आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी वरून ‘परिसर’ या सदरात सकाळी ६.३० वा. दि. १६ एप्रिल २०१३ पासून तीन दिवस लडाख प्रांतावर कार्यक्रम प्रसारीत होत आहे. आज सकाळी
प्रसारीत झालेला हा तीसरा भाग: लेखन नरेंद्र प्रभू
लडाख या प्रांताला वंडरलॅन्ड म्हटल्यास वावगं ठरणार
नाही. १४,५०० फुट उंचीवर असलेला खार्यापाण्याचा पॅन्गॉन्ग लेक हा नेत्रदिपक विशाल
असा तलाव तिथे आहे तसा १८३६० फुट उंचीवरून जाणारा जगातला सर्वात उंचावरचा मोटार
वाहतूकीचा रस्ताही त्याच प्रांतात आहे. लेह शहर सोडून खारडुंगला पासच्या दिशेने गाडी जसजशी चढावाला लागते तसतसा अगदी दूरवरचा
प्रदेश नजरेच्या एका टप्प्यात पाहाता येतो. विमान सोडल्यास एवढ्या लांबवर पहाण्याचा योग क्वचीतच येतो. आणखी
उंचावर गेल्यानंतर संपूर्ण लेह नजरेच्या एका टप्प्यात दिसायला लागतं. त्याही
पलिकडे असणारं सिंधू नदीचं पात्रं, त्याच्या पुढचं स्तोक कांगरी हे लडाख मधलं
सर्वात उंच शिखर असं विहंगम दृष्य पाहून आपण हर्षभरीत होतो. मध्येच दिसणारा एक
हिरवा पट्टा आणि बाकीचा रुक्ष प्रदेश. आजपर्यंत डोळ्यानी न बघितलेलं असं चित्र
डोळ्यात साठवत हा प्रवास सुरूच राहातो. रस्त्याच्या दुतर्फा असलेलं बर्फ अनुभवत
आपण अचानक एका वळणानंतर खारदुंगला पासवर पोहोचतो तेव्हा उत्साहाला उधाण आलेलं असतं.
पण अतीशीत आणि जोरदार वाहणारे वारे थंडीचा कडाका वाढवत असतात. खारदुंगला पासच्या
रस्ता सोडून तिथे सगळं बर्फाचच साम्राज्य असतं. दोन्ही बाजूला बर्फाची तटबंदी आणि
मधून जाणारं एखाद दुसरं वाहन, बारा महीने बर्फाच्छादीत असलेला खारडुंग ला पास पार करून पुढे गेल्यावर सियाचीन
या पाकव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या जिल्ह्यात प्रवेश करता येतो. खारडुंगला
पास नंतरचा हा प्रदेश म्हणजे, नुब्रा व्हाली. तिथे जाताना शोक नदीच्या काठाने आणि
कधी प्रत्यक्ष पात्रातूनही प्रवास करावा लागतो.
समोर अथांग पसरलेल्या नुब्रा व्हॅलीचं दर्शन आणि दूरवर पसरलेल्या सियाचीन
ग्लेशीयरच्या बर्फाच्छादीत पर्वत रांगा पाहून मन प्रसन्न होतं. बर्फामुळे निर्माण
झालेले वेगवेगळे आकार पाहत असताना मन हरकून जातं. नुब्राव्हॅलीत उतरायला लागल्यावर
हिरवा टापू दृष्टीस पडतो आणि मॅकपाय हा पक्षी आपणाला दर्शन देतो. वरती गडद निळा
आणि छातीचा भाग पांढर्या रंगाचा असलेला हा पक्षी मन मोहून घेतो. पुढे तर मरमॅट हा
दुर्मिळ प्राणी दिसतो. जमिनीच्या
पृष्ठभागावर जेव्हा बर्फ असतं तेव्हा जमिनीला गुहेसारखा खड्डा पाडून हा प्राणी
सहा-सात महीने आतमध्ये पडून राहतो आणि बर्फ वितळल्यावर पुन्हा वर येतो. त्या
सहा-सात महीन्यात अंगात साठवलेल्या चरबीवर त्याचा निर्वाह होतो. त्या प्राण्याचे
फोटो काढणं म्हणजे एक कसरत असते. तसं सगळ्याच
वन्यप्राण्याचे फोटो काढताना काही पथ्य ही पाळावीच लागतात. ती
पाळली तरच आपल्याला चंगले फोटो मिळतात. ते प्राणी
कोवळ्या उन्हात बाहेर येतात. त्यांची चाहूल लागल्यावर शांतपणे थांबलं तर
त्याच्या हालचाली टिपता येतात. जसे इथे मरमॅट दिसतात तसे याक सुद्धा दिसतात.
पुढच्या प्रवासात तिथल्या प्रदेशाचं चित्र बदलत जातं. मध्येच खोलगट भागात
एखादा हिरवा टापू दिसायला लागतो आणि खार्दुंग, खालसर, डिस्कीट अशी मोजकी गावं लागतात.
खालसर या गावानंतर रस्त्याच्या एका बाजूला शोक नदी आणि पलिकडे काराकोरम रेंजीस नजरेला
पडतात.
हुंडर हे तिथलं प्रसिद्ध वाळवंट. डबल हॅम्प कॅमल म्हणजे दोन कोळी असलेले उंट
आपल्या सिल्क रुटच्या इ तिहासात घेऊन जातात. ते उंट ही त्या काळची एक खुणच आहे. तर्हेतर्हेचे आकार घेतलेल्या वाळूच्या टेकड्या, सॅंड्युंस आणि त्या आकारांशी स्पर्धा करणारे आकाशातील ढग, दाही दिशांना तिथे निसर्गाचंच वर्चस्व असतं. माणूस इथे शून्य आहे असं वाटत आसतानाच तिथलं
आकाशवाणी केंद्र बघून पुन्हा एक धक्का बसतो.
दोन बैठ्या इमारती आणि एक मनोरा आपल्या आकाशवाणीचं काम तिथेही सुरू
असतं. छप्परही नसलेला पेट्रोलपंप सगळच आश्चर्यकारक.
नजरेच्या एकाच टप्प्यात बर्फाच्छादीत शिखरं, वाळवंट, पाण्याचा प्रवाह आणि
त्याच्याकाठी झुडूपं असं दुर्मिळ दृष्य पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. तिथली डिस्कीट
मॉनेस्ट्री ही तर सुंदर आहेच पण उंचावर असल्याने संपुर्ण नुब्रा व्हालीचं विहंगम दृष्य तिथून पाहाता येतं. इकडे जाव तिथे
काहीतरी वेगळं बघायला मिळतच. अगदी ते हिमालयीन कावळे सुद्धा कसे काळेकुट्ट, पिवळी
चोच आणि भगवे तांबडे पाय.
वाटेत असलेल्या हॉटेल मध्ये लडाखी पक्वान्न म्हणजे मोमो खायला मिळतात. या
भागात फिरताना तिथल्या लहरी निसर्गाचा अनुभव येतोच येतो. एकीकडे लख्ख उन पडलेलं
असेल तर दुसर्या बाजूला
बर्फवृष्टी होताना पाहायला मिळते. लडाखचा हा प्रांत डोळेभरून
पाहायचा असेल तर मे ते सप्टेंबर या कालावधीत तिथे पर्यटनाचा आनंद घेता येतो.
Wa , saheb khup chhan varnan apan ya bhagache kelyane janu kahi vachakach ha bhag pratyaksha dolyani baghato ahe asa bhas hoto.
ReplyDeleteअतूलजी धन्यवाद.
ReplyDelete