31 December, 2015

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे


मंगेश पाडगावकरांनी माझ्या पिढीला गाणं गायला लावलं. त्यानी गद्य माणसालाही पद्य म्हणायला लावलं.
कोकणातल्या माझ्या गावात डोगरावर हुंदडताना रंगभरल्या आकाशाकडे बघताना ‘रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली? ही त्यांची ओळ गुणगुणताना त्या वयात आकाशाची शोभा मी पाहिली, पाडगावकरानी ती ओळ लिहिली नसती तर कदाचीत समोरचं सुंदर आकाश मी न्याहाळलंच नसतं. ‘काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली’ तिन्हीसांजेचं एवढं समर्पक वर्णन आणखी कुणी केलं असेल असं मला वाटत नाही. ऋतू बदल होताना आता निसर्गाचा वेगळा अविष्कार पहायला मिळणार म्हणून मी खुश व्हायचो ते  त्यांच्याच ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ या ओळीमुळे. पुढे मग दुर्गाबाईंचं ‘ऋतूचक्र’ वाचनात आलं, पण ऋतूंबद्दलची आवड, जाण पाडगावकरांच्या त्या ओळीने लहानपणातच करून दिली. एकाच गाण्यातून एवढं चमत्कृतींनी भरलेलं जग दाखवण्याची ताकद या माझ्या कोकणातल्या मंगेशाकडे होती. त्यांचं पहिलं दर्शन सावंतवाडीच्या मोती तवाकाठच्या आमच्या कॉलेजमध्ये झालं, बरोबर बा.भ.बोरकर आमचे वसंत सावंत सर असे कविवर्य होते. थोड्याशा नाटकी ढंगाने केलेलं पाडगावकरांचं कविता वाचन ऎकून आम्ही प्रथमता हसत सुटलो होतो. पण लहानपणापसून  रेडिओवर आणि बालभारतीमधून भॆटणारा हा कवी असा प्रत्यक्ष पाहिल्यावर आम्ही हुरळून गेलो होतो.

पुढे मुंबईत आल्यावर पाडगावकर अनेक कार्यक्रमांमधून ऎकता आले. प्रत्यक्ष भेट झाली आणि हा कवी बापमाणूस म्हणूनही माहित झाला. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणारा हा कवी तत्ववेत्ताच म्हणायचा. आत्महत्येला प्रवृत्त झालेला माणूस हे गाण ऎकून पुन्हा नव्या जोमाने आयुष्याला सामोर गेला, अशी या गाण्याबद्दलची एक आठवण अरुण दाते सांगतात.

‘पाचूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले’ हे पाडगावकरच लिहू शकतात.  ‘जिथे तिथे राधेला भेटे आता शाम मुरारी’, ‘एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना’ ‘चंद्र कोवळा पहिलावहिला झाडामागे उभा राहिला’, ‘अवती भवती असुन दिसेना शोधतोस आकाशी हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी’ ‘चांदण्यात भिजला गालावरचा तिळ’ ‘स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास’, ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ ‘का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?’, ‘वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा’, ‘’त्या तरुवेली, तो सुमपरिमळ झर्‍यांतली चांदीची झुळझुळ’, ‘चांदण्याला नीज आली’, ‘मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे’, ‘लक्ष चंद्र विरघळले गात्री’, ‘मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली’, ‘जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातिल अनंद’, ‘लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रिती’, ‘माझे जीवन गाणे’ असे किती किती मोत्यांचे सर तुम्ही सहज ओवित गेलात, खरंच तुम्हाला अंतर्यामी चा सूर गवसलेला होताच. पाडगावकर, तुम्ही असे गीतातूनी सर्वस्व आहे वाहिले, ते शब्द आता राहिले......., ते शब्द आता राहिले....!                 


आकाशातल्या शुक्र तार्‍याकडे नजर जाईल तेव्हा कवीवर्य पाडगावकर तुमची नक्कीच याद येईल. भारलेले अनेक क्षण तुम्ही दिले  आणि आमचाही जन्म भारून टकलात. अनंत काळ दरवळत रहाणारा तुमच्या ‘अंतरीचा गंध’ तुम्ही आमच्यासाठी सोडून गेला अहातच.              

24 December, 2015

धरित्रीचे देणे


अर्धी रात्र सरलेली
जागे सपान उशाला
कानी कपाळी ओरडे
जाग आली स्मशानाला

किती नाती अशी मेली
काही अर्धीच राहीली
विण नात्यातली आता
काहो अशी उसवली?

त्याने धरित्रीचे देणे
असे फुंकून टाकले
आणि रान तुकड्याचे
कसे विकून टाकले?

काहो मरते ही माती
नाती माती माती होती
किती राखावी तरीही
असे ओंजळ ही रिती

आता गुंता सारा झाला
टाळे पडे घरट्याला
किती टाळावे तरीही
जागे सपान उशाला

नरेंद्र प्रभू

२४/१२/२०१५ 

16 December, 2015

भिमाशंकर ट्रेक



कितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि मग आम्ही निघणार असं चालू  होतं, पण तो दिवस अचानक नक्की झाला आणि मी तयार झालो. फारशी तयारी न करता कैलासची परिक्रमा पायी केल्याने मला ‘आपण जावू’ असा विश्वास होता पण सह्याद्री काही बच्चा नाही. इथल्या पायवाटा एका गावात म्हणता म्हणता दुसर्‍याच ठिकाणी कधी नेवून पोहोचवतील याचा पत्ता लागणार नाही.  

चित्रकार योगेश आगिवले
योगेशने साकार केलेलं एक चित्रं
भल्या पहाटे निघायचं असं ठरवलं तरी नेरळला आठ वाजता पोहोचलो आणि पहिल्यांदा हनुमानाचा प्रसाद मिळाला. त्याने पुढचा सगळा प्रवास सुखकर केला. हा हनुमान अतूलचा मित्र. अतूलची त्याच्याशी खुप छान मैत्री असावी. अगत्याने आपल्या घरी घेवून गेला. त्याच्या घरच्यानी हसून स्वागत केलं. बाहेरच्या खोलीत बसलो तर भिंतीवर अनेक चित्रं टांगलेली होती. या घरात ही चित्रं आहेत म्हणजे चित्रकार पण घरचाच असावा असं अतूलशी बोलतानाच हनुमानचा छोटा भाऊ योगेश आगिवले हाच समोर आला. ती चित्रं त्यानेच काढली होती. एवढ्या लहानश्या गावात असा चित्रकार असावा आणि मुख्य म्हणजे तो आपली कला जपत आहे हे पाहून खुप आश्चर्य वाटलं. त्याचा हात बरा होता. त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. चित्रकार मित्र शरद तावडे यांच्या संपर्काचा सल्ला त्याला दिला.  हनुमानच्या घरीच आमची उत्तम अशा न्याहारीची सोय झाली. हनुमानच्या घरच्या प्रेमळ माणसांचा अल्प सहवास लक्षात रहाण्यासारखा आहे.

पहिल्यांदा काठेवाडीला सोडतो म्हणणारा हनुमान मग आमच्या सोबत शिडीघाटातून भिमाशंकरला यायला तयार झाला. चला म्हणजे आता वाट चुकण्याची शक्यता नाही. लहानपणापासून दर त्रिपुरारी पोर्णिमेला आणि अधेमधे भिमाशंकरला जाणारा हनुमान सोबत आहे म्हणून आम्ही निर्धास्त झालो. दोन तासाची डोंगरवाट चढण्याची तयारी मनाशी केली होती. पण शिडी घाटाचा उभा चढ, थंडीने फिरवलेली पाठ आणि दुपारची चढती उन्हं यामुळे घामाच्या धारा आणि श्वास लागल्याने  गती मंद झाली. दिड-दोन तासांची ती रपेट पार तीन तासांनी पुर्ण झाली.

भिमाशंकरचं जंगल चढताना प्रदुषणाच्या धुरक्याचा भला मोठ्ठा पट्टा कल्याण अंबरनाथ परिसरावर पसरलेला दिसत होता. समोरची गावही त्याच्या विळख्यात गडद होत गेली. उभ्या चढावरून आम्ही पहिल्या शिडीपाशी येवून पोहोचलो. पहिली, त्या नंतरची दुसरी शिडी सहजच चढून गेलो. मग पुन्हा चढती, सुर्य डोक्यावर आला होता. पुन्हा एक शिडी लागली आणि एका ठिकाणी बसायला बर्‍यापैकी
ऎसपैस जागा मिळाली. “इथे बसू पाच मिनीटं”, असं हनुमंत म्हणाला. फोटो काढले. आता शिड्या संपल्या. चला एक टप्पा तर पार केला या फुशारकीतच मी उठलो आणि लगेच निमुळत्या खडकावरून
याच मार्गाने ट्रेक केला 
पुढे जावं लागलं. एका अरुंद जागेत अतूलच्या पाठीवरची सॅक अडकली, ती खाली ठेवून पुढे जाऊन त्याने परत घेतली. मागोमाग मी जात होतो. वाकून चाला असा हनुमंतने सल्ला दिला. तो भाग पार पडला. पुढचा खडक चढून जाणं अधिक कठीण होतं. माझी सॅक, कॅमेर्‍याचे बॅग केव्हाच अतूल आणि हनुमानने घेतली होती. वरच्या कपारीत हात घट्ट रोवले, मग दोन्ही पाय खाचेत पक्के केले आणि शरीर वर झोकून दिलं......,  वर चढलो. पुन्हा सत्तर-ऎशीच्या कोनात सरळ चढ सुरू झाला. आत्ता कुठे पहिला टप्पा संपला होता. पण कठीण टपा पार झाला होता. एक वाजता भिमाशंकरचं दर्शन झालं.

दुसर्‍या दिवशी भिमाशंकर- कल्याण असा सहा तासाचा एसटीचा प्रवास किंवा शिडी घाट अथवा गणेश घाटमार्गे पुन्हा खांडस असे पर्याय होते. सकाळी मंदीरात जावून दर्शन घेतलं आणि गणेश घाट मार्गे उतरायला सुरूवात केली. शिडी घाटापेक्षा हा मार्ग अधिक सोपा पण दुप्पट वेळ खाणारा होता. हे असंच असतं. कठीण परिश्रम घेतले तर लवकर यश प्राप्त होतं. पण उतरताना हनुमान सोबत नव्हता आणि शिडीघाटातून उतरणं धोकादायक वाटलं म्हणून गणेश घाटातून उतरलो. एका ठिकाणी अतूलने थोडं पुढे जावून निरिक्षण करायला सुरूवात केली. समोर शिडीघाट दिसत होता. काल आम्ही जे धोकादाय वळण आणि खडक पार केलं ते दूरवर समोर दिसत होतं. त्याचे फोटो घेतले आणि आता ते पाहिले तेव्हा लक्षात आलं की काल काय दिव्य पार केलं ते.

खुप मोठा आत्मविश्वास, दोन दिवसत भरून घेतलेली शुद्ध हवा आणि पुन्हा एखाद्या ट्रेकला जाण्याची जिद्द मनात बाळगून परतलो. मात्र हनुमंताची कृपादृष्टी हवीच.                        
                             


                                          







21 November, 2015

कसे करावे कौतूक


शितल ऋतूची चाहूल सकाळी
संध्याकाळी जलबरसे
ऋतूचक्रही बिघडूनी गेले
ढगा आडूनी सुर्य हसे

पहाटवारा सांगूनी गेला
गुज मनीचे शितलसे
दुपार होता अचलच झाला
ढगा मागूती कवडसे

मग्न विचारी सारे झाले
कशी कुणाची झाली चूक
कसे करावे आता सांगा
चराचर सृष्टीचे कौतूक          

नरेंद्र प्रभू
२१/११/२०१५    

सकाळी थंडीची चाहूल लागली म्हणून मित्रवर्य प्रसाद कर्णिक यांनी कविला वॉट्सअप केली आणि आता उकाडा आणि पाऊस सुरू झाला म्हणून ही कविता सुचली. प्रसादनी पाठवलेली कविता:

आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले

बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित
उधळीत जाई पर्णपिसारा

मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल

|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

       

19 November, 2015

नीलरंगी रे


श्रीनगरच्या दल सरोवरात शिकार्‍यातून फिरताना टिपलेली ही संध्याकाळ, सगळ्या सृष्टी सौदर्यात असं आकंठ बुडलो असताना कुठेतरी पाकची सावलीही जाणवत होती.


नीलरंगी सांज झाली
शाम तो उतरे धरेवर
शामरंगी रंगलो मी
नीलांबरावर की जळावर

उतरून आल्या मेघमाला
त्या तरूवर नी घरावर
काठ आकंठ डुंबले ते
बहरून आले की सरोवर

रम्य संध्या एक रंगी
रंगात भिजूनी थांबलेली, अन
एक तारा त्या दिशेला
सांज होती लांबलेली

की...? कालियाने या जळावर
ओकले हे विष आहे ?   
त्या तिथे माझ्या धरेवर
नापाक बसले ‘पाक’ आहे ?    

नरेंद्र प्रभू
०८/११/२०१५

        

17 November, 2015

आत्मानंद



 
    
बोरीवलीच्या वन विहारमध्ये पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती घेण्यासाठी जमलेल्या अनेकजणात मी ही सामील झालो. बोरीवली सांस्कृतीक केंद्राने संस्कार भारती आणि पोट्रेट आर्ट ग्रुपच्या सहयोगाने आयोजित केलेल्या आर्ट फेस्टिवलचा हा जंगी कार्यक्रम होता. माजी महापौर विनोद घेडीया यांच्या कल्पक नेतृत्वाखाली साकार झालेल्या वन विहारात अनेक चित्रकार चित्र काढण्याचा आनंद घेत होते आणि माझ्यासारखे अनेक त्याच्या फुकट आस्वाद घेत होते.

एखादी कलाकृती साकार होताना पहाण्यात जी मजा आहे त्याला उपमा नाही. कोर्‍या कागदावर हळूहळू साकार होत जाणारं समोरचच दृष्य पाहताना त्या चित्रकाराची त्याच्या कुंचल्यावर असलेली हुकमत जाणवत होती. चित्रकला ही सादरीकरणाचीही कला आहे, चित्र तयार होत असताना पाहिलं म्हणजे त्या कलाकाराची त्या मागची तपस्या लक्षात येते. चित्रकार शरद तावडे नारळाचं छोटं झाड साकार करताना वापरत असलेले ब्रश, रंग, त्यांचे फटकारे हे सगळं चित्राच्या वेगळ्याच दुनियेची सफर घडवत होतं.
वीस-पंचवीस चित्रकार चित्रकारीतेचं सादरीकरण करीत होते आणि त्यांच्याबाजूला घोळका करून कलारसिक त्याचा आस्वाद घेत होते. दुपारी सुप्रसिद्ध चित्रकार विजय आचरेकर यांनी ‘पोर्ट्रेट पेंटीगचं’ प्रात्यक्षिक सादर केलं आणि सगळेच हरखुन गेले. चौथ्या-पाचव्याच फटकार्‍याला समोर बसलेल्या मॉडेलचा चेहरा कागदावर बोलका झाला. हळूहळू त्यात रंग भरत गेले आणि ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ म्हणजे काय याचा अनुभव
आला. दरम्यान चित्रकार वासुदेव कामत चित्र, चित्रकार आचरेकर यांच्या विषयी बोलत होते. सगळं कसं अनौपचारीक होतं आणि मनमोहकही. पोर्ट्रेट साकार झालं आणि मग चित्रकाराशी गप्पाही रंगल्या. त्या समारंभाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळेच जमिनीवर होते, श्रोते तर असणारच पण कलाकारही होते, हे विशेष !

अजून त्या सोहळ्याचा कळसाध्याय बाकी होता. सुप्रसिद्ध चित्रकार आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. वासुदेव कामत त्यांच्या ‘मोगरा फुलला’ या चित्रमालिकेवरचा ‘स्लाईड शो’ दाखवणार होते. पारल्याच्या लोकमान्य सेवा संघात दहा मिनीटं ते चित्रांवर बोलले होते तेव्हापासून मला त्याना ऎकायचं होतं. आज तो योग जुळून येणार होता. वासुदेवजींनी दाखवलेली पहिली स्लाईड पाहिली आणि मन भरून आलं आणि त्या सगळ्या स्लाईड आणि त्याबरोबर चाललेलं वासुदेव कामतांचं निरुपण म्हणजे मणीकांचन योग होता. एखादा कलाकार बहुआयामी असतो म्हणजे काय ते तेव्हा कळलं. चित्रकलेत अगाठलेली उंची त्याना जगमान्यता द्यायला पुरेशी आहे, पण ते तेवढेच चांगले निरुपण करू शकतात हे तेव्हा समजलं. सारंच वातावरण भारून टाकल्यासारखं झालं होतं.  
 

भारतातील संतांवर वासुदेव कामतानी केलेल्या ‘मोगरा फुलला’ या चित्रमालिकेत संत ज्ञानदेव ते संत विनोबा भावे यांच्या जीवनातील उत्कट प्रसंगाना कॅनव्हासवर चित्रबध्द केलं आहे. शेवटच्या चित्रातली “देवाचा तुमच्यावर विश्वास आहे, काही हरकत?” हे लिहिलेली पाटी तर षटकार मारून गेली. अनेक संत रचनांचा नव्याने अर्थ लागत होता. चित्रांमागचा भाव कळत होता. त्यासाठी  चित्रकाराने केलेल्या अभ्यासाची व्याप्ती दिसून येत होती. एक कलाकार किती तन्मयतेने चित्रं काढतो आणि तेवढ्याच लिनतेने त्याचं सादरीकरण करतो. सगळेजण मंत्रमुग्ध होवून ऎकत होते, पहात होते. नंतर दाखवलेल्या चित्रफितीत वासुदेव कामतानी वाजवलेली बासरी त्यांच ‘वासुदेव’ हे नाव किती सार्थ आहे त्याच द्योतक होत. एकूण काय त्या जवळजवळ बारा तासात आत्मानंदी टाळी लागली होती खरी.                                                                 





13 November, 2015

बॉडी लॅंग्वेज


मराठी, हिंदी, इंग्रजी आशा भाषा (लॅंग्वेज) बोलल्यावर कित्येकवेळा समोरच्याला त्याचा अर्थबोध होतोच असं नाही, पण सद्ध्या माझ्याशी ज्या भाषेत हा माणूस बोलतोय ती भाषा कुणाही भाषीक इसमाला (किंवा इसमीला) सहज समजेल यात शंकाच नाही. या माणसाच्या शरिरात किती नटबोल्ट किंवा खटके असतील देव जाणे. सारखा आपला वेगवेगळ्या तर्‍हेवाईक मुद्रा करून हा आपलं म्हणणं मांडत असतो. दरवाजा उघडला हे दाखवताना प्रत्यंचा ओढल्याचा अविर्भाव असतो तर,  वायर सोडली हे सांगताना तो   धनुष्यातून जणू बाणच सोडतो. ड्रॉवरमध्ये हात अडकेल हे सांगताना तो कासाराने बांगड्या भरल्याचा देखावा उभा करतो, तर मागे जायला होईल असं म्हणताना रंगमंचावरचा पडदा ओढल्यासारखा मागे वाकतो. हा खरंच तिथे रंगमंचावरच हवा होता. त्या सोफ्यावर बसून बघा किती रिलॅक्स वाटतं हे पटवताना याने सुखीमाणसाचा सदरा घालून आल्याचा भास होतो.

गेल्या कित्येक वर्षात असा कलाकार रंगमंचाविना पहायला मिळाला नाव्हता. त्या दिवशी अगदी तळाचा ड्राव्हर असा उघडला जाईल हे दाखवताना तो असा काय वाकला आणि मागे सरला कि मला वाटलं एखादा हत्ती नदीकाठी हळूवार पाय रोवून प्रवाहातलं पाणी पितोय. ....इथे ग्रानाईटवर आरामात पडून संगीत ऎकता येईल असं म्हणता म्हणता तो चक्क आडवा झाला. डुलकी लागली  तर आपटायला होईल असं म्हणत असताना त्याने एक हिसका मारला आणि मग म्हणाला इथे मोल्डींगपट्टी लावतो.  रस्त्याने चालताना असे काही हावभाव असतात की बाबुराव जणू दिवाणखान्यात उभे राहून गप्पा हाणताहेत.  अंगावर पडेल असं दाखवताना हा जणू अदनान सामी बनतो, अहो कुणालाही बघून वाटेल की ‘हमको भी लिप्ट करादो’ म्हणतोय. वस्तू इथून उचलली, इथे ठेवली असं त्याने म्हटल्यावर मला बापू वाणी भजी अलगद तेलात सोडयचा त्याची आठवण झाली. एखादा कसलेला नर्तकही एवढी सफाईदार हालचाल करू शकेल की नाही अशी शंका यावी. मोबाईलवरचं बोलणं संपवताना तो एवढ्यावेळा बाय.. बाय अशा अर्थाचं पुटपुटतो की मला शंका यायला लागते.... हा मोबाईल कंपनीचा एजंट आहे की काय, थांबता थांबत नाही तो; आता मी सावध असतो; पटकन फोन कट करतो, काय सांगाव उद्या बाय.. बाय नंतर बाबू.. बाबू म्हणेल. 

टिव्हीच्याखाली बसायची बैठक नको असं सांगताना त्याने हवेतच अशी काय माकडबैठक मारली की मी लोटपोट होता होता वाचलो. (वाचलो म्हणजे, जर माझं हसू बाहेर फुटलं असतं तर त्याने हे काम सोडून द्यायला मागे पुढे पाहिलं नसतं.) मात्र समोरच्या नियोजित बैठक व्यवस्थेवर तो बेहद्द खुश होता, “इथे कसं छान वाटेल” असं म्हणत त्याने शेषशायी विष्णूचं रुप धारण केलं. त्याच्या त्या रुपाला मी मनोमन साष्टांग प्रणीपात केला. हे वर केलं, ते खाली केलं असं म्हणत असताना तो जणू वेटलिप्टींग करतोय की काय असं वाटत रहातं.   
कामाला थोडा उशीरच होतो आहे अशी नाराजी मी प्रगट केल्यावर त्याचं रुप पार पालटून गेलं. कितीतरी वेळ फक्त हातवारे करीत घालवल्यावर मग म्हणाला “आपलं चालेंज आहे, एवढं फास्ट काम कुणी करून दिलं तर” आणि मग हातवार्‍यांबरोबर पायवारेही सुरू झाले.                   

स्टडी टेबलला कि बोर्डचा ड्राव्हर लावला की काय होणार हे सांगताना तो हवेतल्या खुर्चीवर बसला आणि त्याने सफाईदारपणे बाजाची पेटी वाजवली, जणू काय डबलबारीचं भजनच चाललय. कि बोर्डवर असा कुणाचाच हात चालला नसेल महाराजा! 
        
कार्य स्थळावरचा त्याचा पदन्यास तर हा एव्हाना माझ्यासाठी खरोखर न चुकवण्यासारखा भाग झालाय, इतका की हा निघून गेल्यावर मी कुणाकडे बघू असं होवून जाईल.

पण एवढ्या सढळ हालचाली करणारा हा विरार लोकल मध्ये कसा उभा राहू शकतो? तिथे त्याला बॉडी हालवायलासुद्धा मिळत नसणार, मग तीची 'लॅंग्वेज' ही दूर की बार. तो तिथे काय करत असेल? खरच कोडं आहे.      
      

                       

12 November, 2015

अब जीना है


मंजिल इतनी दूर नही थी
जब मै निकला पाने को
हर चौबारा मुझे बुलाता  
मन नही करता जाने को ।

हर बार लडना और झगडना
खुदसे पंगा लेना था
फिक्र नही दुनियादारी की  
किसीसे कुछ नही पाना था ।

किया बसेरा जिस डालीपर
फिर छुटा उसका साथ
उपरवाली मंजिलपर जा बैठा
नही रहा कभी खाली हाथ ।

यह तो मिलनाही था दोस्तो
समय बित गया हातोहाथ
अब जीना है, जो भी बचता
और न करुंगा कोई बात।

नरेंद्र प्रभू

०८/११/२०१५ 

29 September, 2015

या वाटेवर, त्या वाटेवर


पारल्यातला दोन वर्षांचा निसर्ग सहवास संपवून आता जायचा दिवस जवळ येतोय, इथल्या निसर्गाची आठवण निरंतर येत राहील.

प्राजक्ताची फुले सुगंधी
इथल्या वाटांवरची धुंदी
कधीच सरला इथला वावर
या वाटेवर या वाटेवर

धुळीत मस्ती करीती चिमण्या
डौलाने जणू फिरती राण्या
चालेल उद्याही खेळ बरोबर
या वाटेवर या वाटेवर

तारेवर झोके घेते मैना
मधूनच उडती राघू राना
मारून भरारी लांब दूरवर
या वाटेवर या वाटेवर

शीळ सुरांची मंजूळ मैफिल
इथे गातसे सुरेल कोकीळ
बहरेल प्रेम ते आम्रतरूवर
या वाटेवर या वाटेवर

आभाळाचा रंग निराळा
असतो इथल्या कितीक वेळा
धावेल उद्याही मेघ धरेवर
या वाटेवर या वाटेवर

येईल चिमणा पक्षी अवचीत
तरुशिखरावर बसेल ऎटीत
हसून करीन मी त्याचे स्वागत
त्या वाटेवर, त्या वाटेवर

नरेंद्र प्रभू

२७-०९-२०१५  

27 September, 2015

निरोप


निरोप...., ही गोष्टच संमिश्र भावभावनांनी ओथंबलेली असते. आपल्या प्रिय जनांचा निरोप घेताना होणारी घालमेल, गावचा निरोप घेताना तो पार, वड-पिंपळ, वळणा-वळणाचा रस्ता, स्वर्गरोहणासाठी असल्या सारख्या रामेश्वराच्या पायर्‍या, खळाळणारे ओहळ, खेळवणारं मंदीर, भावईचा तलाव, आणि कुडाळचा स्टॅँडही. या सगळ्यानीच केव्हाना केव्हा मन हेलावून टाकलं आहे. पण पुढे जाताना या सर्वांचाच कधीना कधी निरोप हा घ्यावाच लागतो. असे दोन डोळ्यात वेगवेगळे भाव आणणारे अनेक निरोप आजपर्यंत घ्यावे लागले.

ही मनात घर करून राहिलेली घरं हा हळू-हळू आनंदाचा ठेवा होवून जातात, पुन:प्रत्ययाचा आनंद देत रहातात. हा देवचाफा मला कित्येकवेळा माझ्या गावी घेवून गेलाय, मारुतीच्या देवळासभोवती जेव्हा पालखी फिरायची तेव्हा गुलालासारखा सुगंध देणारे याचे वडीलबंधू बालपणी मला भेटायचे त्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी यानेच पुन्हा ताज्या केल्या. आईच्या हातची बाई रेगेने दिलेल्या नीरफणसाची भाजी इथल्या नीरफणसाने पुन्हा भरवली. अमृताच्या बिजातून उगवलेले  इथले प्राजक्त तर आजवरच्या सगळ्या वाटांवरच्या प्राजक्ताचं संमेलन मनात भरवतात. इथली रातराणी कोल्हापूरच्या राजवाड्यातली सायंकाळ पुन्हा जिवंत करते. मुंबईसारख्या शहरात, निवासी वस्यात अभावाने आढळणारी इवलीशी रानफुलं हात हालवताहेत. इथलं आभाळही वेगळं, गच्चीवर धाव घ्यायला लावणारं.              
हिमालयाच्या कुशीत विसावलेलं ‘मनाली’ असो की नवभूमी असलेलं ‘लडाख’, किन्नौर व्हाली असो की अरूणाचलचं ‘तवांग’ या सागळ्यांचा निरोप घेताना पुन्हा येईन अशी आस मनात असते. पण काही ठिकाणं अशी असतात की ती जवळ असली तरी आपण पुन्हा तिथे जावून तेच विसाव्याचे क्षण शोधू शकत नाही. हे ठिकाण तसं आहे. आता निरोप घेतल्यावर पुन्हा ती खिडकी, तिच्यातून डोकावणारा मी किंवा तो गुलमोहर, पक्षांचा किलबिलाट, ती माझी मैत्रिण झालेली खारूताई,  कैर्‍या देणारे हे आम्रतरू, ही सगळीच झाडं पुन्हा भेटणार नाहीत. हळद्या, तांबट, चिऊताई, सनबर्ड, राघू, मैना, धोबी, नाचण, कोकीळ-कोकीळा असे कितीतरी पक्षी पुन्हा कुठे ना कुठे दिसतील तेव्हा पुन्हा मला इथली आठवण येईल. पहाटेचा किंवा सकाळचा चिवचिवाट तर अप्रतिम. हे मधूर संगीत ऎकायला पुन्हा इथे येणे नाही. या सगळ्यांनी खुप शिकवलं.                  

शाळेतले आवडते शिक्षक नाही का असेच मागे ठेवून आपण पुढच्या वर्गात जातो. पुढे गेलंच पाहिजे, आठवणींचा हा पुलिंदा बरोबर घेवून.  

22 September, 2015

भिकेचे डोहाळे आतातरी पुरे


“अंथरूण पाहून पाय पसरावेत’, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, अशा म्हणी आणि ‘नको देवू पैसा अडका’ असली गाणी यांवरच मराठी पिंड पोसला गेला आहे. एवढंच नव्हे तर स्वत: धनाढ्यांच्या थैलीकडे डोळे लावून बसलेले मराठी राजकारणीही मराठी माणसाला मात्र वडापाव आणि चपराशाची नोकरी यापुढे न्यायला तयार नाहीत. पैसा हा मराठी माणसाचाही ‘लोकाधिकार; आहे हे मराठी माणसाला कळेल तो सुदि. लोकसत्ताच्या अर्थवृतांतमध्ये जयंत विद्वांस यांचा म्हणे, आपण अर्थ साक्षर!’ हा मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. आपण तो जरूर वाचावा.

पारल्याच्या लोकमान्य सेवा संघात चालवल्या जाणार्‍या Investment Guidance Cell ला एकदा तरी भेट द्या. बचतीचे धडे आतातरी गिरवा.       
                
लोकसत्ताच्या अर्थवृतांतमधला लेख:  

मराठी माणसांमध्ये पूर्वापार श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. बुद्धिमत्ता व कष्ट याद्वारे आíथक सुबत्ता येईल व ती मराठी समाजाला पतदेईल. मात्र यासाठी आपल्या पुढच्या पिढय़ांना प्रयत्नपूर्वक आíथक साक्षर बनविले गेले पाहिजे.
आपल्यावर पिढय़ान् पिढय़ा साक्षरतेचे संस्कार झाले आहेत. परंतु आíथक साक्षरता आपल्या डीएनएमध्ये आलेलीच नाही. त्यामुळेच मराठी माणसांमध्ये श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. या आíथक निरक्षरतेपायी मराठी समाज म्हणून आपल्याला पतनाही.

वैयक्तिक आíथक पत या बद्दल मी म्हणत नसून संपूर्ण मराठी समाजाची पत म्हणत आहे. ही पत असेल तर समाजाच्या उन्नतीसाठी किंवा मराठी समाजासाठी खूप काही करता येणे शक्य असते. साधे उदाहरण बघा, महाराष्ट्रात ज्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण देता येईल असे असंख्य समाजसेवक आहेत परंतु त्यांना पद्मश्रीवर समाधान मानावे लागते किंवा पद्मश्रीसुद्धा मिळालेली नाही. याचे कारण आपली दिल्ली लॉबी नाही(पत नाही). आपली जी काही थोडीफार मराठी म्हणून पत असते ती आपण रोजच्या दिवसांत तोंडात पोळ्या कोंबून घालवून बसतो.

हे सर्व आज आठवण्याचे कारण? पर्युषणकाळांत मांस विक्रीवर घातलेली बंदी. ही बंदी जैन लोकांची आíथक पतदाखवते. आज महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास तेरा कोटी आहे. त्यापकी एक शतांशसुद्धा जैन नाहीत पण त्यांच्यासाठी पर्युषणकाळात मांस विक्रीवर बंदी. याच काळात आपला गणपती उत्सव असतो, आणि बहुसंख्य समाज गौरीला नवेद्य मासांहारी दाखवत असतो, तरीही बंदी!
आज सर्व पंचतारांकित हॉटेलात जैन पदार्थ मिळतात. पंचतारांकित हॉटेलात भरलेल्या मोठय़ा परिषदात जेवणाची सोय जैन पद्धतीत असतेच असते. समजा नसेल, तर ‘‘जैन फूड नहीं है क्या?’’ म्हटल्याबरोबर दोन माणसांसाठी सुद्धा जैन जेवणाची सोय केली जाते. हे सर्व त्यांच्या आíथक शक्तीमुळे होते. पुरणाची पोळी मात्र कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात मिळत नाही.

या आíथक सुबत्तेपायी जैन समाजाने काय काय मिळविले, मिळवीत आहेत याची उदारहणांनाही तोटा नाही. काही महिन्यांपूर्वी एका मोठय़ा उद्योगपतीने सांगितले होते की एका राजकीय पक्षाचे दुकान आम्हीच चालवतो. पण वस्तुस्थिती अशी आहे आज हा जैन समाज सर्वच दुकाने चालवत आहे. हे सर्व आíथक सुबत्तेद्वारे चालू आहे. या उलट आपली आíथक सुबत्ता काहीही नाही व वाचाळपणा मात्र सुरू आहे. परिणाम चार पकी तीन दुकानदारांची तोंडे बंद झाली आणि चौथ्यासाठी आता हा विषय संपलेला आहे.

ज्यावेळेस आपण समाजाची पत किंवा समाजाची श्रीमंती म्हणतो त्यावेळेस त्या समाजातील प्रतिष्ठित चारशे-पाचशे अब्जाधीश डोळ्यांसमोर येतात, जे आपल्या समाजासाठी आपली पत उभी करतात. अशी चार-पाचशे मराठी माणसे संपूर्ण महाराष्ट्रात दिसतात का? मग तुमची दिल्लीत काय तुमच्या राजधानीतसुद्धा पत राहिल का? यासाठी ‘‘कानाखाली’’ची भाषा उपयोगाची नसते. तर त्यांच्या शस्त्राला (श्रीमंतीला) तुमच्या त्याच शस्त्राने (श्रीमंतीने) उत्तर द्यायचे असते.

जैन समाज म्हटला की आपल्यासमोर फक्त गुजराती समाज येतो. मारवाडी जैन, संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकात विखुरलेला, स्थानिक भाषा आणि आडनावे धारण केलेला जैन समाज आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आज मुंबईतील व्यापार प्रामुख्याने जैन समाजाच्या ताब्यात आहे, (व कष्टकरी व्यावसायिक उत्तरेतील आहेत.) म्हणजे नोकरी करणारे जैन नाहीत असे नाहीत. ते ज्या ठिकाणी आहेत तेथे वरचढच आहेत. वॉरेन बफेचा उत्तराधिकारी जैन आहे तर भारतातला सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन आहे.( याच्या नावावर मुंबईत दोन घरे व दोन भाडय़ाने दिलेली दुकाने आहेत.)
जैन समाजाने मिळवलेली श्रीमंती त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानामुळे व कष्टामुळे मिळवलेली आहे. मुंबईतील एल अँड टी कंपनीला पूर्वी चेष्टेत लार्सवानी टुब्रमणीयम म्हणत असत. तिथे मराठी टक्का वाढला पण कष्ट करण्याची वृत्ती नसल्याने पवईची मोक्याची जागा सोडून कारखाना केरळ व गुजरातमध्ये हलवणे चालू झाले.

यासाठी उपाय काय? आपल्या पुढच्या पिढय़ांना आíथक साक्षर बनवू या. बुद्धिमत्ता व कष्ट याद्वारे आíथक सुबत्ता येईल व ती मराठी समाजाला पतदेईल. मुलांना लहानपणापासून आíथक शिक्षण द्या. आपल्या मागच्या पिढय़ांमधील हा भाग बदलू या. हे आíथक शिक्षण कोणत्याही शाळा कॉलेजांत मिळत नाही, याचे क्लासेस नाहीत. आपल्या मुलांसाठी तुम्हीच वेळ बाजूला काढा व हे शिक्षण द्या.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज् मार्केट (सेबीचा एक उपक्रम) मार्फत शाळा कॉलेजमध्ये आíथक विषय शिकवण्यासाठी अभ्यासक्रम बनविला गेला आहे. पाचवी/सहावीपासून हा विषय शिकवता येतो. पुस्तके फुकट दिली जातात. शिक्षकांना शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सेबी, रिझव्‍‌र्ह बँक, आयआरडीए, शेअर बाजार सर्वानी काही हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करून ठेवली आहे. पण शिक्षक हा विषय, शिकवण्यास तयार नाहीत. काही शाळांमध्ये शिक्षकांजवळ बोलल्यावर कळले, ‘‘चार-चार महिने उशिराने पगार मिळतो, त्यात हे नवीन झेंगट आमच्या मागे कशाला?’’

नव्याने निवडून आलेल्या शिक्षणमंत्र्यांनाही भेटलो. या विषयाची दोन पुस्तके व पत्र दिले. एक महिन्यानंतर एका ओळीचे उत्तर आले – ‘‘आपला अर्थ शिक्षणाबाबतचा विचार अभ्यास समितीसमोर ठेवण्यात येईल.’’ धन्यवाद.’’

म्हणजे महाराष्ट्रात नव्याने १५-२० शेरेगर, शेळ्या-मेंढय़ा पाळणारे, सागाची झाडे लावणारे येऊन जनतेला फसवत नाहीत तोपर्यंत हा विषय आमच्या अजेंडय़ावर नाही.

ज्ञानगंगा दारात येऊन उभी आहे. त्यासाठी पसा, शैक्षणिक पुस्तके सर्व तयार आहे; पण तिला घरात घ्यायला कोणी तयार नाही. मग यावर उपाय काय? सर्व पालकांनी एकत्र येऊन, पालक सभेमध्ये हा विषय मांडणे गरजेचे आहे. आज आपण मुलांना सर्व प्रकारचे क्लासेस लावतो. शिक्षकाऐवजी आपण हा विषय शिकून घेऊन (ऐच्छिक विषय म्हणून) गटागटाने आपल्या पाल्याच्या वर्गातील सर्व मुलांना रविवार किंवा सुटीच्या दिवशी शिकवणे गरजेचे आहे. घरातील आजी-आजोबा या उपक्रमात मदत करू शकतात. असे पालक किंवा शाळा तयार झाल्यास त्यांना सर्वप्रकारे मदत करण्यास / मिळवून देण्यास मी तयार आहे. चला आपल्या पुढच्या पिढीला ही पतयेण्यासाठी आजपासून झटूया.
लेखक सेबीद्वारा नोंदणीकृत सल्लागार आहेत.

sebiregisteredadvisor@gmail.com

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates