विचार सुरू असताना म्हटलं चला एक पोस्ट लिहूया म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या
पुजाही आणि हसरा नव्हे नव्हे दसराही.
गावच्या घरात मात्र पिकाव, पारय, कोयता, कुदळ अशांची पुजा करायच्या
आधी ती स्वच्छ करून पाटावर मांडायचो तेव्हा कळलं नाही, पण श्रमांनाही किंवा श्रमिकांनाही
आपल्या आयुष्यात महत्व आहे हे संस्कार नकळत झाले. हत्यारांची निगा राखली जायची आणि
पावसाळा संपत असताना ती हत्यारं काळजीपुर्वक
साफ करून ठेवावीत म्हणजे पुन्हा वापरताना गैरसोय होत नाही. शस्त्र पुजा केलीच
पाहिजे पण ती डोळसपणे.
No comments:
Post a Comment