29 September, 2010

सिंधू व्हाली – लडाख

सिंधू घाट

आज सर्वात प्रथम आम्ही सिंधु नदीच्या घाटावर जाणार होतो. लेह शहर मागे पडलं तसं हमरस्त्याच्या दुतर्फा छोट्या छोट्या डोंगरांच्या राशी ओतून ठेवाव्यात तसं दिसत होतं. वाटेतच बौद्ध धर्माचे गुरू दलाई लामांचं निवासस्थान लागलं. मध्येच प्रेयींग व्हील्स दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही सिंधू नदी जवळ पोहोचलो. सिंधू नदिचा बहूतांश भाग फाळणीनंतर आता पाकिस्तानात असला तरी सुमारे तीनशे किलोमीटर एवढा नदीचा भाग हा आजही भारताच्या जाम्मू-काश्मीर राज्यातून वाहत जावून पुढे तो पाकिस्तानात जातो हे फार थोड्यानाच माहीत असेल. जिच्या केवळ नामोच्चाराने कोट्यावधी भारतीयांच्या मनात पवित्र भाव निर्माण होतात. हिंदू संस्कृती जिच्या काठी रुजली, फोफावली ती वेदांची जननी म्हणजे सिंधू. तीच्या काठावर उभा असताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो. सिंधूवरून हिंदू आणि म्हणून हिंदूस्थान, तसच इंडस वरून इंडीया अशी आपल्या देशाला नावं पडली.  तिबेटमध्ये मानसरोवरनजीक सिन-का-बाव इथे उगम पावून पुढे सिंधू नदी आपल्या भारतात लडाख प्रांतात प्रवेश करते. ऋग्वेदापासून महत्वाच स्थान असलेल्या या नदीच्या काठी कधी काळी आर्यानी वस्ती केली होती. तिच्या काठी आम्ही उभे होतो. खळाळणारं स्वछ, शीतल जल घेवून वहात जाणार्‍या या नदीला पुढे झंस्कार व्हाली मधून वाहत येणारी झंस्कार नदी मिळते आणि नंतर पाकिस्तानात जाते. लडाखमध्ये जी शेती होते ती बहुतांश या नदीच्या पाण्यावर. इतर ठिकाणी गवताची पातीही दिसणार नाही पण या नदीच्याकाठी मात्र हिरवळ दिसते. दरवर्षी जून महीन्यात सिंधू घाटावर सिंधूमहोत्सव साजरा केला जातो. या घाटावरून लडाखच्या सर्वात उंच अशा स्तोक कांगरी शिखराच सुरेख दर्शन होतं. 
मैत्र्येय बुद्धाची मुर्ती

लडाखमध्ये मॉनेस्टीज खुप आहेत आणि त्या पहाण्या सारख्याही आहेत. मॉनेस्टी म्हणजे गुंफा किंवा आपण त्याना बौध विहार सुद्धा म्हणतो. 1430 साली बांधून पुर्ण झालेली थिकसे मॉनेस्टी ही सर्वात उत्तम अशी मॉनेस्टी आहे. त्याची सुरवात अगदी प्रवेशद्वारापासून होते. अत्यंत आकर्षक अशी रंगसंगती आणि कलाकुसर असलेलं हे प्रवेशद्वार आहे. सर्वच मॉनेस्टींची उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. मी त्या ठिकाणी तीन वेळा गेलो पण प्रत्येकवेळी ती तेवढीच साफ होती. रंगही अगदी काल काढल्या सारखा. ही मॉनेस्टी म्हणजे अख्ख गावच आहे. शाळा, बॅंक, निवासस्थानं प्रार्थनामंदीर सगळ एकाच ठिकाणी, 


