07 October, 2009

नाटकाआधीचे नाटक


एका महोत्सवी नाटकाच्या कार्यक्रमाला मंडळी जमली होती. आयोजकांनी दिलेल्या प्रवेशिकांवर आसन क्रमांक नसल्याने पहिल्यांदा येणार्‍याला पहिल्या रांगेत बसता येणार होते. प्रवेशद्वारावर बरीच गर्दी जमली होती. पहिल्या दोन माणसांनंतर माझा नंबर होता. प्रवेशद्वार उघडायला अजून अवकाश होता. माझ्या पुढच्या व्यक्तीचा संवाद सहज कानी पडत होता. तो असा. तो अनिलभाई आरामात बाजीरावासारखा येणार, वरून त्याला चांगली पुढची जागा पाहीजे. मागितली तर द्यायची, पण तो जर का काही बोलला तर मात्र त्याला बोलायलाच द्यायचं नाही, तुझी बकबक नको म्हणून त्याचा चारचौघात अपमान करायचा. मला त्याचा खुप राग येतो. नाक कापून अगदी हातात द्यायचं. ते दोघे भिन्न प्रवृतीचे वाटत होते, कारण दुसरा फक्त मान डोलावत होता. एवढ्यात मागे लांबपर्यंत गेलेल्या रांगेत पहिल्याला तो अनिलभाई दिसला (की याने मुद्दाम शोधुन काढला. तीच शक्यता जास्त वाटली.) झालं, याला हवी ती संधी चालून आली. हा माणूस अनिलभाईपर्यंत जाऊन पोहोचला. त्याच्या बरोबरच्या माणसाला विचारू लागला. जागा अडवून ठेऊ ? हो जागा ठेवायचीच ना ! विचारायचं काय त्यात ? इति अनिलभाई. अनिलभाईचे दिवस भरले होते. त्याच्या मित्राला विचारलेल्या प्रश्नाला अनिलभाईने उत्तर दिल्याने हा चिडला तू, तू मध्ये तोंड का घालतोस ? प्रश्न ज्याला विचारला त्यानेच उत्तर द्यायचं. तू कशाला बोलतोस ? तुला तोंड आहे ते मला माहीत आहे. याचे मोठमोठ्याने ओरडणे सुरूच. तिथले व्यवस्थापक धावले, आणखी चार माणसं मध्ये पडली. मुद्दाम उकरून काढलेलं भांडण थांबलं. याला भांडण सुद्धा म्हणता येणार नाही. कारण हा एकटाच तोंडसुख घेत होता. अनिलभाई खजील चेहर्‍याने उभा होता. लोक त्याच्याकडे पहात होते. त्याच लांब-सरळ नाक मला चीन्या-जपान्या सारखं चपटं वाटायला लागलं. तो अनिलभाई सहजच बोलला आणि याच्या जाळ्यात सापडला होता. चार चौघात त्याची इज्जत काढायचा याचा डाव सफल झाला होता.

आत गेल्यावर माझ्या बाजुलाच याला जागा मिळाली होती. संपुर्ण नाटक संपेपर्यंत त्याचं नाटकात कमी आणि अनिलभाईकडे जास्त लक्ष होतं. सुरवातीपासून चालू होतं, एकसारखा दुसर्‍या माणसाला सांगत होता आपल्याकडे बघतोय का बघ, त्याला इथे बसायचं असणार, पण आता विचारणार कुठल्या तोंडाने. मध्ये तोंड घातलं तिथेच मी त्याला पकडला, फसला तो.

ही अशी विघ्नसंतोशी माणसं क्लेश झाला की खुपच आनंदीत होतात. दुसर्‍या माणसाचा पाणउतारा करून अशांना चांगली झोप लागते.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates