या आठवड्यातील साप्ताहिक लोकप्रभाच्या पर्यटन विषेशांकामध्ये आलेला माझा
लेख:
अप्रतिम निसर्ग
सौदर्यची खाण म्हणजे कोकण. भुरळ घालणारे समुद्र किनारे, उतुंग सह्याद्रीचे कडे, नागमोडी वळणांचे घाट, भरगच्च आमराया, अनोख्या देवराया, पक्षी सौदर्य, गड-किल्ले-दुर्ग आणि भुईकोट, प्राचिन मंदीरं, दिपगृह, बॅक वॉटर्स, स्नॉरकेलींग, स्कुबाडायव्हींग असे समुद्री क्रिडा प्रकार, आंबे-फणस-काजू आणि रसनेचे यच्ययावात चोचले
पुरवणारे खाद्यपदार्थ, कलाग्राम, दशावतार आणि रसाळ व इरसाल असा कोकणी माणूस सर्व प्रकारच्या पर्यटकांना
खुणावणारं असं सगळंच आहे कोकणात. खरं तर हा बारमाही पर्यटनाचा प्रदेश, पण एप्रिल-मे महिन्यात इथलं वातावरण भारलेलं
असतं.
मुंबईहून किंवा
घाट माथ्यावरच्या पुणा-कोल्हापूरहून इकडे सहज जाता येतं. कोकण रेल्वे किंवा रस्ते
मार्गे गाठता येणारा हा इलाखा आता पर्यटकांनी गजबजलेला असतो. रमत गमत कोकणात जायचं
तर रत्नागिरी जिल्ह्यातून सुरवात करता येते.
आकाशात भरारी घेणारा विहंग जसा मनसोक्त
मजा करत फिरत असतो तसंच वाटेतल्या सृष्टीसौंदर्याचा आनंद घेत, मुशाफिरी करत मुंबई- गोवा मार्गापासून थोडं
आतल्या बाजूला असलेल्या दापोलीत जावं. तिथल्या
कृषी विद्यापीठाला भेट द्यावी आणि थेट दापोली जवळच्या आंजर्ल्याला मुक्काम
ठोकावा. तिथल्या रस्त्यावरून प्रवास करताना
कोकणच्या मातीत दडलेली कला, कोकणचं निसर्ग सौंदर्य, जुनी पण सुंदर घरं
न्याहाळत, नदी, डोंगर
यांच्या साथीने चाललेली निसर्गाची अदाकारी पहात असतानाच अचानक डाव्या बाजूला अथांग
समुद्राचं दर्शन घडतं आणि आंजर्ला जवळ आल्याचा मैलाचा दगडही दिसतो. दगदगीच्या
जगापासून दूर समुद्राच्यालाटांवर स्वार होत मौज करावी आणि किनार्यालगतच्या
एखाद्या रिसॉर्ट्मध्ये किंवा होमस्टेमध्ये निवासाला जावं. प्रथम दर्शनीच त्या
परिसराच्या आपण प्रेमात पडतो. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, बागायती, सुखद हवा आणि हवीहवीशी
वाटणारी समुद्राची गाज.

मुंबई पासून २२५ कि.मी. अंतरावर असलेलं
आंजर्ले हे दापोली जवळ असलेलं एक सुंदर गाव. कोकणातल्या उत्तम निसर्ग सौंदर्याचा
अनुभव घ्यायचा असेल तर अशा गावात गेलं पाहिजे. डोंगरमाथा आणि तो उतरताच पायथ्याशी
असणारा अथांग सागर किनारा हे कोकणातल्या बहुतेक समुद्र किनार्यांचं वैशिष्ठ्य, आजर्ल्याचा किनारा
तसाच, मनाला भुरळ
पाडणारा. शांत सुंदर गाव आणि तशीच त्या वातावरणाला शोभतील अशी माणसं. नागमोडी
रस्ते, ठिकठिकाणी असलेली
मंदिरं, नारळी-पोफळीच्या
बागा, जणू काही
स्वप्नातलं गाव. गावातल्या बागांमधून थेट
समुद्र किनारा गाठता येतो. अगदी प्रायव्हेट बीच म्हणाना. तिथला निसर्ग आपलं स्वागत
करायला तयारचा असतो. आपण समुद्रावर फिरण्यात रममाण होतोच. बागायतीत रहाणं. दोन
माडांना बांधलेल्या झोपाळ्यावर झुलणं, समोर १८० अंशात पसरलेला समुद्र, तिथून येणारा गार
वारा, आवाज काय तो त्या
लाटांचाच. सुख म्हणजे नक्की हेच असावं.
आजर्ल्याच्या जवळच असलेलं हर्णै बंदर
म्हणजे मासळी प्रेमींना पर्वणीच. सामीष पोटभर जेवणाचा आस्वाद घेत मंडळी खुश झाली
नाही तरच नवल. घरगुती जेवणाची चवही तशीच न्यारी असते.
कुबेराची संपत्ती
आणि समुद्रातील धन कधी संपायचं नाही. त्यातलं समुद्रातील धन पाहायला मिळतं ते
हर्णै बंदरावर. सायंकाळच्या वेळी चमचमत्या चांदीचा वर्ख ल्यालेली मासोळी संपूर्ण बंदर
किनारा व्यापून उरलेली असते. जिकडे बघावं तिकडे मासळीच मासळी. शेकडो होड्या
बंदराला लागलेल्या असतात आणि त्यामधून आणलेलं ते धन कोळी लोक बैल गाड्यांमधून
किनार्यावर आणून आणून ओतत असतात. निवती, मालवणच्या समुद्र किनार्यावर रापण ओढून
आणलेले मासेही असेच पहायला मिळतात. तिकडे सुर्य समुद्रात डुंबण्याच्या तयारीत असतो, त्याची तिरकी किरणं, लांब पडणार्या सावल्या, वाळूत मारलेल्या रेघा आणि खारं वारं... मन प्रसन्न होवून जातं. सुर्य
मावळतीला जाईपर्यंत उत्सव साजरा होतो.

पुढच्या पडावावर रत्नागिरीपासून
जवळच २२ कि.मी. एवढ्या अंतरावर असलेलं गणपतीपुळे हे एक अप्रतिम गाव आहे. रत्नागिरी
शहर मागे सोडल्यावरच कोकणातील सुंदर गावांमधून आणि कातळावरून आपला प्रवास सुरू
होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कधी आमरायी तर कधी माडा-पोफळीची बनं लागतात आणि
पलिकडच्या समुद्रावरून येणार्या वार्याबरोबर
ही झाडं झुलत असतात. वार्याबरोबर येणारा मातीचा सुगंध तर कधी मोहराचा हवाह्वासा
वाटणारा गंध मन प्रफुल्लीत करतात. या वातावरणाचा आनंद लुटत असतानाच आरे आणि वारे ही गावं लागतात. आपला प्रवास सागर किनार्याला
लागून असलेल्या डोंगरावरून सुरू असतो आणि ही गावं आली की सागर किनार्यांचं जे
दर्शन घडतं ते खरोखराच देव दुर्लभ असं आहे. अगदी रस्त्यावर गाडी थांबऊन त्याचा
आनंद घेता येतो. गणपतीपुळ्याला पोहोचायच्या आतच मस्त मुड येतो. गणपतीपुळं जसं जवळ
येतं तशी अनेक होम-स्टे, लॉजचे बोर्ड दिसायला लागतात, पुढे ही संख्या वाढतच जाते.

कवी
केशवसुतांच्या मालगुंड या गावापासून दोन कि.मी. असलेलं गणपतीपुळे निसर्गाचं वरदान
लाभलेलं आणि विस्तीर्ण समुद्र किनार्याने नटलेलं स्वप्नातलं गाव वाटतं.
गणपतीपुळ्याच्या सागर किनार्यावरच स्वयंभू गणेशाचं मंदीर असून या मंदीराला लागून
असलेली टेकडी हेच गणेशाचं स्थान आहे. गणपतीपुळ्याला घेऊन आलेला रस्ता किनार्याजवळच
संपतो आणि तिथेच गणेश मंदीराकडे घेऊन जाणार्या वाटेवरची कमान लागते. स्वयंभू
गणेशाचं दर्शन घेऊन समोरच असलेल्या विस्तीर्ण किनार्यावर पाय ठेवताच सगळा थकवा
निघून जातो. अफाट सागराचं हे दर्शनही मन मोहून टाकतं. मंदीराला लागून असलेल्या
टेकडीला प्रदक्षीणा घालता येईल अशी दगडांनी बांधलेली पाखाडी (पाय वाट) आहे. साधारण
एक कि.मी. असलेल्या या वाटेवर पहाटेच्या वेळेस गेलं तर पांढर्या देव चाफ्यांच्या
फुलांचा सडा किंवा केतकीचा सुगंध चित्तवृत्ती फ्रफुल्लीत करतात.

देवळापासून एक
कि.मी. वर असलेल्या ‘प्राचिन कोकण’ला भेट द्यायला हरकत नाही. ५०० वर्षांपुर्वीचं कोकण आणि तिथे अस्तित्वात
असलेली बारा बलुतेदार पद्धत कशी होती, गावचे व्यवहार कसे चालत याचे काही
देखावे या ठिकाणी साकारण्यात आले आहेत.
मुख्य म्हणजे एका टेकडीवर असलेल्या या परीसराची माहिती देणारे गाईड इथे आहेत.
शेवटी असलेलं शंख-शिपल्यांचं प्रदर्शन पहाण्यासारखं आहे.
गणपतीपुळ्यापासून
दोन किमीवर असलेल्या मालगुंडला मुद्दाम भेट दिली पाहिजे ती तिथल्या कवी
केशवसुतांच्या स्मारकात जाण्यासाठी. प्राचिन कोकणमध्ये कवी माधवांची ‘हिरवे तळ कोकण’ या कवितेचं काव्य शिल्प पहायला मिळतं तर इथे मालगुंडमध्ये केशवसुतांच्या
अनेक कविता वाचायला मिळतात.
एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
ही कविता
बालभारती बरोबरच शाळेत घेऊन जाते आणि त्याच कवितेतल्या शेवटच्या कडव्यातील
पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!
या ओळी गेल्या
शंभर-सव्वाशे वर्षापासून आजपर्यंत समाजाची स्थिती आणि मागणी फारशी बदलली नसल्याची
जाणीव करून देतात. गणपतीपुळ्याच्या समुद्र किनार्यावर जर कधी फार गर्दी असेल तर
इथे मालगुंडमध्ये असलेल्या सागरकिनारी आपण विरंगुळ्याचे क्षण नक्कीच शोधू शकतो. बाकी
या गावांच्या कुठल्याही वाटेवर चालत फेरफटका मारला तर अनेक पक्षी आणि देखणी कुरणं
पहात आनंदात भर टाकता येते. क्षुदाशांतीसाठी रस्त्याच्या लगत असलेल्या हॉटेलमध्ये
चवदार पदार्थ मिळतात. अनेक खानावळी आहेत आणि रहाण्याच्या सोई बर्याच आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा देशात सर्वात स्वच्छ
जिल्हा म्हणून नुकताच जाहिर झाला आहे. कोकणातला हा निसर्गरम्य जिल्हा आता
पर्यटनाच्या नकाशावर आला आहे. हिरवा निसर्ग आणि निळेशार समुद्र किनारे हे तर या
संपुर्ण जिल्ह्याचंच वैशिष्ट्य आहे. निर्मळ सागर किनारे, नैसर्गिक तलाव, धो-धो
पडणारा पाऊस, गणपती उत्सव, दशावतार, गावोगाव भरणार्या जत्रा, प्राचीन देवळं आणि
ऎतिहासीक सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे जलदुर्ग तसंच अनेक किल्ले अशा अनेक गोष्टी
पर्यटकांना इथे नेहमीच आकर्षीत करीत आल्या आहेत.
रांगड्या सह्याद्रीच्या रांगा आणि उधाण
आलेल्या समुद्राच्या शुभ्र फेसाळत्या लाटा इथे एकमेकांना भिडतात तेव्हा तो सोहळा
पहात राहण्यासारखा असतो. संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच पर्यटन ठिकाण म्हणूनही घोषीत
झाल्याला आता बरीच वर्ष झाली. या जिल्ह्यात सगळीचं ठिकाणं पर्यटकाला मोहवून
टाकतात.
तारकर्लीचा समुद्र किनारा आता जागतीक
पर्यटनाच्या नकाशावर आहे. तारकर्लीची खाडी आणि देवबागचा समुद्र जिथे एकत्र येतात त्या
ठिकाणाहून बॅकवॉटर्समधून वालावल गावापर्यंत होडीने जाणं यासारखं सुख नाही. कर्ली
नदीच्या विस्तिर्ण पात्रातून संथ वहणारे पाणी कापत आपली नौका निघाली कि आपण सारेच
देहभान विसरून जातो. दोन्ही बाजुला असलेली गर्द झाडी, माड पोफळींच्या
बागा, त्यांच्या छायेत
विसावलेली छोटी-छोटी घरकुलं, मंदिरं , मधुनच डोकावणारं एखादं तुळशीवृंदावन, पक्षाची शीळ, खाली हिरवीगार
वनराई आणि वर आकाशाची निळाई, वार्याची झुळुक आणि खाली वाहणारं शांत, थंड पाणी. भुलोकीचा
स्वर्गच जणु. खरतर ही देवभुमीच. परमेश्वरने एकाच ठिकाणी एवढं निसर्गसौंदर्य ओतलय
याचा इतरेजनांना हेवा वाटावा असा हा दृष्टीदुर्लभ देखावा याचीदेही याचीडोळा आपण
पहातोय हे खरंच वाटत नाही.

पुढे भेटतं ते अस्सल मालवणी गाव वालावल. वालावल गावातलं
लक्ष्मिनारायणाचं प्राचीन मंदीर आणि त्याला खेटून असलेला तलाव आपल्याला गावातल्या
समृध्द वारश्याच दर्शन घडवतात. हेमाडपंथी वास्तुकलेचा नमुन असलेलं श्रीदेव
लक्ष्मीनारायण मंदिर तर बघत राहण्यासारखं. मंदिरालगतचा सुंदर तलाव आणि वनराईने
नटलेल्या या गावात विवीध पक्षांचं दर्शनही घडतं. इतर पक्षांबरोबरच धनेश (Horn-bill) हा हमखास दिसणारा
पक्षी.
पुढे आपली नाव भोगवे या गावी जाते तेव्हा तो या नौकानयनातला परमोच्य बिंदु
ठरतो. इथेच सागर-सरितेचं मिलन होतं. समुद्रपक्षांचे थवेच्या थवे इथे पाहायला
मिळतात. एवढा वेळ फिरून क्षुधाशांतीसाठी जर आपल्याला थांबायचे असेल तर येथील
गावकरी आपले तशी सोयही करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे ४२ बॅकवॉटर्स उपल्ब्ध
आहेत. नितांत सुंदर सिंधुदुर्गात नौकानयन करायला खुप वाव आहे.
सिंधुदुर्गात बॅकवॉटर्स आहेत याची कल्पना अनेकाना
नाही. मुळतच हा प्रदेश सागराने श्री. परशुरामासाठी सोडलेला आणि त्यामुळे ' परशुराम भुमी ' म्हणून ओळखला जातो.
परशुराम भुमी कशी?
तर त्याने जिंकलेली सर्व भुमी कश्यप ऋषीना दान केली. दान दिलेल्या भुमित
राहणे योग्य नाही म्हणून बाण मारून समुद्र मागे हटवला आणि जी भुमी तयार झाली ती
कोकणची भुमी. तिला " अपरांत " असेही म्हणतात. (अपर म्हणजे पश्चिम आणि
अंत म्हणजे शेवट) . सागराने ही जमिन स्वतःहुन परशुरामासाठी सोडली तरीसुध्दा
आपल्याजवळ येण्यासाठी अनेक वाटा निर्माण केल्या. अशा या नितांत सुंदर सिंधुदुर्गात
नौकानयन करायला बराच वाव आहे.
समुद्र आणि सह्याद्रीचे कडे यांचं सख्य
इथे पहायला मिळतं. भेगवे बीचच्या किनार्याने चार किलोमिटर चालत गेल्यास निवतीचा
किल्ला लागतो. पुढे डुंगोबा ही देवराई आहे. फार पुर्वीपासून इथल्या वनसंपदेला कुणी
हात लावलेला नसल्याने नेहमीपेक्षा वेगळी झाडं इथे पहायला मिळतात. समोरच्या दर्यात
आपल्याला डॉल्फीनचं दर्शनही होतं. समुद्रात बुडणारा सोन्याचा गोळा पहाताना एका
स्वप्नाची पुर्ती झालेली असते.

मालवणच्या सागरी किनाऱ्यावर दगड-खडकांनी
वेढलेल्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. चहुबाजूंनी समुद्राने वेढलेल्या या
किल्याचे क्षेत्र ४८ एकर असून, घेर दौन मैल आहे. किल्ल्यास ३२ बुरूज आहेत. तटाची
रूंदी सरासरी १0 फूट असून लांबी दोन मैल आणि उंची ३० फूट एवढी आहे. तटबंदी नागमोडी
वळणाची असून, शत्रूवर तोफा आणि
बंदुका यांचा परिणामकारक मारा करण्यासाठी तटाची रचना कौशल्यपूर्ण केली आहे. सिंधुदुर्ग
किल्ल्याचे प्रवेशव्दार पूर्व दिशेला आहे. तिथे पोहोचेपर्यंत या ठिकाणी
प्रवेशव्दार आहे हे लक्षातही येत नाही. प्रवेश व्दाराचा दरवाजा भक्कम अशा
उंबराच्या फळ्यांपासून बनवला गेला आहे. आत गेल्यावर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे.
तिथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरूजावर गेल्यावर पंधराएक मैलांचा प्रदेश
सहजच नजरेस पडतो. या किल्ल्यावर शिवराजेश्वराचं मंदिर असून आत शिवाजी महाराजांची
बैठी मुर्ती आहे. मुख्य म्हणजे या किल्ल्यावर दुधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशा
गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्याच्या बाहेर खार्यापाण्याचा समुद्र आणि आत
या गोड्यापाण्याच्या विहिरी असं हे आश्चर्य आहे. या किल्ल्यावर आजही लोक वसती करून
रहातात.
छत्रपती शिवाजी माहाराजांच्या असामान्य
कर्तृत्वाची साक्ष देत आज हा जलदुर्ग डौलाने उभा आहे. २४ नोव्हेंबर २०१४ रोजी या
किल्ल्याला तब्बल ३५0 वर्षे पूर्ण झाली. भूईकोट आणि डोंगरी किल्ल्य्यांच्या
बरोबरीने सागरी मार्गाने होणारी शत्रूची स्वारी रोखण्यासाठी या जाणत्या राजाने या
किल्ल्याची निर्मिती केली. त्या काळी एक कोटी होन एवढा खर्च आणि तीन वर्षांच्या
अविरत कामानंतर हा जलदुर्ग उभा राहिला. मालवण किनाच्यापासून साधारण अर्धा मैल
समुद्रात हा दुर्ग इतिहासाची साक्ष देत आजही डौलात उभा आहे.
सिंधुदुर्गसारखाच आणखी एक जलदुर्ग या
जिल्ह्यात आहे तो म्हणजे विजयदुर्ग.
गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमिटर आणि मुंबईच्या दक्षिणेस २२५ किलोमिटर
एवढ्या अंतरावर विजयदुर्ग किल्ला असून एकूण १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. तीन
बाजूने पाण्याने घेरलेल्या या किल्ल्यात एका बाजूने जमिनीवरुन प्रवेश करता येतो.
शिवाजी महाराज्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे एकेकाळी या जलदुर्गाचे
प्रमुख होते. ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला
आहे. या किल्ल्यावरही गोड्या पाण्याची
विहिर असून त्या विहिरीपासून फक्त विस फुटांवर समुद्र आहे.

वरील दोन्ही किल्ल्यांच्या बाजूला अप्रतिम
समुद्र किनारे असून संपूर्ण सिधुदुर्ग जिल्ह्यालाच सागर किनारा लाभला आहे. या
प्रत्येक सागर किनार्याचं स्वत:चं असं वेगळं वैशिष्ट्य आहे. वेंगुर्ल्याच्या सागर
किनार्याजवळ बर्न्ट रॉक्स हे दिपगृह दिसतं. हे दिपगृह
समुद्र किनार्यालगतच्या डोंगररावर असल्याने तिथे सहज जाता येतं. देवगडचं स्वयंभू शिवालय कुणकेश्वर मंदिरही
सागर किनार्याला खेटूनच उभं आहे. ११ व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान
म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल.
जसं
कुणकेश्वर मंदिर सागर किनार्यावर आहे तसा रेडीचा गणपतीही रेडी बंदरजवळ आहे. दोन
हाती गणेशाची ही मुर्ती स्वयंभू असून ती खाणकाम करताना सापडली. श्री. गणेशाची
मूर्ती जांभा दगडावर कोरलेली असून आसनस्थआहे. ६ फ़ुट उंच आणि साडे चार फ़ुट रुंद
अशी ही लंबकर्ण गणेशाची अति दिव्य
, देखणी, प्रसन्न, विशाल मूर्ती पाहिल्यावर भाविकांना प्रसन्नता
वाटते. पुराणकाळात पांडवानी आणि ॠषिमुनींनी अनेक ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरांची
स्थापना केली होती. त्यावेळची ही स्वयंभू गजाननमूर्ती असावी असा जाणकारांचा व
अभ्यासकांचा अंदाज आहे.
निसर्ग निर्मित धामापूरचं तळं, गंजिफा हा
खेळ खेळण्याचे पत्ते आणि लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना असलेला मोती तलावाजवळचा
सावंतवाडीचा जुना राजवाडा, सावंतवाडी जवळच असलेलं कलाग्राम, सावंतवाडीची लाकडी
खेळणी, तारकलीचं सी वर्ल्ड, अशी अनेक ठिकाणं इथे भेट देण्यासारखी आहेत.
आंबोली या थंड हवेच्या ठिकाणाला भेट
दिल्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याची सफर पुर्ण होत नाही. आंबोली हे सिंधुदुर्गातलं
थंड हवेचं ठिकाण. सदाहरीत प्रकारात मोडणारं दाट वनराईने वेढलेलं जंगल असलेली आंबोली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे.
सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान
निसर्गरम्यता आणि चांगलं हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्या, अप्रतिम
सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचं वैशिष्ट्य आहे. आंबोलीच्या नजीकच्या परिसरात
सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. येथील हिरण्यकेशी नदी
मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. नदीवर १० कि.मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे.
महादेवगड, मनोहरगड आदि जुने
किल्लेही नजीकच्या अंतरावर आहेत. कावळेसाद हे तीन बाजूंनी दरीने वेढलेलं ठिकाण तर
कायमचं लक्षात रहातं. आंबोलीचे जंगल दाट असल्याने सभोवतालच्या परिसरात अनेकदा
रानडुकरे, ससे, गवे, बिबटे, चितळ आदी वन्य
प्राणी आढळतात. सहसा न दिसणार्या पक्ष्यांचंही येथे दर्शन घडतं.
एकूण काय सिधुदुर्ग जिल्यात कुठेही गेलं
तरी समुद्र आणि सह्याद्रीचे कडे यांचं सख्य पहायला मिळतं. अनेक देवराया तिथली नेहमीपेक्षा
वेगळी झाडं, दर्यात उड्या मारणारे डॉल्फीन, समुद्रात बुडणारा सोन्याचा गोळा, निळं
आकाश, स्वच्छ हवा, माश्यांचं चमचमीत जेवण वाढणार्या खानावळी, देवगडचा जग प्रसिद्ध
हापूस, फणस, करवंद-जांभूळ, काजू असा रान मेवा, दशावताराच्या खेळांबरेबर मिळणारं
मालवणी खाजं, शहाळी याचा मनमुराद आवाद घ्यायचा तर या तळकोकणात एकदा तरी गेलंच
पाहीजे. या सर्वांबरोबर मालवणी भाषेची लज्जत अनुभवली पाहिजे.
नरेंद्र प्रभू