चार महीन्याचा उन्हाळा सोडल्यास अतीशित असलेल्या या ठिकाणी सगळी  व्यवस्थाजागच्या जागीच व्हावी अशीच त्या मॉनेस्टीची रचना आहे. शंभरेक पायर्‍या चढताना वाटेत एक भलं मोठ प्रेयींग व्हील आहे. त्या नंतर   सुबक अशी मैत्र्येय बुद्धाची मुर्ती पाहून थक्क व्हायला होतं. पंधरा फुट उंच असलेली ही मुर्ती मात्र अलिकडेच म्हणजे 1980 साली उभारण्यात आली. एकदा पेटवल्यावर वर्षभर पेटतील  अशा समया तिथे तेवत होत्या. समोरच्या इमारतीत प्रार्थना चालू होती. आणि बाजूलाच सुंदर रांगोळी काढलेली होती.
 हे सगळं पहात आम्ही त्या इमारतीच्या गच्चीत   गेलो. तेव्हा सिंधू नदीचं पात्र दूर पर्यंत दिसत होतं. लेह कडून येणार्‍या रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती आणि दुसर्‍या बाजूला वैराण जमीन हे दृष्य पहाण्या सारख आहे. एवढा भिन्न किंवा विरोधी चित्र क्वचीतच कुठे पहायला मिळेल. थिकसे गुंफेत आम्ही पोहोचलो तेव्हा अर्ध्यातासात परत फिरु असं वाटलं पण दोन तास कसे संपले ते समजलच नाही. ही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही औडंबर न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे. उत्तम मूर्तीकाम, नक्षीकाम, कमानी, रंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा,
थिकसे मॉनेस्टी
 जेमतेम चार महिने सोडले तर निसर्गाशी दोन हात करत जगणारी ही माणसं पण त्याची कसलीही खूण चेहरर्‍यावर न बाळगणारी, अगदी शांतपणे सगळं चाललेलं, सगळे हसतमुख. प्रार्थना सुध्दा देवासाठी, दिखाव्यासाठी नाही. बुध्दाची भव्य मुर्ती तर बघत रहाण्यासारखी . फोटो काढण्यातच सगळा वेळ जातो खरं तर शांतपणे बसायला हवं होतं. लडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं.  


हेमिस मॉनेस्टी 
त्यानंतर हेमिस ही लडखमधली सर्वात मोठी गुंफा पाहिली. १६३० मध्ये बांधलेली ही गुंफा इतर गुंफांहून वेगळी आहे. इथे त्या मॉनेस्टींच्या आतापर्यंत होवून गेलेल्या सर्व मुख्य लामांचे पुतळे आहेत. इथे असलेला गौतमबुध्दांच्या शिष्याचा पद्मसंभवाचा मोठा पुतळा आहे. या मॉनेस्टींमध्ये भिंतींवर अप्रतिम अशी पेंटींगज् आहेत. 
शे पॅलेस
नंतर पाहीलेला शे पॅलेस ही मुळात  मुळात गोम्पा होती१६५० मध्ये देलडॉन नामग्याल (King Deldon Namgyal) या राजाने या ठिकाणी स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे'सिंगाय नामग्याल' (Singay Namgyal) यांच्या आठवण म्हणून राजवाडा बांधला. या ठिकाणी १८३४ पर्यंत राज निवासस्थान होते. आता सध्या येथे फार कोणी रहत नाही. गोम्पाची काळजी घेणारे काही लामा आहेत.  राजवाडा म्हणण्यासारखे सुद्धा काही राहिलेले नाही येथे. बर्‍याचशा  खोल्या बंदच आहेत. तिथल्या  'शे' चे आकर्षण असलेल्या बुद्ध मूर्तीला भेट द्यायला गेलो. ठिकसेप्रमाणे येथे सुद्धा भली मेठी बुद्ध मूर्ती आहे. तितकी रेखीव नाही पण भव्य निश्चित आहेलेह-लडाखमध्ये जिथे पाहाल तिथे तुम्हाला स्तुप दिसत राहातात.

27 September, 2010

छडी वाजे छम् छम् नको पण...



स्थळ: शासकिय विद्यामंदिर खार, ड्राईंगची परिक्षा देण्यासाठी परिक्षार्थींची झुंबड उडालेली, त्यापेक्षा पालकांचीच जास्त गडबड. अगदी परिक्षेच्या हॉल मध्येच सगळ्यानी गर्दी केलीली असते. पहिली घंटा व्हायची वेळ आली तरी पालक मागे हटायला तयार नाहीत. अखेरपर्यंत आपल्या पाल्ल्याला अनेक सुचना देऊन ते पालक भंडाऊन सोडत होते. आता बाहेर चला किंवा तुम्हीच परिक्षेला बसा असा सुपरव्हीजन करण्यार्‍यांचा आर्त स्वर...... शेवटी कसं बसं सगळ्यांना बाहेर काढलं जातं.

पहिला पेपर वेळेच्या बर्‍याच आधी टाकून बच्चेमंडळी त्यांच्या आयासोबत शाळेच्या आवारातच गोंगाटाला सुरवात करतात. वर्गात बसून चित्र रंगवणार्‍यांना त्याचा त्रास होत असतो. जिकडे जागा मिळेल तिकडे बसून या आया आपल्या बछड्यांना खमण,ढोकळा, बर्गर, सॅन्डवीच भरवत असतात. थोड्याच वेळात त्या आवाराचं फुड मेळ्यात रुपांतर होतं. पुढच्या पेपराच्या वेळी पहिल्यावेळची पुनरावृत्ती. अशा पालकांची मुलं हॉल मध्ये आपले गुण दाखवत होतीच हे सांगायला नकोच.

आदल्या दिवशीच्या अनुभवामुळे दुसर्‍या दिवशी पालकांना आवारात प्रवेश दिला गेला नाही. पेपरचा वेळ पुर्ण होईपर्यंत मुलांचे पेपर घेतले गेले नाहीत. मधल्यावेळातही प्रवेश नाकारला गेला. पालकांनी दारवानाशी हुज्जत घातली. त्याने सरांचा हवाला दिला, बुलाव तेरे सर को अशी असभ्य भाषा केली गेली. मुख्याध्यापक आले आणि त्यानी मृदू स्वरात पण ठामपणे नकार दिला. हि गोजीरवाणी मग वैतागली. आत गेल्या वर दंगा केला, त्याना एका शिक्षकाने हाताला धरून निट वागण्याची सुचना केली. तर ती कारटी त्या शिक्षकानाच तु कैसा हात पकडता है? असं म्हणून त्यानाच आव्हान देऊ लागली. मुख्याध्यापकानी पुन्हा हस्तक्षेप केला.

सातवी आठवीतली ही मुलं त्या सेंटरवर परिक्षा द्यायला गेली होती कि पिकनीकला असा प्रश्न पडावा असं त्यांचं आणि त्यांच्या पलकांचं वागणं होतं. शिक्षकांशी सोडा पण मोठ्यामाणसांबरोबर कसं वागू नये याचा तो नमूना होता. हल्ली शाळांमधून मुलांना शिक्षा केली जात नाही. त्यात करून काही इंग्रजी शाळा या शाळा कमी आणि व्यापारकेंद्र जास्त, असा अनुभव येत चाललाय. बेशीस्त मुलांची गर्दी इथे वाढत चाललीय. पालक त्या मुलांचं वो तो बडा सैतान है। अशा शब्दात कौतूक करणार. छडी वाजे छम् छम् नको पण किमान शिस्त या मुलांना कोण लावणार?  

26 September, 2010

भेसळयुक्त दूध ओळखायचं कसं?


आजच्या लोकसत्तामध्ये मुंबई-पुण्यात दूध पिशव्यांतून मिळते विष’! हि बातमी वाचली. आम्ही गोकूळचं दूध घेतो. आता गोकूळ असो नाहीतर इतर कुठल्याही ब्रॅन्डचं ते दूध शुद्ध आहे का? असा प्रश्न पडतो (एकवेळ पाणी घातेलेलं चालेल पण रसायनयुक्त नको असं म्हणण्याची पाळी आली.) हल्ली जगण्याशी संबंधीत सगळ्याच क्षेत्रात सम्राट निर्माण झालेत. शिक्षण, बांधकाम, अन्न, भाजी-पाला, फळं, दूध सगळी क्षेत्रं या सम्राटांनी व्यापून टाकलीत. या समाज कंटकांचा जेवढा व्याप वाढत गेला तेवढं सामान्यांचं जगणं मुष्कील झालं आहे. पुर्वी पेपरात नावं छापून आली की अशा लोकांना थोडी तरी शरम वाटत होती आता ती ही वाटेनाशी झाली आहे. लोकसत्ताच्या वरील बातमीत या संबंधी कोण कोण राजकिय लोक संबंधीत आहेत त्यांची नावं आहेत. त्यात पुढील नावं आहेत कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर, परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे यांचा गोदावरी, साई संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांचा श्रीरामपूर, आमदार शंकरराव गडाख यांचा नेवासे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते यांचा सोलापूर, भंडारा, त्याचबरोबर दिनशॉ, हल्दीराम, प्रभात, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा अशोक मिल्क आदींसह राज्यातील २२ प्रकल्पांनी हे रासायनिक दूध खरेदी केले.  पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आता प्लँटचालकांचे पालकत्व घेऊन बैठक आयोजित केली आहे. राजकीय हस्तक्षेपाला भीक न घालणारे पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्यासाठी मात्र हा तपास एकप्रकारे आव्हान आहे. नगर जिल्ह्य़ात कारवाई झाली. मात्र, अन्य जिल्ह्य़ांत सुरू असलेल्या गोरखधंद्यावर कोण प्रकाशटाकणार  

आपलं बिंग आता फुटणार असं समजताच हे राजकिय लोक सक्रीय झाले आहेत. यांना आवर कोण आणि कसा घालणार? मुख्य म्हणजे आपल्या घरात येणारं दूध हे भेसळयुक्त आहे का हे ओळखायचं कसं? 

25 September, 2010

दंताजीचे ठाणे उठले......!






दातदुखी किती भयंकर असते हे ती झाल्या शिवाय समजत नाही. मला ती समजली कारण गेले चार दिवस त्यातच गेले (नव्हे घालवले). पहिल्या दिवशी पेन किलर, दुसर्‍या दिवशी डॉक्टर. त्या भल्या गृहस्थाने हातोडी मारून नक्की कोणता दात दुखतोय ते विचारलं, मग हालऊन बघीतला, चार गोळ्या बांधून दिल्या आणि उद्या दात काढून टाकूया म्हणाले. मी अधिक दुखणारा दात घेऊन घरी आलो. (बाकिचे न दुखणारेही बरोबरच होते
.) घरी आल्या आल्या दात काढणार असल्याचं बायकोला सांगताच तीने त्या डॉक्टरवरच दात-ओठ खाऊन संताप व्यक्त केला. (आता माझ्या दाताबरोबरच तीचे ओठही दुखायला लागले असणार.) त्या डॉक्टरला सांगायला काय? दात काय वाटेवर पडलाय? (अग तो दात अजून माझ्या तोंडातच आहे, वाटेवर कसा पडणार? (मी मनातल्या मनात)) तीने तावातावाने दुसर्‍या डेंटीसला फोन केला, वेळ घेतली दुसर्‍या दिवशी दुसर्‍या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरीणबाईंनी एक्सरे काढला आणि दोन दात काढून टाकावे लागणार म्हणून निर्णय दिला. (अरे आपण अपिलात कशाला गेलो? खालच्या कोर्टाचा निर्णय बरा होता की. (मी पुन्हा मनातल्या मनातच). त्या काढून टाकलेल्या दातांच्या ठिकाणी ब्रिज करूया म्हणाली. (नको..... नको....... ब्रिज नको. तिकडे कलमाडीने बांधलेला ब्रिज लगेच पडला, तुझा कितीसा टिकेल? माडी कलंडली तर? (मी पुन्हा मनातल्या मनात.) तेवढ्यात ती डॉक्टरीणबाई म्हणाली इंम्प्लांट करना है तो पर टूथ फोर्टीफाय थाउजंट पडेंगे (ऎक, दाता तुझा काय भाव चाललाय बाजारात?) अरे हिच्या खोट्या दाताची एवढी किंमत मग माझ्या खर्‍या नैसर्गिक दाताची किती असायला पाहिजे? पंचेचाळीस हजार तर नक्किच असणार ना? मग तो एक दुखणारा सोडून बाकीचे हिलाच विकूया ना? ३१x४५०००=१३,९५,००० असा हिशेब मी लगेच तयार केला. (पुन्हा मनातल्या मनात)  

एक्सरे आणि दुखरा दात घेऊन आम्ही क्लिनीकच्या बाहेर. ही हट्टाला पेटलेली होती. आणखी एका  डॉक्टरीणबाईंना फोना-फोनी करुन हिने वेळ ठरवली. संध्याकाळी मेट्रो रेल्वेच्या बांधकामांमुळे असलेल्या तुफान ट्राफिकचा सामना करीत अस्मादीक बायकोसह तिसर्‍या क्लिनीकला पोहोचले. मला खुर्चीवर झोपऊन ती वर करण्यात आली. हा दात काढावा लागेल इती. डॉक्टर. (हो काढा, ते विधिलिखील आहे ते चुकणार आहे का आता?) हे सुद्धा मनातच बोलल्याने डॉक्टरना समजलं नाही पण मी बायकोकडे बघत होतो, तेव्हा डॉक्टरांच्या नजरेत अरे दात तुझा काढायचाय की तीचा? असा प्रश्न मला स्पष्ट दिसला. बायको संभ्रमात. शेवटी मी बोललो काढून टाका. (एकदाचा असं पुढे मनात). चला एक दात गेला, आता कुणाला आपली बत्तीशी बाधायला नको.

