02 October, 2014

बा देवा रवळनाथा sssss



बा देवा रवळनाथा.................. असं म्हणत आलेल्या भक्ताचं म्हणणं देवापर्यंत पोहोचवणारा राऊळ रवळनाथाच्या देवळात भेटला की मालवणी माणसाला देव दोन हात राहिल्याचा आनंद होतो. देवाने ऎकलं तर याचंच म्हणून ‘गार्‍हाणा’ घालण्यासाठी रावळाची तासंतास  वाट पाहणारे कितीतरी मालवणी मी पाहिले आहेत. पण मला भेटलेला हा राऊळ माझी तासंतास नसली तरी वाट पाहत पिंगुळीच्या तिठ्यावर रिक्षात बसला होता. हे राऊळ महाराज तसे माझी म्हणजे ’गिरायकाची’  वाट पहात होते.
साळगावाक जाव्क किती घेतलात ? या माझ्या प्रश्नाला दोनशे........ असं उत्तर त्यानी दिलं तेव्हा ‘कायते बरोबर घ्या’ म्हणताच सळगावाक खय? अशा त्यानी विचारलेल्या प्रश्नाला म्हाझ्याकडे नेमकं उत्तर नव्हतं. शेवटी चला.. असं म्हणत  मी रिक्षात बसलो. याने हे सांगितलेलं भाडं बरोबर आहे ना? या माझ्या संशयाला धरून त्यानी खुलाशाला सुरूवात केली.

“आमी तशे ओगिचच पैशे घेणव नाय. बावीस काय तेवीस वर्षा झाली मी रिक्षा चलवतय. लोक चतुर्थी इली काय तोंडाक येय्त ता भाडा सांगतत. माजा तसा नाय. खोटे पैसे घेवन काय माडी बांदाची आसा?” माझा सगळा संशय फिटला असं दिसताच मग त्यानी विषय बदलला.  

तो एकदम पॉझिटिइव्ह माणूस होता. एवढा गिर्‍हायकाशी चांगला बोलणारा आणि योग्य भाडं घेणारा रिक्षावाला मला क्वचितच भेटला असेल. मग पुढे साळगावच नहे तर माणगाव, सावंतवाडी, झाराप असा प्रवास त्याच्याबरोबर करून मी त्याला सोडला तेव्हा त्याचा फोन घेण्याचीही सुबुद्धी मला झाली आणि टिप देण्याचीही.

वाट चुकली तर सुवर्णपदक हुकल्याची हुरहुर नाही की ‘यंदा शेतीचा काय खरा नाय’ अशी रडवी वृत्ती नाही. म्हणाल तेव्हा म्हणाल तेवढा वेळ थांबताना कटकट नाही आणि उपकार केल्याचीही भावना नाही.

तसं आता गाव खुपच बदललय. अगदी प्रकर्शाने जाणवावं असं. किती वर्षानी कोकणात गणपतीच्या दिवसात गेलो. आत्माच्या आग्रहामुळे गेलो आणि त्याच्याच बरोबर खुप फिरलो. कुडाळमध्ये बरेच गणपती आणि तिथल्या घरांमध्ये जाण्याचा योग आला. बाहेरून कळत नाही पण कुडाळ अमुलाग्र बदललं आहे. घरं कमी आणि बहुमजली इमारती जास्त अशी व्यवस्था होताना दिसतेय. पण असे अस्सल मालवणी माणूस अजूनही तिथे आहेत. कधी गेलात पिंगुळीला आणि जर रिक्षात बसणार असाल तर रावळाला या 9860925118 फोन नंबरवर फोन करून बघाच.                    

‘बा रवळनाथा.......... तुझ्या सेवेकर्‍याकडसून अशीच सेवा करून घे’  असं गार्‍हाण घालत परत याल.             

                   

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates