आज सकाळी घराबाहेर पडताना सेफ्टीडोअर बंद केलं, पण ते बंद झालं नाही. पुन्हा ढकललं. नाही, उपयोग झाला नाही. लॅच तपासलं तर ते बरोबर होतं. जरा वर खाली केलं तेव्हा ते बंद झालं. पुन्हा घरी आल्यावर तेच. अरे काय झालं, कालपर्यंत व्यवस्थित होतं. थोडा विचार केला. गेल्या आठ दिवसात वातावरण बदललं आहे. हवेतल्या बाष्पाचं प्रमाण कमी झालं आहे. पावसाळ्यात दारं जरा घट्ट होतात. कोरडेपणामुळे या दिवसात सैल झालेलं दार थोडं कललं असावं. वरच्या बाजूला दाब देवून ते जरा ढकललं. ते व्यवस्थित बंद व्हायला लागलं. तेव्हा विचार आला, प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतं.
तुम्ही म्हणाल, हे काय, निर्जीव दाराचं काय म्हणणं असणार? पण रोजच्या सारखं ते लागलं नाही म्हणजे काहीतरी बिघडलंच नाहीका? मित्रहो, गोष्टी खुप शुल्लक वाटतात, छोट्या तक्रारी असतात तेव्हाच त्या निस्तरायच्या असतात. नाहीतर काट्याचा नायटा कधी होतो ते समजतच नाही. जेव्हा समजतं तेव्हा मोठं नुकसान झालेलं असतं. अगदी बारीकसं दुखणं आहे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचं रुपांतर मोठ्या दुखण्यात होतं. कधी कधी जीवावर बेततं. जे शारिरीक दुखण्याचं तेच मानवी संबंधांचं. एखादी गोष्ट खटकते, मुलांच्या वागण्यात बदल होतात. बायको नीट बोलत नाही. मित्र रस्ता बदलतो, तेव्हा....., तेव्हा त्या प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतं. बघा विचार करून. आपल्या बाबतीत असं काही असेल तर त्याकडे लक्ष द्या. आपण सगळेच सतत पळत आहोत. थांबून विचार करायला कुणालाच वेळ नाही. असं असलं तरी मित्रहो, थोडं थांबा, छिद्र लहान असतानाच ते बुजवा. गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. गोष्टी विकोपाला जायच्याआधी ती तक्रार ऎका, प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतंच.