28 April, 2016

विरहिणी











वसंतात येते फुलांना झळाळी
तुझी याद ही दाटली रे उरी
जरी मोगर्‍याचा उल्हास आहे
कशी सांज मी ही करू साजरी?

ग्रीष्मात शोधू कुठे मी विसावा
कसा ताप सोसू तू नसता असा?
असा रंध्ररंध्रातूनी घाम बरसे
रीता घट पाण्याहूनी ना पसा

विसरून गेलास पाऊस सारा
दिसेना किनारा मला पारखा
तुझ्या रुपगंधात न्हावू कशी रे
कुठे हात शोधू तुझ्यासारखा?

वैरीण झाली अशी रात्र का रे
शिंपून जातो शरद चांदणे
आकाश सारे तुला वाहिले मी
नसे चंद्र माझा असे वागणे

तशी साथ हेमंत आता न देई
सुके वैखरी गीत गाता तुझे
धुके दाटले रे असे हे सभोवती
खरे होऊदे भास हे रे तुझे

पानात पाऊल माझेच वाजे
शिशिरासवे गान गाऊ कसे?
वार्‍यात थंडी असे दाटलेली
उबदार मिठी तुझी ती नसे  

२७/०४/२०१६          

नरेंद्र प्रभू     

27 April, 2016

ई-भटक्यांच्या जगात



आज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे.     

प्रवासवर्णनाच्या पुस्तकांची मराठीत खूप मोठी परंपरा आहे. पण आठ-दहा वर्षांत ब्लॉगच्या माध्यमातून अनेकविध प्रवासवर्णनं इंटरनेटवर, तीदेखील मराठीतून उपलब्ध झाली आहेत. या ई-भटकंतीचा हा थोडक्यात धांडोळा..



साचलेपणा घालवण्यासाठी फिरणं जरुरीचं आहेच, पण पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी मात्र त्या आठवणींची साठवण करणंही क्रमप्राप्त आहे. सफरीवर जाऊन आल्यानंतर पूर्वी त्या सहलीच्या फोटोंचे अल्बम बनवले जात असत. हे अल्बममधले फोटो मग आठवणींना उजाळा देत राहण्याचं काम करतात. क्वचितप्रसंगी त्या प्रसंगाची नोंद डायरीमध्ये व्हायची. कधी कधी त्याला पुस्तकाचं रूप मिळत असे. मात्र हा सगळा ठेवा हातासरशी असणं खूप महत्त्वाचं असतं. इंटरनेटमुळे मात्र ते एकदमच सोयीचं झालंय असं म्हणावं लागेल. युनिकोडच्या सुविधेमुळे हे सारं मराठीतून मिळायला लागून आठ नऊ र्वष होऊनही गेली.

माहितीचं महाजाल याही बाबतीत आपली मदत करायला हजर झालं. गुगलड्राइव्हवर आता आपल्याला हवी ती माहिती साठवून ठेवता येते. त्यामध्ये फोटो, फाइल्स, गाणी असे अनेक प्रकार अगदी सहजच साठवता येतात. पण ही माहिती फक्त आपणास किंवा आपण ज्यांना अधिकृत केलं आहे अशांनाच वापरता येते. आपण काढलेले फोटो किंवा लिहिलेला मजकूर इतर कुणालाही वाचण्या, ऐकण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा तर त्याकरिता महाजालावर ब्लॉगची सोय उपलब्ध आहेच. गुगल किंवा याहूने ब्लॉगस्पॉट किंवा वर्डप्रेसच्या माध्यमामधून अगदी फुकट म्हणावी, अशी ही सोय उपलब्ध करून दिली आणि जगातल्या सर्व भाषांमधले नेटिझन्स या माध्यमाचा वापर करू लागले. आपली मराठीही त्या बाबतीत पुढे आहेच. अनेक विषयांबरोबरच पर्यटन किंवा प्रवास वर्णन या सदराखाली लेख आणि छायाचित्रांची नोंद माहितीच्या महाजालात होऊ लागली आणि संपूर्ण जगातले मराठी बांधव त्याचा घरबसल्या आस्वाद घेऊ लागले. अनेक प्रवासवेडय़ा भटक्यांची सफरीची दैनंदिनी छायाचित्रांसहित वाचल्यावर अनेकांना सफरीवर जाण्याचे वेध लागू लागले. अनेक साहसी सफरींचा लेखाजोखा मग नेमाने येऊ लागला आणि तत्परतेने त्याचं स्वागतही होऊ लागलं. एखाद्या ठिकाणी कसं जावं, कधी जावं, काय काय अडचणी येऊ शकतात, जाण्यायेण्याचा मार्ग याचं छायाचित्रांसहित वर्णन ब्लॉगवर उपलब्ध झालं आणि ब्लॉगर आणि पर्यटक यांच्यामध्ये एक सेतू बांधला गेला.

रोहन चौधरी हा असाच एक भटक्या. त्याच्या ब्लॉगवर त्यानेच म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या देशाच्या इतिहासाप्रमाणे त्याच्या भूगोलावरही उदंड प्रेम करणाऱ्या एका सामान्य भटक्याची भ्रमणगाथात्याने सादर केली आहे. सिक्कीम या देशाच्या ईशान्येकडील राज्यात भटकंतीला जायच्या तयारीपासून ती सफर पूर्ण होईपर्यंतचा सगळा वृतांत या ब्लॉगवर मिळतो. रोहनने ब्लॉगवर लिहिलेला लडाखचा सफरनामाही वाचनीय आहे आणि त्या संपूर्ण सफरीचा व्हिडीओ वृत्तांतही त्याने यूटय़ुबवर ठेवला आहे. रोहनच्याच माझी सह्य़भ्रमंतीया ब्लॉगवर सह्य़ाद्रीत काय करावं लागतं तरहे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा महाबळेश्वर नव्हे. नुसतं डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण-पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडावं लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणारं ऊन. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरुषार्थाला..!’’ गोनिदांच्या शब्दातला हा थरार ज्या वेडय़ांनी अनुभवलाय त्यांचंच हे स्वानुभव कथन आहे.

संकेत पाटेकर या सह्य़वेडय़ानेही त्याच्या ब्लॉगवर सह्य़ाद्रीच्या कडेकपारी धुंडाळताना त्यांचा घेतलेला आढावा स्तिमित करणारा आहे. सह्य़ाद्रीचा सचित्र असा आढवाच यातून हाती लागतो. तर सरदेसाईज या ब्लॉगवर पिर्ड रॉक्सची अप्रतिम छायाचित्रं पाहायला मिळतात. मॅकिनॉव आयलंड, सूलॉक्स, टकमिनॉव फॉल्स व पिर्ड रॉक्स या सफरीविषयीची माहिती आणि मुख्यत्वाने छायाचित्रं इथे पाहता येतात. सहजच या ब्लॉगवर खाडी देशातील भटकंती, तिथले लोक, इमारती याची महिती आणि छायाचित्रं पाहता येतात. भुंगा या ब्लॉगवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचा धांडोळा घेतलेला दिसते. धुवाधार पावसात झिम्माड होताना टिपलेली छायाचित्रं ही या ब्लॉगची आणखी एक जमेची बाजू आहे.

पंकज झरेकर या छायाचित्रकाराचा ब्लॉग म्हणजे छायाचित्रांची मेजवानी आहे. स्वर्गीय साल्हेर, मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, ताम्हणी घाट, रतन गड, धुक्यातले अप्रतिम फोटो हे या ब्लॉगचं खास वैशिष्टय़ आहे. त्याचजोडीला लडाखची रमणीय अशी भटकंती आपणास वाचायला मिळते. तर अमित कुलकर्णीच्या ब्लॉगवरदेखील अशीच छायाचित्रत्रिय भटकंती करता येते. मिसळपावच्या एका खास धागा भटकंतीला वाहिलेला आहे. नुकताच त्यांनी महिला दिन २०१६ निमित्त अनाहिता भटकंती विशेषांकही सादर केला आहे. या ब्लॉगवर लंडन, अमेरिका, जपान ते थेट रत्नागिरी अशा देश-विदेशातील अनेक पर्यटनस्थळांविषयी महत्त्वपूर्ण माहितीचा खजिना रिता केला आहे.

प्रभुनरेंद्र या ब्लॉगवर अंदमान, भूतान, लेह-लडाख, अरुणाचल आसाम, मेघालय, काल्पा, कैलास-मानसरोवर, गोवा, दादरा नगर-हवेली, नारकांडा, नुब्रा व्हॅली, सराहन, सांगला, नारकांडा, हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालॅण्ड अशा अनेक अनवटवाटांवरचे गेल्या सात-आठ वर्षांत लिहिलेले ११५ हून अधिक लेख आणि छायाचित्रं पाहता येतील.

