01 February, 2019

पद्मश्री पुरस्कार आणि चहावाला


आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. या वर्षी मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराच्या यादीत अनेक  नावं अपरिचीत आहेत. त्यातलं एक म्हणजे डी. प्रकाश राव. डी. प्रकाश राव हे कटक च्या बख्शी बाजारात चहाचं दुकान लहानपणापासून चालवतात. डी. प्रकाश राव ह्यांना आपलं शिक्षण मॅट्रिकच्या आधी सोडून आपल्या वडिलांना चहाच्या दुकानात मदत करणं भाग पडलं.

रोज सकाळी ४ वाजता उठून ते चहा विक्री सुरु करतात. पण त्यांचा खरा दिवस उजाडतो तो सकाळी १० नंतर. जेव्हा डी. प्रकाश राव शाळेत जातात ते गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. आजूबाजूच्या झोपडपट्टी वस्तीतील ८० पेक्षा जास्त ४ ते ९ वयोगटातील मुले आज त्यांच्याकडे शिक्षण घेतं आहेत. आपलं शिक्षण अर्धवट झाल्याची सल त्यांच्या मनात अनेक वर्ष होती. आजूबाजूला गरीब लहान मुलांसाठी शाळा नाही हे त्यांच्या लक्षात आलं मग २००० साली त्यांनी एक आशा आश्वासननावाची लहान शाळा उघडली. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोकांना त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी जागरूक केलं. त्यांनी आपल्या पैशातून काही शिक्षकांची नियुक्ती केली. स्वतः ही त्या मुलांना शिकवण्याचं शिवधनुष्य उचललं. ही शाळा सध्या तिसरी इयत्तेपर्यंत आहे. नंतर ते ह्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी सरकारी शाळेत प्रवेश घेऊन देतात.

 
आपल्या कमाईचा ५०% हून अधिक हिस्सा डी. प्रकाश राव ह्या मुलांवर खर्च करतात. ज्यात मुलाचं शिक्षण, त्याचं आरोग्य, त्याचं जेवण ह्या सगळ्यांचा समावेश आहे. मॅट्रिकच्या आधीच शाळा सोडलेले डी. प्रकाश राव ह्यांना ८ भाषेचं ज्ञान आहे. ज्यात ओडिया, इंग्रजी, हिंदी, तेलगु, तमिळ, कनडा, मल्याळम आणि बंगाली भाषा येतात. त्याचं हे कार्य इथवर मर्यादित नाही तर डी. प्रकाश राव हे रक्तदाता आहेत. आजवर त्यांनी २१४ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलं असून १७ वेळा प्लेटलेट दान केल्या आहेत. ह्या मागची प्रेरणा काय हे सांगताना ते सांगतात, “वयाच्या १७ व्या वर्षी एका आजारामुळे मी थोडा अधू झालो होतो. तेव्हा अशाच एका निनावी माणसाने रक्त दिल्यामुळे माझे प्राण वाचले. तेव्हाच मी शपथ घेतली कि मी जमेल तितकं रक्तदान करणार”. डी. प्रकाश राव त्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मृत्यूनंतर शरीराचे अवयव आणि आपलं पूर्ण शरीर हे दान करण्याचा संकल्प केला आहे.

त्यांच्या कार्याची दखल खुद्द भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी घेतली. डी. प्रकाश राव सांगतात कि एक दिवस पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी माझ्या भेटीला आला. देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला भेटायचे आहे तेव्हा आपण वेळ कधी देऊ शकता असे विचारत होता.
 डी प्रकाश रावांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

"I could not believe when an officer from the PMO requested me to give time for a meeting with PM. My happiness knew no bounds when I finally met Modi."

डी. प्रकाश राव ह्यांच्या निस्वार्थी कार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झाले कि त्यांनी आपल्या मन कि बात३० मे २०१८ च्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला. एक साधा चहा विकणारा विक्रेता ठरवलं तर काय करू शकतो ह्याचा आदर्श डी. प्रकाश राव ह्यांनी संपूर्ण देशापुढे ठेवला आहे. कितीतरी गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं पवित्र काम त्यांनी केलेलं आहे.

डी. प्रकाश राव  ह्यांच्या सारख्या निस्वार्थी, सेवाभावी व्यक्तिमत्वाला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने पद्मश्री पुरस्काराचा सन्मान झाला आहे.

समाज कार्य करणार्‍या अशा अनेकजणांना गेल्या चार वर्षात पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. हाच फरका आहे मोदी सरकार आणि इतरांच्यात

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.

No comments:

Post a comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates