नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटरला दशावतारावर प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक अशोक राणे यांची निर्मीती असलेला माहितीपट पाहिला. कोकणची विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला म्हणजे दशावतार. कार्तिक एकादशीनंतर प्रत्येक ग्रामदेवतेसमोर ‘दहिकाला’ होतो. त्यावेळी संपूर्ण गाव देवळाजवळ जमा होतं. देवळात देवासमोर नवस फेडले जातात. देवळाभोवती लोटांगणं घातली जातात. ढोल वाजवले जातात. तर्हेतर्हेच्या वस्तूंनी सजलेली दुकानं आणि खाद्यपदार्थांची हॉटेलं हे त्या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य. उत्साहाला अगदी उधाण आलेलं असतं. पण जत्रेला मनोरंजनाचा मुख्य कार्यक्रम असतो तो म्हणजे दशावतारी नाटक. हे दशावतारी आदल्या दिवशीची जत्रा आटोपून त्याच दिवशी गावात हजर होतात. आणि बालगोपाळांना चेव चढतो. जत्रेत फिरता फिरता एक डोळा सतत त्या दशावतार्यांवर असतो. आपल्या सामानाची, मेकपची ट्रंक स्वतःच्याच डोक्यावर घेवून आलेला तो मालवणी कलाकार काही वेळात राज्याच्या वेशात सर्वांसमोर येणार असतो. सगळी मंडळी त्याची आतुरतेने वाट पहात असतात. पण त्या आधी त्या कलाकारांना आजचं कथानक, पात्र निवड यावर चर्चा करायची असते आणि त्या नंतर दिवस भराचा थकवा घालवण्यासाठी एक डुलकीसुद्धा काढायची असते. हे सगळं झाल्यावर मध्यरात्री दशावताराच्या प्रयोगाला प्रारंभ होतो. काल कृष्णाची भुमिका करणारा नट आज द्रोपदी किंवा अगदी भिमाचीही भुमिका वठवतो. कोणतीही लिखीत संहिता नसलेलं हे नाट्य हुबेहूब सादर केलं जातं. प्रत्येक वेळी संवाद वेगवेगळे असले तरी आशय तोच असतो. या लोककलेचा उल्लेख रामदास स्वामींनी त्यांच्या साहित्यात केलेला आहे. रंगमंच व्यवस्था नाही त्यामुळे नेपथ्यही नाही तरी पण केवळ संवादातून सगळं वातावरण उभं केलं जातं. पहाट होते तसे गावकरी प्रसन्न मनाने आपापल्या घरी जातात. दहिकाला हा एक सोहळाच असतो.
लहानपणी पाहिलेला हा दहिकाला अशोक राणेंच्या माहितीपटाने मनात पुन्हा जागा केला. आमचे प्रा. विजय फातरफेकर सर माहितीपटात आणि प्रत्यक्ष असे दोन्हीकडे भेटले, तसे ८४ वर्षाचे ‘दशावतार’मध्ये कुंतीची अजरामर भूमिका करणारे बाबा पालव हेही भेटले. या वयातही त्यांनी दशावतारातलं ध्रुवपद त्याच तालात, त्याच ठेक्यात गावून दाखवलं. अभिनेते शिवाजी साटम यांनी या माहितीपटाचे केलेलं निवेदनही भाव खावून गेलं.
No comments:
Post a Comment