दात गेल्याच्या दुःखात आणि दुखण्यात घरी आलो. आता त्या दाताची जागा कुणी घ्यायची ब्रिजने की दंतरोपणाने ते अजून ठरतय. दात माझा, तोंड माझं आणि निर्णय घेणार्‍या दोन बायका यात माझे दात पिसले जाताहेत.

ता.क. गेल्या चार दिवसांच्या माझ्या दंतकथेमुळे बायकोला थकवा आलाय. पुढची डॉकक्टरवारी मला एकट्यालाच करावी लागणार असं दिसतय.                                     

22 September, 2010

लडाख - ऑल इज नॉट वेल



लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गाची अशी वाताहात झाली
लेह शहरात काळोख असताना प्रवेश केला असला तरी सगळं सामान्य नाही हे समजत होतं. सकाळी बाहेर पडलो आणि सर्वांचं शहरात स्वागत करणारी कमान ओलांडली तेव्हाच आलेलं आसमानी संकट आणि त्यामुळे झालेली वाताहात याचा अंदाज यायला लागला. (तसा तो आधीच ऎकून माहित होता. इशा टूर्स चे संचालक आणि माझे मित्र आत्माराम परब या लडाखी मित्रांना भेटून नुकतेच परतले होते.)  पुर्ण उध्वस्त झालेली घरं, दुकानं दिसायला लागली. शहरालगतचा बस स्टॅन्ड, आजूबाजूच्या इमारती नाहीश्या होवून आता त्या ठिकाणी मातीचा ढिगाराच दिसत होता.
काय आणि कसं शोधणार? 
त्याच ढीगार्‍यात आपलं किडूकमिडूक शोधणारी लडाखी माणसं पाहून मन हेलावून गेलं. एरवी साफसुतरा असलेला,  दलाईलामांच्या निवासस्थानाचा परिसर चिखलाने भरून राहीला होता. व्यासपीठ आणि सभोवतालच्या भागात अजूनही पाणी होतं. चोगलमसर गावाची सगळ्यात जास्त हानी झालेली दिसत होती. रस्त्याच्या दुतर्फा दहा-बारा फुटांचा दगड-मातीचा ढीग ढगफ़ुटीच्या वेळची व्यथा सांगायला अजून तिथेच होता. तो ढीग बाजूला करूनच लेह-मनाली महामार्ग वाहतूकीसाठी खुला केला होता. दोन्ही बाजूची घरं, दुकानं आता माणसांनी नव्हेत तर मोठमोठ्या खडकांनी आणि वाहत आलेल्या वाहनांनी भरलेली दिसत होती. दरोडेखोरांनाही लाजवेल अशाप्रकारे दुकानाची शटर त्या प्रलयाने उचकटून टाकली होती. जुनं लेह शहर आता त्या अवशेषातच बाकी होतं.      

हिच ती रॅन्चोची शाळा, पाठीमागचा डोंगर शाळेच्या इमारतीमधून पुढे आला.  
पुढे लेह-मनाली मार्गावरच थ्री इडीयटस् मधली रॅन्चोची शाळा आहे. त्या शाळेत गेलो. शाळेच्या प्रवेशव्दारातच मातीचे ढिगारे पुढे काय वाढून ठेवलय ते सांगत होते. शाळेचं ऑफिस, पुढचे वर्ग सगळ्याचीच वाताहात झाली होती. ए.सी.सी चे लोक दुरूस्तीच्या कामात व्यग्र होते.   

साबू हे लडाख मधलं मॉडेल व्हिलेज, राष्ट्रीय महामार्गाला लागूनच एक रस्ता त्या गावात जातो. स्वागताची एक कमान याच रस्त्यावर उभारलेली आहे. आता चिखल साफ केला असला तरी ढगफुटीच्यावेळी किती पूर आला होता त्याच्या खुणा त्या कमानीच्या दोन्ही खांबांवर दिसत होत्या. गावात जाणारा पक्का रस्ता पार खणून गेला होता. रस्त्याच्या मधोमध पण्याच्या प्रवाहामुळे नदीचं पात्र असतं तेवढ्याखोल जमीन खणली गेली होती. त्या पेक्षा खोल जखमा लडाखी लोकांच्या मनावर झाल्या होत्या.  मात्र सर्वस्व गमाऊनही कुठे दुःखातिरेकाने केलेला आक्रोश नव्हता.    

पद्माच्या घराची अशी वाताहात झाली
पद्मा ताशी हा आमचा लडाखी मित्र आणि त्या घटनेचा जिवंत साक्षिदार. तो त्या विषयी बोलला पण अगदी थोडक्यात. जणू त्याला तो प्रसंग लवकरात लवकर विसरून जायचा होता. रोज रात्री साडेनऊ-दहाला झोपणारा पद्मा त्या काळ रात्री मात्र जागाच होता. काही पुर्व सुचना, संकेत मिळतात तसच काहीसं झालं पद्मा सांगत होता. सगळी कामं आटोपली तरी झोपेचा विचार मनात येत नव्हता. बाहेर आभाळ चांगलच भरून आलं होतं. रात्रीच्या अंधारातही गडद काळे ढग भयाण वाटत होते. नेहमीच मोकळं आकाश आणि चंद्र-चांदण्या त्या ढगाआड गुडूप झाल्या होत्या. चमचमणार्‍या विजांच्या लख्ख उजेडाने सारा आसमंत प्रकाशीत होत होता. पाठोपाठ कानठळ्या बसवणारा प्रचंड कडकडाट होत होता. त्या आवाजाने धरणी कंप पावत होती. भुकंप झाल्याचा भास व्हायला लागला. आकाशात नेहमीपेक्षा वेगळीच हालचाल दिसायला लागली. पावसाला सुरवात झाली.
ही एक बाजारपेठ होती
 नुकत्याच बांधून पुर्ण झालेल्या गेस्ट हाऊसच्या छतावर   नुसतीच माती पसरली होती, त्यावर पॉलिथीन पसरावं म्हणून मी आणि भाऊ नोरबू चढलो. ते पसरत असतानाच पावसाचा वेग वाढला. वरून येणारे टपोरे थेंब अंगावर ताशा वाजवत होते. त्याचाही वेग वाढला. आता अख्खं आभाळच कोसळणार की काय असा भास झाला. पाण्याच्या खळखळाटाचा आवाज ऎकून कानावर विश्वास बसत नव्हता. एवढ्यात घरासमोरची जर्दाळूची झाडं आमच्या दिशेने चाल करून यायला लागली. पुढे घडलेली सगळी प्रतिक्षिप्त क्रियाच होती. मी आणि भावाने छप्परावरून उडी मारून घराकडे धूम ठोकली. पुढच्या बाजूने घरात प्रवेश करणं अशक्य होतं. खालचा मजला पाण्याखाली गेला होता. एवढं पाणी आयुष्यात बघितलं नव्हतं.
प्रलयाचा शो रुम
 घराच्या मागल्याबाजूने पहिल्या मजल्यावरच्या खिडकितून आरडाओरड करून घरातल्या मंडळीना सावध केलं. भावाचे दोन मुलगे, आई-वडील यांना त्या खिडक्यामधूनच बाहेर काढलं.  उंचावरच्या टेकडीकडे धावत सुटलो. अंधारात काहीच समजत नव्हतं. मधूनच चमकणार्‍या विजांच्या प्रकाशात आजूबाजूचा नेहमीचाच भाग अनोळखी वाटायला लागला. कारण शेजार्‍यापाजार्‍यांची घरं जागेवर नव्हती. भर रात्रीत आरडाओरडा ऎकायला येत होता.  आम्ही तर वाचलो. बाकिच्यांचं काय. आभाळाकडचं सगळं पाणी संपलं तेव्हा पाऊस थांबला. पण खाली प्रलय आला होता.

बसचं कलेवर
 जवळच असणार्‍या बहीण इशेच्या घराची काय अवस्था झाली असेल याच्या नुसत्या विचाराने थरकाप उडाला होता. समोरच्या छातीभर चिखलातून आणि काळोखातून कसलीच हालचाल करणं शक्य नव्हतं. सकाळ व्हायची वाट पहात असहाय्यपणे उभे होतो. पहाट झाली, आकाश मोकळं झालं. झुंजूमुंजू झालं तसा इशेच्या घरा जवळ जाण्याचा प्रयत्न करायला सुरवात केली. चिखलातून कशीबशी वाट काढत तिकडे पोहोचलो तर घराचा मागमूस नव्हता. इशे आणि तीचा नवरा जिगमीत घराच्या ढीगार्‍यावर उभे होते. काळजाचा थरकाप उडवणारी ती घटना होती. त्यांच्या घरा मागून प्रचंड मोठा प्रवाह वाहत गेल्याचं दिसत होतं. आमच्यासाठी आभाळही फाटलं होतं आणि धरतीही दुभंगली होती.

मारुती कार प्रवाहाने चालवलेली
 एवढं बोलून पद्मा काहिसा थांबला. मी सुन्न होऊन ऎकत होतो. त्याने पुढे बोलायला सुरवात केली घरा शेजारी पार्क करून ठेवलेली मारूती कार जाग्यावर नव्हती. ती वाहून गेली होती. सगळ्या गावाची तीच गत होती. अनेक आप्तस्वकीय बेपता झाले होते.

दुकान आणि मकान दोन्ही बरबाद
तिकडे बसस्टॅन्ड वरच्या पद्माच्या मिनीबस मध्ये ड्रायव्हर झोपला होता. बारा-साडेबाराच्या दरम्यान बस वरच्यावर उचलली गेली. बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण ड्रायव्हरला बाहेर पडता आलं नाही. गाडीने आपली जागा सोडली होती आणी ती प्रवाहाबरोबर वाहत जात होती. थोड्यावेळाने ती बुडायला लागली. पाणी, चिखल, दगड-गोटे आत यायल्या लागले. हळूहळू चिखल वाढत गेला. आता श्वास घ्यायला जागा उरली नव्हती. कशालातरी अडकून गाडी तीरकी होऊन थांबली एकदिड फुटाच्या जागेत मान वर काढून जगण्याचा प्रयत्न करत असताना कधीतरी सकाळ झाली, एक झरोखा दिसला त्यातूनच बाहेर पडून सुटका करून घेतली.

दरोडेखोर निसर्ग
अशा अनेक घटना त्या एका काळरात्रीत घडून गेल्या. कितीतरी माणसं जिवाला मुकली. कित्येक अजून बेपत्ता आहेत. त्या नंतरच्या अनेक रात्री लडाखवासीयांनी जागून काढल्या. घरदार सोडून लोक मॉनेस्ट्रीमध्ये रहायला गेले. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा आभाळ भरून आलं तर लोकांनी थेट शांतीस्तूप सारखे डोंगरमाथेच गाठले. एकूण काय 'भय इथले संपत नाही अशीच स्थिती अजून आहे.

आभाळ कोसळलं!
गेल्याच फेब्रूवारीत अंदमानला गेलो होतो तेव्हा सुनामीमुळे झालेली हानी पाच वर्षानंतरही दिसून येत होती. आता समुद्रसपाटीपासून साडेअकरा हजार फुटांवर आलेलं हे अरिष्ट लडाखींना येत्या हिवाळ्यातही आपला इंगा दाखवणार. रक्त गोठवणार्‍या वजा वीस-पंचवीस तपमानात नेहमीची उबदार लडाखी घरं त्या काळरात्रीने काही क्षणात ओढून नेली. निळाईने भरलेलं लडाखचं आभाळ नेहमीची माया विसरून गेलं होतं.
अध्यात्म खर्‍या अर्थाने जगणार्‍या हसतमुख लडाखी मित्रांना देव जगण्याचं बळ देवो.                                        

पद्माचे वडील 'मागे प्रकाश होता, पुढे मात्र अंधार  दाटलाय' हे कथन करताना.
ता.क.: काल परवाच पद्माकडून समजलं की सरकारने नुकताच साबू गावात सर्वे सुरू केला आहे. मा. पंतप्रधानानी अडीच महिन्यात नवी घरं बांधून देऊ असं सांगितल्याला आता महिना उलटून गेलाय. हिवाळा तोंडावर आला असताना आत्ता कुठे पहाणी चालू झाली आहे, मग बांधकाम कधी होणार?  कुठे होणार?  




इतर लेख:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates