18 March, 2010

जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता


काहीवेळा खुप बोलण्या पेक्षा एखादी कृतीच बरच काही सांगून जाते. समर्थानी म्हटलच आहे क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या बाबतीत बरच काही बोललं जातं, लिहिलं जातं पण फारशी कृती होताना दिसत नाही या पार्श्वभुमीवर गंगाजल नॅचर फाउंडेशन ची जन जोडो गंगा यात्रा आपल्याला बरच काही सांगून जाते. कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता गेली कित्येक वर्षं श्री. विजय मुडशिंगीकर गंगा शुद्धीकरणाच्या ध्यासाने कार्यरत आहेत. गंगाजल हे त्यांचं प्रदर्शन मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात आजपर्यंत लागलं आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून गंगेसारख्या पवित्र नदीचं झालेलं ओंगळवाणं रुप जन जागृतीसाठी लोकांसमोर आणणं हा एकचं ध्यास त्यानी घेतला आहे. गंगा नदीला जर तीचं गतवैभव प्राप्तकरून द्यायचं असेल तर तीच्याकाठी असलेल्या गावा-गावात, शहरा-शहरात गेलं पाहीजे. तीथल्या जनतेला गंगेच्या शुद्धीकरणाचं महत्व पटवून दिलं पाहीजे. वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा मुळातच उपाय केला पाहीजे हे ओळखून गंगाजल नॅचर फाउंडेशन ने  जन जोडो गंगा यात्रा हे अभियान हाती घेतलं होतं.

मुडशिंगीकर यांच्याबरोबरच मुंबईतील सुरेंद्र मिश्रा, मच्छिंद्र पाटील, संतोष मरगज, माहितीपट निर्माते उन्मेश अमृते, मुंबई दूरदर्शनचे केवल नागवेकर हेही या अभियानात सहभागी झाले होते. गंगोत्री जवळील मुखवा, उत्तरकाशी, ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद,  बनारस,  पटना, कोलकाता, गंगासागर असा हा प्रदीर्घ पल्ला पार करून नुकतीच गंगासागर येथे ही यात्रा यशश्वीपणे पुर्ण झाली. सामान्य लोक, विद्यार्थी, साधू, जवान अशा अनेकांपर्यंत हा संदेश पोहोचला. एकेका ठिकाणी चार-चार दिवस थांबण्याचा स्थानिक जनतेचा आग्रह होता पण निधीअभावी तसं करणं शक्य झालं नाही. पण हाती घेतलेलं काम पुर्ण झालं, पंधरा दिवस का होईना गंगा शुद्धीकरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवता आला. स्वर्गीय गंगा आपलं विलोभनीय रुप घेवून पृथ्वीवर आली. इथल्या मातीचं तीने सोनं केलं. जनतेची भरभराट केली. त्याच्या बदल्यात आपण मात्र तीची विटंबना केली. आतातरी जागं होवूया. पाणी आणि त्याचं महत्व यावर अजून किती कंठसोस करावा लागणार हा आजचा खरा प्रश्न आहे.      

नरेंद्र प्रभू
        


16 March, 2010

डॉ. किबे



कोणत्याही सहलीवर असताना ज्या हॉटेल किंवा निवासस्थानी आपण राहतो ते आपलं तात्पुर्तं का होईना पण घरच असतं. ज्या खोलीत आपण राहात असतो तिथे बरोबरची व्यक्ती आधीपासून ओळखीची किंवा नात्यातली असली तर प्रश्नच नसतो पण परक्या माणसाबरोबर वास्तव्याची वेळ आली तर एकमेकांशी सूर जुळतीलच असं सांगता येत नाही. हल्ली तर दोन व्यक्तींसाठी असलेल्या खोलीत पलंगसुद्धा एकच असतो आणि त्याच्यावर पांघरूण पण एकच असतं. दोघांची देहयष्टी, झोपण्याचे प्रकार, झोपल्यानंतरचे प्रकार, आकार आणि आवाज या मुळे बर्‍याच वेळा दोघांची किंवा किमान एकाची झोपमोड होण्याची शक्यता असते. सहलीच्या व्यस्त दिनक्रमात प्रातर्विधी, आंघोळीत जाणारा वेळ यामुळेही अडचण होवू शकते. बाकी व्यसनं, सवयी असे अनेक घटक एकमेकांमधील संबंध कसे असतील ते ठरवतात. या झाल्या भौतिक गोष्टी पण स्वभाव आणि आचार विचार यामुळेही गोंधळ होवू शकतो.

नुकत्याच झालेल्या अंदमान सहलीदरम्यान डॉ. अरवींद किबेंचा मी रुमपार्टनर होतो. चेन्नईच्या हॉटेल मध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली आणि पुन्हा परतीच्या वाटेवर  चेन्नई विमानतळावर त्यांचा निरोप घेताना खुप जुन्या ओळखीच्या सहृदयाची ताटातूट होत आहे अशी भावना निर्माण झाली. तसे डॉ. किबे ऎशी वर्षाचे, वयाने, पेशाने, ज्ञानाने आणि सर्वार्थानेच मोठे असलेल्या डॉ. किबेंनी मात्र ते मला त्या सहा दिवसांच्या सहवासात कधी जाणवू दिलं नाही. रुममध्ये असताना अनेक विषयांवर चर्चा झाल्या, आध्यात्मावर तर रोजच त्यांचे मौलिक विचार ऎकायला मिळत. वैद्यकीय व्यवसाय, राजकारण, खेळ, पर्य़टन, योग आणि अध्यात्म सर्वच विषयांवर त्यांचा अभ्यास आणि आवड याचा मला प्रत्यय आला. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेलं द्विशतक त्यांनी एखाद्या लहानमुलाच्या उत्साहाने साजरं केलं आणि हॅवलॉकला रात्रीच्या निवांत वेळी सागर किनारी तपस्व्यासारखी ध्यानधारणा केली. या वयातही असं समजून, समरसून जगणं आणि छोट्या-छोट्या तर नाहीच पण जगाच्या द्रुष्टीने मोठ्या दुःखाचाही बाऊ न करता ते वर्तमान कसा जगत आहेत हे जवळून पाहणं हा खरच एक सोहळा होता.                           

15 March, 2010

रंग कोणते खरे?



 
रंगावरती रंग घासूनी
पेल्यावरती पेला
सरली रजनी, सरली मदिरा
पायांमध्ये झेला

ती कुठे उर्वशी, कुठली रंभा
काहीच आकलेना
गालावरचे रंग उडाले
दर्पणी पहावेना

रंग उषेचे क्षितिजावरती
अधीर अंगणी ललना
हिंदोळ्यावर खिदळत होत्या
सांजपर्‍या सुखवदना

ते रंग खरे की हे रंग खरे?
संशय का मनी आला?
दिनमणी उदया अस्ता येता
संभ्रम सरूनी गेला

नरेन्द्र प्रभू

गुढी उभारा उत्साहाने


वाढती महागाई आणि सर्वार्थाने बदलणारं जग यात सामान्य मराठी माणूस भांबावून गेलेला दिसतोय. या समाजाला सामर्थपणे विकासाच्या दिशेने नेणारं नेतृत्व आजतरी राजकिय पटलावर दिसत नाही. सबळ आर्थिक शक्ती पाठीशी उभी असल्याशीवाय  केवळ अस्मिता तग धरू शकणार नाही. मुंबईबाहेर केव्हाच फेकला गेलेला मराठी माणूस रोजच्या लोकलच्या प्रवासातच आपलं अर्धंअधिक आयुष्य घालवत असल्याने गलितगात्र झालेला आहे. मराठी इतिहासाचं, थोर परंपरेचं कौतूक आहे पण त्यावर पोट भरता येत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाय काय? काय करावं म्हणजे यातून सुटका होईल? निदान पुढची पिढी तरी वाचेल? विचारांची सुस्पष्ट  दिशा देणारा एक लेख आजच्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाला आहे. कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी मांडलेले हे विचार आपणाला नक्कीच प्रेरणा देतील. जरूर वाचा ..तरच उद्योजकतेत मराठी पाऊलं पडतील पुढे!

उद्या गुढीपाडवा, आजच उभारलेली ही विचारांची गुढी आपणा सर्वांना उध्याची गुढी उभारायला नवीन उत्साह देईल यात शंका नाही.   
      

14 March, 2010

गर्दीतले देवदूत


रोज मरे त्याला कोण रडे अशी म्हण आहे. खरं तर ती रोज रडगाणं गाणार्‍याकडे कुणी लक्ष देत नाही अशाअर्थी आहे. पण आपल्या मुंबईत लोकलखाली रोजच कुणी ना क़ुणी येत असतं आणि वर्दीतल्या माणसांच्या बेफिकीरीमुळे त्यातल्या बहुतेकजणांचे प्राण जातात. नुकताच असाच एक तरूण छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अपघातग्रस्त स्थितीत पडून होता. आजूबाजूची गर्दी त्याला पाहून हळहळत होती पण त्याच्या मदतीला नेहमीप्रमाणे कुणीच येत नव्हतं. वर्दीवाले आले नाहीत पण त्या गर्दीत असलेल्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्या तरूणाचे वडील येईपर्यंत थांबून त्या जखमी तरूणाला धीर तर दिलाच पण आपल्या मुलाला पाहून मूर्च्छित पडलेल्या वडीलांना आधाराचा हात दिला.

काळाचौकी तेथे रहाणारा अनिकेष कदम हा तरूण त्या दिवशी धावत्या लोकलमधून धक्कालागून पडला होता आणि त्याला तत्काळ मदत करणारे युवक होते जे.जे. कला महाविद्यालयात शिकणारे सुशांत वायदांडे, कुणाल पाटील, चेतन नेहते, मयूर गुलदगड आणि धवल मंगरूळकर. या सर्व युवकांचं अभिनंदन आणि त्यांच्या संवेदनशीलतेला सलाम ! तसच अशी सकारात्मक बातमी देणार्‍या लोकसत्ताच्या कैलास कोरडे यांना धन्यवाद.       

09 March, 2010

स्त्री शक्ती




अतीशय कठीण परिस्थीतीतून चातुर्याने मार्ग काढून कुटुंबाचं पर्यायाने समाजाचं जगणं सुकर करणार्‍या स्त्रीया आपण रोजच पहातो. नैसर्गिक मर्यादांमुळे अबला म्हणून गणला गेलेला स्त्री वर्ग आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर गगनाला गवसणी घालताना दिसतो. कालच मुंबई ते न्युयॉर्क या एअर इंडीयाच्या विमान प्रवासात पायलट पासून सर्व विमान कर्मचारी आणि प्रवाशी फक्त महिला होत्या, हा विक्रमही महिलांनी करून दाखवला. एव्हरेस्ट सर करणारी कृष्णा पाटिल असूदे नाहीतर अंटार्टिकावर १५ महिने राहून आलेल्या डॉ. देवयानी बोरोले असूदे स्त्री शक्तीचा हा वावर आता आपल्याला सर्वच क्षेत्रात दिसतो आहे. आज पर्यंत पडद्याआड असलेली किंवा जाणीवपुर्वक ठेवलेली ही शक्ती आता खर्‍या अर्थाने कामी येते आहे.

या पार्श्वभुमीवर गेली १४ वर्षं संसदेत अडकलेलं महिला आरक्षण विधेयक काल पास होईल असं वाटत असतानाच बैल बाजाराला लाजवेल एवढ्या उन्मत्तपणे त्याला विरोध करण्यात आला. लालू , मुलायम, शरद या यादवांनी आणि त्यांच्या बगलबच्चांनी दांडगाई करून महिला आरक्षण विधेयक रोखलं. याच लालूने राबडीदेवीच्या खुर्चीआड राहून राज्य केलं तेव्हा त्याला लाज वाटली नव्हती हे विशेष. आज सदर विधेयक पास होईल अशी आशा करूया नव्हे तसे झाले पाहिजे.              

05 March, 2010

थिंक महाराष्ट्र


Logoआज थिंक महाराष्ट्र (thinkmaharashtra.com) हे संकेतस्थळ इंटरनेटवर अधिकृतपणे अवतीर्ण होत आहे. जेष्ठ पत्रकार आणि गंथालीचे श्री. दिनकर गांगल यांच्या नेतृत्वाखाली  हे संकेतस्थळ तयार झाले आहे. महाराष्टीय समाजातील चांगुलपणा आणि गुणवत्ता यांचे नेटवर्कींग करावे आणि त्याद्वारे समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे यासाठी गेले काही महिने काही तरूण व अनुभवी ज्येष्ठ मंडळी एकत्र येवून विचारविनिमय करत होती त्यातून थिंक महाराष्ट्र डॉट ऑर्ग या प्रकल्पाचा जन्म झालेला आहे.

आज शुक्रवार ५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबई येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात थिंक महाराष्ट्र डॉट ऑर्ग इंटरनेटवर अवतरणार आहे. याच कार्यक्रमात ब्लॉग, वेब माध्यम आणि मराठी या विषयावर एक परिसंवाद होणार असून त्यात संजीव लाटकर, अतुल तुळशीबागवाले, माधव शिरवळकर, रामदास बिवलकर आणि तात्या अभ्यंकर सहभागी होणार आहेत.   

जीएनएफ ची ‘जन जोडो गंगा यात्रा’

गंगाजल नॅचर फाउंडेशन ची जन जोडो गंगा यात्रा आज गंगोत्रीजवळील मुखवा या ठिकाणाहून सुरू होते आहे. गेली आठ दहा वर्ष गंगा नदी आणि तीचे शुद्धीकरण हा एकच ध्यास घेतलेल्या विजय मुडशिंगीकर यांच्या नेतृत्वखालील सात जणांचा एक चमू दोन दिवसांपुर्वीच मुंबईहून निघाला असून, मुखव्यापासून अनेक स्थानिक गंगाप्रेमी नागरीक या यात्रेत सहभागी होणार आहेत. गेली पाच वर्ष श्री. मुडशिंगीकरांनी गंगेचं  सुंदर त्याचबरोबर विद्रूप झालेलं रुप छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातच्या विविध भागात मांडलेलं आसून आता गोमुख ते गंगासागर असे २५२५ किलोमीटर अंतर कापून गंगाकाठच्या गांवा-गावात आणि शहरांमधून जनजागृती करून गंगेच्या प्रदूषणाला आळा बसावा म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत.


यापुर्वी विजय मुडशिंगीकरांनी गंगेच्या किनारी तीसपेक्षा जास्तवेळा जावून छायाचित्र काढली आहेत, त्या त्यांच्या अनुभवावर आधारीत पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठीच्या आणखी एका प्रयत्नाला यश लाभो अशी इश्वर चरणी प्रार्थना.


  

02 March, 2010

मराठी ग्लोबल होतेय...!


दिनकर गांगल हे व्यक्तीमत्व गेली पस्तीस वर्ष मराठी मनाला प्रबोधनाच्या वाटेवर साथ करत आहे.गंथालीने अनेक लेखक कवी महाराष्ट्राला माहित करून दिले. अनेकाना लिहायला उद्यूक्त केलं. ग्रंथाली पस्तीस वर्षाची झाली आणि गांगल सत्तर. गांगल ग्रंथालीच्या विश्वस्त पदावरून निवृत्त झाले. असं असलं तरी त्यांचा उत्साहं तसूभरही कमी झालेला नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे www.thinkmaharashtra.in हे संकेत स्थळं. पुस्तक रुपाने आता पर्यंत बंदीस्त असलेला खजीना आता जगभरातील मराठी वाचकाना हळूहळू खुला होत जाईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्राचे e-पर्व ही लोकसत्ता मधली बातमीच वाचा.


01 March, 2010

हॅवलॉकची होळी


आज धुळवड, मुंबईत आलो तेव्हा रंगाची उधळण जरा कमी कमी होत होती पण माझ्या मनात कालच्या हॅवलॉकच्या होळीची आठवण अजून ताजी आहे. हॅवलॉक हे बेट अंदमान निकोबार बेट समुहांपैकी एक. पोर्टब्लेअर पासून दूर अंतरावर असलेलं एक अप्रतिम बेट. भारताच्या मुख्य भुमी पासून दूर. तिथे एक दिवस आधीच होळी साजरी केली जाते. त्या मुळे काल तिथे रंग उधळले जात होते. देशी विदेशी नागरीक रंगात कसे न्हावून गेले होते बघा.



LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates