‘बासरी’ म्हटलं की श्रीकृष्ण आणि कृष्ण म्हटलं की बासरी हे समिकरण ठरुन गेलेलं आहे. म्हणजे किमान द्वापारयुगापासून त्या बासरीने सर्वानाच मोहित केलं आहे. बांबूचा एक तुकडा आणि त्याला पाडलेली सहा भोकं, पण ती बालक़ृष्णाच्या ओठांना लागली की मग गोप-गोपीं बरोबर गायी-वासरंही त्याच्या भोवती गोळा होत, सर्वजण त्या अपुर्व सुरांनी मोहित होत असत आणि म्हणूनच कृष्णाचं एक नाव मनमोहन पडलं असावं. सद्ध्या असाच एक मनमोहन आपल्या बासरीच्या सुरावटी द्वारे उभ्या महाराष्ट्राला गुंग करून टाकत आहे. म्हणूनच अमर ओक म्हटलं की ते बासरीवाले का? असा प्रश्न विचारला जातो. या ब्लॉगवर 'द म्युझिशियन्स' पन्नासावा प्रयोग या पोस्टवर आलेली एक प्रतिक्रियाच बघाना फार बोलकी आहे वाचक म्हणतात " बहुतांश नवीन कलाकारांची कला मला उथळ वाटते; एका उत्तम सतारवादकानीही माझ्याशी बोलताना आधीच्या कलाकारांची कला फार उच्च पातळीवरची होती आणि तशी विविधता आणि खोली संगीतात आणणं कठीण आहे, अशी कबुली दिली होती. अमर ओक हा एक कलाकार मात्र याला अपवाद आहे. अमर ओकांबद्दल मात्र हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की ते दुसरे हरिप्रसादच आहेत. आणि ते खरंच आहे. त्यांच्या बासरीत जादू आहे. बासरीचा सर्वोत्कृष्ट वापर करणार्या हृदयनाथसारख्या संगीतकाराकडून ओकांना पावती मिळाली, याचा मला आनन्द झाला. मुख्य म्हणजे ओक संगीताचे तुकडे आहेत तसे वाज़वतात. स्वत:चं प्रभुत्व दाखवण्याची अनावश्यक धडपड, विचित्र कपडे, बोलताना मर्कट हातवारे वगैरे चाळे ते करत नाहीत. चौरसियांचे अत्यन्त कठीण असे एकदोन तुकडे वाज़वताना ओकांची ज़रा गडबड झाली, पण तो दोष अगदीच किरकोळ आहे. त्यांच्या कलेचं चीज़ करणारी नवीन गाणी आज़ कोणीही रचू शकत नाही हे ओकांचं दुर्दैव.हृदयनाथसारखा संगीतकार ओकांना मिळायला हवा होता."
एखाद्या कलेशी जेव्हा तो कलाकार एकरूप होऊन जातो तेव्हा ती कला त्याला वश होते. अमर ओकांची बासरी त्यांना अशीच वश झालेली आहे. ‘चुरा लिया है’ किंवा ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’ हे गाणं जेव्हा आपण अमरच्या बासरीमधून ऎकतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो. म्हणूनच टाइम्स मुझिक सारख्या कंपनीने ‘प्यार मोहब्बत’ ही अमर ओकनी वाजवलेल्या बासरीची सिडी बाजारात आणली आहे. झि मराठीच्या ‘सारेगमप’ मध्ये जेव्हा ही बासरी वाजते तेव्हा बर्याच वेळा अख्खा पडदाच अमर ओकने व्यापलेला असतो. समोर कोणतीही महनीय व्यक्ती परिक्षक म्हणून असो अमर ओकच्या बासरीला दाद मिळाली नाही असं कधी होत नाही. ‘द म्युझिशियन्स्’ या वाद्य मैफिलीत ‘सावन का महिना’ असो की ‘कही दूर जब दिन ढल जाये’ असो समोरचे प्रेक्षक भाराऊन जातात आणि उभे राहून मानवंदना देतात. एवढं असलं तरी अशा या गुणी कलाकाराचे पाय जमिनीवरच आहेत. बासरीच्या सहा छिद्रांवाटे काम, क्रोध, मद, मत्सर आदी षड्-रिपू आपल्यातून निघून जातात असं ते म्हणतात ते खरं असावं. ऎकणार्याला सुद्धा जो अलौकीक आनंद मिळतो त्याला तोड नाही. ती सुरावट ऎकतच रहावी असं वाटत रहातं, ती बासरी बस रे असं कधी वाटतच नाही.