पूर्वांचलातील नागालॅण्ड हे राज्य आता पर्यटकांच्या नकाशावर
येत आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे नागालॅण्ड हे आणखी एक
राज्य विकासाच्या नार्याला ओ देत प्रगतीकडे वाटचाल करायला सिद्ध झालं असून
दरवर्षी मोठ्याप्रमाणात साजरा होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हे त्याचं द्योतक
आहे.

नागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून
त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या
भूभागाच्याच रक्षणांसाठी प्रचंड रक्तपात करीत. मुळात या जमाती शूर योद्धे म्हणून
प्रसिद्ध होत्या. अतिशय वेगळी आदिवासी संस्कृती असलेल्या या जमातींची प्रत्येकाची
वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे आणि आजच्या आधुनिक जगातदेखील ती संस्कृती यांनी
टिकवून ठेवली आहे. प्रत्येक जमातींचा पेहराव, दागिना, घरांची पद्धत, डोक्यावर परिधान करण्याची
पद्धत, चालीरीती आणि शस्त्र अशा नाना भिन्न वेगवेगळय़ा
गोष्टींमुळे हे राज्य सांस्कृतिकदृष्टय़ा आजही प्रचंड श्रीमंत आहे. पर्यटन विभागाने
हीच श्रीमंती सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'ची सुरुवात केली.
या फेस्टिव्हलमध्ये किसामा नावाच्या एका गावाबाहेरील मोकळय़ा
परिसरात या सर्व सोळा जमातींच्या प्रतिनिधींना एक जागा दिली जाते. या जागेमध्ये ही
मंडळी आपापल्या पारंपरिक पद्धतीने घरांची बांधणी करतात. तिथे काही कुटुंबे
त्यांच्या पूर्ण पारंपरिक वेशभूषेसह घरातील सर्व पारंपरिक वस्तूंसह फेस्टिव्हलच्या
काळात पाहावयास मिळतात. त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यामुळेच आपणास केवळ काही
एकरांच्या जागेत संपूर्ण नागालॅण्डचा अनुभव घेता येतो. नागालॅण्डची भौगोलिक रचना
पाहता या सर्व भागांना आपण वेगवेगळी भेट दय़ायचे ठरवले तर किमान एक महिना लागतो.
या फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी १ डिसेंबर ते ६ डिसेंबर या
कालावधीमध्ये केले जाते. १ डिसेंबर हा नागालॅण्ड या राज्याचा स्थापना दिवस.
त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून हे आयोजन केले जाते. १ डिसेंबरला राज्याचे
मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, इतर निमंत्रित
पाहुणे आणि पर्यटकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात येते आणि
सुरू होतो आठवडय़ाभरासाठी जल्लोष. प्रत्येक जमातीच्या घरासमोर मोकळी जागा असते त्या
जागेमध्ये ही मंडळी आपापली पारंपरिक नृत्ये साजरी करीत असतात. काही बायका-मुले
बांधलेल्या घरांमध्ये काम करीत असतात. थोडा वेळ विश्रांती घेऊन हे असेच दिवसभर
सुरू असते. सर्व घर जवळजवळ असल्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरात शिरताना जणू काही
एका संस्कृतीमध्ये आपण जात आहोत असे वाटते.
प्रत्येक जण आपापली वाद्य्ो जोरजोरात वाजवत असतो. याची
सर्वच नृत्ये समूह नृत्ये असतात. नाचताना एक विशिष्ट हेल काढून आवाज काढला जातो.
त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उत्साह आणि जोश असतो. हे सर्व लोक योद्धे या
श्रेणीत मोडत, त्यामुळे शिकारी हा त्यांचा शौर्याचा एक भाग
असायचा. त्यामुळेच यांनी शिकारीत मारलेल्या प्राण्यांच्या हाडापासून, चामडय़ापासून बनविलेल्या अनेक वस्तू आपणास पाहायला मिळतात.

पर्यटकांसाठी पहिलाच दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी
जवळपास सर्व गोष्टी आपल्याला जवळून पाहता येतात. त्यांचा पर्यटक आयुष्यभरासाठीचा
अनुभव पाठीशी बांधून ठेवू शकतो. त्यानंतरच्या पाच दिवसांमध्ये सकाळी दहा ते बारा
आणि दुपारी दोन ते चार या वेळांमध्ये पहिल्या दिवशी उपस्थित राहू न शकलेल्या
लोकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते.
नागालॅण्ड हे राज्य पर्यटनास प्रतिकूल आहे, अशा प्रकारचा समज रूढ झालेला होता. त्यामुळे या भागात पर्यटन अतिशय तुरळक
होते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने या भागात पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे.
सर्वात महत्त्वाचे, पर्यटकांच्या सुरक्षेविषयी
सांगावेसे वाटते की, हा भाग अतिशय सुरक्षित आहे.
या राज्यातील प्रत्येक गावाबाहेरच्या वेशीवर एक मोठे प्रवेशद्वार असते आणि त्यावर 'आम्ही आपले स्वागत करीत आहोत,' असा मजकूर गावाच्या नावासह
लिहिलेला असतो. माझ्या आजवरच्या पर्यटनात कुठल्याही राज्यामध्ये अशा प्रकारचे
स्वागत कोणीही केलेले दिसले नाही. एकंदरच पहाडी लोकांप्रमाणेच हे नागा लोक खूप
प्रेमळ आणि दिलदार आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी लोकांनी जरूर जावे आणि
त्याच्या आदरातिथ्यांचा लाभ घ्यावा.
पर्यटनाच्या माध्यमातूनच आपण आपल्या देशातील निसर्ग, सौंदर्य संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वास्तू अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी पाहू शकतो. 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'सारख्या उत्सवामुळे तर एकाच
ठिकाणी आपणास संपूर्ण राज्याची ओळख होऊ शकते आणि नागालॅण्डसारख्या हिरव्यागार
निसर्गाने नटलेल्या या राज्याची एक वेगळी आठवण मनावर कायमची कोरली जाते.
नागालॅण्डचे नवनियुक्त राज्यपाल ना. पद्मनाभ आचार्य यांची
अलिकडेच मुंबईत भेट घेतली तेव्हा त्यांनी हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या माध्यमातून ते
राज्य देशातील पर्यटकांना आकर्षित करू इच्छित आहे असं सांगितलं. तिथल्या
जन-जातींच्या भाषेतले काही शब्द जरी आपण अवगत केले आणि त्यांच्याशी वार्तालाप केला
तरी तिथलं समाजमन आपल्याशी जोडलं जाईल. या वर्षी १ ते १४ डिसेंबर २०१४ या कालावधीत साजर्या होणार्या हॉर्नबिल
फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संखेने कोहीमा इथे यावं असा मनोदय
राज्यपाल महोदयानी व्यक्त केला.
हॉर्नबिल फेस्टिव्हल आणि पूर्वांचलातील इतर उत्तमोत्तम
स्थळांच्या सहलीवर जाण्याकरीता आत्माराम परब: 9892182655 वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment