आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी वरून ‘परिसर’ या सदरात सकाळी ६.३० वा. आजपासून
तीन दिवस (दि. १६, १७ आणि १८ एप्रिल २०१३) लडाख प्रांतावर कार्यक्रम प्रसारीत होत आहे.
आज सकाळी प्रसारीत झालेला हा पहिला भाग:
हिमालयाचं रांगडं रुप पहायचं असेल तर लडाख प्रांतात गेलं
पाहिजे. आपल्या देशातील जम्मू-काश्मिर राज्यातला हा भाग तिथल्या अनोख्या
सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उंचच उंच पर्वत, बर्फाच्छादीत शिखरं आणि खोल दर्या, भव्यतेचं
दर्शन घेताना आपण एका वेगळ्या जगात आल्याचं आपल्या लक्षात येतं. निळंशार आकाश,
गोठलेले प्रवाह आणि क्षितीजापर्यंत दिसणारा भुभाग डोळ्यात काय काय साठवावं याचं
कोडं पडावं असा हा देखणा प्रांत.
कारगील हे ठिकाण लडाख प्रांताचाच एक भाग आहे. भारत पाक
नियंत्रण रेषेला लागून हा भाग असल्याने आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या
भागाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिमालयात वसलेल्या या भागात झंस्कार, सुरू, द्रास आणि वाखा या चार व्हॅली येतात. श्रीनगर
लेह राष्ट्रीय महामार्गावरून जाताना कारगील जिल्ह्याचं मुख्यालय लागतं पण हा
संपुर्ण जिल्हा मात्र अतिशय दुर्गम भाग म्हणूनच ओळखला जातो. सीमेलगत तसंच
राष्ट्रीय महामार्गालगत थोडी वस्ती आणि लष्करी जवानांची ये जा असली तरी
झंस्कारसारख्या ठिकाणी गेल्यास फार अभावानेच माणसांचं दर्शन घडतं. सोनमर्ग लगतची
जोझिला ही खिंड ओलांडल्यावर हिरवाई कमी कमी होत जाते आणि सगळा प्रदेश वनस्पतीविहीन
दिसायला लागतो असं असलं तरी निसर्गसौंदर्यात काही कमी आहे असं मुळीच वाटत नाही. उलट
अनंत रंगछटा असलेला आसमंत पाहाताना मन हरखून जातं.
आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि कारगीलला गेल्यावर
त्याची प्रकर्षाने जाणीव होते. द्रास व्हॅलीमध्ये २००५ सालच्या हिवाळ्यात वजा साठ
एवढ्या कमी तपमानाची नोंद झाली होती. मानवी वस्ती असलेलं जगातलं थंड ठिकाण म्हणून
द्रासचा उल्लेख केला जातो. तिथल्या उन्हाळ्यातल्या रात्रीही गारठवणार्या असतात,
झंस्कार व्हॅलीमध्ये थंडीचं हे प्रमाण आणखी जास्त असतं. म्हणूनच जम्मू-काश्मिर
राज्यातला कारगील हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याच कारगील भागात
पाकिस्तान बरोबरचं युद्ध झालं होतं. द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आपल्या
जवानांच्या शौर्याच्या गाथा ऎकायला आणि पहायला मिळतात.
पेनसीला खिंडीच्या बर्फाच्छादीत शिखरांत उगम पावलेली सुरू
नदी कारगील मधून वाहत जावून पुढे सिंधू नदीला मिळते. लडाख प्रांतातलं लेह नंतर
दुसरा नंबर असलेलं कारगील हे शहर सुरू
नदीच्या किनारी वसलं आहे. १८५ किलोमीटर एवढी लांबी असलेली ही नदी पुर्णपणे कारगील
जिल्ह्यातूनच वाहाते. पुरातन काळातला
सिल्क रोड याच नदीच्या काठाने जाऊन स्कार्डू या ठिकाणी मिळत असे, आता भारत-पाक
नियंत्रण रेषेमुळे हा मार्ग बंद झाला आहे. या नदीच्या वेग असलेल्या खळाळत्या
प्रवाहामुळे उन्हाळ्याच्या दिवसात राफ्टींगचा खेळ इथे चालतो. सुरू व्हॅलीमधूनच
राफ्टींगला सुरूवात होते. नुन-कुन शिखरावर ट्रेकींग माउंटेनीअरींगला जाणारे साहसी
ट्रेकर सुरू व्हॅली मधून आपल्या मोहीमेला सुरूवात करतात.
विरळ आणि कोरड्या हवामानामुळे कारगील जिल्ह्यात शेतीचं
प्रमाणही खुप कमी आहे, असं असलं तरी सुरू नदीच्या खोर्यात उन्हाळ्यात तिथे शेती
केली जाते आणि गहू, मोहरी, बार्ली अशा धान्यांचं आणि टुर्नीप या कंदमुळाचं उत्पन्न
घेतलं जातं.
लडाखचा प्रांत जुन ते संप्टेंबर या काळातच रस्ते मार्गाने
देशाच्या इतर भागला जोडलेला असतो. जोझीला पासमध्ये असलेल्या बर्फाच्या राशी दूर
करून दरवर्षी कारगीलला जाणारा मार्ग सीमा सडक संघटनेकडून मोकळा केला जातो.
हिवाळ्याच्या काळात हा प्रदेश हवाई मार्गानेच देशाच्या इतर भागाशी जोडलेला
असतो.
कारगील जिल्ह्यात फोटूला पास पासून पंधरा किलोमीटर अंतरावर
असलेली लामायुरू ही बौद्ध गुंफा पर्यटकांचं एक मुख्य आकर्षण असून त्याच भागात
असलेला मुनलॅन्ड हा भाग तिथल्या मातीच्या विशिष्ट रंगामुळे स्मरणात राहातो. चंद्रावर
सापडलेल्या मातीच्या नमुन्याशी साधर्म्य असल्याने या ठिकाणाला मुनलॅन्ड असं नाव
पडलं आहे. रम्य निसर्ग आणि संकृतीने नटलेल्या या प्रदेशात पर्यटनाला खुपच वाव
आहे.
No comments:
Post a Comment