भटकंती करतानाची खाद्ययात्रा हा आणखी एक आवडीचा विषय. काही भटके ठिकठिकाणची खाद्यपरंपरा नेमकी टिपतात. त्यापैकी एक म्हणजे महेंद्र कुलकर्णी यांचा काय वाट्टेल तेहा ब्लॉग. या ब्लॉगवर खाद्ययात्रा या गटात महाराष्ट्रातील काही शहरांतील खाद्ययात्रेचा अनुभव घेता येतो. भटकंती करताना हे असं निवडक काही खायचं असेल तर जरूर भेट द्यायला हवी. याच ब्लॉगवर प्रवासवर्णन या गटात महाराष्ट्र, गोवा, गुजरात भटकंतीची वर्णन तर आहेतच पण जोडीला प्रवासातील अडचणींवरील काही अनुभव मार्गदर्शक ठरणारे आहेत.

गेल्या काही वर्षांत मात्र या ब्लॉगर भटकंतीला काहीशी ओहोटी लागली असं म्हणावं लागले. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्वरित अपलोड केलेले फोटो आणि चार ओळींची माहिती असं स्वरूप याला येत गेलं आहे. फेसबुकवर पटापट मिळणारे लाइक्स जरी तुमचा उत्साह वाढवत असले तरी त्यातून दस्तावेजीकरण कमीच होतं असं म्हणावं लागेल. मुख्यत: गुगलच्या माध्यमातून तुम्ही जर एखाद्या ठिकाणाची माहिती शोधायचा प्रयत्न करत असाल तर तुलनेने फेसबुकवरील माहिती हाती लागणं जरा अवघडच असतं. पण ब्लॉगवर संबंधित लेखांना टॅगिंग केलेले असल्यामुळे ते सहज सापडतात. त्यामुळे किमान आपली फेसबुकवरची माहिती ब्लॉगवर टाकली तरी इतरांसाठी ती फायदेशीर ठरू शकते.


नरेंद्र प्रभू – enpee2004@gmail.com

19 April, 2016

बाजार मांडला




कुण्या दगडाच्यासाठी तुम्ही बाजार मांडला
पडे गाभार्‍यात पाय, तुम्ही सज्जन जाहला?

मनी नसे भाव-देव, राजकारणाचा कावा
मान द्यावया तुम्हाला नसे कुणी आता गावा

देव गाभार्‍यात नाही, देव नसे देवळात
तुम्ही बाजारी जाऊन, घेता देव हा विकत

देव पुजार्‍याचा नाही, देव नाही व्यापार्‍याचा
अंतरात असे देव, काहो टाहो हा फुकाचा?


नरेंद्र प्रभू
१९/०४/२०१६       

14 April, 2016

कंठाशी आले प्राण


‘सागरा प्राण तळमळला’ ऎकून सानूडी अशी व्याकूळ झाली.
      
कंठाशी आले प्राण नेऊनी आण मला तू आई
त्या तिथे वाटते सुख म्हणून ही घाई ॥

मी खेळत असते तिथल्या झाडांसंगे
ती दडून बसली खारुताई मागे
भुकेले काक, सुकली बघ बाग, जिव ग जाई
त्या तिथे वाटते सुख म्हणून ही घाई ॥

हा इथला खाऊ नसतो बाई गोड
त्या तिथेच आहे सावलीचे मम झाड
दुधाची हाक, निजेचा धाक नको ग बाई  
त्या तिथे वाटते सुख म्हणून ही घाई ॥

मी असता त्या तिथल्या माळावरती
आकाश रंगूनी जाई ते बघ किती  
या इथे काय ठेविले असे ग आई
त्या तिथे वाटते सुख म्हणून ही घाई ॥

अशी आली तिथली याद आज बघ किती
किती लपंडाव हा करू मी सख्यां सोबती
दाटला कंठ, नयनी बघ पाणी सतत ते वाही
त्या तिथे वाटते सुख म्हणून ही घाई ॥



नरेंद्र प्रभू
१४/०४/२०१६


13 April, 2016

तथागताच्या वाटेवरती


मित्रवर्य विजय मुडशिंगीकर यांनी बुद्धीस्ट सर्किंटमध्ये भ्रमंती करून उत्तम छायाचित्रं काढली, पण त्याचं कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी त्याना कठिण काळातून जावं लागलं. आता त्यांचा हा प्रकल्प पुर्णत्वास गेला आहे. नुकतच त्याचं प्रकाशनही झालं. त्यांच्या प्रयत्नांना लाभलेलं यश पाहून उत्सुर्त सुचलेली कविता.           

तथागताच्या वाटेवरती बुद्धाच्या देशा
पदस्पर्शाचे पावन दर्शन हीच एक आशा

तू धडपडाला आणि  शिणला तरी वर उठला
वाहिला घाम, दिले ते दाम विश्रांती नाही मनाला

करी दर्शन सोपे सकल जनांना आता
तू दावीशी त्यांच्या निज नयनांना त्राता

सत्य शांतीचा धम्म खरा रे आता
दावील मार्ग तो अखिल जगाला पुरता

नरेंद्र प्रभू
१२/०४/२०१६

09 April, 2016

जेएनयु कांड - माओवाद्यांचे वैचारिक भ्रमास्त्र



एप्रिल २०१६ च्या इशान्य वार्तामध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख: 

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ ला डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियन’ (डीएसयू)च्या माजी सदस्यांनी सभा बोलावली होती. अफझल गुरू आणि मकबूल भटचा न्यायव्यवस्थेने खून केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्या विरोधात आणि काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या लोकशाही हक्कासाठी चाललेल्या लढय़ालापाठिंबा देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. तिला कॅम्पसमधले आणि बाहेरचे बरेच काश्मिरी विद्यार्थी उपस्थित होते. अफझल गुरूच्या स्मरणार्थ अ कंट्री विदाऊट अ पोस्ट ऑफिसहा कार्यक्रम तिथे  आयोजित करण्यात आला होता. डीएसयू हा कट्टर डाव्या विचाराच्या, माओवादावर विश्वास असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट आहे. छत्तीसगढमधल्या माओवाद्यांना त्यांचं समर्थन आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या देशद्रोहाच्या आरोपाने खळबळ माजली आहे.  डाव्या पक्ष संघटनांनी आता दिशाभूल करण्याची निती अवलंबली आहे. जो मुद्दा आहे त्याला बगल देवून भलत्याच विषयावर गदारोळ माजवायचा ही त्याची नेहमीची चाल आहे. इथेही तेच घडले आहे ज्या डाव्या संघटनांच्या पुढाकाराने तिथे अफ़जल गुरूचे उदात्तीकरण झाले, त्यावर पोलिसांनी कारवाई केल्याबरोबर त्यानी तात्काळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा गळा काढला. डीएसयू चा नेता कन्हय्या कुमार याला अटक झाल्याबरोबर आदल्या दिवशीपर्यंत वाहिन्यांवर झळकणारा उमर खालीद हा विद्यार्थी नेता फरार झाला. हा उमर खालीद DSU (डोमोक्राटीक स्टूडंट युनियन)चा नेता DSU ही कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाची विद्यार्थी संघटना. याच उमर खालीदचा या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य हात होता.  उमर खालीदचे वडील सैय्यद कासिम इलियास हे सिमी या संघटनेचे प्रमुख नेते होते. विद्यापीठात पोलिस आलेच कसे? हा नवा युक्तीवाद डाव्यांकडून पुढे करण्यात आला आहे. पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे राखणदार असून, त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय? बाहेरचे विद्यार्थी इथे येऊ शकतात मात्र पोलिसांना मज्जाव का करण्यात येतो?  देशप्रेमी नागरीकांना छळणारे अनेक प्रश्न या प्रकरणातून पुढे आले आहेत. या घटनेआधी उमर खालीदने काश्मीर आणि खाडी देशात अनेक फोन केले होते अशी माहिती उजेडात येत आहे. देशविरोधी कारवाया आणि माओवाद्यांच्या काश्मीर कनेक्शनचाच हा भाग आहे. आणि स्वतंत्र्य म्हणजे वैराचार नव्हेच. २०१० मध्ये दंतेवाडा इथं लक्षलवादी हल्ल्यात ७५ जवान शहीद झाले होते तेव्हा याच जेएनयु विद्यापीठात विजय दिन साजराकरण्यात आला होता ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. देशात दुर्गापूजा केली जाते तेव्हा इथे महिषासूर पुजाला जातो अशी ही औलाद आहे. 

         
या वेळी “भारत तेरे टुकड़े होंगे, इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह, अफज़ल हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं, अफज़ल तेरे खून से इन्किलाब आएगा, भारत की बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी” अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. यावर कॉग्रेस सहीत सर्वच विरोधीपक्षांचं म्हणणं आहे की नुसत्या घोषणा देणं म्हणजे देशद्रोह नव्हे. हे म्हणे अभिव्यक्ति स्वातंत्र्य!  हे बुद्धी दिवाळखोरीत निघाल्याचं लक्षण आहे.. माणसाचे तुकडे तुकडे करू म्हणून घमकी दिली तर मात्र ती जिवे मारण्याची धमकी म्हणून गुन्हा होईल पण देशाचे तुकडे तुकडे करू म्हणणार्‍याची जिभ हासडून टाकली पाहिजे असं यांना वाटत नाही. जगात आयसिसचा धोका टोकाला गोलाय, जगाचं कशाला आपल्याच काश्मीरच्या पंपोरमध्ये अतिरेक्याशी  जिवाची बाजी लाऊन लढणार्‍या (या चकमकीत सेनादलाचे पाच वीर शहीद झाले) सैनिकांवर काश्मीरमधले नागरिक एकत्र येऊन दगडफेक करतात आणि बाजूच्या मशीदीमधून अतिरेक्यांचं गुणगान गाऊन त्यांना पांठिंबा दिला जातोय, ही हिम्मत येते कुठून? तर आपल्याच संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूच्याबाजूने बोलून आपलेच कॉगेसी खासदार पाकिस्तान आणि दोशद्रोही अतिरेकी यांना पाठबळ देत आहेत या सारख्या ग़्हटनांमुळे या वोषवल्लीला खत पाणी घातलं जातं. बरं या अफजल गुरूला आपलंच सरकार असताना फासावर चढवलं गेलं हे पण ते निर्लजपणे नजरेआड करतात. ही देशविरोधी विषवल्ली वेळीच मुळासकट उखडून टाकली पाहिजे, त्याशिवाय या देशाला चांगले दिवस दिसणार नाहीत. अतिरेक्यांशी सामना करताना मानवीहक्क, सहिष्णूता असले मुद्दे दुय्यम ठरतात. लोकशाही समाजव्यवस्था असलेला जगातला सर्वात मोठा देश असलेल्या भारतातच ही थेरं खपऊन घेतली जात आहेत. ज्या लोकशाहीचा जगात उदौदो केला जातो त्या अमेरीकेतल्या विद्यापिठात ‘ओसामा हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं’ म्हणण्याची कुणाची हिम्मत होईल काय? आंधळा मोदी विरोध करणारी ही मंडळी आता देशाच्या मुळावर उठलीत आणि मोदी पंतप्रधान व्हायच्याआधी हेच  लोक त्याना अमेरीकेचा विजा दिला जावू नये म्हणून अमेरीकेची आर्जवं करीत होते.

अफजल गुरू, कसाबसारख्या अतिरेक्यांना फाशीच्या दोरापर्यंत नेण्यासाठी आपल्या देशात अनेक वर्षं न्यायालयात संघर्ष करावा लागतो. त्या नंतर असे काहीच अतिरेकी फासावर लटकवता येतात. आता या अतिरेक्यांचा कळवळा आलेले लोक त्या न्यायालयांचाही अपमान करीत आहेत. ‘चार-दोन व्यायमुर्तींनी ठरवलं म्हणून अफजल गुरू दोषी ठरत नाही’ असं उमर खालीद उघडपणे वाहीन्यांवर येऊन सांगतो? भारतीय व्यायव्यवस्थेला हे लोक किती किम्मत देतात ते यावरून लक्षात घ्यायला पाहीजे. काश्मीरमध्ये Thank you JNU चे फलक दाखवणारे आणि इथे दिल्लीत विद्यापिठात वर्षानुवर्ष भारतमातेच्या अन्नावर पालनपोषण झालेले मावोवादी एकच आहेत. सापाला किती दिवस असं दुध पाजत बसायचं? काश्मीरमधल्या अतिरेकी कारवाया सुरू होण्याआधी काश्मीर विद्यापिठात बॉम्बस्पोट झाले होते ही गोष्ट विसरून चालणार नाही.

प. बंगालच्या मालदा मध्ये घडलेली घटना, मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांचा विनयभंग आणि पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न अशा घटनांना दंगली या सदरात मोडता कमा नये तर त्या अतिरेकी कारवाया म्हणूनच त्यावर कारवाई केली पाहिजे न पेक्षा भारताचा सिरीया व्हायला वेळ लागणार नाही.                                                                        
पुण्याच्या फ़िल्म संस्थेतील  विद्यार्थी आणि जेएनयु मध्ये देशविरोध घोषणा देणारे विद्यार्थी हे तिथे कित्येक वर्ष ठाणमांडून सर्व सोईसुविधांचा अखंड लाभ घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना किती वर्षे  विद्यापीठामधील वसतीगृहांचा वापर करु द्यावा याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
भारत विकासाच्या वाटॆवर आहे हिच खरी तर विरोधकांची दुखरी बाजू आहे. देश आणि जगभरात हे स्पष्ट होऊ लागताच प्रत्येकवेळी या सकारात्मक बाबींवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीविरोधाला उत आला. त्याची वानगी दाखल उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.    
ओबामांची भारत भेट  - चर्चमधल्या चोर्‍यांचा चर्चवरचा हल्ला म्हणून गहजब.
भार-आफ्रिका फोरम समिट – बिफवरुन राजकारण
बिहार निवडणूक – पुरस्कार वापसी
पुर्वांचलाचा विकास – रोहित वेमूला आत्महत्येचं राजकारण
मेक इन इंडीया विक – जेएनन्यु कांड
  
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला हेतूता हवा देण्यात आली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आर्थिक आघाडीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यता अनुदान आणि मनरेगासारख्या योजनामधून खर्च होणारा केंद्रसरकारचा निधी यांना लागलेली गळती थांबवण्यावर सरकारला यश प्राप्त होत आहे. नेमकी हीच गोष्ट हितसंबंधी लोकांना खुपते आहे. योजनांमधला निधी परस्पर हडप करण्याच्या या कारस्थानाला ‘आधार’ आणि जनधन खात्यांच्या मार्फत सरकारने आळा घातला असताना त्यामुळेच अस्वस्थ झालेली मंडळी ‘असहिष्णूता’, ‘अभिव्यक्ति स्वातंत्र्य’ असल्या मुद्द्यांची ढाल पुढे करून सरकार अस्थिर सरण्याचा प्रयत्न करीत आहेत.                

क्षुद्र राजकिय स्वार्थासाठी देशविरोधी कारवाया करायच्या आणि विपर्यास करून राज्य घटनेचा आधार घ्यायचा ही कमुनिस्टांची जुनी रितच आहे. पण आश्चर्य वाटतं ते देशावर साठवर्षाहून अधिककाळ राज्य केलेल्या कॉग्रेस पक्षाचं. त्यानाही ही विपरीत बुद्धी का होते? प. बंगाल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि डावे यांची युती होणार त्याची परिणीती म्हणून हे नेपथ्य तयार करण्यत आलेले आहे काय? कॉग्रसचे नेते दिग्विजय सिंग तर निवडणूक जिंकण्यासाठी नक्षलवाद्याची मदत मागतात तर त्याच पक्षाचे दुसरे नेते मोदींना पराभूत करण्यासाठी पाकमध्ये जावून पाकची मदत मागतात. कॉग्रेसच्या रिटा बहुगुणाचं म्हणणं   विश्वविद्यालयात तिरंगा फडकावयाचा आदेश देणं लाजिरवाणं आहे. इसरत जहाला थेट शहीद दर्जा देणारे ते हेच लोक, (शहीद हणूमंतप्पा असतो इसरत जहा नव्हे) युपीए  सरकारच्या काळात डेव्हीड हेडलीने इसरत जहा आत्मघातकी पथकाची सदस्य होती असं तपास अधिकार्‍यांना सांगितलं होतं पण केवळ नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तपास अधिकार्‍याला त्याच्या मुळ राज्यात परत पाठवून त्या सरकारने ती गोष्ट लपऊन ठेवली. या प्रकरणात अनेक प्रामाणिक अधिकार्‍याना अनेक वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागलं. आता न्यायालयात हेडलेने साक्ष देताना ती गोष्ट पुन्हा सांगितली तेव्हा जनतेला सत्य समजलं.                    

ऎशीच्या दशकात सुरूवातीला पंजाबविद्यापीठात चार-पाच टाळकी खलिस्थानबद्दल बोलताना आढळायची, कालांतरांने ती दहा-वीस, नंतर पन्नास-साठ अशी संख्या वाढत गेली. सुरवातीलाच तिकडे लक्ष न दिल्याने पुढे देशाला त्याची काय किंमत द्यावी लागली त्याचा इतिहास ताजाच आहे. हा असा भ्रम निर्माण करून देशाच्या शहरी भागातही नक्षलवाद पोसण्याचं हे कारस्तान आहे. माओवादी आणि काश्मीरी अतिरेकी यांची हातमिळवणी झाल्याची ही फळं आहेत. जिथे जी चालतील ती अस्त्र वापरायची दिल्लीत वैचारीक भ्रम तयार करायचा आणि केरळ, प. बंगालमध्ये मुडदे पाडायचे.         

एकूण काय ‘खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट’ शिवरायांनासुद्धा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वधच करावा लागला होता. प्रसंग बाका होता आणि............. आताही आहे.     


नरेंद्र प्रभू

सांताकृझ, मुंबई        

08 April, 2016

दूध का पानी


डॉ. तात्याराव लहाने = जे. जे. रुग्णालय, डॉ. संजय ओक = के.ई.एम. रुग्णालय अशी समिकरणं तयार होतात ती त्या समाजहितेशी डॉक्टरांमुळे. व्यवस्थेशी झगडत, तिच्याशी दोन हात करीत समाजाचं हित नजरेसमोर ठेऊन अहोरात्र झटणार्‍या डॉक्टरला देवत्व प्राप्त होतं ते त्याच्या रुग्ण सेवेमुळे. समाजाच्या सर्व थरातील रुग्णांना आपल्या डोळ्यावर डॉ. लहानेनी शस्त्रक्रिया करावी असं वाटत असेल तर ती डॉ. लहानेंसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जे.जे. मध्ये महाराष्ट्रातल्या गरीब रुग्णांची पहाटे ४ वाजल्यापासून रांग लागलेली असते. अशा देशाला अभिमान वाटावा अशा गोष्टी केल्या की आपलं सरकार त्या व्यक्तीला पद्म पुरस्कार देतं. डॉ. तात्यांना तोही मिळालाय. म्हणजे सरकार, समाज आणि समाजसेवी डॉक्टर त्यात डॉ.आमटे बंधूही आले अशा सर्वांच्या लेखी सन्माननिय असलेला हा डॉक्टर अचानक विद्यार्थ्यांना नकोसा का झाला? जे शिकाऊ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने शस्त्रक्रिया शिकवत नाहीत म्हणतात तेच शिकाऊ डॉक्टर  बारा-बारा तास काम करायला लावतात म्हणतात तेव्हा वाटतं ‘डाल मे कुच काला है।‘

डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे. मध्ये काम केलं म्हणजे नक्की काय ते पाहू:
·        
  •    सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक परवानग्या गेल्या दोन वर्षांत मिळवल्या. सरकारी रुग्णालयाच्या इतिहासात हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
  •        १९५६ नंतर प्रथमच जे.जे.तील खाटा लक्षणीय संख्येने वाढणार आहेत. सध्या १३५२ खाटा आहेत. त्यात ११०० खाटांची भर पडेल.
  •          जे.जे.ची ओपीडी वर्षाला पाच लाख रुग्णांची होती. ती गेल्या सहा वर्षांत नऊ लाखांवर गेली.
  •          जे.जे. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ हॉस्पिटल बनले.
  •          वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये जे.जे.चे स्थान २०१० पर्यंत १३ वे होते. गेल्या सहा वर्षांत पाचवे स्थान पटकावले.
  •         एकूण १९ हजार शस्त्रक्रिया व्हायच्या, सध्या ४० हजार होतात. नेत्र विभागात वर्षभरात ६०० शस्त्रक्रिया व्हायच्या त्या सध्या १६ हजार होतात.
  •          इनडोअर पेशंटस्ची संख्या ४२ हजारांवरून ६५ हजारांवर पोहोचली.
  •          एमएमआरडीएकडून ४३ कोटी रुपये निधी आणून रुग्णालयाचा कायापालट घडवून आणला. थ्री टेस्ला एमआरआय मशीनसारखी अत्याधुनिक यंत्रणा सुरू केली.
  •          रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी ५०० लोकांकरिता धर्मशाळा उभारली.
  •          प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण केले.
  •          वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा ९७ वरून १३३ करण्यात यश आले.


हे सगळं सरकारी अडथळ्यांची शर्यत पार करीतच त्यानी केलं असणार. आता मार्डला हाताशी धरून सरकरच त्याना दूर करू पहात आहे काय?      
परवा विधान परिषदेत उच्च शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे या विषयासंदर्भात म्हणाले की ‘यांची चौकशी होऊन जाऊ दे, म्हणजे दूध का दूध, पानी का पानी हो जायेगा’ हा निर्णय नीर क्षीर विवेक असलेला वाटत नाही तर ‘दूध का पानी’ करणारा वाटतो. डॉ. तात्याराव लहानेनी केलेली रुग्ण सेवा कुणाच्या डोळ्याना खुपत आहे?  का?   

वृत्तपत्र काय म्हणतात:  





        

03 April, 2016

बरं झालं सकाळ झाली


 बरं झालं सकाळ झाली!
 तुम्ही म्हणाल त्यात काय झालं ती तर रोजच होते. सवयीने आपण Good Morning म्हणतो (हल्ले ते सुद्धा उधारीच्या फॉरवर्डस व्दारे) आणि दिवस ढकलायला लागतो. आला दिवस ढकलतोय असाच सगळा कारभार असतो. असलेल्याचं कौतूक नाही की नसलेलं मिळवायची जिद्ध नाही.

मित्रहो असे सगळे विचार आले ते चाणाक्य मंडल परिवार  वरचं एक पोस्ट वाचून. काही दिवसांपूर्वी अविनाश धर्माधिकारी सरांना एक मोठा अपघात झाला होता. त्यातून आता ते जरा बरे होत आहेत, अजून पुर्ण बरे झालेले नाहीत. तर ते पोस्ट आधी वाचूया.



भारतीय श्रद्धा
- अविनाश धर्माधिकारी सर
माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे आणि आपल्याला मिळालेला हा देह हे मंदीर आहे अशी आपली भारतीय श्रद्धा आहे.
माझी सुद्धा ही श्रद्धा आहे.
ती कळण्यासाठी मला गंभीर अपघाताची गरज नव्हती.
तरी पण अपघातानंतर माझी ही श्रद्धा आणखी सखोल झाली आहे.
शरीर सुरळीतपणे काम करत असतं तोवर आपण त्याला गृहीत धरतो. त्याचं मोल विसरतो.
पण समोर मृत्यू दिसला, भोवती घुटमळून गेला की त्यानंतर आपण जिवंत आहोत या निव्वळ वास्तवाचाच आनंद असतो.
आणि फ्रॅक्चरमधनं हळू हळू बरं होत असताना क्रमाक्रमानं साध्या साध्या गोष्टी पुन्हा पूर्ववत जमायला लागतात, हा केवळ आनंद असतो.
आज काय उजव्या हातात ब्रश पकडता आला...
आज काय उजव्या हातानं स्वत:चे स्वत: दात घासता आले...
दाढी करता आली...
आज काय पेन पकडता आलं...
(अजूनही लिहिता येत नाहीये, पण येईल) किती साधे पण सखोल आनंद आहेत.
माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे. मिळालेला हा देह हे मंदीर आहे.


रटाळवाणं निरस जगणं आणि नुसते सुस्कारे सोडत जगण्याला काय अर्थ आहे. सगळे अवयव नीट चालतात तेव्हा आपल्याला त्यांची तमा नसते. अगदी लहान सहान गोष्टींवरून आपण दु:खी कष्टी होतो. जे आहे त्याचं सुख भोगण्यापेक्षा जे नाही त्यासाठी रडत बसतो. कधी तरी आपल्याजवळ किती आहे याचा विचार तरी केला आहे का आपण?

आता हेच बघा पाश्चात्य लोक Good Morning म्हणतात म्हणून आपणही म्हणतो. त्यांच्या देशात सदा सर्वकाळ उदासवाणं मळभ भरलेलं असतं. त्याने कित्येकांना मानसिक रोग होतात. थंडीने जीव नकोसा होतो. वर्षातून काही वेळा मात्र लख्ख उन पडतं. तेव्हा ते तो दिवस साजरा करतात आणि रात्री झोपताना Good  Night म्हणून आजची रात्र अती थंडी नसेल अशी आशा करतात. सकाळी उठल्या उठल्या आज पुन्हा सुर्यकिरणांकीत सकाळ असावी अशी सदिच्छा व्यक्त करण्यासाठी Good Morning म्हणतात.

आपल्याकडे मात्र नेहमी सकाळ होते  ती सुर्य किरणात न्हाऊन निघालेली असते. त्यासाठी चिंतीत व्हायची गरज नसते, ही Good Morning असतानाही आपण मात्र चिंताग्रस्त असतो, नसलेल्या गोष्टींसाठी. त्या ही मिळतील पण मन प्रसन्न असेल तर. बहुअंशी लोकांकडे सगळे शाबूत असालेले अवयव आहेत ना? मग? डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऎकू येत नाही, हात पाय चालत नाहीत असं झालं तर? त्या जगण्याला काय अर्थ आहे. जे आहे त्याचं सुख कधी उपभोगणार आपण? रात्रीनंतर सकाळ होते म्हणून सगळं सुरळीत चाललय़. समजा ती एकाद्या वेळी झालीच नाही तर. तर आपण तीची किती आतूरतेने वाट पाहू. ते कशाला एखाद्या रात्री झोपच येत नाही तेव्हा, आठवून बघा आपण किती आतुरतेने सकाळ होण्याची वाट पहात बसतो. नेहमी सारखी ती होते तेव्हा आपणच म्हणतो नाही का ‘बरं झालं देवा सकाळ झाली’. कशा छान कविता असायचा लहानपणी.

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सुर्य देतो    



02 April, 2016

निसटून सांज गेली



असा गार वारा, नदिचा किनारा
खगांचा इशारा,  आकाशीच्या
तुझा हात हाती, नसे शब्द ओठी
मृगाचा शहारा, कानातुझ्या

नि:शब्द वन हे, सांगून गेले
मनीचे तुझ्या भाव सारे मला   
कितीदा वदावे असे वाटले अन
कितीदा तुझा ओठ तू दाबला
  
अशी सांज हलकेच, निसटून गेली
कितीदा करू माझी मी वंचना
कसे शब्द ओठातले चूर झाले
कसे पांग फेडू तरी सांगना    


नरेंद्र प्रभू 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates