स्वतःला ह.भ.प. म्हणवणारे आणि त्याच्या अगदी उलट वागणारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणजे बबनराव पाचपुते. तशी या माणसाची दखल घेण्याचं कारण नाही. पण या आधी वनमंत्री असताना ते सिंधुदुर्गात हत्तीना पळऊन लावण्यासाठी गेले आणि आपलं हसं करून घेतलं होतं. या नवीन मंत्रिमंडळात ते आदिवासी विकास मंत्री आहेत. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यानी घेतलेला पहिलाच निर्णय वादाचा आणि चेष्टेचा विषय झाला. मोहापासून दारू बनण्याच्या निर्णयाने त्यांचे साहेब खुश होतील म्हणून त्यानी तो घेतला असावा. (नाहीतरी हे साहेब अन्नमंत्री पेक्षा दारू विकास मंत्री म्हणूनच शोभतील) त्या निर्णयाने झालेली शोभा लोक विसरले असतील नसतील तोवर आता आदिवासींना ते आदिवासी आहेत की नाहीत हे सिद्धकरण्यासाठी डि.एन्.ए. चाचणी करण्याचा निर्णय मंत्र्याने जाहीर केला. आदिवासींचा हा घोर अपमान त्यांनी केला आहे. हा निर्णय कुणाच्या भल्यासाठी आहे? या ह.भ.प. ला माकडाच्या हाती कोलीत म्हणावं तर माकडाचा अपमान होण्याचीच जास्त शक्यता आहे. तात्पर्य काय तर मुह मे राम.............
माझं स्वैर लेखन
29 January, 2010
27 January, 2010
आत्मा
हा माझा जवळचा मित्र. याच्या बाबतीत रोज काहीतरी घडत असतं. कधी लडाखला गेलाय तर कधी भुतानला. नुकताच श्रीलंकेला जाऊन आला. ओळखीतलं कुणीही भेटलं तरी विचारणा होते आत्मा काय करतोय? आता काय म्हणून सांगायचं? हा माणूस एका मागोमाग एक काहीतरी करतच असतो. आपल्याला माहिती असलेलं सगळं सांगायचं असं ठरवलं तरी अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात. यावर उपाय म्हणून म्हटलं फेस बुकवर एक ग्रुप तयार करावा. तसा केलाय Atmaram Parab Fan Club या नावाने. बघा...वाचा.. जॉईन व्हा.
आत्मा... ज्याच्याशी माणसं मनाने जोडली जातात. जो सह्य आणि असह्य मित्रांनाही हसत मुखाने सामोरा जातो. क्रिकेट, कस्टमस्, फोटोग्राफी, इंटेरिअर डेकोरेशन अशी मुशाफिरी करत जो आता लोकांना भटकवण्यात दंग आहे. आत्ता तरी तेच करतोय, पुढे काय करणार इश्वर जाणे. एकूण काय, देवाक काळजी...!
लडाख, हिमाचल प्रदेश, स्पिती-व्हॅली, सिक्कीम, भुतान, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, मणिपूर सगळ्या हिमालयात भ्रमंती. हिमालय हा त्याचा ध्यास असं असलं तरी तिकडे असताना सह्याद्रीच्या भेटीचीच मनात आस. म्हणून दशसहस्त्र फुटांवरून जो येतो तो समुद्र सपाटीला पार कोकणात तिकडे सिंधुदूर्गात जाऊन थडकतो. प्रत्येकवेळी नवे सखे-सोबती यांची भर पडलेली असते किंबहूना तीच मिळकत असते. असा हा आत्मा. मी त्याचा फॅन..... आपण...?
26 January, 2010
हे खरे भारतभूषण
महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वीज अभावानेच पेटते. लोडशेडींग ही आता सवय झालेली आहे. विद्यार्थ्यांचं उज्वल भवितव्य तर या काळेखाने पार झाकोळून टाकलं आहे. विजेअभावी काळोखात बुडालेल्या खेडय़ापाडय़ातील गोरगरिबांसाठी प्रकाशाचे स्वप्न पाहणारा नायक आपण या आधी स्वदेश चित्रपटात पाहिला आहे. पण तो झाला चित्रपट, तीन तासांनंतर विसरून जायचा. पण तसं प्रत्यक्षात घडल आहे. कोणत्याही भरमसाट नफ्याची अपेक्षा न करता आणि अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आशिष गावडे या युवकाने स्वतःला या कामासाठी वाहून घेतले आहे. ‘दहा मिनिटे सायकलिंग करा आणि चार तास वीज मिळवा’ हा अवघड, पण अभिनव प्रयोग जिद्दीने पूर्ण करीत आणला आहे. आशिष गावडे व अमेरिकेतील त्याचे मित्र अनिरुद्ध अत्रे यांच्या ‘बॉटम ऑफ पिरॅमिड एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल इनोव्हेशन प्रा. लि.’ या कंपनीद्वारे हाती घेतलेल्या संशोधनातून लवकरच खेडय़ापाडय़ातील झोपडय़ा विजेच्या प्रकाशाने लखलखणार आहेत.
‘विजेअभावी खेडय़ापाडय़ातील विद्यार्थी शिक्षणाच्या स्पर्धेत मागे पडू नयेत, माफक खर्चात अभ्यासासाठी पुरेल इतका प्रकाश त्यांना मिळायला हवा, या हेतूने सुरू केलेल्या या संशोधनातूनच एका कुटुंबाला कंदिलातील रॉकेलसाठी आठ-नऊ महिन्यांत कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या किमतीत तब्बल सहा वर्षेपर्यंत दररोज चार तास उजेड देऊ शकणारा रिचार्जेबल दिवा आशिषने विकसित केला आहे.
या दिव्याचा चार्जर म्हणून सायकलच्या पॅडलिंगचा वापर केला गेला आहे. दहा मिनिटे पॅडलिंग केले, की त्याला जोडलेल्या यंत्रणेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेवर हा दिवा चार्ज होतो. नंतर गरजेनुसार कोठेही त्याचा वापर करून त्यापासून चार तास उजेड मिळविता येतो. अत्यल्प किमतीत हा दिवा उपलब्ध केला जाणार असल्याने झोपडीत राहणाऱ्या, इतकेच नव्हे तर आदिवासी पाडय़ांमध्ये राहणाऱ्यांनाही त्याचा खर्च पेलणे सहज शक्य होणार आहे.
आशिष गावडे व अनिरुद्ध अत्रे या ध्येयनिष्ठ तरुणांची ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात पाबळच्या विज्ञानाश्रमाचेही मोलाचे साहाय्य लाभले आहे. तिथेच त्यांचे हे प्रयोग विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पाहिले. या प्रयत्नाबद्दल डॉ. माशेलकर यांनी कौतुक तर केलेच, पण त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत व मार्गदर्शनही ते पुरवित आहेत.
काल देशासाठी महत्वाची कामगीरी पार पाडणार्यांना पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, माझ्या मते आशिष गावडे आणि अनिरुद्ध अत्रे खरे भारतभूषण आहेत.
25 January, 2010
निवडक नवयुग – अत्रे गौरवांजली
नुकतीच मॅजेस्टिक बुक हाऊसचे श्री. अनिल कोठावळे यांची भेट झाली आणि एक अप्रतिम ठेवा हाती लागला. आचार्य अत्र्यांच्या ‘नवयुग’ या साप्ताहिकातील १९४० ते १९६० या वीस वर्षातील निवडक लेखांचा एक ग्रंथ मॅजेस्टिकने प्रकाशित केला आहे. तो ५१२ पानांचा अंक म्हणजे वाचकांना आणि अत्रे प्रेमिंना एक पर्वणीच आहे. नवयुग मधून अत्र्यांनी कला, साहित्य, राजकिय, व्यक्तिविषयक असे अनेक विषयांवर लेखन केले. सयुक्त महाराष्ट्र चळवळीत तर अत्र्यांच्या लेखणीला विलक्षण धार चढली होती. त्या काळात नवयुगला लाखाच्यावर खप होता. त्या काळातले लेख संकलित करून ‘निवडक नवयुग’ हा संग्राह्य ग्रंथ तयार झाला आहे.
अत्र्यांविषयी पु.ल. देशपांडे, प्रभाकर पाध्ये, वसंत बापट, सुधा अत्रे यांचे लेख आहेत, तर अत्रे उवाच, कला, साहित्य, व्यक्तिविषयक, द्विभाषा, सयुक्त महाराष्ट्र, लेख, भाषणे, व्यंगचित्रे अशा अनेक सदरात वाचनीय लेख एकत्र असलेला हा ग्रंथ म्हणजे अमुल्य अशी ठेव आहे.
24 January, 2010
संगीतकार कौशल इनामदार यांची ग्रेट-भेट
23 January, 2010
अत्रे कट्टा कांदिवली
आचार्य अत्र्यांच्या नावाने चालवल्या जाणार्या अत्रे कट्टा या उपक्रमाला आज पहिल्यांदाच जाण्याचा योग आला. राजेश गाडे यांच्या निमंत्रणामुळे मी कांदिवलीला गेलो. सावरकर प्रेमी गायक कलाकार सतीश भिडे यांच्या देशभक्तीपर गीतांचा सुरेख कार्यक्रम ऎकता आला. थोडक्या वेळात भिडेंनी सावरकरांचा जीवनपट उलगडून दाखवला. अत्रे कट्ट्याचे कार्यकर्ते तळमळीने काम करत होते पण प्रेक्षकांची उपस्थिती आणखी असायला हरकत नव्हती.
बोरिबली, कांदिवली, डोंबिवली आणि ठाणे या ठिकाणी अत्रे कट्टा चालवला जातो. चांगले कार्यक्रम होतात त्याचे वृतांत वर्तमान पत्रात वाचायला मिळतात पण अत्रे कट्ट्यांची समंवय समिती असणे फार गरजेचे आहे जेणे करून या चार संस्थांना चांगल्या कार्यक्रमांची देवाण घेवाण करता येईल. एकत्र आल्याने अत्रे कट्ट्याची छाप समाजमनावर पडेल.
दशावतारावरचा माहितीपट
नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटरला दशावतारावर प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक अशोक राणे यांची निर्मीती असलेला माहितीपट पाहिला. कोकणची विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला म्हणजे दशावतार. कार्तिक एकादशीनंतर प्रत्येक ग्रामदेवतेसमोर ‘दहिकाला’ होतो. त्यावेळी संपूर्ण गाव देवळाजवळ जमा होतं. देवळात देवासमोर नवस फेडले जातात. देवळाभोवती लोटांगणं घातली जातात. ढोल वाजवले जातात. तर्हेतर्हेच्या वस्तूंनी सजलेली दुकानं आणि खाद्यपदार्थांची हॉटेलं हे त्या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य. उत्साहाला अगदी उधाण आलेलं असतं. पण जत्रेला मनोरंजनाचा मुख्य कार्यक्रम असतो तो म्हणजे दशावतारी नाटक. हे दशावतारी आदल्या दिवशीची जत्रा आटोपून त्याच दिवशी गावात हजर होतात. आणि बालगोपाळांना चेव चढतो. जत्रेत फिरता फिरता एक डोळा सतत त्या दशावतार्यांवर असतो. आपल्या सामानाची, मेकपची ट्रंक स्वतःच्याच डोक्यावर घेवून आलेला तो मालवणी कलाकार काही वेळात राज्याच्या वेशात सर्वांसमोर येणार असतो. सगळी मंडळी त्याची आतुरतेने वाट पहात असतात. पण त्या आधी त्या कलाकारांना आजचं कथानक, पात्र निवड यावर चर्चा करायची असते आणि त्या नंतर दिवस भराचा थकवा घालवण्यासाठी एक डुलकीसुद्धा काढायची असते. हे सगळं झाल्यावर मध्यरात्री दशावताराच्या प्रयोगाला प्रारंभ होतो. काल कृष्णाची भुमिका करणारा नट आज द्रोपदी किंवा अगदी भिमाचीही भुमिका वठवतो. कोणतीही लिखीत संहिता नसलेलं हे नाट्य हुबेहूब सादर केलं जातं. प्रत्येक वेळी संवाद वेगवेगळे असले तरी आशय तोच असतो. या लोककलेचा उल्लेख रामदास स्वामींनी त्यांच्या साहित्यात केलेला आहे. रंगमंच व्यवस्था नाही त्यामुळे नेपथ्यही नाही तरी पण केवळ संवादातून सगळं वातावरण उभं केलं जातं. पहाट होते तसे गावकरी प्रसन्न मनाने आपापल्या घरी जातात. दहिकाला हा एक सोहळाच असतो.
लहानपणी पाहिलेला हा दहिकाला अशोक राणेंच्या माहितीपटाने मनात पुन्हा जागा केला. आमचे प्रा. विजय फातरफेकर सर माहितीपटात आणि प्रत्यक्ष असे दोन्हीकडे भेटले, तसे ८४ वर्षाचे ‘दशावतार’मध्ये कुंतीची अजरामर भूमिका करणारे बाबा पालव हेही भेटले. या वयातही त्यांनी दशावतारातलं ध्रुवपद त्याच तालात, त्याच ठेक्यात गावून दाखवलं. अभिनेते शिवाजी साटम यांनी या माहितीपटाचे केलेलं निवेदनही भाव खावून गेलं.
सगळे राईटस् जनतेला
पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईं आपल्यातून निघून गेल्या तरी त्यांच्या अमोल साहित्यकृतीचा ठेवा महाराष्ट्राला रिझवत राहिल यात शंकाच नाही. पु. ल. आणि सुनीताबाईं यांनी त्यांच्या हयातीत अनेक संस्था, व्यक्तिंना मदतीचा ओघ सुरूच ठेवला होता. त्यांच्या पश्चातही पुलंच्या सर्व नाटकांच्या प्रयोगासाठी यापुढे कुणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. कलाकाराच्या मृत्यूनंतर सामान्यत: पन्नास वर्षे कॉपीराईट वारसांकडे राहतो; परंतु पुलंनी लिहिलेल्या सर्व नाटकांचे सुनीताबाई देशपांडे यांच्याकडे असलेले हक्क आता त्यांनी मराठी जनतेसाठी खुले केले आहेत. स्वत: सुनीताबाईंनी लिहिलेल्या सर्व म्हणजे सहाही पुस्तकांचे स्वामित्व हक्क (कॉपीराईट) त्यांच्या अंतिम इच्छेनुसार ‘आयुका’ या पुण्यातील खगोल विज्ञान संशोधन संस्थेला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुलंच्या पुस्तकांचे सुनीताबाईंकडे असलेले कॉपीराईटस्ही सुनीताबाईंनी आयुकाकडेच दिले आहेत.
पुलं व सुनीताबाईंचे पुतणे जयंत देशपांडे, भाची डॉ. सुचेता लोकरे व भाचे दिनेश ठाकूर यांनी सर्व पुलंप्रेमींसाठी यासंबंधात एक निवेदन प्रसिद्धीसाठी दिले असून, त्यामध्ये सुनीताबाईंच्या या इच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. मोठ्या व्यक्तिंच्या निधनानंतर नातेवाईकात वाटणीवरून वाद सुरू होतात किंवा दिवंगत व्यक्तिची अशी इच्छा पुर्ण करण्यात संबंधीत टाळाटाळ करतात. पुलंच्या या नातेवाईकांनी तसे न करता एक चांगला वस्तूपाठ समाजापुढे ठेवला आहे. तसेच आपल्या पश्चात आपल्या या ठेव्याची एवढी चांगली व्यवस्था लावून सुनीताबाईंनी जगापुढे चांगला आदर्श ठेवला आहे. त्यांना त्रिवार वंदन.
22 January, 2010
स्वप्नपंख
नवी आशा, नवे किरण
नवी स्वप्ने, नवे जीवन
नव्या वाटा, नवे सोबती
नवे वाहन, नवा सारथी
नवे आकाश, नवे क्षितीज
नवा उत्साह, नवी मिती
नवे झाड, नवी पालवी
नवा बहर, नवी कारवी
नवा पक्षी, नवे पंख
नव्या जगाचे, स्वप्नपंख
20 January, 2010
नेट शिवाय ४८ तास
गेले जवळ जवळ ४८ तास घरचं नेट चालत नव्हतं. महत्वाची कामं अडकली. ऑफिसमध्ये ही कामं करणं शक्य नव्हतं. काही लिहायचं आहे तर नेटवरचे संदर्भ वापरता येत नव्हते. आत्ता कुठे नेट चालू झालं आणि जिव खरचं भांड्यात पडला, येवढे तास तो लोंबकळत होता. तीन दिवसाचा त्रिमितीचा महोत्सव झाला त्यावर लिहायचं होतं. कौशल इनामदार, अनिल कोठावळे भेटले, ‘दशावतार लोककला कोकणची’ हा लघुउपट बघितला, पुलंची नाटकं रसिकांना अर्पण करण्यात आली असे अनेक विषय डोक्यात होते पण नेट भेटत नव्हतं. आता सुरू झालं एकदाच उद्यापासून लिहिन म्हणतो.
16 January, 2010
लोकप्रतिनिधी असाही
काल त्रिमितीच्या ‘स्वप्नांना पंख प्रेरणेचे’ या तीन दिवसांच्या महोत्सवाचा पहिला दिवस. त्यावर पोस्ट टाकिनच पण त्याच कार्यक्रमात अरविंद सावंत हे आमदार भेटले. क्रांतिकारी शिक्षणप्रयोग साकारणारे डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांची मुलाखत होती. मध्यंतरात आमदार अरविंद सावंत दांडेकर दांपत्याला भेटायला आले. बोलता बोलता राजापूरचा विषय निघाला सावंतानी आपल्या बरोबरच्या सुरक्षारक्षकाला जवळ बोलावलं. “हा सुद्धा राजापूरचा” अशी त्याची ओळख करून दिली आणि गप्पात सहभागी करून घेतला.
हल्लीचे लोकप्रतिनिधी आपण पाहतो. त्यांचा माज पाहतो. पण एक आमदार आपल्याबरोबरच्या पोलीसाला एवढ्या आत्मियतेने, आदराने वागवतो हे बघून खुप बरं वाटलं.
15 January, 2010
दुखरी जखम
तूझ्या दुखर्या जखमेवर
फुंकर कुणीच घातली नाही
ते जखमा करत राहिले
खपली कधीच धरली नाही
कधी, कधी ‘एक घाव दोन तुकडे’
होतात सहनही
पण टाचणीचं टोचत राहणं
याच्या सारखं दुखणं नाही
काटा रुतला तर तो
काढून टाकता येतो
पण आतून वाहणारी जखम
हा तर खरच ताप असतो
आता जखम केली न केली
कशाचीच तमा नाही
म्हणच आहे ‘टाकीचे घाव सोसल्या शिवाय
देवपणा येत नाही’
14 January, 2010
पतंग महोत्सव
हे फोटो अहमदाबादच्या पतंग महोत्सवाचे. दोन वर्षां पुर्वी याच दिवशी आम्ही मित्र अहमदाबादला पतंग महोत्सवासाठी म्हणून मुद्दाम गेलो होतो. पतंगांचे अनेक प्रकार, आकार, रंग आणि ते आकाशात उडवणारी माणसं. खुपच मजा आली. सगळं शहर पतंग उडवत होतं. रात्री तर भली मोठी जत्राच भरली होती, फक्त पतंग विकणारे आणि विकत घेणारे. सगळेच झपाटलेले.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
नरेन्द्र प्रभू
स्वप्नांना पंख प्रेरणेचे
13 January, 2010
जगन्नाथ कुंटेंची भेट
पार्ल्याच्या मॅजेस्टिक गप्पा मध्ये नुकताच जगन्नाथ कुंटेंना ऎकण्याचा योग आला. त्यांचं नर्मदेss हर हर हे पुस्तक वाचल्या पासून त्यांना भेटण्याची किमान पाहण्याची इच्छा होती ती या निमित्ताने पुर्ण झाली. विणा देव यांनी घेतलेली कुंटेंची मुलाखत खुपच भावपुर्ण पण रोखठोक अशीच झाली. जगन्नाथ कुंटे म्हणजे अध्यात्माचा जिताजागता ग्रंथच. अमुभूतीचे अनेक प्रसंग त्यानी त्या मुलाखतीत कथन केले. ते त्यांच्या पुस्तकांमधूनही वाचता येतात. अध्यात्माची अनुभूती आल्याशीवाय किंवा श्रद्धा असल्याशीवाय त्यांच म्हणणं कळणार नाही, पण फक्त आठवी पास असलेल्या माणसाने ‘नर्मदेss हर हर’, ‘साधनामस्त’, ‘नित्य निरंजन’ आणि ‘कालिंदी’ अशी चार विलक्षण प्रभावी तसेच प्रचंड खपाची पुस्तकं लिहावी यातच सर्व आलं.
नेट-भेट आणि मग प्रत्यक्ष भेट
आधुनिक संपर्काच्या साधनांमुळे घरातली माणसं सुद्धा प्रत्यक्ष भेटण्याचं प्रमाण कमी होत चाललय. फोन, नेट ही संपर्काची साधनं एवढी वापरली जातात त्यामुळे माणसं एकमेकांशी बोलत असली तरी ती समोरासमोर भेटत नाहीत. नेटवर मैत्री जमणं हे आता नवीन राहिलेलं नाही. विचार जुळणं, मैत्री वाढणं हे नेटवर होतं पण ती नेटकरी मंडळी कोण आहेत ? त्यांचं वय काय ? लिंग काय ? व्यवसाय काय ? राहतात कुठे ? असे अनेक प्रश्न पडलेले असतात आपण संभ्रमात असतो. ती नेटकरी मंडळी प्रत्यक्ष भेटली तर? तर काय मज्जा येईल नाही? खरच मज्जा येते. मी तो अनुभव नुकताच घेतला आहे. आमचं छायाचित्रांचं प्रदर्शन सुरू असताना मला असे एक सोडून दोन मित्र भेटले. पहिले होते हरेकृष्णजी (यांच खरं नाव सुद्धा त्या भेटीत समजलं) आणि दुसरे संदेश सामंत.
या पुर्वी ब्लॉगवर किंवा फेसबुकवर एकमेकांना अनेकवेळा अभिप्राय कळवले पण या प्रत्यक्षभेटीची मजाच न्यारी. आम्ही खुप बोललो, हसलो. नेट मुळे किंवा एकुणच आधुनिक सम्पर्क साधनांमुळे माणसं परस्परांना कमी भेटतात हे खरं असलं तरी जी माणसं कधीच भेटण्याची शक्यता नव्हती ती माणसं आधी मित्र झाली आणि नंतर याची देही याची डोळा पाहिली प्रत्यक्ष भेटली. या भेटीने खुप आनंद झाला.
10 January, 2010
कळी कोवळी
कळी कोवळी हासत आली
मध्यान्हीच्या समयास
माहित तीजला आधी होते
अजून आहे अवकाश
ती जाणत होती, माय बिचारी
किती करील ते साय्यास
करून टाकू मोकळीक मग
पडेना का थोडा त्रास !
ती निजरी, हसरी
अशी साजरी, गोड गोजीरी
ती राधेच्या कानामधली
मधूर बासरी
नरेन्द्र प्रभू
03 January, 2010
'भ्रमंती हिमालयाची’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन
‘वॉन्डररर्स’ या हौशी छायाचित्रकारांच्या भ्रमंती हिमालयाची’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन सूप्रसिध्द छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते नुकतेच पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे झाले. हौशी छायाचित्रकारांनी छायाचित्रकारांनी मांडलेले हे प्रदर्शन उत्कृष्ट असुन हा उत्साह असाच कायम ठेवावा. कॅमेर्या पेक्षा कॅमेर्या मागची नजर महत्वाची आहे. तसच पुढच्यावर्षीही मला अशा प्रदर्शनाला यायला आवडेल असं ते पुढे म्हणाले.
लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड तसेच अन्य ठिकाणांची चित्तवेधक छायाचित्र या ठिक़ाणी मांडण्यात आली असून सदर प्रदर्शन दिनांक 3 जानेवारी ते 10 जानेवारी, 2010, सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील.
02 January, 2010
'भ्रमंती हिमालयाची’ छायाचित्र प्रदर्शन
जगभरातील पर्यटकांना हिमालयाची बर्फाच्छदित शिखरे नेहमीच साद घालत असतात. अर्घ्याहुन अधिक हिमालय तर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. वॉन्डररर्सचे हौशी छायाचित्रकार गेली कित्येक वर्ष हिमालयात भ्रमंती करत आहेत. जम्मु - काश्मीर मधले लडाख, हिमाचल प्रदेश, मधील स्पिती व्हॅली, सिक्कीम. असाम, अरूणाचल प्रदेश मधले तवांग, मघालय, नागालॅन्ड आणि शेजारचा देश भुतान इत्यादी ठिकाणी गेल्या वर्षभरात फिरून काढल्ेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे.
हिमाच्छदित शिखरे, गोठलेले तलाव, खळाळत्या नद्या, चोहिकडे, रंगाची रांगोळी असलेला लडाखचा आगळावेगळा प्रांत, हिरवागार अरूणाचल, तळयांच तवांग, अदिम जनजातींचं मेघालय. आणि नागालॅन्ड शांत धिरगंभीर उत्तर सिक्किम, आणि नेत्रसूखद हिरवाई, चिड आणि पाईनचे भले थोरले वृक्ष व त्यातून बागडणाऱ्या नद्या, बौध गुंफा यांचे साम्राज्य असलेले भुतान अशा अनेक ठिकाणची मनोवेधक छायाचित्र या प्रदर्शनात पाहता येतील. या प्रदर्शनामध्ये हिमालयातील निसर्गरम्य स्थळांबरोबरच, तिथली संस्कृती, सण लोकजीवन, या सर्व गोष्टी जनसामान्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न छायाचित्रकानांनी केलेला आहे.
वॉन्डररर्स या हौशी छायाचित्रकारांच्या गटाची स्थापना श्री. आत्माराम परब यानी हौशी छायाचित्रकरांना हक्कांच व्यासपीठ मिळवून देणे आणि दुर्लक्षित पर्यटन स्थळांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचवणे या हेतुने 9 वर्षापूर्वी केली असून आतापर्यंत अनेक छायाचित्रकाराच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी आत्माराम परब, तुषार निदांबुर, नरेंद्र प्रभु, विश्वेश नाईक, सुधीर धर्माधिकारी, सुरेंद्र तांबे, मेघन पाटणकर. रेखा भिवंडिकर, गिरीष गाडे. सागर कर्णिक, सुहासीनी मुतालिक आणि स्मिता रेगे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक 3 जानेवारी ते 10 जानेवारी, 2010, सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे.
या प्र्रदशनादरम्यान हिमालयातील, भ्रमंती, लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड तसेच अन्य ठिकाणांची महिती, स्लाईड शो चित्रफित आणि मार्गदर्शन विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. संपर्क : 9892182655, 9320031910.
या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन दिनांक 2 जानेचारी 2010 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे.
वाचकसंख्या
About Me
Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
भेटशील का पुन्हा एकदा अवचित येऊन संध्याकाळी ? कळ्या कधीच्या वाट पाहती सजून येतील रानोमाळी कुपीत लपऊन सुगंध मनीचा मीही बसलो भलत्य...
-
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावर...
-
असा विसावा मनास लाभे तनास करीतो शांत निवांत पुन्हा एकदा पुढती नेतो करण्या कामे अविश्रांत पायामध्ये मासोळीची लाडीक हुळहु ळ पुन्हा एकदा...
-
पुरस्कार स्विकारताना लेखक: नरेंद्र प्रभू ग्रंथाली प्रकाशनाच्या ‘ हे प्रवासी गीत माझे , आत्माराम परब यांचा रंजक प्रवास ’ या नरेंद्...
-
या आठवड्यातील साप्ताहिक लोकप्रभाच्या पर्यटन विषेशांकामध्ये आलेला माझा लेख: अप्रतिम निसर्ग सौदर्यची खाण म्हणजे कोक...
-
संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे एप्रिल २०२२ पासून ‘ ईशान्य वार्ता ’ चं प्रकाशन बंद केलं असं वाचलं आणि का कोण जाणे हायसं वाटलं. घरात एकुलता एक म...
-
मंगेश पाडगावकरांनी माझ्या पिढीला गाणं गायला लावलं. त्यानी गद्य माणसालाही पद्य म्हणायला लावलं. कोकणातल्या माझ्या गावात डोगरावर हुंदडताना...
-
पश्चिम एक्सप्रेसने मुंबई सोडली आणि आम्ही चंदीगढच्या दिशेने निघालो . खरं तर मनाने आठ दिवस आधीच मुंबई सोडली होती . जेव्हा आत्माने ( हा आत्मा ...
-
वर्तमानपत्रात होतकरुंसाठी चार ओळींचा मजकूर छापायचे ते दिवस होते. लोकसत्तामध्ये अशीच एक बातमी वाचून प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत...
-
“अंथरूण पाहून पाय पसरावेत’, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, अशा म्हणी आणि ‘नको देवू पैसा अडका’ असली गाणी यांवरच मराठी पिंड पोसला गेला आहे....
Blog Archive
-
▼
2010
(127)
-
▼
January
(21)
- मुह मे राम....
- आत्मा
- हे खरे भारतभूषण
- निवडक नवयुग – अत्रे गौरवांजली
- संगीतकार कौशल इनामदार यांची ग्रेट-भेट
- अत्रे कट्टा कांदिवली
- दशावतारावरचा माहितीपट
- सगळे राईटस् जनतेला
- स्वप्नपंख
- नेट शिवाय ४८ तास
- लोकप्रतिनिधी असाही
- दुखरी जखम
- पतंग महोत्सव
- स्वप्नांना पंख प्रेरणेचे
- जगन्नाथ कुंटेंची भेट
- नेट-भेट आणि मग प्रत्यक्ष भेट
- कळी कोवळी
- 'भ्रमंती हिमालयाची’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन
- 'भ्रमंती हिमालयाची’ छायाचित्र प्रदर्शन
- वेगळ्या हिमालयाचे दर्शन घडविण्याचे प्रयत्न
- इमानदार ‘इनामदार’
-
▼
January
(21)
Labels
Search This Blog
My Blog List
-
Masai Mara National Reserve - Masai Mara National Reserve is a large game reserve in Narok County, Kenya, contiguous with the Serengeti National Park in Mara Region, Tanzania. Ma...5 years ago
-
Finance Fair – 2019 - *Lokmanya Seva Sangh, Parle* *P.V.Bhagwat Investment Guidance Cell* *Presents* Finance Fair – 2019 *12 & 13th January, 2019 13TH* *Enrollment* Registra...5 years ago