आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहीनी वरून ‘परिसर’ या सदरात सकाळी ६.३०
वा. दि. १६ एप्रिल २०१३ पासून तीन दिवस लडाख प्रांतावर कार्यक्रम प्रसारीत होत आहे. आज सकाळी प्रसारीत झालेला
हा दुसरा भाग:
लडाख प्रांताचं मुख्यालय असलेलं लेह शहर सिंधू व्हॅलीत वसलेलं
आहे. लडाख प्रांतातल हे सर्वात मोठं शहर. तिबेटी स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या
इमारती आणि घरं पाहताना आपल्या भारत देशाच्या इतर शहराहून एका वेगळ्याच शहरात
आल्याचं लक्षात येतं. उत्तर-पुर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पुर्वेला हिमालयाच्या
रांगा आणि गाभा ट्रान्स हिमालयीन रांगाचा अशा पर्वतांच्या कुशीत असलेली सिंधू
व्हॅली देखणी तर आहेच पण आर्यांनी ज्या नदीच्या काठाने आपला प्रवास केला ती सिंधू
नदी तिथेच आपल्याला दर्शनही देते.
लेह
शहरा पासून अठरा किलोमीटर असलेल्या सिंधू घाटावर जाण्यासाठी लेह-मनाली मार्गावरून
जावं लागतं. लडाखला जसं श्रीनगरमार्गे जाता येतं तसं मनाली मार्गेही जाता येतं. हमरस्त्याच्या
एका बाजूला संपुर्ण वैराण जमिन आणि दूसर्या बाजूला हिरवळ असं अनोखं दृष्य या
ठिकाणी पाहायला मिळतं. लेह शहर मागे पडतं तसं हमरस्त्याच्या दुतर्फा छोट्या छोट्या
डोंगरांच्या राशी ओतून ठेवाव्यात तशा टेकड्या दिसायला लागतात. पृथ्वीतलावरची
सर्वात अलिकडच्या काळातली जमिन म्हणजेच हा भाग. वार्याच्या एका झुळूकीबरोबर इकडून
तिकडे जाणारी माती पाहून अशाश्वतेची जणू जाणीव होत रहाते.
सिंधू
नदिचा बहूतांश भाग फाळणीनंतर आता पाकिस्तानात असला तरी सुमारे तीनशे किलोमीटर एवढा
नदीचा भाग हा आजही भारताच्या जम्मू-काश्मिर राज्यातून वाहत जावून पुढे तो
पाकिस्तानात जातो. जिच्या केवळ नामोच्चाराने कोट्यावधी भारतीयांच्या मनात पवित्र
भाव निर्माण होतात, ती वेदांची जननी म्हणजे सिंधू. सिंधूवरून हिंदू आणि म्हणून
हिंदूस्थान, तसच इंडस वरून इंडीया अशी आपल्या देशाला नावं पडली. तिबेटमध्ये मानसरोवरनजीक सिन-का-बाव इथे उगम
पावून पुढे सिंधू नदी आपल्या भारतात लडाख प्रांतात प्रवेश करते. ऋग्वेदापासून
महत्वाच स्थान असलेल्या या नदीच्या काठी कधी काळी आर्यानी वस्ती केली होती. खळाळणारं
स्वछ, शीतल जल घेवून वहात जाणार्या या नदीला पुढे झंस्कार व्हॅली मधून वाहत
येणारी झंस्कार नदी मिळते आणि नंतर पाकिस्तानात जाते. लडाखमध्ये जी शेती होते ती
बहुतांश या नदीच्या पाण्यावर. इतर ठिकाणी गवताची पातीही दिसणार नाही पण या
नदीच्याकाठी मात्र हिरवळ दिसते. दरवर्षी जून महीन्यात सिंधू घाटावर सिंधूमहोत्सव
साजरा केला जातो. या घाटावरून लडाखच्या सर्वात उंच अशा स्तोक कांगरी शिखराच सुरेख
दर्शन होतं.
लडाखमध्ये
बौद्ध गुंफा खुप आहेत आणि त्या पहाण्यासारख्याही आहेत. 1430 साली बांधून पुर्ण
झालेली थिकसे गुंफा ही सर्वात उत्तम अशी गुंफा आहे. त्याची सुरवात अगदी
प्रवेशद्वारापासून होते. अत्यंत आकर्षक अशी रंगसंगती आणि कलाकुसर असलेलं हे
प्रवेशद्वार आहे. सर्वच मॉनेस्टींची उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. ही गुंफा म्हणजे
अख्ख गावच आहे. शाळा, बॅंक, निवासस्थानं प्रार्थनामंदीर सगळं एकाच ठिकाणी आहे. चार
महीन्यांचा उन्हाळा सोडल्यास अतीशीत असलेल्या या ठिकाणी सगळी व्यवस्था जागच्या
जागीच व्हावी अशीच त्या गुंफाची रचना आहे. शंभरेक पायर्या चढताना वाटेत एक भलं
मोठ प्रेयींग व्हील आहे. त्या नंतर सुबक
अशी मैत्र्येय बुद्धाची मुर्ती पाहून थक्क व्हायला होतं. पंधरा फुट उंच असलेली ही
मुर्ती मात्र अलिकडेच म्हणजे 1980 साली उभारण्यात आली. ही संपूर्ण गुंफा नीट
पाहायला दोन तासाचा वेळ हाती असावा लागतो. ही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही अवडंबर
न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे. उत्तम मूर्तीकाम, नक्षीकाम, कमानी, रंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा सर्व पाहात राहावं असं
आहे. लडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं.
लेह जवळचा शे पॅलेस ही मुळात मुळात गुंफाच होती. १६५० मध्ये देलडॉन नामग्याल या राजाने या ठिकाणी
स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे 'सिंग्ये
नामग्याल' यांच्या स्मरणार्थ हा राजवाडा बांधला. या ठिकाणी १८३४ पर्यंत राज
निवासस्थान होतं.
लेह शहराच्या जवळच असलेला लेह पॅलेस आणि शांती स्तूप ही
मुद्दाम भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत. निळ्या आभाळाच्या पार्श्वभुमीवर लडाखच्या या
रुक्ष प्रदेशात तिथल्या रंगी-बेरंगी गुंफा, स्तूप आणि राजवाडे उठून दिसतात.
No comments:
Post a Comment